You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कामाची वेळ संपल्यानंतर बॉसच्या कॉल किंवा मेसेजला उत्तर देणं बंधनकारक नाही, काय आहे हा नियम?
- Author, जोआओ द सिल्वा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियात कंपनी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ हा एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नियम आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कामाची वेळ संपल्यानंतर ऑफिसचे फोन किंवा मेसेजचा रिप्लाय देण्याची सक्ती नसणार आहे.
या नवीन कायद्याने कर्मचाऱ्यांना बॉसकडून कोणत्याही भीतीशिवाय कामाच्या तासांनंतर फोन किंवा मेसेज आले तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
ऑस्ट्रेलियातील लोक कोणत्याही मोबदल्याशिवाय वर्षातून सरासरी 280 तास ओव्हरटाईम करतात, असं गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात नोंदवले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर हा कायदा आणला आहे.
युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील 20 हून अधिक देशात या प्रकारचा कायदा आहे. या कायद्यानुसार बॉसने किंवा व्यवस्थापनाने तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ते गैर नाही, पण कर्मचाऱ्यांनी त्या कॉलला किंवा मेसेजला उत्तर देण्याचे बंधन नाहीये.
म्हणजे, समजा जर तुमच्या बॉसने तुमच्याशी कामाचे तास संपल्यानंतर संपर्क साधला आणि कर्मचाऱ्याने त्याला उत्तर दिले नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करता येणार नाही.
या नियमानुसार मालक आणि कर्मचाऱ्यांना आपसातील वादविवाद त्यांच्या पातळीवर सोडवण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील.
पण जर वाद सुटत नसेल तर ऑस्ट्रेलियातील फेअर वर्क कमिशन (FWC) यात हस्तक्षेप करू शकतं.
FWCच्या आदेशांचं पालन न केल्यास कर्मचाऱ्यांवर 19 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 10 लाख रुपये) दंड तर कंपनीवर 94 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 53 लाख रुपये) पर्यंतचा दंड लावू शकतो.
कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड युनियन परिषदने म्हटलंय की, “या कायद्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाच्या तासांव्यतिरिक्त जर त्यांच्याशी व्यवस्थापनाने संपर्क साधला तर त्याला उत्तर न देण्याचे स्वातंत्र्य तर मिळेलच पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स ( काम आणि आयुष्यातील संतुलन) साधणे देखील सोपे होईल."
एका वर्क प्लेस विशेषज्ञाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की हा नवा नियम कंपन्यांसाठी किंवा नोकरी देणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल.
स्विनबर्न युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीचे जॉन हॉपकिन्स म्हणाले, “कोणत्याही संस्थेचे कर्मचारी जे वेळेवर विश्रांती घेतात आणि ज्यांचे 'वर्क लाइफ बॅलन्स' चांगले असते ते आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि कंपनी सोडून जाण्याची शक्यता कमी असते. यामुळे कर्मचाऱ्यांना तर फायदा होईलच, पण ते कंपन्यांनीही फायदा होईल.”
या नवीन नियमावर कर्मचाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
जाहिरात क्षेत्रात कार्यरत रेचेल अब्देलनॉर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले “अशा प्रकारचे नियम असायला हवे, असे मला वाटते. आम्ही आमचा अधिकतर वेळ फोनमध्ये घालवतो. पूर्ण दिवस इमेलवर गुंतलेले असतो. त्यामुळे हे अगदी पूर्णपणे बंद करणं कठीण काम आहे. तर काहींना या नवीन नियमाने काहीच बदल होणार नाही, असं वाटतं.”
वित्त विभागात कार्यरत डेव्हिड ब्रॅनन यांनी रॉयटर्सला सांगितलं, “ही खूप चांगली कल्पना आहे, असं मला वाटतं. मला अपेक्षा आहे की लोकांना ती आवडेल. मात्र, आमच्या क्षेत्रात ही किती यशस्वी ठरेल याबाबत मला शंका आहे.”
पुढे ते म्हणाले, “आम्हाला चांगला पगार मिळतो, त्यामुळे आम्ही चांगला रिजल्ट द्यावा, अशी अपेक्षा आमच्याकडून केली जाते. त्यामुळे आम्हाला 24 तास काम करावं लागेल असं वाटतंय."