चीनचा लष्करी सरावादरम्यान तैवानला वेढा, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

चीन

चीनने लष्करी सरावादरम्यान तैवानला वेढा दिल्यानंतर त्यानंतर तैवाननेही यावर प्रतिक्रिया देताना ही चिथावणी असल्याचे म्हटले आहे.

आज तैवानच्या चहूबाजूंनी चीनची लष्करी कवायत सुरू आहे आणि या दरम्यान चीनने तैवानला वेढा दिला आहे.

या लष्करी कवायतीचे ग्राफिक्स व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या व्हीडिओत असं दिसत आहे की हळूहळू चीनचे लष्कर तैवानच्या भूप्रदेशाच्या जवळ येत आहे.

चीनने प्रसिद्ध केलेला व्हीडिओ

याआधी देखील चीनने लष्करी सरावादरम्यान तैवानला वेढा दिला आहे.

ग्राफिक्समधील लाल रंग आज ( 14 ऑक्टोबर ) चीनने दिलेला वेढा दर्शवतो, पिवळा रंग या वर्षी मे मध्ये चीनने जो वेढा घातला होता तो दर्शवतो तर 2022 साली चीनने तैवानला जो वेढा दिला होता तो पिवळ्या रंगातून दर्शवण्यात आला आहे.

बीबीसीचे चीन प्रतिनिधी स्टीफन मॅकडॉनल यांचे विश्लेषण

बीबीसी न्यूजचे चीन प्रतिनिधी स्टीफन मॅकडॉनल यांनी याचे विश्लेषण केले आहे. ते सांगतात,

चीनच्या लष्कराच्या मते तैवानवर जर चहूबाजूंनी हल्ला करण्याची वेळ आली तर त्याची ही रंगीत तालिम आहे. पुढे चीनकडून सांगण्यात आलं की पीपल्स लिबरेशन आर्मीचे सर्व विभाग या सरावात सहभागी झाले आहेत आणि ते एकत्रितपणे ही कवायत करत आहेत.

जर तैवानला शक्तिनिशी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर चीन काय करू शकतं याचेच हे प्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे.

तैवानच्या सरकारने या कवायतींवर प्रतिक्रिया दिली आहे. ही सरळ सरळ चिथावणी असल्याचे तैवानच्या सरकारने म्हटले आहे.

तैवानच्या मुद्द्यावरून वाद का?

तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे असं ते मानतात आणि चीनला असं वाटतं की तैवान हा शेवटी त्यांच्या ताब्यात येणार आहे.

तैवान आणि चीन यांचं एकीकरण होणार असल्याचा पुनरुच्चार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वेळोवेळी केला आहे. ते मिळवण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यताही नाकारलेली नाही.

तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची राज्यघटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे.

लाल रेष
लाल रेष

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चीनचा लष्करी सराव वाढल्याचे दिसत आहे. या कवायतींची व्याप्ती वाढत चालली आहे. पण अशा कवायती चीनकडून सातत्याने होत आहेत.

या कवायतींचा असा अर्थ नाही की आजच चीनकडून युद्ध पुकारले जाणार आहे.

आम्ही देखील सज्ज आहोत असं तैवानच्या सरकारने म्हटलं आहे. जर दोन्ही पक्षांकडून अंदाज घेण्यात चूक झाली तर गोळीबार सुरू होऊ शकतो हीच खरी चिंतेची बाब आहे असं तैवानच्या सरकारने म्हटले आहे.

तैवान का महत्त्वाचं आहे?

तैवान चीनच्या आग्नेय समुद्र किनाऱ्यापासून 100 मैल अंतरावरचं एक बेट आहे.

चीन मानतं की तैवान त्यांच्यातलाच एक प्रांत आहे तो पर्यायाने एक दिवशी चीनचाच भाग होणार आहे. दुसरीकडे तैवान स्वत:ला एक स्वतंत्र प्रांत असल्याचं मानतं.

सैनिक

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशातच तैवान वसला आहे. चीनने जर तैवानवर ताबा मिळवला तर पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांच्या मते तो पॅसिफिक महासागरात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होईल.

त्यामुळे गुआम आणि हवाई बेटांवर असलेल्या अमेरिकेच्या सैन्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार असल्याचं चीनचं म्हणणं आहे.

चीनपासून तैवान वेगळा का झाला?

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली. त्यावेळी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाचा तिथल्या सत्ताधारी कौमितांग पक्षाबरोबर लढा सुरू होता.

1949 मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला होता आणि त्यांनी राजधानी बीजिंगवर ताबा मिळवला. त्यानंतर कौमितांग पक्षाचे लोक मुख्य भूमीपासून ते अग्नेयच्या तैवान वेटावर निघून गेले.

त्यानंतर कौमितांग हा तैवानमधला सगळ्यांत महत्त्वाचा पक्ष झाला आहे. तैवानच्या इतिहासात बहुतांश काळ याच पक्षाची सत्ता आहे.

सध्या जगातील 13 देश तैवानला एक स्वतंत्र देश मानतात. तैवानला स्वतंत्र ओळख मिळू नये यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील असतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)