10 दिवसांच्या मुलीचं नातेवाईकाकडूनच अपहरण आणि नंतर संगोपन, काही वर्षांनी वाढदिवसाच्या पार्टीत समोर आलं सत्य

डेलिमार वेरा 1997 मध्ये एका आगीत गायब झाल्या होत्या आणि त्या मरण पावल्याचं मानण्यात आलं होतं

फोटो स्रोत, Wag Entertainment

फोटो कॅप्शन, डेलिमार वेरा 1997 मध्ये एका आगीत गायब झाल्या होत्या आणि त्या मरण पावल्याचं मानण्यात आलं होतं
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मुंडो

तिनं खूप मोठा आवाज ऐकला. ती लगेच वरच्या मजल्यावर गेली. तिथे ज्या खोलीत तिचं बाळ झोपलेलं होतं, त्या खोलीला आग लागली होती. तिने पाळण्याकडे पाहिलं, मात्र बाळ तिथे नव्हतं. तिनं उर्वरित बेडरूममध्ये पाहिलं, मात्र बाळ तिला दिसलं नाही.

ती 15 डिसेंबर 1997 ची रात्र होती. फिलाडेल्फियामध्ये लुझ क्युवास आणि पेड्रो वेरा हे प्युर्टो रिकोचं जोडपं राहत होतं. त्यांना दोन लहान मुलं आणि एक 10 दिवसांची मुलगी होती. तिचं नाव डेलिमार होतं. त्या रात्री या जोडप्याच्या घराला आग लागली.

एक गूढ आग, बेपत्ता झालेलं बाळ आणि एक गुपितामुळे दोन कुटुंबांचं विभाजन झालं.

अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. या जोडप्याची 10 दिवसांची मुलगी, डेलिमारचा ठावठिकाणा कधीही सापडला नाही. ती या आगीत मृत पावल्याचं गृहीत धरण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं आहे की, ती "आगीत पूर्णपणे भस्मसात झाली."

या घटनेमुळे डेलिमारचे आई-वडील उद्ध्वस्त झाले.

आग लागण्याआधी पेड्रोची चुलत बहीण कॅरोलिनचा वावर

आग लागण्याच्या थोडा वेळ आधी, कोणीतरी घराचं दार ठोठावलं होतं. ते ऐकून लुझ दरवाजा उघडण्यास गेल्या. दरवाजात कॅरोलिन होती. ती लुझ यांच्या पतीची म्हणजे पेड्रो यांची चुलत बहीण होती. कॅरोलिनच्या आईचं लग्न पेड्रो यांच्या काकाशी झालं होतं.

"माझ्या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. मला मदतीची गरज आहे. पेड्रो आहे का?" असं कॅरोलिननं विचारलं.

"नाही, ते इथे नाही. तुम्ही पुन्हा कधीतरी येऊ शकता," असं लुझ म्हणाल्या.

"ठीक आहे. माझ्याकडे पेड्रोसाठी एक काम आहे. माझ्याकडे त्याच्यासाठी एक काम आहे," असं कॅरोलिन म्हणाल्या.

त्यावेळेस पेड्रो बेरोजगार होते. त्यामुळे लुझ यांनी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं.

त्यानंतर लुझ यांनी पेट्रो यांना फोन केला. पेड्रो घरी परतले. मग कॅरोलिनबरोबर ते त्यांच्या परिचितांच्या घरी गेले.

तिथे पोहोचल्यानंतर, अचानक कॅरोलिन ओरडून म्हणाल्या, "अरे बापरे! मी माझं पाकीट तुमच्या घरीच विसरले आहे. इथेच थांब, मी लगेच परत येते."

त्यानंतर कॅरोलिन कारनं पेड्रो यांच्या घरी परतल्या आणि लुझशी त्यांची पुन्हा भेट झाली.

"लुझ, मी माझं पाकीट इथेच विसरले."

"ठीक आहे, आत या."

कॅरोलिन घरात गेल्या आणि त्यांनी बाथरुमसाठी जायचं आहे असंही सांगितलं. बाथरूम घरात वरच्या मजल्यावर होतं.

लुझ क्युवास यांची लहान मुलगी डेलिमार बेपत्ता झाल्यामुळे त्या खूप दु:खी झाल्या होत्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुझ क्युवास यांची लहान मुलगी डेलिमार बेपत्ता झाल्यामुळे त्या खूप दु:खी झाल्या होत्या
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काही मिनिटांनी, लुझ छोट्या डेलिमारला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या. त्यांनी छोट्या डेलिमारला बेडवर ठेवलेलं होतं. मात्र आता ते बाळ तिथं नव्हतं. त्याऐवजी ते खिडकीजवळच्या पाळण्यात होतं. ते पाहून लुझ यांना आश्चर्य वाटलं.

"तू तिला का हलवलंस?" असं त्यांनी कॅरोलिनला विचारलं.

"मला वाटलं ते खाली पडेल, त्याला दुखापत होऊ नये असं मला वाटत होतं," असं कॅरोलिन म्हणाल्या.

मग कॅरोलिन खाली गेल्या आणि लुझदेखील त्यांच्या मागोमाग गेल्या. त्यांनी निरोप घेतला आणि कॅरोलिन तिथून निघून गेल्या.

त्यानंतर जवळपास लगेचच, लुझ यांना एक मोठा आवाज ऐकू आला. त्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेल्या. तिथे बेडरूमला आग लागली होती.

त्या खोलीत गेल्या, मात्र आता डेलिमार पाळण्यात नव्हती. खिडकी उघडी होती. ही आश्चर्यकारक बाब होती. कारण ती हिवाळ्यातील थंड रात्र होती.

लुझ, आग आणि धुरामधून चालत मुलीला शोधत होत्या. मात्र डेलिमार त्यांना सापडली नाही.

लुझ यांच्या चेहऱ्याला आगीचा दाह जाणवू लागला. दाराचं हँडल तापलं होतं. लुझ यांना वाटलं, "मला या खोलीतून बाहेर पडावं लागेल. कारण जर मी इथे जास्त वेळ थांबले, तर मी मरेन. मात्र माझी मुलगी इथे नाही."

काही मिनिटांनी, अग्निशमन दलाचे जवान आले. त्यांनी आग विझवली आणि गादीचा एक तुकडा खाली आणला. त्यांनी तो गुंडाळला आणि लुझकडे तिच्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष म्हणून दिला.

या घटनेबद्दल माहिती मिळताच, पेड्रो लगेचच घरी पोहोचले.

कॅरोलिन अजूनही फूटपाथवरच होत्या.

"अरे देवा, माझं बाळ कुठे आहे?" असं पेड्रो यांनी विचारलं. कॅरोलिन यांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

गुपित उलगडणारी वाढदिवसाची पार्टी

गर्भधारणेच्या आधीच्या महिन्यांमध्ये कॅरोलिन आनंदी दिसत होत्या. त्यांचं कुटुंब, मित्र आणि सहकारी त्या चौथ्यांदा गरोदर असल्याबद्दल त्यांच्या तोंडून ऐकत होत्या.

त्यांना मुलगी हवी होती. तिचं नाव त्यांनी आलिया ठेवलं. कॅरोलिननं जेव्हा त्यांच्या बाळाच्या जन्माची नोंद केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की एका मैत्रिणीच्या मदतीनं त्यांनी घरीच बाळाला जन्म दिला आहे.

लुझ आणि पेड्रो यांच्या घरापासून त्या 20 किलोमीटर अंतरावर राहत होत्या. त्यामुळे त्यांची फारशी भेट होत नव्हती.

काही वर्षांनी लुझ आणि पेड्रो विभक्त झाले.

दिवस निघून गेले आणि जानेवारी 2004 मध्ये पेड्रो यांच्या बहिणीच्या घरी वाढदिवसाची पार्टी होती.

आता लुझ आणि पेड्रो जरी विभक्त झाले होते, तरी लुझ यांची वेरा कुटुंबाशी मैत्री होती. त्यामुळे त्यांनी लुझ यांना पार्टीचं आमंत्रण दिलं.

खरंतर लुझ यांना पार्टीला जायचं नव्हतं, मात्र त्यांची बहीण, तातिया यांनी त्यांचं मन वळवलं.

"ठीक आहे, मी काही मिनिटांसाठी येईल आणि मग निघेन," असं लुझ म्हणाल्या.

लुझ क्युवास यांना खात्री होती की त्यांची मुलगी आगीत मरण पावलेली नव्हती आणि ती अजूनही जिवंत होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुझ क्युवास यांना खात्री होती की त्यांची मुलगी आगीत मरण पावलेली नव्हती आणि ती अजूनही जिवंत होती

लुझ जेव्हा पार्टीत आल्या, तेव्हा त्यांना कॅरोलिन यांच्याबरोबर एक लहान मुलगी दिसली. एका गोष्टीनं लुझ यांचं लक्ष वेधलं गेलं. ते म्हणजे त्या मुलीच्या चेहऱ्यावरील डिंपल.

"ही माझी मुलगी आहे!" असं लुझ म्हणाल्या.

"लुझ, वेडेपणाचं काहीही करू नकोस. तू आपल्याला अडचणीत आणशील," असं पेड्रो लुझ यांना म्हणाले.

जेव्हा ती मुलगी इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली, तेव्हा लुझ देखील तिच्या मागे गेल्या.

मग लुझ त्या मुलीजवळ गेल्या आणि तिला म्हणाल्या, "तुझ्या केसात चुईंग गमचा तुकडा अडकलेला आहे."

"बरं, मग तो काढा," असं आलियानं उत्तर दिलं.

त्यानंतर लुझनं आलियाचे केस इतके जोरात ओढले की तिला त्याचा त्रास झाला. त्यांनी एक केस उपटला आणि तिथून गायब झाल्या.

आलिया खालच्या मजल्यावर आली आणि तिच्या आईकडे गेली.

"चला, जाऊया," असं कॅरोलिननं सांगितलं.

"का? आपल्याला इथं फार वेळ झालेला नाही," असं आलिया म्हणाली.

"नाही, आपण गेलं पाहिजे. इथे एक वाईट बाई आहे जिला तुझ्याबरोबर राहायचं आहे. मी तिला माझ्यापासून तुला दूर नेऊ देणार नाही," कॅरोलिनने आलियाला सांगितलं.

डॉक्टरांकडे डीएनए चाचणी

अनेक आठवड्यांनी कॅरोलिन यांनी आलिया आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला, अँजेलिकाला डॉक्टरांकडे नेलं.

ते वेटिंग रुममध्ये त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत असताना, कॅरोलिन त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेल्या.

त्यांनी अँजेलिकाला दरवाजावर लक्ष ठेवण्यात सांगितलं आणि स्प्रेची एक छोटी बाटली काढली. त्यात एक पारदर्शक द्रव होता.

त्यांनी आलियाला तिचं तोंड उघडण्यास सांगितलं आणि तो स्प्रे तिच्या जीभेवर मारला.

"ते गिळू नकोस," असं कॅरोलिनानं सांगितलं.

मात्र काही मिनिटांनी, वेटिंग रूममध्ये असतानाच आलियानं ते गिळलं.

आलिया डॉक्टरांसमोर येईपर्यंत याच दृश्याची काही वेळा पुनरावृत्ती झाली.

डॉक्टरांनी तिच्या जीभेवरील द्रवाचा स्वॅब म्हणजे नमुना घेतला.

स्प्रे बाटलीतील तो पारदर्शक द्रव म्हणजे कॅरोलिन यांची लाळ होती.

ते त्या क्लिनिकमध्ये डीएनए चाचणी करत होते.

लहानपणीची डेलिमार वेरा

फोटो स्रोत, Delimar Vera

फोटो कॅप्शन, लहानपणीची डेलिमार वेरा

आलियाचा केस ताब्यात आल्यामुळे लुझ यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी तसंच पोलिसांना त्यांच्यावर विश्वास बसावा आणि आलियाची डीएनए चाचणी व्हावी यासाठी आकाश पाताळ एक केलं.

शेवटी त्यांना एक लोकप्रतिनिधी सापडला ज्यानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्याच मदतीनं लुझ यांना एक वकील सापडला, ज्यानं त्याचा खटला चालवला.

फेब्रुवारी 2004 मध्ये डीएनए चाचणीतून समोर आलेल्या निष्कर्षानं लुझ यांना वाटत असलेली गोष्ट खरी ठरवली.

6 वर्षांची आलिया हर्नांडेझ प्रत्यक्षात डेलिमार वेरा म्हणजे लुझ यांनी मुलगी होती. कॅरोलिन यांनी गरोदरपणा आणि प्रसूतीचं नाटक केलं होतं. त्यानंतर त्यांनी बाळाला म्हणजे छोट्या डेलिमारला पळवलं होतं.

काही दिवसांनी, कॅरोलिननं गुन्हा कबूल केला आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली.

दोन आईंची मुलगी, गोंधळलेलं आयुष्य

जे काही घडत होतं, ते छोट्या डेलिमारसाठी खूपच गोंधळात टाकणारं होतं.

"तुम्ही मला माझ्या आईपासून दूर का नेत आहात?" असा विचार डेलिमारच्या (आलिया) मनात आला.

"मात्र जसजसे दिवस गेले आणि मी बातम्या पाहिल्या, तसं मी पाहिलं की कॅरोलिनला गुन्हेगार दाखवलं जातं आहे," असं ती म्हणते.

तिला तिचं नवीन नाव आवडलं नाही. "सुरुवातीला मला ते अजिबात आवडत नव्हतं. कधीकधी लोक मला डेलिमार म्हणायचे आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे." आता ती नव्या आईबरोबर आणि नव्या भावंडांबरोबर राहत होती, जे तिच्यासाठी अनोळखी होते.

सत्य माहित झाल्यानंतर, डेलिमारला वाटलं होतं की तिच्या आयुष्यात दोन आई असतील

फोटो स्रोत, Delimar Vera

फोटो कॅप्शन, सत्य माहित झाल्यानंतर, डेलिमारला वाटलं होतं की तिच्या आयुष्यात दोन आई असतील

जवळपास 30 वर्षांनी डेलिमार म्हणतात, "मला वाटलं की मला दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळतील. मला खरोखरंच असं वाटलं की मला दोन आई आहेत. माझी आई कॅरोलिन आणि मग माझी आई लुझ. मला वाटलं की माझ्या आईबरोबर माझं अद्भूत आयुष्य असेल."

"मग मला वाटलं की माझी आई कॅरोलिनबरोबर माझं दुसरं आयुष्यदेखील असू शकतं. कदाचित काही महिन्यांनी किंवा कदाचित काही वर्षांनी. मात्र शेवटी आम्ही पुन्हा एकत्र राहू."

त्यावेळेस डेलिमार कॅरोलिन यांना भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या होत्या आणि त्या कॅरोलिनला रागावल्या होत्या.

डेलिमार म्हणतात, "ती कठीण गोष्ट होती. मी म्हणाले होते, तू माझं अपहरण का केलंस? तुला तीन मुलं होती. तू माझ्या बाबतीत असं का केलंस? तू मला अशा स्थितीत का आणलंस, जिथे मी आयुष्याबद्दल खूप गोंधळलेली आहे आणि आता माझ्या आयुष्यात इतके नवे बदल होत आहेत?"

"मी तिच्यावर खूप चिडले होते. मात्र तिनं माझी माफी मागितली नाही. ती म्हणाली होती की आपण पुन्हा एकमेकांना भेटू. त्यावेळेस असं घडलं होतं आणि ते निरोप घेण्यासारखं होतं."

त्यानंतर डेलिमार कॅरोलिनला पुन्हा कधीही भेटल्या नाहीत.

त्या दिवशी कॅरोलिनचा साथीदार कोण होता?

मात्र त्यांच्या डोक्यात काही प्रश्न घोळत होते. पेड्रो यांच्या घराला आग लागल्यानंतर कॅरोलिन पेड्रो यांच्याबरोबर फूटपाथवर होत्या, तर मग तिनं छोट्या डेलिमार यांना कसं चोरलं?

कॅरोलिन यांच्याबरोबर एखादा साथीदार असला पाहिजे, ज्यानं खिडकीतून आत येऊन डेलिमार यांना नेलं होतं. कॅरोलिन यांचा तो साथीदार कोण होता?

स्वत:चा बचाव करताना कॅरोलिन यांनी त्यांचा चुलत भाऊ पेड्रो यांना दोषी ठरवलं होतं. डेलिमार यांच्या अपहरणाशी पेड्रो यांचा काही संबंध होता का?

अलीकडेच पेड्रो यांनी डेलिमार यांच्या कथेवर एक माहितीपट बनवून तिला विचारलं, तोपर्यंत, त्या या विषयावर त्यांच्याशी कधीही बोलू शकल्या नव्हत्या.

2007 मध्ये डेलिमार वेरा आणि त्यांची आई लुझ क्युवास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2007 मध्ये डेलिमार वेरा आणि त्यांची आई लुझ क्युवास

पेड्रो यांनी कॅरोलिन यांचा आरोप नाकारला आणि डेलिमार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

"मात्र आम्हाला माहीत आहे की कॅरोलिनचा एक साथीदार होता आणि तोच तिच्या जीवाचं रक्षण करेल," असं डेलिमार म्हणतात.

"ज्यानं कोणी मला त्या पाळण्यातून उचललं आणि खिडकीबाहेर फेकलं, तो रात्रीच्या वेळेस वाऱ्याबरोबर गायब झाला. दुर्दैवानं ती व्यक्ती कोण होती, हे आम्हाला माहीत नाही," असं डेलिमार म्हणाल्या.

(हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचं 'लाईव्हज लेस ऑर्डिनरी' या पॉडकास्टच्या एका भागावर आधारित होता. तो तुम्ही इथे इंग्रजीत ऐकू शकता.

डेलिमार वेरा यांचा माहितीपट, बॅक फ्रॉम द डेड: हू किडनॅप्ड मी? नोव्हेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.