नितीन गडकरींना उमेदवारी देऊन भाजपनं खरंच 'या' चर्चांना पूर्णविराम दिलाय?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी हिंदी

2019 ची ही गोष्ट. लोकसभेचं कामकाज सुरू होतं. सभागृहात बसलेले गडकरी उठले आणि म्हणाले, 'हे माझं सौभाग्य आहे की सर्व पक्षांच्या खासदारांना वाटतं की मी चांगलं काम करतोय."

त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांचा टेबल वाजवून त्यांच्या विधानाला समर्थन दिलं.

आणखी एक वर्ष मागे गेलं तर 2018 साली सोनिया गांधींनी गडकरींचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. त्यांनी रायबरेलीत असताना त्यांच्या मंत्रालयाच्या कामाची प्रशंसा केली होती.

गेल्या दहा वर्षात असे अनेक प्रसंग घडलेत जेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी गडकरींचं कौतुक केलंय. विशेषत: जेव्हा विरोधकांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करायचं असतं, तेव्हा तर हमखास या गोष्टी घडतात.

बऱ्याचदा विरोधक नितीन गडकरींना 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगले संबंध नसलेले भाजपचे नेते' म्हणून पुढे करतात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे पक्षात गडकरींवर अन्याय करत असल्याचं काँग्रेस नेते वेळोवेळी सांगत असतात.

मात्र, गडकरींची ही प्रतिमा केवळ विरोधकांमुळे तयार झालीय असं नाही. ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी गडकरींची विधानंही कारणीभूत ठरली आहेत.

जुलै 2022 मध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की, त्यांना राजकारण सोडावंसं वाटतं कारण त्यांना आयुष्यात राजकारणाव्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.

तिकीट मिळाल्यावर नितीन गडकरी काय म्हणाले?

दुसऱ्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की, राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांना वाटतं की त्यांनी केलेल्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. पण मी पक्षाध्यक्ष नाही आणि अशी सौदेबाजी मला मान्य नाही.

या विधानांनंतर तीन आठवड्यांनी गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यात आलं. सोबतच भाजपने त्यांना केंद्रीय निवडणूक समितीमधूनही काढून टाकलं. त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला.

जेव्हा गडकरींना संसदीय मंडळातून काढून टाकण्यात आलं, तेव्हा गडकरी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून दुरावत चालल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता.

त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नितीन गडकरींना तिकीट देणार नाही असा कयास होता.

मात्र, भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव जाहीर करून, या सर्व कयासांना पूर्णविराम दिला.

बुधवारी (13 मार्च) भाजपने 72 उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून भाजपने 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेत.

नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले.

गडकरींनी लिहिलंय की, "भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने नागपुरातून उमेदवारी देऊन माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. यासाठी मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि निवडणूक समितीचे आभार मानतो. गेल्या 10 वर्षात मी खासदार म्हणून नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. जनतेच्या प्रेमाच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर हे कार्य भविष्यातही चालू राहील, याची मी खात्री देतो."

नागपुरातील उमेदवारी आणि गडकरींनी दिलेली प्रतिक्रिया हे पाहता त्यांच्या तिकीट रद्द झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना ऑफर

मागच्या काही दिवसांत एका बातमीची खूप चर्चा सुरू होती. स्वतः गडकरींनाच पुढे येऊन यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की, नितीन गडकरींना भाजपमध्ये आपला अपमान होतोय असं वाटत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं. 2024 च्या निवडणुकीत ते जिंकतील याची आम्ही खात्री करू.

ठाकरे म्हणाले होते की, "मी दोन दिवसांपूर्वी गडकरींना हे म्हटलो होतो आणि पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती करतोय. तुमचा अपमान होत असेल तर भाजप सोडून महाविकास आघाडी (एमव्हीए) मध्ये सामील व्हा."

ठाकरे इथेच थांबले नाहीत, तर आमचं सरकार आल्यास आम्ही नितीन गडकरींना मंत्री करू आणि ते आमच्या सरकारमध्ये 'मंत्री विद पॉवर' असतील असं म्हणाले होते. हा खरं तर एक टोमणा होता ज्यात शिवसेना (यूबीटी) प्रमुखांना असं सांगायचं होतं की, "गडकरी मंत्री आहेत पण त्यांच्याकडे अधिकारच नाहीत."

या आवाहनाला नितीन गडकरी यांनी एका सभेत प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, हे बालिश आणि मूर्खपणाचं विधान आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले होते.

त्यांच्या या विधानामुळेच नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.

मात्र बुधवारी भाजपने अशा सर्व चर्चा धुडकावून लावल्या.

संसदीय मंडळाच्या बाहेर आणि चर्चेला हवा

नितीन गडकरी हे आरएसएसच्या आवडत्या नेत्यांपैकी एक मानले जातात. 2009 मध्ये संघाच्या सूचनेवरून त्यांना महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवण्यात आलं आणि ते पक्षाचे अध्यक्ष झाले.

तेव्हापासून भाजपच्या केंद्रीय राजकारणात गडकरी महत्त्वाचे राहिले. पण 2022 मध्ये भाजपच्या संसदीय मंडळाच्या यादीने सर्वांनाच आश्चर्यात टाकलं.

इथूनच गडकरी आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या.

2022 मध्ये भाजपने संसदीय मंडळ सदस्यांची यादी जाहीर केली होती आणि या यादीत नितीन गडकरींना स्थान दिलं नव्हतं. त्यांना केंद्रीय निवडणूक समितीतूनही काढून टाकण्यात आलं.

भाजपच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांचे आणि अमित शाहांचे संबंध फारसे चांगले नव्हते.

प्रदीप सिंह यांनी पुढे सांगितलं की, "ही गोष्ट गडकरींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील आहे. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशामुळे अमित शाह गुजरातबाहेर दिल्लीत राहत होते. अमित शहा जेव्हा सभापतींना भेटायला जायचे तेव्हा त्यांना तासनतास बाहेर ताटकळत उभं राहावं लागायचं. त्यावेळी शाहांचे दिवस फार काही चांगले नव्हते. गडकरी अचानक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. पण काळाचं चक्र फिरलं. डिसेंबर 2014 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय होणार होता."

"शाह त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष होते. गडकरींना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण ते होऊ शकले नाही. पण त्यांना धक्का याचा बसला की त्यांच्या समोर लहानाचे मोठे झालेले नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून संधीची वाट पाहणाऱ्या गडकरींना आता संधी मिळाली आहे. मोदी-शाह यांच्यावर हल्ला चढवण्याची हीच योग्य संधी असल्याचं त्यांना वाटतंय."

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नितीन गडकरींना विचारण्यात आलं होतं की, विरोधी पक्ष आणि राजकारणातील एक गट मोदी विरुद्ध गडकरी असं नॅरेटिव्ह चालवताना दिसतो. असं म्हटलं जातं की, दोघेही भाजपच्या वेगवेगळ्या तंबूत दिसतात.

या प्रश्नावर गडकरी म्हणाले होते की, "हे अत्यंत दुःखद आहे. मी केलेल्या विधानांचा वेगळा अर्थ काढण्यात आलाय. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणेचं साधन आहे. या भावनेने मी काम करतो. आधी देश, मग पक्ष, मग मी अशी पक्षाची विचारधारा आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र विकास होत आहे. पंतप्रधानपदासाठी आमच्यात चुरस नाहीये. निवांत बसलेले लोक वेगवेगळे अर्थ काढून याचं विश्लेषण करत बसलेत."

"आता स्पष्ट सांगायचं तर मंत्री माजी मंत्री होतात… खासदार माजी खासदार होतात पण कार्यकर्ता नेहमीच कार्यकर्ता असतो. तो कधीच माजी होत नाही. मी माझ्या आयुष्यातील 20 वर्ष या पक्षाला दिली आहेत. रात्रंदिवस काम केलंय. मला पंतप्रधान व्हायचं नाही आणि तसा माझा कोणताही अजेंडा नाही."

महाराष्ट्रात भाजपचं समीकरण काय आहे?

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. भाजपने 20 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.

राज्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी युती आहे. महाराष्ट्रात जागा वाटपावर अजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे भाजपने 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या जागांवर विजय मिळवला त्याच जागांवर उमेदवार जाहीर केलेत. या 20 जागांवर सहा विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आलेलं नाही.

भाजपने आपल्या 20 उमेदवारांपैकी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून तिकीट दिलंय. त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. पक्षाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट रद्द करून गोयल यांना तिकीट दिलंय.

तर नितीन गडकरी यांना नागपुरातून तिकीट देण्यात आलंय.

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट देण्यात आलंय. पंकजा यांना त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्या जागी तिकीट देण्यात आलंय.

भारती पवार आणि कपिल पाटील या दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांना त्यांच्या विद्यमान दिंडोरी (एसटी) आणि भिवंडीतून तिकीट देण्यात आलंय.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भातील चंद्रपूरमधून तिकीट देण्यात आलं असून 2019 मध्ये काँग्रेसने जिंकलेली ही एकमेव जागा होती.

भाजपला विदर्भात आपली पकड मजबूत करायची आहे, त्यामुळे यावेळी मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली आहे.