'तू हलगी वाजव, फडे बांध, तुला शिकायची काय गरज?' ; परभणी दलित तरुण मारहाण प्रकरणावर ग्राउंड रिपोर्ट

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"तू हलगी वाजव, ढोलकं वाजव, तिकडं फडे बांध. इथं काय तुला शिकायची गरज आहे?"

17 वर्षांचा पीडित तरुण हे सांगतोय. हा तरुण मातंग समाजातून येतो. अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे.

सदर मुलाच्या जातीचा उल्लेख करत त्याला कॉलेजमध्ये हिणवण्यात आलं आणि नंतर बेदम मारहाण करण्यात आली.

पीडित तरुण परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील एका गावात राहतो. तो त्याच्या गावातून रोज सोनपेठ येथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जातो.

काही दिवसांपूर्वी कॉलेजमधील काही तरुणांसोबत त्याचं भांडण झालं आणि पुढे या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं तो सांगतो.

"आधी एक मुलगा मागून पेन मारायचा. मला खडू मारायचे. जातीनं छळ (जातीवरुन शिवीगाळ) करायचे. एक दिवस मी त्याला विचारलं असं का करायले, तर ते जास्त बोलू लागले. मग मी त्याला एक चापट हाणली. त्या दिवशी त्यानं काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी क्रिकेटच्या ग्राऊंडवर पोरं घेऊन आला. तिथं मला मारायला सुरुवात केली."

"25 मार्चला मला मारहाण केली. एका पोराच्या हातात फायटर होतं. एकाच्या हातात भाला होता. मला फायटरनं गालावर मारलं आणि भाला इथं नाकावर मारला. फ्रॅक्चर झालतं नाक," तो पुढे सांगतो.

'दोषींवर कठोर कारवाई'

पीडित तरुण सोनपेठच्या एका कॉलेजात शिकत आहे. या घटनेप्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचं पीडित कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

पीडित तरुण सांगतो, "पोलीस स्टेशनला गेलो. तर मला चक्कर येत होती. मी तिथंच झोपलो. पोलीस केसच घेत नव्हती आमची. दोन-तीन तास तिथंच पडून राहिलो. मग पुन्हा सरकारी दवाखान्यात गेलो. तिथं मला उलटी झाली. मग परभणीला गेलो."

तर पीडित तरुणाची आई सांगतात, "कम्प्लेट घ्यायना गेले इथं सोनपेठला. झटपट्या खाऊन घेतली. मग म्हटले गंगाखेडला जा. मग गंगाखेडला गेलाव. तिथं बी आमचा जबाब घेतला. होती म्हणले केस."

28 मार्च रोजी या प्रकरणी सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पोलीस प्रशासनानं फेटाळून लावला.

गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "याप्रकरणात अॅट्रॉसिटी आणि गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

"आम्ही शाळेत बैठक घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आहे. याप्रकरणी बाल न्याय मंडळात चार्जशीट पाठवलं जाईल."

'गरिबाच्या लेकरानी शिकू नाही का?'

या प्रकरणातील पीडित तरुणाला सोनपेठमधील एका मैदानावर मारहाण करण्यात आली. जवळपास 10-15 जणांनी मारहाण केल्याचं पण त्यातल्या काहीच जणांची नावं आठवत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

याप्रकरणात जे कुणी दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

तरुणाची आई सांगते, "शिक्षा येव जा. का म्हणून नाही? आपल्या लेकराला मारलं तर त्यायला काय करायचं? भरपूर शिक्षा येव जा त्यायला. ज्यांनी मारहाण केली त्यातलं एक दूधगावचं हाय, एक पिपरीचं हाय."

पीडित कुटुंबाकडे स्वत:ची शेती नाही. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर चालतो. गावातील दलित वस्तीत ते राहतात.

"जातीवर काहून बोलायचं, कशाला मारायचं? गरिबाच्या लेकरानी शिकू नाही का?," असा सवाल मुलाच्या आईने केला.

जातीयवाद शाळा-कॉलेजात पसरतोय कारण...

जातीय मानसिकता टिकून असल्यामुळे आजही लोक तिला बळी पडत असल्याचं दिसून येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे सांगतात, "आमचं बाह्य वर्तन बदललंय. पेहराव बदललेत. पण आतली जी जात मानसिकता आहे, ती काही केल्या जायला तयार नाही. गुन्हाच दाखल झाला नाही पाहिजे अशा प्रकारची फिल्डिंग त्याठिकाणी लागली जाते."

भिसे पुढे सांगतात, "काबाडकष्ट करुन, शिक्षण घेऊन दलित स्वत:ला बदलवून घेताहेत. पण बदलाची प्रक्रिया याठिकाणच्या उच्चवर्णीय मानसिकतेत जगणाऱ्या लोकांना सहन व्हायला तयार नाही, म्हणून या अशा घटना घडताहेत. मायबाप जसा विचार करतात, तसाच विचार शाळा-कॉलेजातील मुलं करणार झाले."

याप्रकरणातील पीडित तरुणावर 3 दिवस सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या त्याची तब्येत स्थिर आहे. त्याच्या तोंडावरील मारहाणीचे व्रण अजूनही कायम आहेत.

पीडित तरुण ज्या गावात राहतो, तिथं मात्र जातीभेद नसल्याचं आणि सगळे लोक एकोप्यानं राहत असल्याचं तो आवर्जून सांगतो. यामुळे आपल्यासोबत असं काही घडेल याचीही कल्पना नसल्याचं तो सांगतो.

या गावात मातंग समाजाची 30-35 घरं आहेत.

पीडित तरुणाच्या वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. 'मी प्रथमत: भारतीय आहे आणि अंतिमत: भारतीय आहे', असं त्यावरती लिहिलेलं आहे.

"बाबासाहेबांनी सगळ्यांना सारखेच अधिकार दिलेत, शाळा-कॉलेजातल्या मुलांनी अभ्यासावर ध्यान दिलं पाहिजे," असं पीडित तरुणाचं म्हणणं आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे पुढे काही त्रास होणार नाही, असा विश्वास या तरुणाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)