तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ही' शपथ घेतल्यावर चीन का संतापला?

तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते
    • Author, रुपर्ट विंगफील्ड-हाएज आणि निक मार्श
    • Role, बीबीसी न्यूज

चीन-तैवान वाद नेहमीच जगाचं लक्ष वेधून घेत असतो. एकीकडे चीनचा तैवान वरील दावा तर दुसरीकडे तैवानची सार्वभौमत्वासाठीची भूमिका यातून या प्रदेशात अनेकदा तणाव निर्माण होत असतो.

या दोन देशांमधील ताज्या तणावाला कारणीभूत ठरलं आहे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते यांनी राष्ट्रीय दिनानिमित्त केलेलं भाषण. लाय या प्रदेशात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप चीननं केला आहे.

या पार्श्वभूमीवर तैवान आणि चीनमध्ये नेमकं काय चाललं आहे याविषयी.

तैवानचे राष्ट्राध्यक्ष विलियम लाय यांनी याच वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या सर्वांत महत्त्वाच्या भाषणात तैवानच्या सार्वभौमत्वाला किंवा स्वराज्याच्या दर्जाला कायम ठेवण्याची शपथ घेतली.

तैवानवरील चीनच्या दाव्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत लाय म्हणाले की, "आमच्या सार्वभौमत्वाला हात लावण्यासाठी होत असलेल्या कोणत्याही प्रयत्नाला विरोध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

अर्थात दुसऱ्या बाजूला लाय यांनी तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता आणि स्थैर्य राखल्याचा दावा केला. त्याचबरोबर त्यांनी हवामान बदल, संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी आणि प्रादेशिक सुरक्षा कायम राखण्यासाठी चीनसोबत काम करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे.

लाय यांच्या भाषणावर चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, "या भाषणानं तैवानची स्वातंत्र्यासंदर्भातील त्यांची हट्टी भूमिका जगासमोर उघड झाली आहे."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

भाषणात नरमाई पण भूमिकेत कठोरपणा

तैवान नॅशनल डे च्या निमित्त तैपेईमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना लाय म्हणाले, "रिपब्लिक ऑफ चायना (तैवान) आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (चीन) एकमेकांच्या अधीन नाहीत."

नऊ दिवस आधीच कम्युनिस्ट चीननं त्यांचा 75 वा राष्ट्रीय दिवस साजरा केला होता.

लाय म्हणाले, "या जमिनीवर, लोकशाही आणि स्वांतत्र्य फुलतं आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला तैवानचं प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही."

याआधी लाय यांनी लोकांना धीर दिला होता की, त्यांच्या राष्ट्रीय दिनी कोणतीही 'वेगळी' गोष्ट होणार नाही. त्यांना लोकांना विश्वासात घ्यायचं होतं की, ते असा कोणताही मुद्दा मांडणार नाहीत जेणेकरून चीन आणखी संतप्त होईल.

त्यांना हे स्पष्टीकरण द्यावं लागण्यामागं एक कारण होतं. ते म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये अनेक प्रसंगी त्यांनी अशी वक्तव्ये केली होती जी लोकांना चिथावणीखोर वाटली होती.

तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते

नॅशनल तैवान विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले लेव नॅकमॅन यांना वाटतं की गुरुवारी राष्ट्राध्यक्ष लाय यांनी केलेलं भाषण बऱ्याच प्रमाणात संतुलित स्वरूपाचं होतं.

नॅकमॅन यांनी बीबीसीला सांगितलं, "आधीच्या भाषणांच्या तुलनेत हे भाषण बरंच मवाळ आणि कमी आक्रमक होतं. त्यांच्यावर टीका करण्यासाठी या भाषणातून चीनला फार कमी मुद्दे आणि बहाणे सापडतील."

ते पुढे म्हणाले, "अर्थात तरीदेखील या भाषणावर टीका करण्यासाठी चीन काहीतरी कारण शोधून काढेलच."

नॅकमॅन यांना वाटतं आहे की, यासंदर्भात पुढील काही दिवसांमध्ये या प्रदेशात आणखी लष्करी सराव करून चीनकडून तिखट प्रतिक्रिया दिली जाईल.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

चीनने काय प्रतिक्रिया दिली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्वातंत्र्याबाबत राष्ट्राध्यक्ष लाय यांना हेकेखोर म्हणत चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं त्यांच्या भाषणावर आणि राजकीय लाभ घेण्यासाठी तैवानच्या सामुद्रधुनीत तणाव वाढण्याच्या त्यांच्या धोकादायक हेतूंवर टीका केली.

लाय यांच्या चीनी नावाचा वापर करत गुरूवारी माओ निंग यांनी पत्रकारांना सांगितलं की "लाय चिंग-ते प्रशासन काय म्हणतं, काय करतं या गोष्टीनं काहीही फरक पडत नाही. तैवानच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच चीनचा आहे, ही वस्तुस्थिती ते बदलू शकणार नाहीत. त्याचबरोबर चीनचं एकीकरण होणारच आहे, या ऐतिहासिक वस्तुस्थितीला देखील ते बदलू शकणार नाहीत. शेवटी हे होणारच आहे."

मागील आठवड्यात लाय म्हणाले होते की चीन, तैवानची मातृभूमी होईल ही गोष्ट पूर्णपणे अशक्य आहे. कारण या बेटावरील सरकारची स्थापना 1911 मध्ये झाली होती. म्हणजेच 1949 मध्ये चीनच्या मुख्यभूमीत सध्याचं कम्युनिस्ट सरकार येण्याच्या काही दशकं आधी हे झालं होतं.

शनिवारी तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या आधी एका संगीत कार्यक्रमात लाय म्हणाले होते, "त्याऐवजी रिपब्लिक ऑफ चायना ( तैवान), पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या (चीन) नागरिकांची मातृभूमी बनू शकतं."

तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष लाय चिंग-ते

तैवानमध्ये रिपब्लिक ऑफ चायनाची राज्यघटना कायम आहे. याची स्थापना चीनच्या मुख्य भूमीत करण्यात आली होती.

1949 मध्ये गृहयुद्धात पराभव झाल्यानंतर रिपब्लिक ऑफ चायनाचं (तैवान) सरकार निर्वासित झालं आणि आश्रय घेण्यासाठी तैवान बेटावर गेलं. तेव्हापासून तैवानवर त्यांचं शासन सुरू आहे.

मागील महिन्यात लाय यांनी प्रादेशिक अखंडतेच्या आधारे तैवानचं चीनशी एकीकरण करण्याच्या चीनच्या दाव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

लाय यांनी प्रश्न विचारला होता की, जर असं झालं तर चीन त्या सर्वच प्रदेशांवर दावा करेल जे कधीकाळी चीनच्या साम्राज्याचा भाग होते.

आपल्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्यावर लाय एका मुलाखतीत म्हणाले होते की, "जर चीनला तैवानचं चीनशी एकीकरण प्रादेशिक अखंडतेसाठी नाही करायचंय."

ते म्हणाले, "जर खरोखरंच प्रादेशिक अखंडतेसाठी चीनला असं करायचं असेल तर ते ही गोष्ट रशियाबरोबर का करत नाहीत."

तैवानच्या स्वातंत्र्याबद्दल काय म्हणाले लाय?

लाय यांनी 1858 च्या आइगुन कराराचा संदर्भ दिला. या करारांतर्गत चीननं मंचुरियाचा एक मोठा भाग रशियाला दिला होता.

जेव्हा हा करार झाला होता, तेव्हा चीन त्याला 'अपमानाचं शतक' म्हणत असे. त्यावेळी पाश्चिमात्य शक्तींनी आणि जपाननं कमकुवत अशा किंग राजघराण्याचं शोषण केलं होतं.

बुधवारी चीनच्या सरकारनं प्रतिक्रिया देत म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष लाय त्यांच्या "धोकादायक हेतूं"मुळे या प्रदेशातील तणाव वाढवत आहेत.

तैवानसाठीच्या चीन विभागकडून एक वक्तव्य जाहीर करण्यात आलं.

त्यात म्हटलं आहे की, "लाय चिंग-ते तैवानला स्वातंत्र्याचं खोटं आश्वासन देत आहेत. ही गोष्ट नव्या बाटलीत जुनी दारू असण्यासारखी आहे. तैवानच्या स्वातंत्र्याबाबत च्या त्यांची हट्टी भूमिका तसंच शत्रुत्व आणि संघर्षाबाबतचे त्यांचे धोकादायक हेतू उघड झाले आहेत."

याच वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत लाय यांनी तैवानचे माजी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्या जागी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. त्साई इंग-वेन यादेखील डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (डीपीपी) च्या नेत्या होत्या.

अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं की माजी राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्यापेक्षा लाय यांनी सार्वजनिकरीत्या केलेली वक्तव्यं अधिक आक्रमक आहेत. त्साई इंग-वेन त्यांच्या भाषणांमध्ये अतिशय सावधपणे भूमिका मांडत असत.

लाय सरकारनं अधिक आक्रमक भूमिका घेतलेली असताना देखील, लाय यांनी चीन आणि तैवानमधील स्थिती कायम ठेवण्यावर भर दिला आहे.

ते म्हणाले की तैवानला स्वातंत्र्य घोषित करण्याची आवश्यकता नाही. कारण तैवान आधीच एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. तैवान कधीही पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या अंमलाखाली नव्हता.

गुरुवारच्या लाय यांच्या भाषणातील बहुतांश भाग ऊर्जा, हवामान बदल आणि घरं यासारख्या देशांतर्गत मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)