मुंबईत 'या' 5 टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना पूर्ण टोलमाफी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याला काही तास उरले असताना, राज्य मंत्रिमंडळाने अनेक घोषणा केलीय. यात मुंबई ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठीही मोठी घोषणा आहे.

मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5 टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आलीय. आज (14 ऑक्टोबर) मध्यरात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या टोलनाक्यांवर टोलमाफी व्हावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे नागरिकांकडून केली जात होती. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हलक्या मोटर वाहनांसाठी टोलमाफीची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबई आणि नजिकच्या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला.

ही मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना - एकनाथ शिंदे

या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी, वाहतुककोंडी यामुळे टोलमधून सूटका मिळावी, अशी जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती."

एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांनी केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, "मी आमदार असताना या संदर्भात टोलमाफीचं आंदोलन केलं होतं, कोर्टातही गेलो होतो. मला याचं समाधान आहे, आनंद आहे की, या टोलमाफीमुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. हलक्या मोटर वाहनांना त्यामधून वगळण्यात आलं आहे. सगळ्यांना त्याचा फायदा होईल.”

शिंदे पुढे म्हणाले, “हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, शेतकरी योजनाप्रमाणेच ही मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना आहे.”

हा निर्णय निवडणुकीपुरता नाही. हा कायमस्वरुपी निर्णय आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी आम्ही पूर्ण केली, याचं आम्हाला समाधान आहे. या सर्व कामांची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईकरांना मोठा दिलासा - दादा भुसे

मंत्री दादा भुसे टोलमाफीच्या निर्णयावर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मुंबईकरांना तसेच महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्या सर्व लहान वाहनांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल.

"मुंबई आणि मुंबईबाहेरील अशी साधारणपणे साडेतीन लाख वाहनं ये-जा करत असतात. गेल्या काही वर्षांपासून टोलमध्ये सूट मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. टोलवर लागणाऱ्या रांगा त्यामुळे होणारं प्रदूषण या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

"यापूर्वी साधारणपणे 45 आणि 75 रुपये अशी टोलची आकारणी केली जात होती आणि आज हा क्रांतिकारी निर्णय सरकारने केला.

"2026 पर्यंत या टोलची मुदत होती. किंबहुना भविष्यात ती वाढुही शकली असती. परंतु, जड वाहनं सोडून साधारणपणे 2 लाख 80 हजार वाहनांना याचा फायदा होणार आहे.” लाखों लोकांच्या मागणीचा निर्णय आज सरकारने केला आहे."

मंत्रिमंडळ बैठकीत इतर कोणते निर्णय घेण्यात आले?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 19 निर्णय घेण्यात आले आहेत :

  • मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री 12 पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
  • आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
  • समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
  • दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
  • आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
  • वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
  • राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
  • पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
  • खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
  • राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार
  • पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
  • किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
  • अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
  • मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे (वैद्यकीय शिक्षण)
  • खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
  • मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
  • अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
  • उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
  • कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)