सूरज चव्हाण : 'झापुक झुपूक' करत 'बिग बॉस' ते रुपेरी पडद्यापर्यंतचा 'गुलिगत' प्रवास

'रीलस्टार' आणि बिग बॉस मराठीच्या 5 पर्वाचा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे.

टीव्हीच्या लहान पडद्यावर आपल्या साध्या भोळ्या स्वभावानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला सूरज आता मोठ्या पडद्यावर जादू दाखवण्यास सज्ज झालाय. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे, पायल जाधव आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याऱ्या सूरजचा प्रवास अतिशय खडतर राहिलाय.

गुलीगत धोका, झापुक झुपूक रील्सच्या माध्यमातून फॅन्सच्या मनावर राज्य करणाऱ्या सूरजचा पडद्यामागचा खडतर प्रवास जाणून घेऊया.

रील्सस्टार ते बिग बॉस मराठी 5 च्या विजेतेपदापर्यंत

'रीलस्टार' सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता ठरला होता. गायक अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघेजण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.

अखेरीस अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा निवेदक रितेश देशमुखनं सूरज चव्हाणचा हात उंचावत विजेता घोषित केलं.

या पर्वातील 16 सदस्यांना मागे टाकत बारामतीच्या सूरजने आपल्या 'झापुक झुपूक' अंदाजात ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

सूरज विजयी ठरल्यानं गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

बिग बॉसच्या या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला ट्राफीसह 14 लाख 60 हजार रुपये रक्कम मिळाली, तसंच इतर अनेक बक्षीसांचा वर्षावही झाला होता.

विशेष म्हणजे, बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर त्यांनी लगेचच चित्रपटाला सुरुवात केली आणि शुक्रवारी (25 एप्रिल) हा चित्रपट प्रदर्शितही झाला.

हालाखीच्या स्थितीतून यशोशिखरपर्यंत

सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील आहे. बारामतीतलं मुडवे हे त्याचं गाव आहे.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सूरजचं बालपण गेलं. सूरज 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि ती आजारी पडली. या आजारपणातूनच पुढे सूरजच्या आईचंही निधन झालं.

आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी, अशा या भावंडांनी एकमेकांना आधार दिला.

आत्या व मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं. यानंतर हाताला मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवू लागला.

हालाखीच्या स्थितीतून जात असतानाच, सूरजच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.

भारतात तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू होता. सूरजनंही टिकटॉकवरून आपला ऑनलाईन प्रवास सुरू केला.

टिकटॉकवरील रिल्सच्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करू लागला. टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर सूरज इन्स्टाग्रामकडे वळला.

इन्स्टाग्रामवरुनही त्यानं चाहत्यांचं मनोरंजन सुरू ठेवलं. इन्स्टाग्रामवर आजच्या घडीला त्याचे तब्बल 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 'बुक्कीत टेंगूळ', 'गुलीगत धोका', 'झापुक झुपूक' अशा शब्दांमुळे तो नेटकऱ्यांत चांगचाल प्रसिद्ध झाला, यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली.

बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजने आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कलाकारांशी त्याची स्पर्धा होती. त्यातच त्याला खेळ समजत नाही, अशी टीकाही त्याच्यावर सातत्याने होत राहिली.

मात्र, या सर्व अडथळ्यांना पार करत त्याने आपला मार्ग शोधला. त्याचा संघर्ष आणि साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांही त्याला तशीच दाद दिली आणि आज सूरज चव्हाण हे नाव घराघरात पोहोचलंय.

आमची परिस्थिती नव्हती, वाटत नव्हतं तो इतक्या वर जाईल म्हणून.. पण तो शून्यातून वर आला, याचा आनंद आहे, अशी भावना सूरजच्या बहिणीनं 'एबीपी माझा'ला मुलाखत देताना व्यक्त केली.

'बिग बॉस' विजेता ठरल्यानं सूरजला बक्षीस काय मिळालं?

बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात विजयी ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. या पर्वातील ट्रॉफीसह विजेत्या सूरजला पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसस्वरुपात 14 लाख 60 हजारांचा चेक मिळाला.

त्यासह कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स यांच्याकडून सूरजला 10 लाख रुपयांचा धनादेश जाहीर करण्यात आला.

एक इलेक्ट्रिक बाईकही त्याला बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.

सोबतच, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणाही केली आहे.

याआधी गायक उत्कर्ष शिंदे यांनी गिफ्ट म्हणून शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाणसाठी एक गाणं बनवण्याची घोषणाही केली होती.

बिग बॉसच्या 5 व्या पर्वात कोणी भाग घेतला?

बिग बॉस मराठी हा अत्यंत लोकप्रिय असा रिएलिटी शो आहे. प्रेक्षक प्रत्येक सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा बिग बॉस मराठीचं 5 वं पर्व होतं तर चित्रपट अभिनेता रितेश देशमुख या शोचा निवदेक होता.

तर सहभागी प्रतिस्पर्धकांमध्ये निक्की तंबोळी, पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे, इंडियन ऑयडल 1 फेम गायक अभिजीत सावंत, आयरिना रुडाकोवा, अरबाज शेख, अभिनेत्री वर्षा उसगावकर, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण अशा 16 सदस्यांनी या सहभाग घेतला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)