जेव्हा अजित पवार म्हणाले होते, 'हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पांडुरंगाचा धावा केला'

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते.

यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला. बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला.

या विमानात अजित पवार यांच्यासह सुमित कपूर, शांभवी पाठक, विदित जाधव, पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

जेव्हा अजित पवारांनी हेलिकॉप्टर अपघाताची भीती व्यक्त केली होती...

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं.

याआधी गडचिरोलीमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर भरकटले होते, तेव्हाचा प्रसंग त्यांनी एका भाषणात यापूर्वी सांगितला होता.

अजित पवार यांनी सांगितलं होतं, "तेव्हा माझ्या पोटात गोळा आला, सारखा पांडुरंगाचा धावा करत होतो."

वडलापेठ इथे सुरजागड इस्पात या कंपनीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 जुलै 2024 रोजी गेले होते. त्यांच्यासोबत उदय सामंत देखील होते. त्यावेळी झालेल्या भाषणात स्वतः अजित पवार यांनी किस्सा सांगितला होता.

अजित पवार म्हणाले होते, "आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरलो, तेव्हा बाबा आत्राम म्हणाले होते की 'पाऊस आहे, ढग आहेत आता हेलिकॉप्टर कसं यायचं?'

"आम्ही नागपूरवरून हेलिकॉप्टरमध्ये बसलो, तर चांगलं वाटलं. परंतु, नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं. इकडे बघतो ढग, तिकडे बघतो ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. बघा म्हटलं बाहेर कुठं जमीन दिसेना झाड दिसेना. आपण ढगात चाललो कुठे चाललो काही कळेना. फडणवीस म्हणाले, काही काळजी करू नका. माझे आतापर्यंत 6 अपघात झालेले आहे. मी हेलिकॉप्टरमध्ये असतो तेव्हा अपघात झाला तरी मला काही होत नाही. त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही.

"पण माझ्या पोटात गोळा आला होता. सारखा पांडुरंगा पांडुरंग म्हणत होतो आणि फडणवीस महाराज मला उपदेश देत होते. पण सगळ्यांना धाकधुक वाटत होती. माझ्या शेजारी उदय सामंत बसले होते. ते म्हणाले दादा दादा जमीन आता दिसायला लागली."

अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)