LOC, LAC, रॅडक्लिफ लाईन म्हणजे नेमकं काय?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBC\PRAKASH SINGH

फोटो कॅप्शन, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य झाली. पण, ब्रिटीश सरकारनं मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र देशाची मागणीही स्विकारली.
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातर्फे ऑपरेशन सिंदूरची कारवाई करण्यात आली. भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. हे पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्याला दिलेलं प्रत्युत्तर होतं असं भारताचं म्हणणं आहे. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचं भारतीय लष्करानं म्हटलंय.

भारत आणि पाकिस्तानमधला हा तणाव आताचा नाही. या दोन्ही देशांमध्ये 1947 पासूनच तणाव आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धं झालेले आहेत. तसेच सीमेवर चकमकी देखील अनेकदा होतात.

सीमापार कारवाया देखील होतात. इतकंच नाहीतर सर्जिकल स्ट्राईक्स, हवाई हल्लेही झाले आहे.

हा तणाव फक्त पाकिस्तानसोबतच आहे असं नाही, तर चीनसोबतच्या भारतीय सीमेवर असाच तणाव असतो.

या सीमांबद्दल बोलताना आपण नेहमीच एलओसी (LOC), रॅडक्लिफ लाईन हे शब्द ऐकतो.

पण, याचा नेमका अर्थ काय आहे? भारत सरकारनुसार भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा काय आहेत? त्यांची नाव काय आहेत? तसेच भारत आणि पाकिस्तानतील सीमा कशी ठरवली गेली? पाहुयात.

7 मे रोजी पहाटेच्या सुमारास भारतानं पाकिस्तानातल्या 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचं जाहीर केलं.

पण हे करताना आपली सीमा न ओलांडल्याचंही लष्कराने सांगितलं.

पण, भारत-पाकिस्तानमधली ही सीमा नेमकी कशी ठरवली गेली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल.

बाऊंड्री कमिशनची स्थापना

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य झाली. पण, ब्रिटीश सरकारनं मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र देशाची मागणीही स्विकारली.

ब्रिटीशकालीन भारताचं विभाजन कसं होईल हे ठरवण्यासाठी जुलै 1947मध्ये बाऊंड्री कमिशनची स्थापना करण्यात आली.

ब्रिटीशांचे भारतातले शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी स्थापन केलेल्या या कमिशनमध्ये इंडियन नॅशनल काँग्रस आणि मुस्लिम लीगचे प्रत्येकी चार सदस्य होते.

या कमिशनचे सर सिरील रॅडक्लिफ (Cyril Radcliffe)अध्यक्ष होते.

सर सिरील रॅडक्लिफ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटीशकालीन भारताचं विभाजन कसं होईल हे ठरवण्यासाठी जुलै 1947मध्ये बाऊंड्री कमिशनची स्थापना करण्यात आली, या कमिशनचे सर सिरील रॅडक्लिफ (Cyril Radcliffe)अध्यक्ष होते.

ब्रिटीश वकील असणाऱ्या रॅडक्लिफ यांना फक्त 5 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. ब्रिटीश भारताचं विभाजन करत त्यांना दोन देश आखायचे होते.

दोन मोठे प्रदेश असे होते जिथे मुस्लिम आणि बिगर मुस्लिमांची संख्या जवळपास सारखीच होती ते म्हणजे पूर्वेकडचा बंगाल आणि पश्चिमेकडचा पंजाब.

याबद्दल बाऊंड्री कमिशनच्या सदस्यांचं एकमत होत नव्हतं.

रॅडक्लिफ लाईन

यावेळी रॅडक्लिक यांनी एक सीमा ठरवली. ही सीमा या दोन्ही प्रांतांचं विभाजन करणारी होती. या फाळणीमुळे लाखो लोकांनी स्थलांतर केलं. दंगली सुद्धा झाल्या.

यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला होता. या सीमारेषेनं ब्रिटीशनकालीन भारताचं भारत आणि पाकिस्तान असं विभाजान केलं. याच सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन म्हटलं जातं.

भारताच्या गृहखात्याच्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 3,323 किलोमीटर लांबीची सीमा आहे.

सिरील रॅडक्लिफ (Cyril Radcliffe)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॅडक्लिक यांनी एक सीमा ठरवली. ही सीमा या दोन्ही प्रांतांचं विभाजन करणारी होती. याच सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन म्हटलं जातं.

नियंत्रण रेषा (Line of Control)

पाकिस्तानसंबंधी बोलताना आणखी एका सीमारेषेचा उल्लेख होतो ती म्हणजे एलओसी (LOC) अर्थात लाईन ऑफ कंट्रोल. त्यालाच मराठीत नियंत्रण रेषा सुद्धा म्हणतात.

1948 मध्ये काश्मीर युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धविराम रेषा (Ceasefire Line) अस्तित्त्वात आली होती.

1971 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धं झालं. यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली.

1972 साली भारत - पाकिस्तान दरम्यान झालेल्या सिमला कराराद्वारे एलओसी (LOC) नियंत्रण रेषा अस्तित्त्वात आली.

ही भारत आणि पाकिस्तानमधली आंतरराष्ट्रीय सीमा (International Border) नाही. याला डी फॅक्टो बॉर्डर de facto border म्हटलं जातं.

ग्राफिक्स
फोटो कॅप्शन, पाकिस्तानसंबंधी बोलताना आणखी एका सीमारेषेचा उल्लेख होतो ती म्हणजे एलओसी (LOC) अर्थात लाईन ऑफ कंट्रोल. त्यालाच मराठीत नियंत्रण रेषा सुद्धा म्हणतात.

एलएसी (LAC) - Line of Actual Control - प्रत्यक्ष ताबारेषा

पाकिस्तानसोबतच्या सीमेवर तणाव असतो तसाच चीनच्या सीमेवरही कधी कधी तणाव बघायला मिळतो. भारत आणि चीनदरम्यान 3,488 किमी लांबीची सीमा आहे.

भारताच्या ताब्यातील भूभाग आणि चीनच्या ताब्यातील भूभाग यांच्यामधल्या रेषेला एलएसी (LAC - Line of Actual Control) प्रत्यक्ष ताबारेषा म्हटलं जातं.

काश्मीरमधला अक्साई चिन (Aksai Chin) हा भारत आणि चीनमधला वादग्रस्त भूभाग आहे.

जम्मू आणि काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशांसोबतच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनसोबतची सीमा आहे.

या बॉर्डरवर आयटीबीपी (ITBP - Indo-Tibetan Border Police) फोर्स तैनात आहे.

मॅकमोहन रेषा (McMohan Line)

भारत आणि चीनसंदर्भात बोलताना आणखी एका सीमारेषेचा उल्लेख होतो ती म्हणजे मॅकमोहन रेषा.

1914 च्या सिमला कराराद्वारे भारत आणि तिबेटदरम्यानची अरुणाचल प्रदेशातली सीमा ठरवण्यात आली, याला मॅकमोहन रेषा म्हटलं जातं.

पण चीनने यावर आक्षेप घेतलेले आहेत.

ब्रिटीश इंडियन आर्मी ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आर्थर हेन्री मॅकमोहन यांनी या सीमारेषेचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्यावरूनच हे नाव देण्यात आलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1914 च्या सिमला कराराद्वारे भारत आणि तिबेटदरम्यानची अरुणाचल प्रदेशातली सीमा ठरवण्यात आली, याला मॅकमोहन रेषा म्हटलं जातं.

डुरँड रेषा (Durand Line)

ब्रिटीशकालीन आणखी एका सीमारेषाचा उल्लेख होतो ती म्हणजे डुरँड रेषा (Durand Line).

ब्रिटीशकालीन भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातली मॉर्टिमर डुरँड यांनी ठरवलेली ही सीमा होती.

आता ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान असणारी सीमा आहे.

याशिवाय बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान यांच्यासोबतही भारताची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटीशकालीन भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातली डुरँड रेषा आता अफगाणिस्तान-पाकिस्तान दरम्यान असणारी सीमा आहे.

यासोबतच भारताची किनारपट्टी 7,516.6 किलोमीटरची असून यामध्ये बेटांचाही समावेश आहे.

भारताच्या जमिनीवरच्या सीमा आणि किनारपट्टी यांच्यासाठी जानेवारी 2004 मध्ये भारताच्या गृहखात्याने डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंटची स्थापना केलीय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.