टायटॅनिक : टायटन पाणबुडीत बुडालेल्या दाऊद कुटुंबाचं 'हे' आहे भारतीय कनेक्शन

    • Author, रियाज सोहेल आणि तन्वीर मलिक
    • Role, बीबीसी उर्दू

दाऊद कुटुंबाचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या टायटन पाणबुडीच्या अपघातात ज्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यातले दोन या दाऊद कुटुंबातले होते. शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान अशी त्यांची नावं.

टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा पाण्याच्या दाबाने स्फोट झाला आणि यातल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला.

दाऊद कुटुंब पाकिस्तानातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. शहजादा दाऊद अँग्रो कॉर्पोरेशनचे व्हाईस चेअरपर्सन होते. ही कंपनी खतं, खाद्यपदार्थ आणि उर्जा क्षेत्रात काम करते.

या कुटुंबाचा व्यवसाय पाकिस्तान, तसंच पाकिस्तानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्याशिवाय या कुटुंबातल्या व्यक्ती आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सामाजिक कामांमध्येही भाग घेतात.

या दाऊद कुटुंबाचं भारत कनेक्शन सुद्धा आहे.

दाऊद कुटुंबाच्या व्यवसायाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा एक अनाथ तरुण अहमद दाऊदने एका गाडीवर कपड्यांचे तागे विकायला सुरुवात केली आणि मग नंतर मुंबईत यार्नचं (कृत्रिम धागे) दुकान उघडलं होतं.

तर याच दाऊद कुटुंबाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कौटुंबिक व्यवसायाची सुरुवात

पाकिस्तानातलं मोठं उद्योगपती कुटुंब असलेल्या दाऊद कुटुंबाच्या व्यवसायाची सुरुवात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका लहानशा दुकानातून झाली. काही दशकातच या कुटुंबाचा व्यवसाय फोफावला.

याचे प्रमुख अहमद दाऊद यांचा जन्म काठियावाडमधल्या बाँटवा गावात झाला. हे शहर भारतातल्या सौराष्ट्रात येतं.

त्यांचे वडील व्यापारी होते. त्यांनी फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. लहानपणीच त्यांचे वडील वारले त्यामुळे त्यांना लहानाचं मोठं त्यांच्या आजोबांनी केलं.

‘अहमद दाऊद, एक पॅकर-ए-औसाफ’ (अहमद दाऊद : सर्वगुणसंपन्न व्यक्ती) या पुस्तकाचे लेखक उस्मान बाटलीवाला लिहितात की, अहमद दाऊद यांनी 16 व्या वर्षी मुंबईत ठेल्यावर कापडाचे तागे विकून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली तर दाऊद इन्वेस्टमेंटच्या वेबसाईटनुसार अनाथ असलेल्या तरुण दाऊदने एक छोटंसं यार्नचं दुकान काढून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी 1920 साली हे दुकान उघडलं असल्याचे उल्लेख आहेत.

उस्मान बाटलीवाला अनेकदा अहमद दाऊद यांना भेटले होते. ते लिहितात की, “अहमद सांगायचे त्यांची आई खूप प्रतिभावंत आणि हुशार महिला होत्या. त्या आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास जागवायच्या. त्यामुळे मुलांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.”

मेमन समुदायावर पुस्तक लिहिणारे उमर अब्दुल रहमान लिहितात की, त्यांनी कापूस पिंजण्याचा कारखाना (जिनिंग मिल) काढला. याशिवाय तेलाचे घाणे आणि वनस्पती तुपाच्याही फॅक्टरी सुरू केल्या.

बघता बघता दाऊद कुटुंबाचा व्यवसाय कलकत्ता (कोलकाता), मद्रास (चेन्नई), कानपूर, मथुरा, लुधियाना आणि दिल्लीसारख्या अनेक ठिकाणी पसरला.

उस्मान लिहितात की, “जेव्हा त्यांनी खाद्य तेलाचा कारखाना काढला तेव्हा त्यांचा व्यवसाय कित्येक पटींनी वाढला. या व्यवसायात त्यांनी आपले भाऊ सुलेमान दाऊद अली, अली मोहम्मद दाऊद, सिद्दीकी दाऊद आणि सत्तार दाऊद या सहभागी करून घेतलं.”

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दाऊद कुटुंब काही काळासाठी ब्रिटनला गेलं. काही वर्षं तिथे काढल्यानंतर ते पाकिस्तानात परत आले. त्यांनी मँचेस्टर आणि पाकिस्तानात दाऊद प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी काढली.

पाकिस्तानात लष्करी राजवट आणि दाऊद कुटुंब

पाकिस्तानाला दीर्घ काळासाठी लष्करी राजवटीचा इतिहास आहे. पण दाऊद कुटंबाला लष्करी राजवटीचा फायदाच झाला.

मार्शल अय्युब खान यांच्या कारकीर्दीत कराची आणि बोरेवाला इथे असणाऱ्या कापड गिरण्या वाईट अवस्थेत होत्या.

या गिरण्या सरकारी संस्था पाकिस्तान इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चालवत होतं, पण परिस्थिती अगदीच खालावत चालली होती.

त्यामुळे अय्युब खान यांना सल्ला देण्यात आला की जर या गिरण्या अहमद दाऊद यांना चालवायला दिल्या तर त्या चांगल्या प्रकारे नफा कमावू शकतील. अहमद दाऊद आणि त्यांच्या भावांनी हा सौदा मान्य केला.

उस्मान लिहितात, “तेव्हा ना या व्यवहारासाठी बोली लागली ना लिलाव झाला. सरळ गिरण्या दाऊद कुटुंबाकडे सुपुर्द केल्या गेल्या आणि कुटुंबाने त्यासाठी ठरलेली रक्कम मोजली.”

दाऊद कुटुंबाच्या कराचीतल्या लांढी भागात आधीच कापड गिरण्या होत्या.

पश्चिम पाकिस्तानात यश मिळाल्यानंतर दाऊद कुटुंब पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये नशीब आजमावण्यासाठी गेलं.

ही संधीही अय्युब खान सरकारने साधली. तिथल्या कर्णफुली पेपर मिल्स आणि कर्णफुली कापड गिरण्या तिथल्या मजुरांच्या संपामुळे आणि इतर गोष्टीमुळे तोट्यात चालल्या होत्या.

उस्मान बाटलीवाला लिहितात की, “कालाबागच्या नवाबाने अहमद दाऊद यांना सुचवलं की त्यांनी हे कारखाने विकत घ्यावेत. दाऊद कुटुंबाने हे कारखाने विकत घेतले आणि तोट्यातून नफ्यात आणले.”

कर्णफुलीचा कारखाना हा पाकिस्तानातला एकमेव कारखाना होता जिथे बांबूपासून कागद बनायचा.

जानेवारी 1969 साली न्यूयॉर्क टाइम्सने अहमद दाऊद कुटुंबाला पाकिस्तानातलं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत कुटुंब म्हटलं होतं. त्यांच्या एकूण संपत्तीचं मुल्य तेव्हा 20 कोटी डॉलर्स होतं.

त्यावेळी त्यांच्याकडे कापूस, लोकर, कापड, यार्न, केमिकल्स, खनिकर्म, बँकिग, इन्शुरन्स, कागद आणि खतांचे कारखाने होते.

1971 साली पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश वेगळा झाला. त्यावेळी कर्णफुली पेपर मिल, दाऊद मायनिंग, दाऊद शिपिंग यासह अनेक कारखाने आणि व्यवसायांवर परिणाम झाला.

उस्मान बाटलीवाला म्हणतात की, “त्यावेळी संपूर्ण दाऊद कुटुंबाचं 30-35 कोटीचं नुकसान झालं होतं.”

पाकिस्तानातल्या सर्वात श्रीमंत ’22 कुटुंबांपैकी एक’

फील्ड मार्शल जनरल अय्युब खान यांच्या शासन काळात डॉक्टर महबूल हक यांनी बजेट भाषणादरम्यान यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तानात 60 ते 80 टक्के संपत्ती फक्त 22 कुटुंबाच्या ताब्यात आहे.

पण त्यांनी या कुटुंबांची नावं सांगितली नाहीत.

पण ही गोष्ट समोर आल्यानंतर पाकिस्तानात एका विरोधी आवाजाने जन्म घेतला. पाकिस्तानातले शायर हबीब जालिब यांनी लिहिलं की -

बीस घराने है और करोडो है नाशाद

हम पर अबतक जारी है, काली सदियों की बेदाद

सदर अय्युब जिंदाबाद

(नाशाद - विपन्नावस्थेत, बेदाद – अत्याचार)

यानंतर झुल्फिकार अली भुट्टो समाजवादी घोषणा देत सत्तेत आले. त्यांनी सत्तेत आल्यानंतर त्या श्रीमंत कुटुंबाना चिन्हित केलं आणि इशारा दिला की आता पाकिस्तानाला पैशाची गरज आहे, त्यामुळे या कुटुंबांनी त्यांचा पैसा पाकिस्तानात परत आणावा नाहीतर त्यांना अटक करण्यात येईल.

त्यानंतर झुल्फीकार अली भुट्टो यांनी दाऊद कुटुंबासह अनेक कुटुंबांची मालमत्ता जप्त केली.

त्या 22 कुटुंबापैकी 14 कुटुंब मेमन होती आणि त्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं कुटुंब दाऊद होतं.

अहमद दाऊद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यांची सुटका झाल्यानंतर ते अमेरिकेला निघून गेले. त्या वेळी त्यांना ‘2 अब्ज रुपयांचं’ नुकसान झालं असं म्हणतात.

दाऊद यांनी अमेरिकेत एका तेलकंपनीसोबत व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी एका ठिकाणी खोदलं तर त्यांना तिथे पेट्रोल सापडलं.

जेव्हा पाकिस्तानात जनरल झिया उल हक यांनी भुट्टो सरकार बेदखल करून सत्ता काबीज केली, तेव्हा अहमद दाऊद यांच्या कुटुंबाचे चांगले दिवस परत आले.

जनरल झियांच्या काळात अहमद दाऊद पाकिस्तानात परत आले आणि त्यांच्या उद्योगधंद्यांमध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू झाली. झियांसोबत अहमद यांचे चांगले संबंध होते.

उस्मान बाटलीवाला यांच्यामते अहमद दाऊद यांचे 20 असे व्यवसाय होते जे त्यांनी आपल्या जीवनकाळातच आपल्या भावांमध्ये वाटून टाकले. सुलेमान दाऊद अली, अली मोहम्मद दाऊद, सिद्दीक दाऊद आणि सत्तार दाऊद यांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची कमान सोपवली.

ज्याच्या वाटेला जे उद्योग आले ते त्यांनी पुढे नेले.

दाऊद कुटुंबातील महत्त्वाचे पदाधिकारी

सध्या दाऊद फाउंडेशनचे प्रमुख अहमद दाऊद यांचा मुलगा हुसेन दाऊद हे आहेत.

पाकिस्तानातील दाऊद कुटुंबातील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे रज्जाक दाऊद. ते माजी लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या काळात वाणिज्य सल्लागार होते. त्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य-व्यापार मंत्रालयही सांभाळलं होतं.

रज्जाक दाऊद हा सुलेमान दाऊद यांचा मुलगा असून अहमद दाऊद हे त्यांचे बंधू आहेत. रज्जाक दाऊद हे डिस्कॉन इंजिनिअरिंग कंपनीचे सर्वेसर्वा आहेत.

दुसऱ्या बाजूला शहजादा दाऊद यांचे वडील हुसेन दाऊद आणि कुटुंबीय अँग्लो कॉर्पोरेशन आणि दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशनचे मालक आहेत.

टायटन दुर्घटनेत प्राण गमावलेले शहजादा दाऊद हे एन्ग्रोचे व्हाईस चेअरमन होते.

एन्ग्रो आणि दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशन

व्यवसाय संस्थांच्या कामगिरी आणि रेटिंगवर काम करणाऱ्या पाकिस्तान क्रेडिट रेटिंग एजन्सी नुसार, एन्ग्रो कॉर्पोरेशनची स्थापना 1965 मध्ये झाली होती. त्यावेळी या संस्थेचं नाव ईसो पाकिस्तान फर्टिलायझर कंपनी असं होतं. मारी गॅस फील्डनंतर या संस्थेची स्थापना झाली.

या संस्थेतून परदेशी भागीदार बाहेर पडल्यानंतर तिचं नाव अॅग्रो केमिकल करण्यात आलं. ही कंपनी खतांच्या क्षेत्रात कार्यरत होती, नंतर इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा पुढे आल्यानंतर तिचं नाव अॅग्रो कॉर्पोरेशन असं करण्यात आलं. या कॉर्पोरेशन अंतर्गत दहाहून अधिक कंपन्या काम करतात.

अॅग्रो कॉर्पोरेशन ही पाकिस्तान स्टॉक मार्केटमधील एक सूचीबद्ध कंपनी आहे. या कंपनीचे बहुतांश शेअर्स दाऊद कुटुंबीय आणि त्यांच्याच मालकीच्या संस्थांकडे आहेत. शहजादा दाऊद हे अॅग्रो कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष होते तर त्यांचे वडील हुसेन दाऊद हे त्याचे अध्यक्ष आहेत. शहजादा दाऊद यांचे बंधू समद दाऊद या कंपनीचे डायरेक्टर आहेत.

हुसैन दाऊद आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीची दुसरी मोठी कंपनी दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशन आहे. याचे शेअर्स देखील दाऊद कॉर्पोरेशनकडेच आहेत.

हुसैन दाऊद हे दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत तर त्यांचा मुलगा समद दाऊद उपाध्यक्ष आणि शहजादा दाऊद संचालक आहेत.

हुसैन दाऊद आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता असलेल्या अँग्लो कॉर्पोरेशन आणि दाऊद हरक्यूलिस कॉर्पोरेशन या शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सामान्य लोकांव्यतिरिक्त संस्थांचेही शेअर्स आहेत. पण या कंपनीचे बहुतांश शेअर्स दाऊद कुटुंबाकडे आहेत.

'पाकरा' नुसार, अॅग्रो कॉर्पोरेशनच्या बोर्डावर सर्वाधिक सदस्य हे दाऊद कुटुंबाचे आहेत.

दाऊद कुटुंबाच्या कंपन्या आणि पाकिस्तानातील मालमत्ता

हुसैन दाऊद आणि त्यांच्या मुलांकडे हर्क्युलस कॉर्पोरेशन

आणि अॅग्रो कॉर्पोरेशनमध्ये सर्वाधिक शेअर्स आहेत. या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

दाऊद हर्क्युलस समूहाच्या वार्षिक अहवालानुसार, या समूहाच्या विविध सहयोगी कंपन्या आणि उपकंपन्यांद्वारे भांडवल गुंतवले जाते. उदाहरणार्थ, अॅग्रो कॉर्पोरेशनचे, अॅग्रो फर्टिलायझर्समध्ये 56 टक्के शेअर्स आहेत.

अहवालानुसार, 2022 पासून या समूहाने ऊर्जा, अन्न आणि कृषी, पेट्रोकेमिकल, रासायनिक साठवणूक, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात सात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

'अँग्रो एक्झिम अॅग्री' मध्ये कॉर्पोरेशनचे 100% शेअर्स आहेत. अॅग्रो एनर्जी टर्मिनलमध्ये त्यांचे 56 टक्के शेअर्स आहेत तर अॅग्रो एनर्जी लिमिटेडमध्ये 100 टक्के शेअर्सची मालकी आहे.

सिंध सरकारच्या एन्ग्रो कोल मायनिंग कंपनीत हुसैन दाऊद यांच्या कुटुंबाच्या अॅग्रो कॉर्पोरेशनचे 11 टक्के शेअर्स आहेत. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार केमिकल क्षेत्रातील अॅग्रो पॉलिमर आणि केमिकलमध्ये कॉर्पोरेशनचे 56 टक्के शेअर्स आहेत.

अॅग्रो कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे सुमारे 750 अब्ज रुपयांची एकूण मालमत्ता आहे.

अॅग्रो कॉर्पोरेशनच्या 2022 च्या वार्षिक अहवालानुसार, संपूर्ण वर्षात 46 अब्जांचा नफा झाला आहे. दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशनच्या वार्षिक आर्थिक अहवालानुसार, 2022 मध्ये त्यांचा नफा साडेतीन अब्ज रुपयांपेक्षा जास्त होता.

वार्षिक अहवालानुसार दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशनने विविध क्षेत्रात दोन हजारांहून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. तर दुसरीकडे अॅग्रो कॉर्पोरेशनच्या विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांहून जास्त आहे.

अॅग्रो कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 2022 मध्ये सामाजिक क्षेत्रात 84 कोटी रुपये खर्च केलेत. यात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण इत्यादींचा समावेश आहे.

कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 2022 मध्ये सरकारकडे 29.5 कोटी डॉलर कर जमा केलाय, तर त्याची उपकंपनी एन्ग्रो एनर्जीने पाकिस्तानमधील 90,000 घरांना वीज पुरवली आहे.

पाकिस्तान क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या मते, दाऊद समूहाच्या मालकीच्या एन्ग्रो कॉर्पोरेशनची कामगिरी चांगली आहे. त्याची दीर्घकालीन कामगिरी प्लस एए आहे आणि कंपनीची स्थिती मजबूत आहे.

दाऊद कुटुंबाचे शिक्षण, विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान

पाकिस्तानमध्ये 1961 साली दाऊद फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. याचं उद्घाटन जनरल अयुब खान यांच्या हस्ते करण्यात आलं. दाऊद कुटुंबाने शिक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं.

फाउंडेशनच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना सेठ अहमद खान म्हणाले की, त्यांनी पूर्व पाकिस्तानातील म्हैसूर शहरात शाळेची इमारत बांधली. तसेच बोरेवाला येथील सरकारी महाविद्यालयासाठी विज्ञान शाळा बांधली. कराची येथील ग्रामीण भागातील दरसानु छन्नू मध्ये एक शाळा बांधली.

दाऊद फाउंडेशनने 1962 मध्ये कराचीत दाऊद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली. हे महाविद्यालय पाकिस्तानमधील खाजगी क्षेत्रातील पहिलं व्यावसायिक अभियांत्रिकी महाविद्यालय होतं. या महाविद्यालयात रासायनिक अभियांत्रिकी, धातूशास्त्र आणि साहित्य अभियांत्रिकी या क्षेत्रांचं शिक्षण दिलं जायचं.

पुढे झुल्फिकार अली भुट्टो सरकारच्या काळात या महाविद्यालयाचं राष्ट्रीयीकरण झालं आणि त्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण आलं.

1983 साली कराचीमध्ये अहमद दाऊद गर्ल्स पब्लिक स्कूलचा पाया रचण्यात आला. आजही या शाळेत अडीच हजारांहून अधिक मुलींना शिक्षण दिलं जातं. याशिवाय लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आणि कराची विद्यापीठात दाऊद कुटुंबाच्या नावाने बिझनेस स्कूल आहेत.

1991 मध्ये कराचीत स्थापन झालेल्या पाकिस्तानातील यूरोलॉजी अँड ट्रान्सप्लांटमध्येही दाऊद कुटुंबाचा मोठा वाटा आहे.

या संस्थेतील डॉ. गौहर यांच्या म्हणण्यानुसार, बशीर दाऊदने येथे कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. यातून तीन मोठ्या इमारती बांधण्यात आल्या. याठिकाणी लहान मुले आणि कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय डायलिसिस आणि प्रत्यारोपणासाठी मशिनरी खरेदीसाठीही मदत केली जाते.

दाऊद फाऊंडेशनने कराचीमधील सार्वजनिक जागेत टीडीएफ (द दाऊद फाऊंडेशन) घराची रचना केली. 1930 च्या दशकात बांधलेल्या या घरामध्ये फर्निचर आणि ग्रामोफोन्स आणि कराचीच्या इतिहासाशी संबंधित वस्तू आहेत. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची समाधी देखील इथून दिसते.

कराचीमधील मध्यमवर्गीयांसाठी पहिली सहकारी संस्था म्हणजे टीडीएफ घरं. ही घरं जमशेद क्वार्टरमध्ये स्थित आहे. हा कराचीच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ही संस्था 1920 मध्ये जमशेद नसरवानजी (टाटा) यांनी स्थापन केली होती. इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू एकत्र राहायचे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)