बँकिंग क्षेत्रात नोकरी करायचीय? परीक्षा कधी आणि कशी असते? जाणून घ्या सर्वकाही

    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बँक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कर्ज घेणं, पैसे जमा करणं आणि मुदतठेवी (एफडी) करणं या गोष्टी येतात.

मात्र, बँका फक्त याच कामांसाठी नसतात. तिथे नोकरी करता येते, करियर घडवता येतं. बँकांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी असतात.

नोकरीच्या बाबतीत सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश देशातील टॉप पाच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये होतो.

खासगी क्षेत्रातील बँकांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी असते.

मात्र, या नोकऱ्या कशा मिळवाव्यात, त्यासाठी काय प्रक्रिया असते?

यासाठीचा मार्ग म्हणजे आयबीपीएस, यातून सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळते.

IBPS काय असतं?

ज्याप्रकारे सिव्हिल सेवांसाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससी परीक्षा घेतं. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरभरती करण्यासाठी जी संस्था आहे तिचं नाव आयबीपीएस आहे.

याचा अर्थ इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन.

ही एक ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त संस्था आहे. सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरभरती करण्यासाठी ही संस्था दरवर्षी परीक्षा घेते.

आयबीपीएस सात प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेते.

  • क्लर्क
  • प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)
  • स्पेशॅलिस्ट ऑफिसर (एसओ)
  • रीजनल रुरल बँक (आरआरबी) ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3
  • ऑफिस असिस्टंट

सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका आणि 43 प्रादेशिक ग्रामीण बँका, यामध्ये आयबीपीएसद्वारे परीक्षा घेऊन नोकरभरती केली जाते.

यात बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांचा समावेश आहे.

मात्र देशातील सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआयचा यात समावेश नाही.

कारण स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरभरतीसाठी स्वत:च परीक्षा घेते आणि त्याचं नोटिफिकेशनदेखील स्वत:च जारी करते.

IBPS परीक्षेत किती टप्पे असतात?

या परीक्षेत मुख्यत: तीन टप्पे किंवा लेव्हल असतात.

  • प्रीलिम्स किंवा प्राथमिक परीक्षा
  • मेन्स किंवा मुख्य परीक्षा
  • मुलाखत

क्लर्कच्या पदासाठी फक्त दोनच टप्पे असतात, प्रीलिम्स आणि मुख्य परीक्षा. क्लर्क आणि पीओ यांच्यासाठीच्या परीक्षेचे पॅटर्नदेखील वेगळे असतात.

ही परीक्षा कोणाला देता येते?

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असते. मात्र ढोबळमानानं या परीक्षेला बसण्यासाठी काही अटी असतात, त्या पुढीलप्रमाणे,

  • पीओची परीक्षा देण्यासाठी भारतीय नागरिक असलं पाहिजे.
  • वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असलं पाहिजे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे.
  • कॉम्प्युटरबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे.

जर एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील बँकेत नोकरभरती करायची असेल तर तिथल्या अधिकृत भाषेबद्दल माहिती असणंदेखील आवश्यक आहे.

पीओसाठी प्रादेशिक भाषेची अट बंधनकारक नाही.

तन्वी आयबीपीएस परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या शिक्षिका आहेत. या अटींमागचं कारण सांगताना त्या म्हणतात की क्लर्कच्या परीक्षेत उमेदवाराची भरती त्यांच्या प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिलेल्या राज्यांमध्ये होते. तर पीओला भारतात कुठेही पाठवलं जाऊ शकतं.

मात्र आरआरबी म्हणजे रीजनल रुरल बँकेसाठी पीओ आणि क्लर्क म्हणजे सर्व परीक्षांसाठी भाषा कौशल्य म्हणजे लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट देणं बंधनकारक असतं.

वयाच्या अटीच्या बाबतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, माजी सैनिक आणि अपंगासह वेगवेगळ्या श्रेणीत येणाऱ्या उमेदवारांना 3 ते 10 वर्षांची सूट मिळते.

क्लर्कच्या पदासाठी परीक्षा द्यायची असेल तर,

  • उमेदवाराचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असलं पाहिजे.
  • तो भारताचा नागरिक असला पाहिजे.
  • त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेची पदवीच्या समकक्ष पदवी हवी.

बँकिंग परीक्षा आहे म्हणून तुम्ही कॉमर्सचे पदवीधारक असणं बंधनकारक नाही. कला किंवा विज्ञान शाखेतील तरुणदेखील ही परीक्षा देऊ शकतात.

मात्र स्पेशॅलिस्ट ऑफिसर म्हणजे एसओसाठी संबंधित विषयातील शिक्षण आवश्यक असतं. उदाहरणार्थ लॉ ऑफिसर असेल तर एलएलबी आणि मार्केटिंग मॅनेजर असेल तर एमबीए इन मार्केटिंग असणं आवश्यक असतं.

परीक्षेचा पॅटर्न काय असतो?

या परीक्षांचा पॅटर्नदेखील वेगवेगळा असतो. पीओच्या परीक्षेत प्रीलिम्सचे तीन सेक्शन असतात.

  • इंग्रजी भाषा
  • क्वॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड
  • रीजनिंग ॲबिलिटी

मुख्य परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह, दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

  • ऑब्जेक्टिव्ह सेक्शनमध्ये रीजनिंग आणि जनरल/इकॉनॉमी/बँकिंग अवेयरनेस, इंग्रजी भाषा आणि डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन असतं.
  • डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनमध्ये इंग्रजी भाषेशी संबंधित पत्र लेखन आणि निबंध लेखनाचे प्रश्न असतात.

आयबीपीएसमधून आता कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड काढून टाकण्यात आलं आहे. मात्र एसबीआयच्या परीक्षेत ते अजूनही आवश्यक आहे.

मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना शेवटी मुलाखत द्यावी लागते.

मात्र एसबीआयच्या परीक्षेत मुलाखतीव्यतिरिक्त एक ग्रुप एक्सरसाईजदेखील असते. याला आधी ग्रुप डिस्कशन म्हटलं जायचं. मात्र आता त्याला ग्रुप एक्सरसाईज म्हणतात.

त्याचबरोबर आता आयबीपीएस आणि एसबीआय या दोघांनीही ही परीक्षा पास होण्यासाठी सायकोमेट्रिक टेस्ट किंवा पर्सनॅलिटी टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे.

क्लर्कच्या पदासाठी फक्त प्रीलिम्स आणि मुख्य परीक्षा द्यावी लागते.

प्रीलिम्समध्ये इंग्रजी भाषा, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रीजनिंग ॲबिलिटीसारखे सेक्शन असतात.

मुख्य परिक्षेत रीजनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्रजी भाषा, क्वॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल/ फायनान्शियल अवेयरनेस सेक्शन असतात.

यातील जनरल आणि फायनान्शियल अवेयरनेस या विषयात काही वेगळे प्रश्न विचारले जातात.

उदाहरणार्थ बँकिंग व्यवस्था कशाप्रकारे काम करते, आरबीआय कशाप्रकारे काम करते, महागाईवर कसं नियंत्रण ठेवलं जातं. बँकांचं नियमन कसं केलं जातं, बँकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय कायदा काय आहे.

परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी नेगेटिव्ह मार्किंग पद्धती असते आणि पुढील टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला कट-ऑफ मार्क्स मिळवावे लागतात.

यासाठीची मेरिट लिस्ट तयार होते. क्लर्क आणि पीओ या दोन्ही पदांसाठी प्रीलिम्स क्वॉलिफाईंग परीक्षा असते. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते, मात्र मेरिटमध्ये या परीक्षेतील गुण धरले जात नाहीत.

क्लर्कची मेरिट लिस्ट फक्त मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारेच तयार होते.

तर पीओसाठी मुलाखतीचा टप्पादेखील असतो. त्यामुळे एकूण गुण मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे ठरतात. या दोन्हींसाठीचं वेटेज काही पेपेरमध्ये 80:20 असं असतं, तर काहीमध्ये ते 75:25 असं असतं. यात मुख्य परीक्षेला अधिक वेटेज दिलेलं असतं.

किती पगार मिळतो आणि तयारी कशी करायची?

सर्वसाधारणपणे आरआरबी म्हणजे ग्रामीण बँकांमध्ये क्लर्क म्हणून नियुक्ती झाल्यावर सुरुवातीचा पगार 25 हजार ते 35 हजार दरम्यान असतो.

वेगवेगळ्या ठिकाणांनुसार मिळणाऱ्या भत्त्यांवर पगाराची रक्कम ठरते.

म्हणजेच लोकेशननुसार भत्तेदेखील बदलतात आणि त्यानुसार पगारदेखील बदलतो.

तर आयबीपीएस क्लर्कचा पगार 30 हजार ते 40 हजारांदरम्यान असते. एसबीआय क्लर्कसाठीचा पगार 35 हजार ते 45 हजारांदरम्यान असतो.

आरआरबी म्हणजे ग्रामीण बँकांमध्ये पीओ म्हणून नियुक्ती झाल्यावर सुरुवातीला 55 हजार ते 65 हजारांदरम्यान पगार असतो.

आयबीपीएस पीओसाठी 60 हजार ते 80 हजारादरम्यान पगार असतो. तर एसबीआय पीओसाठीचा पगार 80 हजार ते दीड लाखादरम्यान असतो.

आयबीपीएसच्या परीक्षेचं वेळापत्रक दरवर्षी 15-16 जानेवारीला आयबीपीएसच्या वेबसाईटवर येतं. दरवर्षी ही परीक्षा होते.

तन्वी म्हणतात, "वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच उमेदवारांना माहित असतं की परीक्षा कधी असणार आहे, मुलाखत कधी होणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो आणि इतर गोष्टींबद्दल आधीपासून स्पष्टता असते."

या परीक्षेची तयारी कशी करावी?

तन्वी यांना वाटतं, "उमेदवारांनी स्पीड म्हणजे वेगावर लक्ष दिलं पाहिजे. कारण संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करणं हे परिक्षेच्या तयारीच्या फक्त 30-40 टक्के भागच आहे. याव्यतिरिक्त त्यांनी किमान 50 मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात त्यांना परीक्षा पास होता येईल."

खासगी बँकांमध्ये कशा मिळतात नोकऱ्या?

सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकाव्यतिरिक्त देशात खासगी क्षेत्रातील जवळपास 20 मोठ्या बँका आहेत. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यासारख्या मोठ्या बँका आहेत.

या बँकांमध्येदेखील नोकरीच्या संधी असतात. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांप्रमाणेच खासगी बँकांमध्ये कोणत्याही परीक्षा घेतल्या जात नाहीत. खासगी बँकांमध्ये वर्षभर भरती सुरू असते. ती शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि मुलाखतीच्या आधारे केली जाते.

खासगी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी काय करावं?

  • सर्वात आधी पदवीवर व्हावं. या बँकांमध्ये बी.कॉम, बीबीए आणि बीएमएस (बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) या पदव्यांना प्राधान्य दिलं जातं.
  • इकॉनॉमिक्स, फायनान्स किंवा बँकिंगमध्ये पदवी घ्यावी.
  • इतकंच काय बीए, बी.एससी. किंवा इंजिनिअरिंगचे पदवीधर देखील सेल्स किंवा कस्टमर सर्व्हिससारख्या एंट्री लेव्हलच्या पदांसाठी अर्ज करू शकतात.
  • सर्वसाधारणपणे बँका वृत्तपत्रांमधून भरतीसाठी जाहिरात देत नाहीत. बहुतांश नोकर भरती ऑनलाईन स्वरूपात किंवा रेफरल पद्धतीनं होते. याबाबतीत सक्रिय राहिल्यास ते उपयोगी ठरतं.
  • बँकेच्या वेबसाईटवर असणाऱ्या करियर पेजला नियमितपणे पाहिलं पाहिजे.
  • जॉब पोर्टवर प्रोफाईल बनवावं.
  • तुमच्या शहरात होणाऱ्या वॉक-इन मुलाखतीची माहिती ठेवावी.
  • जर तुम्ही कॉलेजात असाल आणि पदवीचं शिक्षण पूर्ण होणार असेल, तर तुमच्या कॉलेजचं प्लेसमेंट सेल बँकांबरोबर काम करतं का याची माहिती घ्यावी.
  • इंटर्नशिपवर लक्ष देणं. अनेक बँका अशा आहेत, ज्या इंटर्नना फुल-टाईम नोकरी देतात.
  • सर्वसाधारणपणे खासगी बँकांमध्ये काही आठवड्यांमध्येच नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
  • पहिल्या राऊंडमध्ये ऑनलाईन ॲप्टिट्यूड किंवा सायकोमेट्रिक टेस्ट होऊ शकते.
  • यानंतर मुलाखत घेतली जाते, ती ऑनलाईन स्वरुपात किंवा प्रत्यक्षरित्या घेतली जाऊ शकते.
  • काही बँका ग्रुप डिस्कशन देखील घेतात. विशेषकरून सेल्सशी संबंधित पदांसाठी त्या ग्रुप डिस्कशन घेतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)