इम्रान खान यांच्याविषयी पसरणाऱ्या अफवांबद्दल विभक्त पत्नी जेमिमा गोल्डस्मिथने काय म्हटलं?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विभक्त पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांवर 'सूचक मौन बाळगून' असल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट लिहिताना त्यांनी म्हटलं की, "त्यांच्या (इमरान खान) मुलांना त्यांना चिठ्ठी पाठवण्याचीही परवानगी नाहीये. आणि आंतरराष्ट्रीय संघटना या सगळ्यावर 'सूचक मौन बाळगून' आहेत."

पाकिस्तानात गेल्या बुधवारपासून (26 नोव्हेंबर) सोशल मीडियावर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान यांनी आपल्या वडिलांच्या जिवंत असण्याचा पुरावा ज्याला 'प्रूफ ऑफ लाइफ' म्हणतात, तो मागितला आहे.

सोशल मीडियावर अनेक युजर्स इम्रान खान यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबतही अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. दरम्यान, इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान यांनीही आपल्या वडिलांच्या सुरक्षेवर प्रतिक्रिया दिली.

वडिलांच्या सुरक्षेबद्दल कासिम खान यांनी एक्सवर म्हटलं, "माझे वडील 845 दिवसांपासून तुरुंगात आहेत. गेल्या 6 आठवड्यांपासून त्यांना 'डेथ सेल' मध्ये एकांतवासात ठेवण्यात आलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाही."

"न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनंतरही त्याच्या बहिणींना प्रत्येक भेट नाकारण्यात आली आहे. ना कोणता फोन कॉल, ना कोणत्या भेटी आणि ना ते जिवंत असल्याचा कोणताही पुरावा. माझा आणि माझ्या भावाचा आमच्या वडिलांशी कोणताही संपर्क झालेला नाही," अशी माहिती कासिम खान यांनी दिली.

कासिम खान यांनी पुढे म्हटलं, "हा ब्लॅकआउट सुरक्षा प्रोटोकॉल नाही. त्यांची स्थिती लपवण्याचा आणि आमच्या कुटुंबाला ते सुरक्षित आहेत की नाही हे जाणून घेण्यापासून रोखण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. माझ्या वडिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि या अमानुष एकांतवासाच्या सर्व परिणामांसाठी पाकिस्तान सरकार नैतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे जबाबदार असेल."

"मी आंतरराष्ट्रीय समुदायाला, जागतिक मानवाधिकार संघटनांना आणि प्रत्येक लोकशाहीवादी आवाजाला तात्काळ हस्तक्षेप करण्याचं आवाहन करतो. ते जिवंत असल्याचा पुरावा मागा, न्यायालयाचा आदेश पुनर्संचयित करा, ही अमानवीय एकांतवासाची शिक्षा संपवा आणि केवळ राजकीय कारणांसाठी तुरुंगात टाकलेल्या पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय नेत्याची सुटका करण्याची मागणी करा," असं आवाहन कासिम खान यांनी केलं.

माजी पंतप्रधान इम्रान खान मागील दोन वर्षांहून जास्त काळ रावळपिंडीतील अदियाला तुरुंगामध्ये आहेत. त्यांना 19 कोटी पाउंडच्या (सुमारे 2 हजार कोटी रुपये) भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

सोशल मीडियावर इम्रान खान यांच्याबद्दलच्या अफवांदरम्यान अदियाला तुरुंगातील अधिकाऱ्यांनी इम्रान खान हे पूर्णपणे निरोगी असल्याचे म्हटले आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान हे पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना तुरुंगातील नियमांनुसार तसेच न्यायालयाच्या निर्देंशानुसार सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती अदियाला कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

दुसरीकडे, इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांनी त्यांच्या भावाबद्दलच्या सर्व अफवा पूर्णपणे फेटाळल्या आहेत.

तुरुंगात कैदेत असलेल्या इम्रान खान यांच्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

इम्रान खान यांच्या कुटुंबाला गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या अफवांना बळ मिळाल्याचं, कारण सांगितलं जात आहे.

या महिन्यात इम्रान खान यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती

इम्रान खान यांच्याबद्दलच्या अफवा कशा सुरू झाल्या?

पाकिस्तानमध्ये बुधवारी (26 नोव्हेंबर) रात्रीपासून सोशल मीडियावर 'इम्रान खान कुठे आहेत?' असा हॅशटॅग #WHEREISIMRANKHAN ट्रेंड करत आहे.

सोशल मीडिया साइट एक्सवर, पीटीआय समर्थक आणि युजर्स इम्रान खान कुठे आहेत आणि त्यांना भेटण्याची परवानगी का दिली जात नाही, असं विचारत आहेत.

तुरुंग प्रशासनाने अनेक आठवड्यांपासून इम्रान खान यांना भेटू दिले नसल्याचे त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांचे कुटुंबीय आणि पीटीआयच्या नेत्यांनी अदियाला तुरुंगाबाहेर यासाठी आंदोलनही केलं आहे.

अदियाला तुरुंगात आठवड्यातील एक दिवस कैद्यांना भेटण्यासाठी ठेवलेला असतो. त्या दिवशी पीटीआयचे अनेक कार्यकर्ते इम्रान खान यांना भेटायला तुरुंगाबाहेर जमले. परंतु, तुरुंग प्रशासनाने त्यांना इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी दिली नाही.

यानंतर लंडन येथील पीटीआयचे नेते झुल्फी बुखारी यांनी सोशल मीडियावर इम्रान खान यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आधीपासूनच सोशल मीडियावर पसरलेल्या वेगवेगळ्या अफवांना आणखी बळ मिळालं.

झुल्फी बुखारी म्हणाले की, "एकांतात कैद असलेल्या इम्रान खान यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत आहे. अनेक आठवडे उलटूनही, मी त्यांना भेटलेलो नाही."

"जर त्यांना (इम्रान खान) दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असेल, तर कुटुंबाला माहिती का दिली गेली नाही? न्यायालयाच्या आदेशानंतरही इम्रान खान यांच्यापर्यंत का पोहोचू दिलं जात नाही?"

ते पुढे म्हणाले, "सरकारचं याबद्दलचं मौन अत्यंत बेकायदेशीर आहे आणि खूप त्रासदायकही."

बुधवारी अदियाला तुरुंगाच्या बाहेर पीटीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये कार्यकर्ते आणि नेते कारागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करताना दिसत होते.

"तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना (इम्रान खान) अदियाला येथून दुसरीकडे हलवल्याचा संशय आहे," असं प्रसारमाध्यमांशी बोलताना पीटीआयचे नेते शौकत बसरा यांनी सांगितलं.

भारत आणि अफगाण मीडियातील बातम्यांच्या चौकशीची मागणी

सोशल मीडियावर इम्रान खान यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बहुतांश अफवा आणि माहिती भारत आणि अफगाणिस्तानमधील अकाऊंटवरून पोस्ट होत आहेत.

अशा अफवांनंतर पीटीआयनेही सरकारकडे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती देण्याची आणि या अफवांचं खंडन करण्याची मागणी केली आहे.

"अफगाण आणि भारतीय मीडिया प्लॅटफॉर्म्स तसेच विदेशी सोशल नेटवर्किंग साइट्सवरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत," असं पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने एक्सवर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

आपल्या निवेदनात पीटीआयने म्हटलं आहे की, "चेअरमन इम्रान खान यांची प्रकृती, सुरक्षा आणि सध्याच्या स्थितीबाबत सरकारने स्पष्ट आणि अधिकृत निवेदन जारी करावं. तसेच अशा धोकादायक आणि संवेदनशील अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जावी."

पंजाब सरकारने काय म्हटलंय?

इम्रान खान यांना रावळपिंडीतील अदियाला तुरुंगातून दुसरीकडे हलवण्यात आल्याच्या वृत्ताचं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने खंडन केलं आहे.

इम्रान खान पूर्णपणे बरे आहेत. त्यांना तुरुंगातून हलवण्यात आल्याचे दावे खोटे आहेत, असं पंजाबच्या माहिती मंत्री अजमा बुखारी यांनी सांगितलं.

त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत आणि डॉक्टरही त्यांच्या नियमित चाचण्या घेत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

माहिती मंत्री पुढे म्हणाल्या की, बुधवारी अदियाला तुरुंगाच्या अधीक्षकांचं विधान समोर आलं आहे. त्यांनी पीटीआयचे चेअरमन तुरुंगामध्ये राजकीय बैठका घेतात आणि अशा बैठकांमध्ये ते आंदोलनं आणि गोंधळ करण्याच्या सूचना देतात, असं म्हटलं आहे.

त्यांनी सांगितलं की, इम्रान खान हे एक कैदी आहेत आणि त्यांचा संपर्क त्यांचे कुटुंबीय आणि वकिलांपर्यंत मर्यादित असला पाहिजे.

या महिन्यात कुटंबीय आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना इम्रान खान यांना भेटण्यास परवानगी दिली नव्हती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)