You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी मरेपर्यंत ही भीती अशीच राहील', बांगलादेशातील मृत्यूहून भयंकर अशा गुप्त तुरुंगातून सुटलेल्यांची आपबिती
- Author, समिरा हुसैन
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, ढाका, बांगलादेशातून वार्तांकन
बांगलादेशातील शेख हसीना यांची राजवट जाऊन आता काही महिने उलटून गेले आहेत. तरीही शेख हसीना आणि त्यांच्या सरकारनं विरोधकांवर केलेले अत्याचार, विरोधकांचा छळ, सरकारच्या टीकाकारांना गायब करणं, याबद्दलची नवनवीन प्रकरणं आणि प्रकार समोर येतच आहेत.
विरोधक आणि टीकाकारांना गुप्त तुरुंगात अंधार कोठडीत ठेवून त्यांचा कसा भयानक छळ केला जात होता, हे आता समोर आलं आहे. यासंदर्भात एक चौकशी आयोगदेखील स्थापन करण्यात आला आहे.
शेख हसीना यांच्या राजवटीत बांगलादेशात गुप्त तुरुंगांचं जाळ कसं तयार करण्यात आलं होतं, त्या अंधार कोठड्यांचं स्वरुप कसं होतं, विरोधक किंवा टीकाकारांना त्यात कसं डांबलं जात होतं, कशाप्रकारे छळ केला जात होता, त्यातून वाचलेल्या पीडितांच्या मनात अजूनही किती प्रचंड भीती आहे, यासंदर्भातील बीबीसीचा हा विशेष रिपोर्ट.
तपास अधिकाऱ्यांनी घाईघाईनं बांधलेली भिंत तोडली, तेव्हा गुप्त तुरुंगातील कोठड्या सापडल्या.
ते एक नव्यानं बांधलेलं दार असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या मागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
एका अरुंद कॉरिडॉरच्या पलीकडे उजव्या आणि डाव्या बाजूला छोट्या खोल्या होत्या. तिथे पूर्ण अंधार होता.
तपास पथकाला कदाचित हा गुप्त तुरुंग कधीच सापडला नसता. विशेष म्हणजे तो ढाक्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एका दगड फेकण्याच्या अंतरावर होता. मीर अहमद बिन कासेम आणि इतरांच्या आठवणीतून तो तुरुंग सापडला होता.
बांगलादेशमधील पदच्युत नेत्याचे ते टीकाकार होते. त्यांना आठ वर्षे या गुप्त तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
ते तुरुंगात असताना बहुतांश वेळ त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. त्यामुळे त्यांना आठवणाऱ्या आवाजांवर ते अवलंबून होते. त्यांना विमानं उतरताना येणारा आवाज स्पष्टपणे आठवत होता.
त्यातून तपास अधिकाऱ्यांना विमानतळाजवळच्या लष्करी तळापर्यंत पोहोचण्यात मदत झाली. कंपाऊंडमधील मुख्य इमारतीच्या मागील बाजूस त्यांना एक छोटं मात्र कडक पहारा असलेलं बांधकाम आढळलं. ते विटा आणि कॉंक्रिटपासून बनवलेलं होतं आणि त्याला खिडक्याही नव्हत्या.
ते चटकन दिसून नये अशा पद्धतीनं लपवण्यात आलेलं होतं.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार हटवण्यात आल्यापासून आणि तुरुंगातील कैद्यांची सुटका करण्यात आल्यापासून, कासेम यांच्यासारख्या शेकडो पीडितांशी तपास अधिकारी बोलले आहेत. इतर अनेकांची बेकायदेशीररित्या हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
ढाका विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या तुरुंगासह अनेक गुप्त तुरुंग चालवणारे लोक प्रामुख्यानं रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) या प्रतिष्ठित दहशतवादविरोधी पथकातील होते. ते शेख हसीना यांच्या थेट आदेशावरून काम करत असल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
"संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोक बेपत्ता होण्याची सर्व प्रकरणं, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या परवानगीनं, मंजुरीनं किंवा आदेशानंच घडली आहेत," असं ताजुल इस्लाम यांनी बीबीसीला सांगितलं. ते बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाचे मुख्य वकील आहेत.
शेख हसीना यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की, कथित गुन्हे त्यांच्या माहितीशिवाय घडले आहेत. यासाठी ते जबाबदार नाहीत आणि लष्कर स्वतंत्रपणे याबाबत काम करत होतं. बांगलादेशचं सैन्य मात्र हे आरोप नाकारतं.
सात महिन्यांआधी कासेम आणि इतरांची सुटका झाली असेल. मात्र त्यांना अटकेत ठेवणाऱ्या आणि अजून मुक्त असणाऱ्या सुरक्षा दलांच्या सदस्यांची त्यांना भीती वाटते.
कासेम म्हणतात की, ते टोपी आणि मास्क घातल्याशिवाय कधीही घरातून बाहेर पडत नाहीत.
"प्रवास करताना मी नेहमीच माझा कोणी पाठलाग तर करत नाही ना, याकडे लक्ष ठेवत असतो," असं कासेम म्हणाले.
गुप्त तुरुंगांचं 'व्यापक' जाळं
कासेम हळूहळू काँक्रिटच्या पायऱ्या चढून, त्यांना कुठे ठेवण्यात आलं होतं, हे बीबीसीला दाखवतात.
धातूच्या एका जड दरवाजाला लोटून ते त्यांचं डोकं खाली वाकवतात आणि दुसऱ्या एका अरुंद पॅसेजमधून "त्यांना ठेवण्यात आलेल्या" खोलीत जातात. हीच ती कोठडी जिथे त्यांना आठ वर्षे ठेवण्यात आलं होतं.
"बाहेरच्या जगाशी माझा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता. त्यामुळे मला जिवंत गाडण्यात आलं आहे, असंच मला वाटलं," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
त्या कोठडीत सूर्यप्रकाश येण्यासाठी कोणतीही खिडकी किंवा दरवाजा नव्हता. ते जेव्हा या गुप्त तुरुंगातील कोठडीत होते, तेव्हा त्यांना दिवस आहे की रात्र हेच कळत नव्हतं.
कासेम वयाच्या चाळीशीत असून वकील आहेत. त्यांनी यापूर्वी मुलाखती दिल्या आहेत. मात्र त्यांना ज्या अरुंद, छोट्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, ती कोठडी दाखवत त्याची तपशीलवार माहिती त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना दिली आहे.
आम्ही ती कोठडीत टॉर्चच्या प्रकाशात पाहिली. ती इतकी छोटी, अरुंद आहे की एखाद्या किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाला देखील सरळ उभं राहणं कठीण होईल. तिथे कुबट वास येत होता. तिथल्या काही भिंती पडल्या आहेत.
विटा आणि काँक्रीटचे काही तुकडे जमिनीवर विखुरले आहेत. गुन्हेगारांनी (कासेमसारख्यांना बेकायदेशीरपणे अटकेत ठेवणारे) त्यांच्या गुन्ह्यांचे पुरावे नष्ट करण्याचा केलेला तो शेवटचा प्रयत्न आहे.
"हे एक डिटेंशन सेंटर आहे. बांगलादेशात अशा 500, 600, 700 हून अधिक कोठड्या आहेत, असं आम्हाला आढळलं आहे. यातून दिसतं की, हे व्यापक प्रमाणात आणि अतिशय पद्धतशीरपणे करण्यात येत होतं," असं सरकारी वकील इस्लाम म्हणतात. ते बीबीसीसोबत या गुप्त तुरुंगाला भेट द्यायला आले होते.
कासेम यांना त्यांच्या कोठडीतील फिकट निळ्या रंगाच्या टाइल्सदेखील स्पष्टपणे आठवतात. आता त्यांचे तुकडे जमिनीवर पडलेले आहेत. त्यामुळेच तपास अधिकारी या विशिष्ट खोलीपर्यंत पोहोचले.
तळ मजल्यावरील कोठड्यांच्या तुलनेत ही कोठडी बरीच मोठी आहे. तिचा आकार 10 फूट बाय 14 फूट (3 मीटर X 4.3 मीटर) आहे. एका बाजूला बैठं म्हणजे भारतीय पद्धतीचं शौचालय आहे.
कासेम यांनी त्यांच्या कोठडीचे आणि तुरुंगाचे सांगितलेले तपशील अतिशय वेदनादायी होते. ते खोलीत फिरत असताना, त्यांनी इतकी वर्षे बंदिवासात राहताना वेळ कसा घालवला याचं वर्णन केलं.
उन्हाळ्यात तिथे असह्य उष्णता असायची. थोडीशी हवा मिळावी म्हणून ते जमिनीवर वाकायचे आणि त्यांचा चेहरा दरवाजाच्या तळाशी जितका ठेवता येईल तितका ठेवायचे.
'ते मृत्यूपेक्षाही भयंकर होतं'
त्यांना ज्या कोठडीत इतकी वर्षे ठेवलं होतं, तिथेच पुन्हा येणं हे क्रूरपणाचं वाटतं. मात्र, कासेम यांना वाटतं की, तिथे काय घडलं आहे, हे जगानं पाहणं महत्त्वाचं आहे.
"ज्या वरिष्ठ, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी या फॅसिस्ट राजवटीला मदत केली, प्रोत्साहन दिलं, ते अजूनही त्यांच्या पदावर आहेत," असं कासेम म्हणतात.
"आमच्या कहाण्या जगासमोर आणण्याची गरज आहे. जे परत येऊ शकले नाहीत त्यांना न्याय मिळावा आणि जे वाचले आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते केलं पाहिजे," असं ते म्हणतात.
आधीच्या वृत्तांमध्ये असं म्हटलं होतं की, कासेम यांना आयनाघोर किंवा "हाऊस ऑफ मिरर्स" नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका कुप्रसिद्ध तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. ते मुख्य गुप्तचर विभागाच्या ढाक्यातील मुख्यालयात आहे.
मात्र, आता तपास अधिकाऱ्यांना वाटतं आहे की, अशा प्रकारच्या अनेक कोठड्या, तुरुंग आहेत.
कासेम यांनी बीबीसीला सांगितलं की, पहिले 16 दिवस सोडून उर्वरित सर्व काळ ते आरएबीच्या तळावरील कोठडीत होते. तपास अधिकाऱ्यांना आता संशय आहे की, त्यांना सुरुवातीला काही दिवस ठेवण्यात आलेलं ठिकाण हे ढाक्यातील पोलिसांच्या गुप्तचर शाखेत होतं.
त्यांना वाटतं की, त्यांच्या कुटुंबाच्या राजकारणामुळेच त्यांना गायब करण्यात आलं होतं. 2016 मध्ये ते त्यांच्या वडिलांचं प्रतिनिधित्व करत होते.
त्यांचे वडील देशातील सर्वात मोठ्या इस्लामिक पक्षाचे, जमात-ए-इस्लामीचे वरिष्ठ सदस्य होते. त्यांच्यावर खटला सुरू होता आणि नंतर त्यांना फाशी देण्यात आली.
'मला वाटलं होतं, मी कधीच बाहेर पडणार नाही'
बीबीसी ज्या इतर पाच जणांशी बोललं त्यांनी सांगितलं की, त्यांना नेण्यात आलं, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आणि हातात बेड्या घालण्यात आल्या. त्यांना क्रॉंकिटच्या एका अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं जिथं बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नव्हता.
अनेक प्रकरणांमध्ये पीडित सांगतात की, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला.
बीबीसी स्वतंत्रपणे त्यांच्या कहाण्यांची पडताळणी करू शकत नसली, तरी जवळपास ते सर्वचजण म्हणतात की, त्यांना प्रचंड भीती वाटते की कदाचित एखाद्या दिवशी त्यांची रस्त्यावर किंवा बसमध्ये त्यांना अटकेत ठेवणाऱ्यांशी भेट होईल.
"आता मी जेव्हा कारमध्ये बसतो किंवा घरी एकटाच असतो. तेव्हा मी कुठे होतो याचा विचार करून मला भीती वाटते. मला आश्चर्य वाटतं की, मी कसा वाचलो. मी खरोखरंच वाचणार होतो का?" असं 35 वर्षांचे अतिकूर रेहमान म्हणतात.
ते सांगतात की, त्यांचं नाक मोडलं होतं आणि त्यांच्या हातात अजनूही वेदना होतात. "त्यांनी मला हातकड्या घातल्या होत्या आणि मला खूप मारहाण केली."
रसेल म्हणतात की, गेल्या वर्षी जुलै महिन्यात, सरकारविरोधी निदर्शनं सुरू असताना, ढाक्याच्या जुन्या भागातील एका मशीदीबाहेर काही माणसं त्यांच्याकडे आली. त्यांनी सांगितलं की, ते कायदा अंमलबजावणी विभागाचे अधिकारी आहेत आणि मला त्यांच्याबरोबर जावं लागेल.
पुढच्याच मिनिटाला, रसेल यांना हातकड्या घालून, डोळ्यावर पट्टी बांधून आणि चेहरा झाकून, एका राखाडी रंगाच्या कारमध्ये नेण्यात आलं.
चाळीस मिनिटांनंतर रसेल यांना कारमधून बाहेर काढण्यात आलं आणि एका इमारतीत नेण्यात आलं. तिथे त्यांना एका खोलीत ठेवण्यात आलं.
त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर, एकेक करत लोक येऊ लागले आणि ते मला प्रश्न विचारू लागले. तू कोण आहेस? काय करतोस? असं ते विचारत होते. त्यानतंर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरूवात केली, असं रसेल म्हणतात.
"त्या जागेत असणं ही एक भयानक गोष्ट होती. मला वाटलं की, आता मी कधीही इथून बाहेर पडू शकणार नाही," असं रसेल म्हणतात.
रसेल आता त्यांची बहीण आणि मेहुण्याबरोबर राहतात. ढाक्यातील बहिणीच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसून रसेल यांनी त्यांच्या बंदिवासातील काळाचं वर्णन केलं.
बोलताना ते फारसे भावनिक होत नाहीत. त्यांच्या या भयानक अनुभवापासून ते अलिप्त असल्यासारखे दिसतात.
त्यांनादेखील असंच वाटतं की, त्यांची अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित होती. कारण ते सत्ताधारी पक्षाचा प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) विद्यार्थी नेते होते. त्यांचे वडील बीएनपीचे वरिष्ठ सदस्य होते.
तर रसेल यांचे परदेशात राहणारे भाऊ सातत्यानं सोशल मीडियावर शेख हसीना यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट लिहायचे.
रसेल म्हणतात की, त्यांना नेमकं कुठे बंदिवासात ठेवण्यात आलं आहे, हे कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
मात्र या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशच्या हंगामी सरकारचे नेते मुहम्मद युनूस यांनी तीन अटक केंद्रांना भेट दिल्यानंतर, त्यांना वाटतं की त्यांना ढाक्यातील अगरगाव जिल्ह्यात ठेवण्यात आलं होतं.
'मी गायब होईन, असं मला सांगण्यात आलं होतं'
शेख हसीना यांना राजकीय मतभेद, टीका सहन होत नव्हती, हे एक उघड गुपीत होतं. त्यांच्यावर टीका केल्यास तुम्ही "गायब" केले जाऊ शकत होता, तेही कोणताही मागमूस न ठेवता, असं बंदिवासातील माजी कैदी, राजकीय विरोधक आणि तपास अधिकारी सांगतात.
मात्र, बांगलादेशात एकूण किती लोक बेपत्ता किंवा गायब झाले याची संख्या कधीच स्पष्ट होणार नाही.
एका बांगलादेशी सामाजिक संस्थेनं, 2009 पासून जबरदस्तीनं बेपत्ता झालेल्या लोकांचा आढावा घेतला आहे. या संस्थेनं किमान 709 जण जबरदस्तीनं बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. त्यापैकी 155 जण अजूनही बेपत्ता आहेत.
सप्टेंबर महिन्यात जबरदस्तीनं लोक बेपत्ता होण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केल्यापासून, त्यांच्याकडे कथित पीडितांकडून 1,676 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. तक्रार करण्यासाठी आणखी लोक पुढे येत आहेत.
मात्र, यातून एकूण संख्या समोर येत नाही. प्रत्यक्षात ही संख्या खूप अधिक असल्याचं मानलं जातं आहे.
कासेमसारख्या लोकांशी बोलल्यानंतरच ताजुल इस्लाम यांना माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह या बेकायदेशीर तुरुंग किंवा डिटेन्शन सेंटरसाठी जबाबदार असलेल्या लोकांविरोधात खटला उभारता आला आहे.
या सर्व पीडितांना जरी वेगवेगळ्या ठिकाणी बंदिवासात ठेवण्यात आलं होतं, तरी देखील त्यांची कहाणी, त्यांनी कथन केलेल्या गोष्टी भयावहपणे सारख्याच आहेत.
मुहम्मद अली अराफात शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे प्रवक्ते आहेत. ते या प्रकरणात पक्ष किंवा पक्षातील लोकांचा सहभाग असल्याचं नाकारतात.
ते म्हणतात की, जर लोकांना जबरदस्तीनं बेपत्ता करण्यात आलं असेल, तर ते शेख हसीना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही व्यक्तीच्या आदेशानुसार करण्यात आलेलं नाही.
शेख हसीना यांना सत्तेतून हटवण्यात आल्यानंतर त्या पलायन करून भारतात आल्या आहेत.
"जर अशी कोणतीही अटक झाली असती तर ती गुंतागुंतीच्या अंतर्गत लष्करी कारवाईतून झाली असती. या लोकांना गुप्त बंदिवासात ठेवल्यामुळे अवामी लीग किंवा सरकारला कोणताही राजकीय लाभ झाल्याचं मला दिसत नाही," असं अराफात म्हणतात.
बांगलादेशच्या लष्कराच्या मुख्य प्रवक्त्यानं सांगितलं की, त्यांना "या प्रकरणांची कोणतीही माहिती नाही."
"अशा प्रकारचे गुप्त तुरुंग किंवा डिटेंशन सेंटर हाताळत असल्याच्या गोष्टीस लष्कर स्पष्टपणे नकार देतं," असं लेफ्टनंट अब्दुल्लाह इब्न झैद यांनी बीबीसीला सांगितलं.
ताजुल इस्लाम यांना वाटतं की, या गुप्त तुरुंगांमध्ये बंदिवासात ठेवण्यात आलेले लोक हेच अवामी लीगच्या यातील सहभागाचे पुरावे आहेत.
ते म्हणतात,"अटक करण्यात आलेल्या सर्व लोकांची वेगवेगळी राजकीय ओळख होती. आधीच्या राजवटीच्या विरोधात, त्यावेळच्या सरकारच्या विरोधात त्यांनी फक्त आवाज उठवला होता आणि त्यामुळेच त्यांना ही अटक करण्यात आली होती."
आतापर्यंत त्यांनी 122 अटक वॉरंट जारी केले आहेत. मात्र अद्याप कोणालाही न्याय मिळालेला नाही.
त्यामुळेच इक्बाल चौधरी (71 वर्षे) यांच्यासारख्या पीडितांना वाटतं की, अजूनही त्यांच्या जीवाला धोका आहे.
चौधरी यांना बांगलादेश सोडायचा आहे. 2019 मध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर अनेक वर्षांपासून ते घराबाहेर पडलेले नाहीत. अगदी बाजारातदेखील गेलेले नाहीत.
इक्बाल चौधरी यांना अटक करणाऱ्यांनी त्यांना धमकावलं होतं की, त्यांच्या अटकेबद्दल कधीही तोंड उघडू नये.
"जर तू कधीही तोंड उघडलंस की, तू कुठे होतास, तुझ्याबरोबर काय झालं आणि जर तुला पुन्हा अटक करण्यात आली तर तुला कोणीही कधीही शोधू शकणार नाही किंवा तू पुन्हा कधीही कोणालाही दिसणार नाही. तू या जगातून गायब होशील," या भाषेत धमकावल्याचं इक्बाल चौधरी सांगतात.
भारत आणि अवामी लीग पार्टीविरोधात लिखाण केल्याचा आरोप असलेले इक्बाल चौधरी म्हणतात की, या लिखाणामुळेच त्यांचा छळ करण्यात आला.
"मला मारहाण करण्यात आली तसंच विजेचा धक्कादेखील देण्यात आला. विजेचा धक्का दिल्यामुळे माझं एक बोट निकामी झालं आहे. माझ्या पायातील ताकद गेली आहे, माझी शारीरिक ताकद गेली आहे," असं ते सांगतात.
इतर कैद्यांचा छळ केल्यानंतर येणारे त्यांचे आवाज त्यांना आठवतात. पुरुष वेदनेनं रडताना आणि किंचाळतानाचे आवाज त्यांना आठवतात.
"मला अजूनही भीती वाटते," असं चौधरी म्हणतात.
'मी मरेपर्यंत ही भीती कायम राहील'
रहमतुल्लाह 23 वर्षांचे आहेत. ते देखील या गुप्त कोठड्यांमध्ये होते. अजूनही ते प्रचंड घाबरलेले आहेत. ते म्हणतात, "त्यांनी माझ्या आयुष्यातून दीड वर्ष हिरावून घेतलं. माझ्या आयुष्यातील ते दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत. जिथे माणूसच असता कामा नये, अशा ठिकाणी त्यांनी मला झोपायला लावलं."
29 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री आरएबीच्या अधिकाऱ्यांनी रहमतुल्लाह यांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यातील काही युनिफॉर्म होते आणि तर काहीजण साध्या कपड्यांमध्ये होते. रहमतुल्लाह शेजारच्या शहरात आचाऱ्याचं काम करत होते आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनचं प्रशिक्षणदेखील घेत होते.
अधिकाऱ्यांनी वारंवार चौकशी केल्यानंतर, रहमतुल्लाह यांना हे स्पष्ट झालं की सोशल मीडियावरील त्यांच्या भारतविरोधी आणि इस्लामिक पोस्टसाठी त्यांना जबरदस्तीनं अटक करण्यात आली होती.
पेन आणि कागदाचा वापर करून त्यांनी त्यांच्या कोठडीचा आराखडा (ले-आऊट) काढला. त्यात त्यांनी एक उघडं शौचकुपदेखील काढलं, ज्याचा ते वापर करायचे.
"ढाक्यातील त्या ठिकाणाबद्दल विचार केल्यावर देखील त्यांना भीती वाटते. तिथे अंग पसरून झोपण्यासाठी देखील नीट जागा नव्हती. त्यामुळे मला अंग गोळा करून झोपावं लागायचं. झोपल्यानंतर मला माझे पाय लांब करता येत नव्हते," असं रहमतुल्लाह सांगतात.
बीबीसीनं अटकेत राहिलेल्या दोन माजी कैद्यांचीदेखील मुलाखत घेतली. मायकल चकमा आणि मसरुर अन्वर हे ते दोन पीडित. गुप्त तुरुंगाची माहिती घेण्यासाठी आणि त्या तुरुंगांमध्ये काय चाललं आहे, याबद्दलच्या तपशीलांना पुष्टी देण्यासाठी ही मुलाखत घेण्यात आली.
बंदिवासाच्या काळात काही पीडितांच्या शरीरावर ज्या जखमा झाल्या होत्या, त्यांच्या खुणा आजही त्यांच्या अंगावर आहेत. ते जिथे जातात तिथे त्यांच्या मागोमाग येणाऱ्या मानसिक छळाबद्दल ते बोलतात.
वर्षानुवर्षांच्या हुकुमशाही राजवटीनंतर देशाची पुनर्उभारणी करण्याचा प्रयत्न करत असताना, बांगलादेश त्याच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
या पीडितांना अटकेत ठेवणाऱ्या गुन्हेगारांवर योग्य प्रकारे खटला चालवणं ही या देशाच्या लोकशाहीच्या दिशेनं होणाऱ्या वाटचालीची महत्त्वाची परीक्षा असणार आहे.
ताजुल इस्लाम यांना वाटतं की, हे होऊ शकतं आणि हे घडलंच पाहिजे. ते म्हणतात, "पुढील पिढ्यांच्या बाबतीत याप्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती आपण होऊ देता कामा नये. पीडितांना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांनी खूप काही सहन केलं आहे."
कासेम ज्या काँक्रीटच्या कोठडीत होते, त्याच्या उरलेल्या भागात उभं राहून कासेम म्हणतात, या प्रकरणातील खटला शक्य तितक्या लवकर चालवला गेला पाहिजे, जेणेकरून हे प्रकरण संपून देशाला पुढे जाता येईल.
रहमतुल्लाह यांच्यासाठी हे सर्व इतकं सोपं नाही.
"ती भीती अजूनही गेलेली नाही. मी मरेपर्यंत ती भीती कायम राहील," असं ते वेदनेनं म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)