केरळमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, 'टॉयलेट सीट चाटायला लावली', आई वडिलांचा आरोप

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

शाळा, महाविद्यालयांमधील रॅगिंगचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. कठोर कायदे अस्तित्वात असूनही असे प्रकार दिसतात. अशाच एका घटनेत एका 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे केरळ राज्यात खळबळ उडाली आहे.

रॅगिंगच्या या घटनेतून शाळा व्यवस्थापन आणि पालकांमधील तीव्र विरोधाभास समोर आला आहे.

जीपीएस इंटरनॅशनल स्कूलमधील केंब्रिज आयजीएसईचा नववीत शिकणाऱ्या मिहीर अहमद या विद्यार्थ्याने 15 जानेवारी रोजी आत्महत्या केली. शाळेतून घरी आल्यानंतर लगेचच त्यानं आत्महत्या केली.

(महत्त्वाची सूचना : बातमीत काही माहिती विचलित करणारी आहे.)

शाळेतून घरी जाताना 'मिहीरची वर्तणूक सामान्य होती आणि तो आनंदात होता', असं शाळेकडून सांगण्यात आलं. तर दुसरीकडे ''त्यानं आत्महत्या करावं असं घरी काही घडलंच नव्हतं,'' असं त्याचे काका शरीफ यांनी 'बीबीसी हिंदी'ला सांगितलं.

'जस्टिस फॉर मिहीर' पोस्ट का डिलीट केली?

मिहीरच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर सोशल मीडियावर 'जस्टिस फॉर मिहीर' नावाची एक पोस्ट करण्यात आली होती. परंतु, 9 दिवसांनंतर ती पोस्ट 'सोशल मीडिया'वरुन अचानक हटवण्यात आली. तेव्हा मिहीरच्या कुटुबींयांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. या कृतीमुळे हे गूढ अधिकच गंभीर झालं.

त्या पोस्ट्समुळं ''आम्हालाही धक्का बसला'', असं ग्लोबल पब्लिक स्कूलच्या (GPS) प्रवक्त्यानं 'बीबीसी हिंदी'ला सांगितलं.

या पोस्टमुळं मिहीरच्या पालकांना पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी एक सर्वसमावेशक असा ठोस आधार तयार झाला. मिहीरची आई राजना यांनी या घटनेची तपशीलवार माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची हीच पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

''सरकार या संपूर्ण घटनेकडं गांभीर्यानं पाहत असल्याचं,'' केरळचे शिक्षण मंत्री के. शिवनकुट्टी यांनी 'बीबीसी हिंदी'ला सांगितलं.

शिक्षण संचालकांना मिहीरच्या शाळेत चौकशीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून येत्या दोन दिवसांत अहवाल येणं अपेक्षित असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं.

'टॉयलेट सीट चाटायला लावली'

मिहीर त्या दिवशी दुपारी 2.45 वाजता शाळेतून परतल्यानंतर अवघ्या तासाभरात आमचं ''जग उध्वस्त झालं'' असं राजना यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.

मुलानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेण्यासाठी मिहीरच्या मृत्यूनंतर, त्यांनी आणि त्यांच्या पतीने त्याच्या मित्रांकडून, शाळेतील सहकाऱ्यांकडून माहिती गोळा केली, त्यांच्या पोस्ट पडताळून पाहल्या.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ''मिहीरवर शाळेत आणि स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं रॅगिंग, दादागिरी आणि मारहाण केली होती.''

''अंगावर शहारे येतील असे पुरावे आम्ही गोळा केले. मिहीरला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि शेवटच्या दिवशीही त्याला मानसिक त्रास देण्यात आला. त्याचा भयंकर पद्धतीने अपमान केला गेला.

त्याला जबरदस्तीनं वॉशरूममध्ये नेण्यात आले, टॉयलेट सीट चाटायला लावली आणि टॉयलेट फ्लश करुन त्यात त्याचं डोकं ढकललं. त्याला अशा क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं की, मिहीर अक्षरशः आतून तुटत गेला,'' असं राजना यांनी म्हटलं आहे.

राजना पुढे म्हणाल्या की, ''दिसण्यावरून त्याला त्रास दिला जात होता. त्याच्या मृत्यूनंतरही त्यांनी ही क्रूरता संपवली नाही. एक खळबळजनक चॅटचा स्क्रीनशॉट त्यांची क्रूरता समोर आणतो. त्यांनी 'fxxk nigga तो आता मेला आहे' असा मेसेज पाठवला आणि मिहीरच्या मृत्यूचा आनंद साजरा केला.''

या घटनेबाबतची माहिती समोर यावी म्हणून त्याच्या मित्रांनी 'जस्टिस फॉर मिहीर' ही सोशल मीडिया पोस्ट मोहीम सुरू केली होती. पण ''शाळेनं सत्य दडपण्यासाठी विद्यार्थ्यांना धमकावत सोशल मीडियावरील हे पेज आणि पोस्ट हटवली,'' अशी शंका त्याच्या आई-वडिलांना आहे.

''शाळेत त्याच्याबाबत काय सुरू आहे, तो कोणत्या अवस्थेतून जात आहे, हे घरी समजू नये, असं मिहीरला वाटत होतं,'' असं त्याच्या मित्राकडून समजल्याचं शरीफ म्हणाले.

''या प्रकरणात किती जण गुंतले होते ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की, ते सर्व 'प्लस वन' आणि 'प्लस टू'चे विद्यार्थी होते.

आम्हाला मिळालेली सर्व नावे आम्ही पोलिसांकडे दिली आहेत. ती इतर मुलं कोण आहेत याचा आम्ही शोध घेतला नाही. ते कोणीही असोत आम्हाला त्यांची पर्वा नाही. आम्हाला फक्त मिहीरला न्याय हवा आहे,'' असं शरीफ म्हणाले.

शाळेकडून बचावाचा प्रयत्न

''आमच्या तपासातून सध्या काहीही उघड झालेलं नाही. आम्ही इतर मुलांशी तसंच मिहीरशी संवाद साधणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी बोललो आहोत,'' असं शाळेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

''हे पाहा, मिहीर फक्त 39 दिवसच आमच्यासोबत होता. एवढ्या दिवसांत त्याच्याबाबतीत कोणताच अनुचित प्रकार घडला नव्हता. त्याच्या देहबोलीत उदासीनता दिसत नव्हती,'' असंही प्रवक्त्यानं म्हटलं.

''तो त्याच्या पूर्वीच्या शाळेतून काही मुद्दे, गोष्टी घेऊन आला असला तरीही तो आमच्यासोबत आनंदी होता, असं आमच्या चौकशीत आम्हाला समजलं."

शाळा सुरू झाल्यावर लगेचच, ''शाळेच्या समुपदेशकांनी मिहीर आणि त्याच्या इतर वर्गमित्रांसह वर्गात एक अॅक्टिव्हिटी घेतली. त्यानंतर, तो शाळेत स्थिरावला. मुळातच तो एक सामान्य मुलगा होता.''

रॅगिंगचा आरोप करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना प्रवक्त्यानं शाळेतील सुरक्षा यंत्रणेबाबतही माहिती दिली.

ते म्हणाले की, ''जर आपण आमच्या सुरक्षा यंत्रणा पाहिल्या तर लक्षात येईल की, आमच्याकडे वर्गात कॅमेरे आहेत, कॉरिडॉरमध्ये कॅमेरे आहेत, प्रत्येक वॉशरूमच्या बाहेर कर्मचारीही नेमले आहेत. मुलांचे आणि मुलींचे शौचालय वेगवेगळ्या मजल्यावर आहेत, एकाच मजल्यावर नाहीत.''

शाळेतील शेवटच्या दिवशीही तो सकाळी त्याच्या बास्केटबॉल शिबिरासाठी गेला होता. घटनेच्या दोनच दिवस आधी तो शाळेच्या एका मॉडेल युनायटेड नेशन्सच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य होता. या कार्यक्रमाच्या दोनच दिवस आधी तो आयआयएम-यूएन परिषदेत गेला होता.

त्यानंतर 14 जानेवारी रोजी शाळेत एक घटना घडली. त्यात मिहीरनं दुसऱ्या एका मुलाला कुठल्या तरी कारणावरुन ठोसा मारला. हा प्रकार लंच ब्रेक दरम्यान घडला होता.

परंतु, दुर्दैवाने ज्या मुलाला ठोसा लागला त्याच्या नाकातून थोडंसं रक्त आलं. इतर दोन विद्यार्थ्यांनी त्याला उपचारासाठी नेलं," असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

शाळेच्या नियमांनुसार मुख्याध्यापकांनी दुसऱ्या दिवशी चारही विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून या घटनेची माहिती दिली.

''त्यावेळी मिहीरचे वडीलही आले होते. त्याच्या वडिलांनी त्याला तुझ्यासाठी ही दुसरी संधी आहे. अशा गोष्टींमध्ये तू अडकू नकोस, असा सल्ला दिला.

भूतकाळाबद्दल काही बोलू नका असं शाळेच्या प्रमुखांनी त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी त्याचे वडील शाळेतून निघून गेले,'' असं शाळेचा प्रवक्ता म्हणाला.

ते म्हणाले की, ''मिहीरनं त्याचं इंग्रजीचं पुस्तक तिथंच ठेवलं. खरं तर त्याला दुसऱ्या दिवशीच्या रिव्हिजनसाठी त्याची गरज होती. पुस्तक उद्या घेईन असं त्यानं शिक्षकांना सांगितलं.

सर्व मित्रांना बाय करून तो स्कूल बसमधून निघून गेला. त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत असलेली काही मुलंही त्याच्याबरोबर गेली.''

रॅगिंगच्या घटना का वाढत आहेत?

तिरुवनंतपुरम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग आणि बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयप्रकाश आर यांनी ''रॅगिंगचे वाढते प्रकार ही सार्वत्रिक समस्या आहे. ती एका राज्यापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही,'' असं म्हटले आहे.

''रॅगिंग हा कनिष्ठ विद्यार्थ्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. हे आक्रमक वर्तन मूलभूत मानसशास्त्र आहे. याचा मूळ गाभा हा हिंसा आणि आक्रमकता आहे,'' असं डॉ जयप्रकाश यांनी 'बीबीसी हिंदी'ला सांगितलं.

''पण या प्रकारच्या मुलांची समस्या अशी आहे की, त्यांना संवाद कौशल्यात अडचण येते, कसं वागावं कळत नाही. त्यामुळं, पालकांनी आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवणं आवश्यक आहे. जेणेकरुन मुलं संभाषण तसंच वर्तणूक कौशल्यं शिकतील,'' असेही ते म्हणाले.

''सामान्यपणे, किशोरवयीन मुलं त्यांचा ताण किंवा मानसिक ताण त्यांच्या पालकांशी किंवा भावंडांशी शेअर करत नाहीत. जर आई-वडिलांशी जवळीक चांगली असेल तर ते त्यांच्या समस्या सांगण्यास तयार असतील.''

''पण जर हे सर्व पर्याय उपलब्ध नसतील तर मुलं आत्महत्या करतात. प्रौढ व्यक्तीप्रमाणे ही सुनियोजित आत्महत्या नसते,'' असं डॉ. जयप्रकाश म्हणाले.

मुलांना आव्हानांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी पालकांनी तसंच शिक्षकांनी जीवन-कौशल्य प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचे, त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मिहीरच्या आत्महत्येप्रकरणी तिघांची चौकशी सुरू आहे. सरकारनं सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

शिक्षण संचालकांकडूनही याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं या घटनेची स्वतःहून (Suo Motu) दखल घेतली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटलं आहे की, "केरळमधील मिहीर अहमदच्या आत्महत्त्येची घटना ऐकून प्रचंड यातना झाल्या. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.

मिहीरने जो सोसलं ते कोणत्याही मुलाने सोसू नये. मुलांसाठी शाळा अत्यंत सुरक्षित असायला हव्यात मात्र तरीही मिहीरला बरंच काही भोगावं लागलं. या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

अशाप्रकारे रॅगिंग करुन दमदाटी करणं एखाद्याचं आयुष्य उद्धवस्त करणारं असू शकतं. पालकांनी मुलांना दयाळूपणा, प्रेम, सहानुभूती आणि बोलण्याचं धैर्य द्यायला हवं. जर तुमचं पाल्य सांगत असेल की त्याला धमकावलं जात आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवून वेळीच हस्तक्षेप करायला हवा."

प्रियांका गांधी यांनीही या प्रकरणी भाष्य करत मिहीरच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.