मिथेनॉल म्हणजे काय असतं? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजीटल हेल्थ एडीटर, बीबीसी न्यूज
लाओस येथे मिथेनॉलची विषबाधा झाल्यामुळे सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, मिथेनॉलमुळे उद्भवणाऱ्या धोक्याची कल्पना पर्यटकांना देण्यात येत आहे.
मिथेनॉल हे एक औद्योगिक उत्पादन असून ते अँटिफ्रिज आणि विंडशिल्ड वॉशर म्हणून वापरण्यात येतं.
ते अतिशय विषारी असल्यामुळे माणसांना त्याचं सेवन करता येत नाही.
अगदी थोडं प्यायलं तरी प्रचंड नुकसान होऊ शकतं. ही बेकायदा दारू थोडी घेतली तरी जीवघेणी ठरू शकते.
मिथेनॉलच्या तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
मिथेनॉल अल्कोहोल सारखं दिसतं आणि चवही तशीच असते. त्याचे परिणामही असेच असतात. ते सेवन केल्यावर तुम्हाला विषबाधा झाल्यासारखं आणि आजारी वाटतं.
सुरुवातीला लोकांना काहीच झालं नाही असं वाटू शकतं.
मात्र, काही तासानंतर हे परिणाम दिसू लागतात. कारण जठरात त्याचं विघटन होऊन शरीराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं.
चयापचयामुळे फॉर्मलडिहाईड सारखे तसंच फॉर्मेट आणि फॉर्मिक आम्लासारखे पदार्थ तयार होतात.
त्यामुळे ते मज्जासंस्थेवर परिणाम करतात आणि त्यामुळे अंधत्व, कोमा, आणि मृत्यू होतो.
न्यूकॅसल विद्यापीठातील डॉ. क्रिस्टोफर मॉरिस म्हणतात, “फॉर्मेट हे एक मुख्य विष तयार होतं. ते सायनाईडसारखी प्रक्रिया करतं आणि पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणं कमी करतं. त्यामुळे या प्रक्रियेला मेंदू साथ देत नाही.”
“यामुळे मेंदूच्या काही भागांना प्रचंड नुकसान होतं. डोळ्यांवरही त्याचा थेट परिणाम होतो आणि अंधत्व येतं. मिथेनॉलच्या बराच काळ संपर्कात आलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसतात.


सहा बळीपैंकी पाच महिला आहेत.
मिथेनॉलचा विषारीपणा तुम्ही तो किती प्रमाणात घेता आणि तुमचं शरीर ते कसं हाताळतं यावर अवलंबून आहे.
अल्कोहोलबरोबर असं असतं की ते जितकं कमी प्रमाणात घेता तितका त्याचा परिणाम जास्त होऊ शकतो.
डॉ. नूट एरिक होवडा हे मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स येथे काम करतात. मिथेनॉलमुळे होणाऱ्या विषबाधेवर ते काम करतात. जगातील वेगवेगळ्या भागात प्रवासी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सजगतेचं प्रमाण वेगवेगळं आहे. त्यामुळे निदान करायलाही उशीर होऊ शकतो.
“ही सगळी लक्षणं विचित्र असतात. तुम्ही अतिआजारी पडेपर्यंत काहीही कळत नाही,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
मिथेनॉलच्या विषबाधेवर कसे उपचार केले जातात?
विषबाधा ही एक वैद्यकीय आणीबाणी असून त्यावर रुग्णालयातच उपचार होतात.
काही औषधं दिली जातात किंवा रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस सुद्धा केला जातो.
काही केसेसमध्ये मिथेनॉलवर उतारा म्हणून इथेनॉल दिलं जातं. मात्र हा उपाय खूप तातडीने करायला हवा.
लीड्स विद्यापीतील तज्ज्ञ डॉ, अल्स्टर हे म्हणतात, “इथेनॉल हे स्पर्धात्मक अवरोधक म्हणून काम करतं. त्यामुळे मिथेनॉलचं विघटन कमी होतं. ते मंदावल्यामुळे फुप्फुसं आणि किडनीवाटे आणि काही प्रमाणात घामावाटे मिथेनॉल बाहेर टाकायला मदत होते.”
डॉ, होवदा म्हणतात की मिथेनॉल प्यायल्यावर तातडीने मदत मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं.
“तुम्ही जर तातडीने इस्पितळात गेले आणि तिथे उपचाराची सगळी साधनं असतील तर दुष्परिणाम कमी होतात,” ते म्हणाले.
“तुम्ही अगदी कमी प्रमाणात घेतलं तरी मृत्यू येतो आणि कधीकधी खूप जास्त घेतलं आणि मदत मिळाली तरी बचावू शकता, नियमित अल्कोहोल हा त्यावरचा उतारा आहे,” ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
पर्यटक मिथेनॉलची विषबाधा कशी रोखू शकतात?
MSF या संस्थेच्या मते मिथेनॉल विषबाधा बहुतांश प्रमाणात आशियात होते. पण काही प्रमाणात ती आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतही या घटना घडतात.
आपण काय पितोय आणि त्याचे काय धोके आहेत याबद्दल पर्यटकांनी सजग रहायला हवं.
एखाद्या प्रसिद्ध, परवाना असलेल्या ठिकाणी मद्यपान करावं आणि घरी तयार केलेली दारू पिऊ नये.
मिथेनॉल हे मद्य तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होते आणि डिस्टिलेशन प्रकियेने ते अधिक तीव्र केले जाते.
व्यावसायिक उत्पादक ते माणसांना सेवन करण्यालायक होण्यापर्यंत त्याचं प्रमाण कमी करतात. मात्र घरगुती कारखान्यात किंवा सप्लाय चेनमध्ये कारखान्यात तयार केलेले मिथेनॉल घालतात आणि नफा वाढवतात.
डॉ. होवडा यांच्या मते नफा वाढवण्यासाठी ते अल्कोहोलमध्ये मिसळलं जातं. कारण ते स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध असतं.
तसंच जीवाणू सडवून पारंपरिक इथेनॉल तयार करताना सुद्धा मिथेनॉल तयार करता येऊ शकतं. यूकेचं फॉरेन ऑफिस सल्ला देतं, “जर कोणी देऊ केलं, विशेषत: फुकट दिलं किंवा त्यात स्पिरिट असेल, किंवा लेबल, वास, किंवा चव वेगळी असेल तर अजिबात सेवन करू नका?”
कोणत्या मद्यात मिथेनॉल असतं?
प्रभावित मद्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
- स्थानिक मद्य, जसे की स्थानिक तांदूळ किंवा पाम लिकर
- स्पिरिट-आधारित संमिश्र पेयं, उदा. कॉकटेल्स
- दुकाने किंवा बारमधील नकली ब्रँडेड बाटलीबंद मद्य

फोटो स्रोत, Getty Images
मिथेनॉल विषबाधेपासून बचाव करण्यासाठी:
- मद्य केवळ परवाना असलेल्या मद्यविक्री दुकानांतून खरेदी करा.
- फक्त परवानाधारक बार आणि हॉटेलमध्येच पेयं खरेदी करा.
- घरगुती तयार केलेले मद्य सेवन करणं टाळा.
- बाटलीचे सील योग्य स्थितीत आहे की नाही हे तपासा.
- लेबलवरील छपाई खराब आहे का किंवा चुकीची अक्षरं आहेत का ते तपासा.
जर तुम्हाला किंवा तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मिथेनॉल विषबाधेची लक्षणं दिसली, तर त्वरित वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











