रशियाच्या हायपरसॉनिक मिसाईलमुळे युरोप चिंतेत, 'ही' क्षेपणास्त्रं इतकी धोकादायक का मानली जातात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, संरक्षण प्रतिनिधी
चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरातील परेड ग्राउंडवर पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे पीएलएची क्षेपणास्त्रं उन्हामुळे चमकत असलेल्या ट्रकांवरून गर्दीतून हळूहळू पुढे सरकत होती.
ही क्षेपणास्त्रं, सुईसारखी टोकदार, 11 मीटर लांब आणि 15 टन वजनाची होती. प्रत्येक क्षेपणास्त्रावर 'डीएफ-17' लिहिलेलं होतं.
ही डोंगफेंग हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं होती. चीननं ती स्वत:च विकसित केली आहेत. परेडमधून चीननं त्यांची क्षेपणास्त्रं सादर केली होती.
1 ऑक्टोबर 2019 ला नॅशनल परेड डे च्या प्रसंगी चीननं त्यांची नवीन क्षेपणास्त्रं जगासमोर आणली. या शस्त्रांस्त्रांवर सुरू असलेल्या कामाबद्दल अमेरिकेला आधीपासूनच माहित होतं. मात्र चीननं क्षेपणास्त्रांवर वेगानं काम करत आघाडी घेतली.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची गती ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपट अधिक असते. या क्षेपणास्त्रांचा वेग आणि अत्यंत वेगानं दिशा किंवा मार्ग बदलण्याची क्षमता यामुळे ते अत्यंत शक्तीशाली ठरतात. त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे युद्धाचं स्वरूप बदलू शकतं.
याच कारणामुळे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं विकसित करण्यासाठी जगभरात स्पर्धा वाढत चालली आहे.
कौन्सिल ऑन जिओस्ट्रॅटेजी या थिंक टँकचे राष्ट्रीय सुरक्षा फेलो विलियम फ्रीर म्हणतात, "आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध देशांच्या सरकारांमध्ये निर्माण होत असलेल्या स्पर्धेच्या मोठ्या चित्रातील हा फक्त एक भाग आहे."
"शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच याप्रकारची स्पर्धा, स्थिती जगात दिसते आहे."
रशिया, चीन आणि अमेरिकेत जोरदार स्पर्धा
हायपरसॉनिक तंत्रज्ञानात चीननं केलेल्या प्रगतीमुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा बीजिंगमध्ये झालेल्या या परेडमुळे वाढली आहे. आज चीन या क्षेत्रात जगात सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर रशियाचा नंबर लागतो.
तर अमेरिका या स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे. तर ब्रिटनकडे मात्र अशी कोणतीही क्षमता नाही.
कौन्सिल ऑन जियोस्ट्रॅटेजी या थिंक टॅंकला संरक्षण उद्योगातील कंपन्या, संरक्षण मंत्रालयाव्यतिरिक्त काही इतर स्त्रोतांकडून निधी मिळाला आहे. या थिंक टँकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा फेलो असलेल्या विलियम फ्रीर यांचं म्हणणं आहे की या स्पर्धेत चीन आणि रशिया पुढे असण्याचं कारण स्पष्ट आहे.
ते म्हणतात, "या दोन्ही देशांनी अनेक वर्षांपूर्वीच याप्रकारच्या प्रकल्पांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा लावण्याचा निर्णय घेतला होता."

तर, या शतकाच्या सुरूवातीच्या दोन दशकांमध्ये बहुतांश पाश्चात्य देशांनी देशांतर्गंत पातळीवर जिहादींकडून प्रेरित कट्टरतावाद संपवण्यावर आणि परदेशातील कट्टरतवाद-विरोधी संघर्षावर लक्ष केंद्रित केलं होतं.
त्यावेळेस, आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर अतिशय प्रगत अशा विरोधक किंवा शत्रूबरोबर संघर्ष होण्याची शक्यता खूपच कमी वाटायची.
2020 मध्ये ब्रिटनच्या सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतर लगेचच सर ॲलेक्स यंगर यांनी मान्य केलं होतं की, "एक लष्करी शक्ती म्हणून चीननं घेतलेली झेप समजण्यात एकूणच आम्ही अपयशी ठरलो."
याबाबतीत इतर देशदेखील पुढे जात आहेत. इस्रायलकडे ॲरो 3 हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. इंटरसेप्टर म्हणून त्याची रचना विकसित करण्यात आली आहे.
इराणनं देखील त्यांच्याकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं असल्याचा दावा केला आहे. इराणनं म्हटलं आहे की त्यांनी जून महिन्यात इस्रायलबरोबर झालेल्या 12 दिवसांच्या युद्धात इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागली होती.
(या क्षेपणास्त्रांचा गती खूपच जास्त होती. मात्र उड्डाणाच्या दरम्यान दिशा बदलण्याती ती इतकी सक्षम नव्हती की त्यांना हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं म्हणता येईल)

फोटो स्रोत, Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images
तर, उत्तर कोरिया 2021 पासून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पांवर काम करतो आहे. उत्तर कोरियाचा दावा आहे की त्यांच्याकडे अशी शस्त्रास्त्रं आहेत.
आता अमेरिका आणि ब्रिटन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. फ्रान्स आणि जपानसह इतर देशदेखील असं करत आहेत.
या क्षेत्रात अमेरिका त्यांची क्षमता वाढवताना दिसते आहे. अमेरिकेनं 'डार्क ईगल' हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे.
यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सनुसार, डार्क ईगल "हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या शक्ती आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे. अमेरिकेचं सैन्य आणि नौदलानं हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि मारक क्षमता त्यातून दिसते."
मात्र चीन आणि रशिया या क्षेत्रात सध्या बरेच पुढे आहेत. काही तज्ज्ञांच्या मते ही चिंतेची बाब आहे.
हायपरसॉनिक म्हणजे काय?
हायपरसॉनिकचा अर्थ आहे की, अशी वस्तू जी मॅक 5 (ध्वनीच्या गतीच्या म्हणजे 767 मैल प्रति तास वेगापेक्षा पाच पट गती म्हणजेच 3,858 मैल प्रति तास) किंवा त्यापेक्षा अधिक वेगानं जाते. या वेगामुळेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं किंवा शस्त्रास्त्रांपेक्षा वेगळी ठरतात.
तसं पाहता, हायपरसॉनिक आणि सुपरसॉनिक या दोन्ही शब्दांचा वापर ध्वनीपेक्षा अधिक गतीचा उल्लेख करण्यासाठी होतो.
मात्र, सुपरसॉनिकचा अर्थ असतो, ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त आणि मॅक 5 पेक्षा कमी वेग असणं.
तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वेग यापेक्षा कितीतरी अधिक असतो.
या वेगामुळेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं अतिशय धोकादायक मानली जातात.
एवनगार्ड हे रशियाचं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आतापर्यंतचं सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र आहे. त्याच्याबद्दल दावा केला जातो की ते मॅक 27 (जवळपास 20,700 मैल प्रति तास) इतक्या प्रचंड वेगानं उडतं.
अर्थात याच्यासाठी बहुतांश आकडेवारी मॅक 12 (9,200 मैल प्रति तास) च्या आसपासची दिली जाते. ती 2 मैल प्रति सेकंद इतकी असते.
फ्रीर यांच्या मते, विध्वंस करण्याच्या क्षमतेचा विचार केल्यास, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं सुपरसॉनिक किंवा सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा खूप वेगळी नसतात.
ते म्हणतात, या क्षेपणास्त्रांची ओळख पटवण्याची, ट्रॅक करण्याची आणि त्यांना रोखण्यात येणाऱ्या अडचणी, याच गोष्टी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना सुपरसॉनिकपेक्षा वेगळं ठरवतात.

फोटो स्रोत, Pierre Crom/Getty Images
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं दोन प्रकारची असतात.
पहिलं, बूस्ट-ग्लाइड क्षेपणास्त्रं (उदाहरणार्थ चीनचं डीएफ-17). हे एका रॉकेटवर अवलंबून असतं. हे रॉकेट या क्षेपणास्त्राला आकाशात, कधीकधी पृथ्वीच्या वातावरणाच्या देखील वर घेऊन जातं आणि मग तिथून हे क्षेपणास्त्र प्रचंड वेगानं खाली झेपावतं.
साधारण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं कोणत्या मार्गानं येणार, याचा अंदाज बांधता येतो. सर्वसाधारणपणे अशी क्षेपणास्त्रं पॅराबोलिक कर्व्हवर उड्डाण करतात.
साधारण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या उलटं हायपरसॉनिक ग्लाइड व्हेहिकल त्याच्या लक्ष्याकडे अनिश्चित मार्गानं जातात आणि लक्ष्यावर हल्ला करण्याच्या अगदी आधीच ते त्यांच्या मार्गात बदल करू शकतात.
याव्यतिरिक्त हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रंदेखील असतात. ती कमी उंचीवरून मार्गक्रमण करतात. त्यामुळे रडारवर ती लक्षात येत नाहीत.
त्यांना देखील रॉकेट बूस्टरनं हवेत सोडलं जातं. जेव्हा ही हायपरसॉनिक वेग धारण करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एक सिस्टम क्रियान्वित होते. ही सिस्टम त्यांना त्यांच्या लक्ष्यांपर्यंत घेऊन जाते. या सिस्टमला 'स्क्रॅमजेट इंजिन' म्हणतात. ते हवेच्या मदतीनं क्षेपणास्त्राला पुढे न्यायचं काम करतं.
ही 'दुहेरी वापर करता येणारी शस्त्रास्त्रं' आहेत. म्हणजेच यांचं वॉरहेड (क्षेपणास्त्राचा पुढचा भाग) आण्विक (न्युक्लियर) असू शकतं किंवा सामान्य स्वरुपाची स्फोटकं असू शकतात. अर्थात या क्षेपणास्त्रांची शक्ती फक्त यांच्या वेगापुरतीच मर्यादित नाही.
एखाद्या क्षेपणास्त्राला लष्करीदृष्ट्या हायपरसॉनिक म्हणता यावं, यासाठी ते क्षेपणास्त्र प्रचंड वेगानं जात असतानादेखील सहजपणे पुढे नेता येणं आवश्यक आहे.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, ज्या सैन्यानं या क्षेपणास्त्राचा मारा केला आहे, त्या सैन्याला क्षेपणास्त्र सोडल्यानंतर देखील अचानक आणि अनपेक्षित पद्धतीनं त्याचा मार्ग बदलता आला पाहिजे. मग भलेही ते क्षेपणास्त्र कितीही वेगानं जात असलं तरीदेखील मार्ग बदलता आला पाहिजे.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ही क्षमताच त्याला इतकं धोकादायक बनवतं. कारण त्यामुळे हे क्षेपणास्त्रं हाणून पाडणं खूपच कठीण होतं. बहुतांश रडार हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा शेवटपर्यंत छटा लावू शकत नाहीत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
पट्रीचिया बेजिलजिक वॉशिंग्टन डीसीमधील लष्करी आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास केद्रात क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पात रिसर्च असोसिएट आहेत. या केंद्राला अमेरिकेतील सरकारी संस्थांबरोबरच संरक्षण उद्योगातील कंपन्या आणि काही इतर स्त्रोतांकडून निधी मिळतो.
पट्रीचिया म्हणतात, "रडारच्या कक्षेबाहेर गेल्यामुळे या क्षेपणास्त्रांबद्दल लवकर कळू शकत नाही. उड्डाणाच्या शेवटच्या टप्प्यातच ती रडारच्या सेन्सरवर दिसू शकतात. त्यामुळे या क्षेपणास्त्रांना रोखण्याची फारच थोडी संधी असते."
पट्रीचिया यांना वाटतं की पाश्चात्य देशांचे स्पेस-बेस्ड सेन्सर्स मजबूत करणं हे रडार या मर्यादित क्षमतेवरील उत्तर असू शकतं.
प्रत्यक्षात जेव्हा युद्ध होत असतं, तेव्हा ज्या देशावर हल्ला होत असतो, तेव्हा त्याच्यासमोर एक अत्यंत कठीण प्रश्न असतो, तो म्हणजे, "हा आण्विक हल्ला आहे की पारंपारिक शस्त्रांस्त्रांद्वारे करण्यात आलेला हल्ला आहे?"
रॉयल नेव्हीचे माजी कमांडर आणि अँटी-एअर युद्धाचे तज्ज्ञ असलेले टॉम शॉर्प म्हणतात, "हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांमुळे युद्धाचं स्वरुप तितकं बदललेलं नाही, जितकं हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या कालमर्यादेला बदललं आहे."
ते सांगतात, "शस्त्रूला ट्रॅक करणं, हल्ला करणं, मग वेगानं स्थान बदलत असलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्राचा मार्ग बदलणं, यासारख्या मूलभूत गोष्टी, आधीच्या क्षेपणास्त्रांमध्येही होत्या. मग ती बॅलिस्टिक, सुपरसॉनिक किंवा सबसॉनिक क्षेपणास्त्रं असोत."
याचप्रकारे, "शत्रू म्हणजे लक्ष्यासाठीदेखील हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं ट्रॅक करणं, त्याला जॅम करणं किंवा नष्ट करणं आवश्यक आहे. फक्त इतकाच फरक आङे की हे सर्व करण्यासाठी आता खूप थोडा वेळ उपलब्ध असेल."
अशी चिन्हं आहेत की हे तंत्रज्ञान अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन काँग्रेसच्या रिसर्च सर्व्हिसच्या एका अहवालात इशारा देण्यात आला आहे की, "अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की पृथ्वीर असलेले सेन्सर्स आणि सध्याचे स्पेस-बेस्ड सेन्सर्स, हे दोन्ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यास आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास पुरेसे नाहीत."
तरीदेखील, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांबद्दल खूपच वाढवून बोललं जातं आहे.
या क्षेपणास्त्रांबद्दल खरोखरंच अतिशयोक्तीनं बोललं जातं आहे का?
डॉ. सिद्धार्थ कौशल रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट नावाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित थिंक टँकशी जोडलेले आहेत. ज्या लोकांना वाटतं की हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांमुळे युद्धाचं स्वरूपच बदलून जाईल असं नाही, असं मानणाऱ्या लोकांमध्ये सिद्धार्थ यांचा समावेश आहे.
ते म्हणतात, "वेग आणि उड्डाणाच्या काळात आवश्कतेनुसार मार्ग बदलण्याच्या क्षमतेमुळे ही क्षेपणास्त्रं महत्त्वाची ठरतात. वेगामुळे मिळालेल्या ऊर्जेमुळे ती बंकर आणि भुयारांसारख्या मजबूत लक्ष्यांवर हल्ला करण्यास उपयोगी ठरतात. आधीच्या पारंपारिक शस्त्रास्त्रांद्वारे या गोष्टींना नष्ट करणं कठीण असायचं."

फोटो स्रोत, Shutterstock
तर टॉम शार्प म्हणतात की भलेही या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट किंवा त्याहून अधिक असतो, मात्र तरीदेखील, त्यांच्यापासून बचाव करण्याचे काही 'प्रभावी' मार्ग आहेत.
पहिला मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी लक्ष्याला ट्रॅक करता येणं आणि लक्ष्याचा शोध घेणं कठीण करणं. ते म्हणतात, "जहाज त्यांची पोझिशन लपवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतात तसाच हा प्रकार आहे."
"व्यावसायिक उपग्रहांकडून मिळणारे फोटो काही मिनिटांतच लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी निरुपयोगी ठरतात. कारण तोपर्यंत लक्ष्याच स्थान बदललं असू शकतं. लक्ष्य साधण्यासाठी योग्य वेळेस उपग्रहाद्वारे लक्ष्याचा ठावठिकाणा शोधणं खूपच कठीण आणि महागडं आहे."
मात्र त्यांना वाटतं की, काळानुरुप आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर तंत्रज्ञानांमुळे ही परिस्थिती बदलेल.
हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशियापासून सावध राहण्याची आवश्यकता
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं विकसित करण्याच्या बाबतीत रशिया आणि चीन यांनी मोठी आघाडी घेतली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
विलियम फ्रीर म्हणतात, "मला वाटतं की चीनचा हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम प्रभावशाली आणि चिंताजनक आहे."
ते पुढे म्हणतात, "रशियाचा विचार करता, त्यांच्या दाव्यांबद्दल आपण अधिक सावध असलं पाहिजे."
नोव्हेंबर 2024 मध्ये रशियानं युक्रेनच्या नीप्रोमध्ये एका औद्योगिक ठिकाणी एक मध्यम पल्ल्याचं प्रयोगात्मक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉंच केलं होतं. त्याचा वापर लाईव्ह टेस्टिंग ग्राउंड म्हणून करण्यात आला होता.
या क्षेपणास्त्राबद्दल युक्रेननं म्हटलं आहे की त्याचा वेग मॅक 11 (म्हणजेच 8,439 मैल प्रति तास) इतका होता. त्याला 'ओरेश्निक' असं नाव देण्यात आलं आहे. रशियन भाषेत त्याचा अर्थ हेझल वृक्ष असा होतो.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की हे क्षेपणास्त्र मॅक 10 च्या वेगानं उडालं.
बातम्यांनुसार, शेवटच्या टप्प्यात या क्षेपणास्त्राचं वॉरहेड अनेक भागात विभागलं गेलं. अशा प्रकारे या एका क्षेपणास्त्रानं एकाच लक्ष्याऐवजी, वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करणारे प्रोजेक्टाइल सोडले. शीतयुद्धाच्या काळापासून हे तंत्रज्ञान वापरलं जातं आहे.
एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की क्षेपणास्त्रं पडण्याचा आवाज खूप मोठा नव्हता. मात्र त्यामुळे अनेक स्फोट झाले. सहा वॉरहेड वेगवेगळ्या लक्ष्यांवर पडले, मात्र जास्त नुकसान झालं नाही. कारण ते निष्क्रिय होते.

फोटो स्रोत, Getty Images
युरोप आणि नाटोचे सदस्य असलेल्या देशांसाठी खरा धोका रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आहे. यातील काही क्षेपणास्त्रं रशियाच्या कॅलिनिनग्राडमध्ये बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आली आहेत.
मात्र मोठा प्रश्न असा आहे की जर पुतिन यांनी कीव्हवर 'ओरेश्निक' क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचे आदेश दिले आणि त्या क्षेपणास्त्रांवर जर शक्तीशाली स्फोटकं असतील, तर त्याचे परिणाम किती विध्वंसकारी असतील?
मॅक 10 या वेगाचा विचार करता, रशियाचं ओरेश्निक क्षेपणास्त्रं दर 5 मिनिटात जवळपास एक हजार किलोमीटरचं अंतर कापतं. त्यामुळे हे क्षेपणास्त्रं 5 ते 15 मिनिटात युरोपात पोहोचू शकतं. म्हणजेच संपूर्ण युरोप त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतो.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दावा केला की या क्षेपणास्त्राचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आहे आणि ही क्षेपणास्त्रं त्यांच्या लक्ष्याला पूर्णपणे 'नष्ट' करू शकतात.
रशियाकडे इतरही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं आहेत.
पुतिन यांनी त्यांच्या हवाई दलाच्या किंजल क्षेपणास्त्रांचा उल्लेख करत दावा केला की ती इतकी वेगवान आहेत की त्यांना रोखणं शक्य नाही.
या दाव्यानंतर त्यांनी युक्रेनवर ही क्षेपणास्त्र अनेकवेळा सोडली. मात्र प्रत्यक्षात समोर आलं की किंजल हे काही पूर्णपणे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र नाही. तसंच यातील अनेक क्षेपणास्त्रं हाणून पाडण्यातदेखील आली.

फोटो स्रोत, REUTERS/Valentyn Ogirenko
रशियाची अतिशय वेगवान आणि आकाशात असताना दिशा बदलण्याची क्षमता असणारी 'एवनगार्ड' क्षेपणास्त्रं, ही पाश्चात्य देशांसाठी चिंतेची बाब आहे.
2018 मध्ये हे क्षेपणास्त्र जगासमोर आणताना पुतिन यांनी पाच इतर तथाकथित 'सुपरवेपन'देखील सादर केली होती. त्यांनी दावा केला होती की या क्षेपणास्त्रं रोखणं अशक्य आहे.
डॉ. सिद्धार्थ कौशल सुचवतात की या क्षेपणास्त्रांचा मुख्य उद्देश प्रत्यक्षात 'अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली'चा भेद करणं हा असू शकतो.
ते म्हणतात, "रशियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातून असंही दिसतं की एवनगार्डसारख्या क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे."
दुसरीकडे, पश्चिम पॅसिफिक क्षेत्रात व्यूहरचनात्मक आघाडी मिळवण्यासाठी अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा वाढते आहे.
चीनकडे जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तीशाली हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. 2024 च्या शेवटी चीननं, 'जीडीएफ-600' हे त्यांचं नवीन हायपरसॉनिक ग्लाइड व्हेहिकल सादर केलं.
याची पेलोड क्षमता म्हणजे 1,200 किलोग्रॅम स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र मॅक 7 (5,370 मैल प्रति तास) इतक्या वेगानं जाऊ शकतं.
ब्रिटनचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठीचे महत्त्वाचे प्रयत्न
ब्रिटन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या पाच अण्वस्त्रधारी स्थायी सदस्यांपैकी एक आहे. मात्र असं असूनही, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या स्पर्धेत ब्रिटन सध्या खूपच मागे आहे.
मात्र आता उशीरानं का होईना, या स्पर्धेत सहभागी होण्याचा किंवा त्यात अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न ब्रिटननं सुरू केला आहे.
एप्रिल महिन्यात ब्रिटनचं संरक्षण मंत्रालय आणि डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेबोरेटरीनं जाहीर केलं की एका मोठा चाचणी कार्यक्रम पूर्ण करून ब्रिटिश वैज्ञानिकांनी 'ऐतिहासिक कामगिरी' केली आहे.
ब्रिटिश सरकार, संरक्षण उद्योग आणि अमेरिकन सरकार यांच्यातील त्रिपक्षीय सहकार्यातून ब्रिटनची ही प्रोपल्शन टेस्ट पूर्णत्वास गेली होती.
अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील नासा लँगली रिसर्च सेंटरमध्ये सहा आठवडे 233 'यशस्वी स्टॅटिक टेस्ट रन' पूर्ण करण्यात आले.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी हा 'महत्त्वाचा क्षण' असल्याचं म्हटलं.
अर्थात, हे क्षेपणास्त्र पूर्णपणे तयार होण्यासाठी अजून काही वर्षे लागतील.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
विलियम फ्रीर यांना वाटतं की पाश्चात्य देशांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार करण्याबरोबरच त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी भक्कम डिफेन्स सिस्टम विकसित करण्यावर देखील लक्ष दिलं पाहिजे.
ते म्हणाले, क्षेपणास्त्र युद्धात ही बाब नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे. तुमच्याकडे शत्रूच्या हल्ल्यापासून तुमचं कमी नुकसान होईल अशी क्षमता हवी आणि त्याचबरोबर शत्रूच्या लॉंच प्लॅटफॉर्मवर हल्ला करण्याची क्षमतादेखील तुमच्याकडे हवी.
"जर तुमच्याकडे या दोन्ही क्षमता असतील, तर तुम्ही फक्त स्वत:चं संरक्षणच करू शकत नाही, तर शत्रूवर परिणामकारक प्रतिहल्ला देखील करू शकता. अशा परिस्थितीत शत्रूनं युद्ध सुरू करण्याची शक्यता कमी होते."
अर्थात टॉम शार्प यांना वाटतं की सध्या यासंदर्भात आपण किती चिंता करायची, यावरदेखील सावधगिरी बाळगली पाहिजे.
ते म्हणाले, "हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या बाबतीतील मुख्य मुद्दा असा आहे की यातील दोन्ही पैलू म्हणजे संरक्षण आणि आक्रमण, हे तितकेच कठीण आहेत. अजूनपर्यंत दोन्हीपैकी एकही पूर्णपणे विकसित झालेला नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











