You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाकावरून कसा जाणून घेता येईल आयुष्यातला तणाव? मानसशास्त्रज्ञांनी अशी केली चाचणी
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जेव्हा मला अचानक तीन अनोळखी लोकांसमोर पाच मिनिटांचं भाषण देण्यास सांगितलं आणि 2023 पासून 17 च्या अंतरानं गणना करण्यास सांगितलं गेलं, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.
खरं तर, ससेक्स विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ एका संशोधन प्रकल्पासाठी हा थोडासा भीतीदायक अनुभव कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करत होते. यामध्ये ते थर्मल कॅमेऱ्याच्या मदतीनं तणावाचा अभ्यास करत होते.
तणावाचा चेहऱ्याच्या रक्त प्रवाहावर परिणाम होतो आणि नाकातील तापमानात घट झाल्यामुळे तणावाची पातळी शोधली जाऊ शकते, असं मानसशास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.
तणावानंतर एखादी व्यक्ती किती लवकर सामान्य स्थितीत परत येते हे देखील पाहिलं जाऊ शकतं. अभ्यासात सहभागी असलेल्या मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ताणतणावावरील संशोधनात थर्मल इमेजिंग "गेम चेंजर" ठरू शकतं.
मी ज्या प्रायोगिक तणाव चाचणीतून गेले ती खूप विचारपूर्वक आणि जाणूनबुजून अस्वस्थता निर्माण करण्यासाठी तयार केली गेली होती.
विद्यापीठात पोहोचेपर्यंत, मी कोणत्या प्रक्रियेतून जाणार आहे याची मला कल्पना नव्हती.
सुरुवातीला मला खुर्चीवर बसवून हेडफोनवर व्हाईट नॉईज ऐकायला सांगितलं गेलं. व्हाईट नॉईज हा एक ध्वनी आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेचे (फ्रिक्वेन्सीचे) आवाज असतात.
जेव्हा वेगवेगळ्या वारंवारता असलेल्या ध्वनींचे मिश्रण केले जाते, तेव्हा निर्माण होणाऱ्या आवाजाला 'व्हाईट नॉईज' असं म्हणतात.
याचा उपयोग झोप येण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी किंवा बाह्य आवाजामुळे विचलित होणं टाळण्यासाठी केला जातो.
तणाव कसा ओळखला जातो?
इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, अगदी शांततापणे.
यानंतर ही चाचणी करणाऱ्या संशोधकानं तीन अज्ञात लोकांना खोलीत बोलावलं.
ते सर्वजण शांतपणे माझ्याकडे पाहू लागले. मग संशोधकानं मला सांगितलं की माझ्याकडे फक्त तीन मिनिटं आहेत आणि मला माझ्या 'स्वप्नातील नोकरी'बद्दल पाच मिनिटं बोलायचं आहे.
हे ऐकल्यानंतर मला माझ्या घशाजवळ एक उबदार संवेदना जाणवली, मानसशास्त्रज्ञांनी थर्मल कॅमेऱ्यानं माझ्या चेहऱ्याचा बदललेला रंग रेकॉर्ड केला.
माझ्या नाकाचं तापमान झपाट्यानं खाली आलं. थर्मल इमेजमध्ये ते निळं झालं.
कोणतीही तयारी न करता पाच मिनिटांत मी ते कसं सांगायचं याचा विचार करत असताना हे सर्व घडलं. मग मी म्हणू लागले की मला अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमात सामील व्हायचं आहे.
ससेक्सच्या संशोधकांनी 29 स्वयंसेवकांवर ही स्ट्रेस टेस्ट म्हणजेच तणाव चाचणी घेतली.
प्रत्येकाच्या नाकाचं तापमान 3 ते 6 अंशांनी कमी झालं होतं.
माझ्या मज्जासंस्थेमुळे माझ्या नाकातून डोळ्यांकडे आणि कानांकडे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे माझ्या नाकातील तापमान 2 अंशांनी कमी झालं होतं.
कोणताही धोका मला पाहता आणि ऐकता यावा यासाठी शरीराची ही प्रतिक्रिया होती.
या संशोधनात सहभागी झालेले बहुतेक लोक माझ्यासारखे पटकन सामान्य स्थितीत आले. काही मिनिटांतच त्याचं नाक पुन्हा गरम झालं.
प्रमुख संशोधक प्राध्यापक गिलियन फॉरेस्टर म्हणाले की, एक रिपोर्टर आणि ब्रॉडकास्टर असल्यानं मला कदाचित "तणावपूर्ण परिस्थितीची सवय आहे".
ते मला म्हणाले, "तू नेहमीच कॅमेऱ्यासमोर असतेस आणि अनोळखी लोकांशी बोलत असतेस, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुझी ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे."
"पण तुमच्यासारख्या व्यक्तीमध्येही रक्तप्रवाहातील बदल दर्शवितात की 'नाक थंड होणं' हे तणावातील बदलांचं विश्वसनीय सूचक आहे."
'थंड नाक'
ताणतणाव हा जीवनाचा एक भाग असला तरी, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे संशोधन तणावाला धोकादायक पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करू शकतं.
प्राध्यापक फॉरेस्टर म्हणतात, "एखाद्याच्या नाकाचं तापमान सामान्य होण्यास किती वेळ लागतो हे ती व्यक्ती तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास किती सक्षम आहे हे दर्शवतं."
"जर या परिस्थितीतून बाहेर पडणं असामान्यपणे मंद गतीनं असेल, तर हे चिंता किंवा नैराश्याचं लक्षण असू शकतं का? आणि आपण याबद्दल काही करू शकतो का?"
खरंच, हे तंत्र कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय केवळ शारीरिक प्रतिसादाचं मोजमाप करतं, म्हणून हे अर्भक किंवा संवाद न साधणाऱ्या लोकांमध्ये ताणतणावाचं निरीक्षण करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतं.
माझ्या तणाव चाचणीचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक कठीण होता. मला 2023 पासून 17 च्या अंतरानं काउंटडाउन करण्यास सांगितलं गेलं.
जेव्हा जेव्हा मी चूक करायचे, तेव्हा त्या तीन अनोळखी लोकांच्या पॅनलपैकी कोणीतरी एक मला अडवायचे आणि पुन्हा सुरुवातीपासून गणना करायला सांगायचे.
मी कबूल करते की मानसिकदृष्ट्या गणना करण्यात मी कमकुवत आहे.
जेव्हा मी गणना करण्याच्या प्रयत्नात अडखळत होते, तेव्हा फक्त या भरलेल्या खोलीतून बाहेर पळून जाण्याचा विचार मी करत होते.
या संशोधनात सामील झालेल्या 29 स्वयंसेवकांपैकी केवळ एकानंच चाचणी चालू असताना मध्येच खोलीतून बाहेर जाण्याबाबत सांगितलं.
बाकीच्या लोकांनी माझ्यासारखीच ही चाचणी पूर्ण केली.
चाचणीच्या वेळी जरी ते अपमानास्पद वाटलं असलं तरी, शेवटी आम्हाला हेडफोनवर ऐकण्यासाठी काहीतरी छान देण्यात आलं.
चिंपांझींना व्हिडिओ दाखवला गेला तेव्हा काय झालं?
प्राध्यापक फॉरेस्टर 18 ऑक्टोबर रोजी लंडनमधील न्यू सायंटिफिक लाइव्ह इव्हेंटमध्ये प्रेक्षकांसमोर तणाव मापनाची ही पद्धत सादर करतील.
कदाचित या पद्धतीबद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे थर्मल कॅमेरे ताणतणावात शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद पकडतात, जो की तणावाच्या वेळी आपोआप येतो. आणि हे केवळ मानवांमध्येच होतं असं नाही तर चिंपांझी, गोरिला यांसारख्या प्राइमेट्समध्येही होतं.
(प्राइमेट्स म्हणजे मानव, माकडं आणि वानरांसह सस्तन प्राण्यांच्या सर्वात विकसित आणि बुद्धिमान गटाचा सदस्य)
म्हणून, हे तंत्र त्यांच्यावर देखील काम करू शकतं.
संशोधक सध्या चिंपांझी आणि गोरिला संवर्धन स्थळांवर वापरण्यासाठी ते तयार करत आहेत. या प्राण्यांचा ताण कसा कमी करता येईल हे समजून घेणं हा त्यांचा उद्देश आहे. विशेषत: कठीण परिस्थितीतून सुटका करून आणण्यात आलं आहे त्या प्राण्यांचं जीवन कसं सुधारता येईल, याचा विचार ते करत आहेत.
टीमला असं आढळून आसं की जेव्हा प्रौढ चिंपांझींना लहान (मुलं) चिंपांझींचे व्हिडिओ दाखवले गेले तेव्हा ते अधिक शांत झाले.
जेव्हा संशोधकांनी त्याच्या पिंजऱ्याजवळ एक पडदा लावला आणि व्हिडिओ प्ले केला, तेव्हा त्यांच्या नाकाचं तापमान वाढलं, म्हणजेच ते शांत झाले.
म्हणजे तणावाच्या बाबतीत लहान प्राण्यांना खेळताना पाहण्याचा मुलाखत देण्यापेक्षा किंवा हिशोब करण्यापेक्षा उलट परिणाम होताना दिसतो.
अशा अभयारण्यांमध्ये थर्मल कॅमेऱ्यांचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो. हे ज्या प्राण्यांना भूतकाळात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला आहे, अशा प्राण्यांना नवीन वातावरणाशी आणि गटाशी जुळवून घेण्यास मदत करू शकतं.
ससेक्स विद्यापीठातील संशोधक मारियान पेस्ले म्हणाल्या, "हे प्राणी आपल्याला त्यांना कसं वाटत आहे हे सांगू शकत नाहीत आणि कधीकधी त्यांच्या खऱ्या भावना लपवण्यात ते खूप चांगले असतात."
त्या म्हणतात, "मानवांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही शंभर वर्षांहून अधिक काळ प्राइमेट्सचा अभ्यास केला आहे."
"आता आपल्याला मानवी मानसिक आरोग्याबद्दल येवढं काही माहिती झालं आहे, तर आता या माहितीचा थोडा फायदा त्यांनाही दिला पाहिजे, अशी वेळ आली आहे."
या छोट्याशा वैज्ञानिक प्रयोगात मी सहन केलेल्या त्रासामुळे आपल्या या दूरच्या नातेवाईकांचं दुःख थोडं कमी होण्यास मदत झाली तर ते चांगलं होईल.
अतिरिक्त अहवाल : केट स्टीफन्स, फोटोग्राफी: केविन चर्च
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)