खुनांचं सत्र थांबवण्यासाठीची एक बनावट हत्या, जगाला मूर्ख बनवणाऱ्या एका खूनाची गोष्ट

    • Author, जोनाह फिशर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, कीव्हहून

"त्यांच्याकडे एक हिट लिस्ट होती, त्यासाठी कितीही पैसे देण्यास ते तयार होते.

मग तुम्ही काय म्हणालात?

"मी नक्कीच सहमत असल्याचं सांगितलं. जर तुम्ही त्याला नकार दिला असता तर कदाचित तुमचाही अंत होऊ शकला असता.”

चेहऱ्यावर हास्य, गोरा, टक्कल आणि दाढी, आणि खूनाची सुपारी मिळालेला ओलेक्सी त्सिम्बालियुक माझ्या कारमध्ये शेजारी बसून माझ्याशी बोलत होता.

त्सिम्बुलियाक हे मुळात एक माजी धर्मगुरू. पण हीच व्यक्ती एक खून थांबवण्यासाठीचा प्रारंभ बिंदू ठरली. खून थांबवण्यासाठी करण्यात आलेल्या एका फेक एनकाऊंटर प्रकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

शिवाय, या प्रकरणाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांच्या हत्येत रशियाचा सहभाग कसा असतो, हे जगासमोर ठसवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, हे विशेष.

“मी अर्काडी बाबचेन्कोचा मारेकरी आहे,” असं त्सिम्बालियुक मल विनोदाने सांगत होता.

मे 2018 च्या अखेरीस, रशियन पत्रकार अर्काडी बाबचेन्को यांच्या हत्येची बातमी सर्वत्र पसरली होती.

या बातमीने जगभरात खळबळ माजल्याचं दिसून आलं.

बाबचेन्को हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक होते. युक्रेनची राजधानी कीव्ह येथे त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली.

ब्रिटनच्या सॅलिसबरी शहरात सर्गेई आणि युलिया स्क्रिपल यांच्या विषबाधेच्या आठवणी यामुळे लोकांच्या मनात ताज्या झाल्या.

त्यामुळे, हे प्रकरण रशियन सरकारच्या अत्याचारांशी जोडून पाहण्यात येऊ लागल्या.

काही तासांतच या प्रकरणाची चर्चा संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ते मांडण्यात आले. पण सुरुवातीला दिसत होतं, तसं या प्रकरणात काहीही नव्हतं.

मृत्यू झाल्यानंतर तब्बल 20 तासांनी अर्काडी बाबचेन्को हे जगासमोर जिवंत अवतरले.

एका पत्रकार परिषदेत बाबचेन्को यांना पुन्हा जगासमोर आणण्यात आलं.

राजकीय हत्या घडवून आणण्यात रशियन सरकारची भूमिका उघड करण्याच्या अत्यंत वादग्रस्त प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे त्यांचं बनावट एनकाऊंटर करण्यात आलं होतं.

युक्रेनची सुरक्षा संस्था SBU ने या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे प्रकरण काय आहे आणि या ते का व कशासाठी घडवण्यात आलं, याची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे. बीबीसीच्या पॅनोरमा आणि अवर वर्ल्ड टीव्ही कार्यक्रमांसाठी आणि वर्ल्ड सर्व्हिस रेडिओवरील असाइनमेंटअंतर्गत हा लेख लिहिण्यात आलेला आहे.

खूनांचं षडयंत्र

ओलेक्सी त्सिम्बालियुक नसते, तर अर्काडी बाबचेन्को नक्कीच मरण पावले असते.

त्सिम्बालियुक यांच्या फेसबुकवरील फोटोंवर प्रथम नजूर टाकूयात. सुरुवातीला त्यांनी सोनेरी वस्त्रं परिधान केलेलं काही फोटोंमध्ये दिसतं. त्यावेळी ते धर्मगुरू म्हणून काम करायचे.

इतर फोटोंमध्ये ते लष्करी पोशाख घालून बंदूक धरलेले दिसून येतात. त्यावेळी ते युद्धग्रस्त पूर्व युक्रेनममधील उजव्या विचारसरणीच्या गटांसाठी स्वयंसेवक होते.

गेल्या चार वर्षांपासून ते युक्रेनचे स्वयंसेवक असून रशियाच्या पाठिंब्याने लढणाऱ्या बंडखोरांविरुद्ध लढण्याचं ते काम करत आहेत.

एप्रिल 2018 च्या सुरुवातीला त्यांनी पूर्व युक्रेनमधील त्यांच्या संपर्कातील जुन्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला.

बोरीस हर्मन असं त्याचं नाव होतं. तो एक शस्त्रास्त्र निर्माता होता.

याविषयी त्सिम्बालियुक म्हणतात, "मला हर्मनने काही लोकांना मारायला सांगितले होतं. त्यापैकी बहुतेक जण रशियन होते.”

"त्याने मला सांगितलं की ते युक्रेनच्या विरोधात काम करत आहेत, ते आपले शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना मारून टाकलं पाहिजे. शिवाय, त्यासाठी मला पैसाही पुरवण्यात आला.

"मी अर्थातच मान्य केलं," ते हसत म्हणाले.

बोरीस हर्मनने आपल्याला निवडण्यामागचं कारण म्हणजे आपण हे प्रकरण योग्यरित्या हाताळू शकतो, असं त्यांना वाटलं असावं, असा विचार त्सिम्बालियुक यांनी केला.

यानंतर त्यांना त्यांच्या पहिल्या टार्गेटबद्दल माहिती पुरवण्यात आली.

पण, ही माहिती मिळताच त्सिम्बालियुक यांनी युक्रेनच्या SBU सुरक्षा सेवेशी संपर्क साधला.

"आम्हाला प्रकरण समजलं आणि आम्ही लगेचच त्सिम्बालियुक यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली," SBUचे प्रमुख वासिल हिट्सक यांनी सांगितलं.

SBU ला हर्मनच्या कृत्यांबाबत चांगलीच कल्पना होती. युक्रेनमध्ये रशियन समर्थक गोष्टींसाठी पैसे पुरवणारा तो हस्तक असल्याचं हिट्सक म्हणाले.

हिट्सक यांनी सांगितलं, “आम्ही त्सिम्बालियुक यांनी आता काय करावं, याबाबत कळवलं.”

तेव्हापासून, त्सिम्बालियुकने हर्मनबरोबरचे सर्व संवाद रेकॉर्ड करणं सुरू केलं.

मी सुपारीची रक्कम 30 हजार डॉलर ठेवली. हर्मन म्हणाला, बिअरसाठीचे आणखी 10 हजार डॉलर त्यामध्ये जोडू, त्सिम्बालियुक सांगतात.

पहिल्या टप्प्यातील पैसे एका शॉपिंग सेंटरच्या बाहेर कारमध्ये देण्यात आले.

SBUमधील अधिकाऱ्यांनी गुप्त कॅमेऱ्याने या मीटिंगचं चित्रीकरण केलं.

नंतर हा संवाद माध्यमांमध्ये प्रसिद्धही करण्यात आला आहे. यामध्ये पैसे कसे मोजायचे यावर चर्चा करताना दोन पुरुषांचे आवाज ऐकू येतात.

पहिला हप्ता भरल्यानंतर, SBU ने ठरवलं की आता टार्गेटवर असलेल्या अर्काडी बाबचेन्को यांच्याशी संपर्क साधण्याची आणि बनावट हत्येची योजना आखण्याची वेळ आली आहे.

खरं तर आम्हाला माहिती मिळाली की युक्रेनमध्ये अनेक युनिट्स आहेत. ही हत्या इतर हत्यांसाठीची फक्त एक चाचणी होती," SBUप्रमुख हिट्सक सांगत होते.

"इतर टार्गेट्सबाबत, त्यांच्यात कुणाचा सहभाग आहे, याविषयी माहिती मिळवण्यासाठी हा गुन्हा घडवून आणणं, हा केवळ एकच पर्याय आमच्याकडे होता.”

टार्गेट बाबचेन्को

यानंतर अर्काडी बाबचेन्को आणि SBU यांच्यात त्वरीत एक बैठक आयोजित केली गेली.

अर्काडी यांना षडयंत्राबाबत कल्पना देण्यात आली. तसंच, हर्मन आणि सिम्बालियुकच्या संवादाचं रेकॉर्डिंगही त्यांना ऐकवलं गेलं.

पण, हे प्रकरण अधिक सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला रशियन पत्रकार बाबचेन्को आणि त्यांच्या भूतकाळावर थोडी नजर मारावी लागेल

1990 च्या दशकात, बाबचेन्को रशियन सैन्यात भरती होते. ते चेचन्यामध्ये लढले. नंतर ते जॉर्जिय आणि युक्रेनमध्ये युद्ध वार्ताहर बनले.

पूर्व युक्रेनमधील युद्धात रशियाचा सहभाग आणि क्राइमियाचा बेकायदेशीर ताबा यांच्यावरील त्यांच्या वार्तांकनात त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर जोरदार टीका केली. तेव्हापासूनच ते रशियन सरकारच्या निशाण्यावर होते.

बाबचेन्को म्हणतात, “पुतीन यांना सगळं हडप करायचं आहे.”

"एक छोटा हुकूमशहा जो पूर्णपणे स्वतःच्या विश्वात मश्गूल असतो. त्याला नेपोलियनसारखे बनायचं आहे. सगळी रशियन जमीन एकत्र करण्याची त्याची इच्छा आहे.”

2017 च्या सुरुवातीस, बाबचेन्कोंची मते आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे त्याचे बरेच शत्रू बनले. तेव्हापासूनच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.

कुटुंबासह ते रशियातून पळून गेले. त्यानंतर झेक प्रजासत्ताक, इस्रायल आणि अखेरीस युक्रेनमध्ये गेले.

मॉस्कोतील एक जुने मित्र आणि सहकारी रशियन निर्वासित एडर मुझदाबाएव्ह (खाली छायाचित्रात) यांनी बाबचेन्कोंना एका क्रिमियन टीव्ही चॅनेल शो होस्ट करण्याची ऑफर दिली.

"बाबचेन्को फुटबॉल विश्वचषकावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत होते," मुझदाबाएव्ह सांगतात.

"बाबचेन्को यांना रशियावर आणखी निर्बंध घालायचे होते आणि पुतीनच्या दहशतवादी राज्याशी वाटाघाटी करणे अशक्य असल्याचं ते लिहित होते.”

पकडापकडीचा खेळ

मे महिन्याच्या सुरुवातीला एका संध्याकाळी, SBU एजंट्सनी माहिती दिल्यानंतर, बाबचेन्को घरी परतले.

घरी त्यांची पत्नी ओल्गा त्यांची प्रतीक्षा करत होती.

यानंतरचा घटनाक्रम सांगताना बाबचेन्को यांच्या पत्नी ओल्गा म्हणतात, “तो घरी आल्यानंतर थेट फ्रीजकडे गेला. त्याने ग्लासात मद्य ओतून मला दिलं.

मी ते पिण्याआधीच त्याच्याकडे पाहून विचारलं, “काय झालं? मला सांगशील?”

ओल्गा यांची मुलाखत आम्ही एका सेफ हाऊसमध्ये घेतली.

बाबचेन्को यांनी त्यांच्याविरुद्धची धमकी आणि त्याच्या मृत्यूची खोटी योजना बनवण्याची SBU ची योजना कशी स्पष्ट केली, याविषयी सविस्तरपणे सांगितलं.

त्या म्हणतात, “मला पळून जायचं होतं, लपायचं होतं. पती आणि मुलाला सोबत घेऊन फक्त दूर पळायचं होतं. पण कुठे पळणार मला काही माहीत नव्हतं. मी कदाचित एखाद्या वाळवंटी बेटावर पळून गेले असते.”

“मी विचारलं, आता आपण काय करायचं आहे?

“आता आपण त्यांना पकडून देणार आहोत,” बाबचेन्को उत्तरले.

बनावट खुनाची तयारी सुरू असताना पुढील काही आठवडे बाबचेन्कोला खाली पडून पाय दुखावल्याचं नाटक करण्यास भाग पाडण्यात आलं.

त्यांनी यादरम्यान घरीच राहावं, यासाठी त्यांना हे नाटक करावं लागलं.

यानंतर, 29 मे रोजी, विशेष ऑपरेशन सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

बनावट हत्या

"सगळं खरंच सोपं होतं, सांगण्यासारखं काही खास नाही. मी माझं सूप संपवलं, टॅक्सी बोलावली आणि बाबचेन्कोला मारायला गेलो."

अर्काडी बाबचेन्को:

"आमच्याकडे एक मेक-अप व्यक्ती होता, ज्याने माझा चेहरा रंगवला होता. रक्तबंबाळ झाल्याचं भासवण्यासाठी नियोजन करण्यात आलं.

“मी गोळी लागल्याचं नाटक केलं, तेव्हा मी माझ्या गुडघ्यावर पडलो. तोंडातील रक्त नकळतपणे सांडण्यासाठी थोडासा खोकलो.

ओल्गा बाबचेन्को

"या कामात हस्तक्षेप न करणं हे माझं काम होतं. मी शक्य तितका चांगला अभिनय करणं, योग्य रित्या काम मार्ग लावणं, याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती.

"मी कसं वागावं, याचा विचार करत होते, जेणेकरून त्यामध्ये नैसर्गिकपणा दिसून येईल.”

ओलेक्सी त्समबालियुक:

"मी दार उघडलं तेव्हा मला काय दिसलं? मला रक्ताच्या थारोळ्यात एक माणूस दिसला. सर्व काही अगदी वास्तविक दिसत होतं. मेकअप करणार्‍यांनी खूप चांगले काम केलं.

"क्षणभर मी विचार केला - हे खरं असलं असतं तर किती भयानक घडलं असतं. मी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. असेल तर ते भयानक असेल.' मी त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या."

अर्काडी बाबचेन्को:

"मी साथीदारांना म्हणत होतो, 'मला हसवू नका, कारण मी आता मेलो आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरच्या सुकलेल्या रक्ताला तडे जात आहेत.”

त्सिम्बालियुकने अपार्टमेंट सोडलं. ओल्गाने यानंतर पोलिसांना आणि रुग्णवाहिका बोलावली.

बाबचेन्कोचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी शोक व्यक्त केला.

ओल्गा बाबचेन्को

“एडर मुझदावेव्ह हा सगळ्यात आधी आला. त्याला एखाद्या लहान मुलासारखा रडताना पाहून मला खूप वाईट वाटलं.

एखाद्या पुरुषाला इतरं रडताना मी कधीच पाहिलं नाही. त्याला बाजूला घेऊन सगळं खरंखुरं सांगावं, असं मला वाटून गेलं. पण त्या भावनेला आवर घालणं, हे माझ्यासाठी सगळ्यात कठीण काम होतं.”

हा घटनाक्रम मारेकरी पाहत असतील, या विचारांतून सुरुवातीला बाबचेन्को यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्याचं नाटक करून मृत घोषित करण्यात आलं.

बाबचेन्को यांच्या ‘मृत्यू’च्या तपशिलांची लवकरच पोलिस प्रवक्त्याने पुष्टी केली.

बाबचेन्को रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मॉस्कोमधून निर्वासित असलेला बाबचेन्कोंचा मित्र एडर मुझबादेव्ह त्याचा मित्र, टीव्ही चॅनेलमधील बॉस आणि इतर पत्रकारांची बाबचेन्कोच्या घराबाहेरची गर्दी वाढू लागली.

"हे पत्रकारितेचं खूप मोठे नुकसान आहे, कारण रशियाबद्दलचं सत्य लिहिणाऱ्या काही व्यक्तींपैकी ते एक होते आणि म्हणूनच त्यांची हत्या झाली," असं मुझबादेव्ह यांनी सांगितलं.

"हे स्पष्ट आहे की हे रशियन फेडरेशनच्या आदेशानुसार केलेले थेट, गणना केलेलं दहशतवादी कृत्य आहे."

शवागारातील स्थिती

शवागारात नेल्यानंतर काही वेळातच बाबचेन्को उठून बसले.

अर्काडी बाबचेन्को:

"ते माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र दोन-तीन तास होते. मी गांधींप्रमाणे चादर लपटलेल्या अवस्थेत शवागारात बसून होतो.

"मी धूम्रपान करत होतो आणि टीव्हीवर बातम्या पाहत होतो की मी किती छान माणूस आहे. त्याच वेळी माझ्या बाजूला असलेला एक पॅथॉलॉजिस्ट ‘माझ्या कथित कवटी’चं शवविच्छेदन करत उभा होता."

ओल्गा बाबचेन्को:

"मला यावेळी त्याचा हेवा वाटला, कारण त्याला कुणाशीही बोलायचं नव्हतं.

"मला वाटलं की तो कदाचित या क्षणी सर्वात शांत ठिकाणी आहे. पण, त्याचवेळी मी मात्र, एक प्रकारे दुःखात अडकलो आहे. कारण त्या क्षणी, प्रत्येकाचं लक्ष माझ्यावरच केंद्रीत होतं.”

बाबचेन्कोच्या मृत्यूची बातमी वेगाने पसरली.

काही तासांतच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत याचा उल्लेख करण्यात आला आणि यूकेसह देशांनी आपली चिंता व्यक्त करणारी निवेदने जारी केली.

युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर ग्रोईसमन यांनी या प्रकरणी रशियावर आरोप केले.

सुपारीची रक्कम

दरम्यान, मारेकऱ्याने हर्मनला काम पूर्ण झाल्याचं सांगितलं.

बाबचेन्को यांच्यासाठी एक टोपणनाव वापरून त्यांनी संदेश पाठवला. त्यामध्ये लिहिलं होतं, “किडा मारला गेला आहे. बातमी पाहा.”

काही तासांनंतर हर्मनचं उत्तर आलं. मी खूप मद्य प्यायलेलो आहे. उद्या भेटू.

त्यांची भेट होण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणा तिथे उपस्थित होत्या.

पुढच्या दिवशी बोरीस हर्मन काम पूर्ण झाल्याबाबत त्सिम्बालियुक यांना सुपारीची रक्कम देणार होता. पण दरम्यान, प्रकरण माध्यमांमध्ये खूप मोठं झालेलं होतं.

घाबरून हर्मनने इटलीला पलायन करण्यासाठी विमानाची तिकिटे काढली होती.

त्यामुळे, तो कुठेही जाण्याआधी त्याला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना पावले उचलावी लागली.

SBU च्या एजंट्सनी त्याच्या घरी जाऊन त्याला अटक केली.

प्रकरण उघडकीस

30 मे रोजी सायंकाळी पाच वाजता SBUमुख्यालयात पत्रकारांच्या गर्दीत बाबचेन्को प्रकट झाले.

यानंतर हिट्सक यांनी संपूर्ण प्रकरण पत्रकार परिषदेत उघड केलं.

लोकांची दिशाभूल केल्याबद्दल सॉरी म्हणण्यासाठी भावनिक बाबचेन्को यांनी मायक्रोफोन घेतला.

"माझ्या सहकाऱ्यांना-मित्रांना मला दफन करावे लागलं. जेव्हा तुम्ही स्वतःचे दफन करता तेव्हा मला त्रासदायक भावना माहीत आहे. पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता."

बाबचेन्कोच्या टीव्ही चॅनेलवरील मोबाइल फोन फुटेजमध्ये त्यांचे सहकारी पत्रकार परिषदेच्या त्यांच्या स्वत: च्या कव्हरेजवर आनंद व्यक्त करताना आणि उघड्या तोंडाने पाहत आहेत.

"मी नुकताच बाहेर पळत गेलो आणि गवतावर पडलो," त्याचा बॉस एडर मुजदाभैव मला म्हणाला.

"मी जवळपास दीड तास तिथे पडून आभाळाकडे बघत होतो. मला खूप बरे वाटले."

बर्‍याच युक्रेनियन लोकांनी हा एक विजय म्हणून साजरा केला.

बाबचेन्कोचा जीव वाचला. पण सगळ्यांनाच इतका आनंद झाला नाही.

काहींसाठी, विशेषत: परदेशातून निरीक्षण करणाऱ्यांना हा प्रकार नाटकी असल्याचं वाटलं.

"युक्रेन लोकांना काहीतरी पटवून देण्यासाठी रशियाप्रमाणेच बनावट बातम्या तयार करत आहे, असं मत यामुळे बनल्याचं निरीक्षण मायकल बोसिकिव्ह यांनी व्यक्त केलं.

हिट लिस्ट बनावट?

या प्रकरणातून युक्रेनला काय मिळालं?

"आम्ही नुकतेच अर्काडी बाबचेन्कोंचे प्राण वाचवले, हेसुद्धा यशच आहे," वॅसिल ह्रिट्सक बचावात्मकपणे म्हणतात.

"परंतु या ऑपरेशनमुळे आम्हाला 47 लक्ष्यांची यादी देखील मिळाली आहे. यामध्ये पत्रकार, भूतकाळातील आणि सध्याचे कार्यकर्ते, रशियन फेडरेशनचे नागरिक, यांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यादीतील पहिला माणूस म्हणजे बाबचेन्कोचे बॉस एडर मुझदाबाएव्ह. त्यांनी ताबडतोब चोवीस तास राज्य संरक्षणाची ऑफर स्वीकारली.

पण यादीत इतर काही पत्रकार असेही होते, ज्यांचा अर्थाअर्थी रशियासोबत काही संबंध नव्हता.

त्यापैकीच एक म्हणजे सोनिया कोश्किन.

त्यांच्या मते, 47 जणांची हिट-लिस्ट हीसुद्धा बाबचेन्को यांच्या हत्येसारखी बनावट आहे आणि युक्रेनियन सुरक्षा सेवेद्वारे रशियन-संबंधित 30 नावांसह इतर 17 नावे त्यामध्ये जोडण्यात आली आहेत.

त्या म्हणतात, “हा प्रामुख्याने घाबरवण्याचा उद्देश आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा ते त्यांचे वर्तन बदलतात."

SBU ने मात्र जाहीर केलेली यादी खरीच असल्याची भूमिका कायम ठेवली आहे.

रशियन कनेक्शन

युक्रेनच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील रशियाचा सहभाग व्याचेस्लाव पिव्होवर्निक यांच्या मार्फत उघड झाला आहे.

पिव्होवर्निक हा एक युक्रेनियन आहे, जो आता रशियामध्ये राहतो. असा दावा केला जातो की पिव्होवर्निकची या प्रकरणात भूमिका होती. बोरिस हर्मनला ऑर्डर, हिटलिस्ट आणि पैसे पुरवणे, आदी कामे त्याने केली, असं म्हटलं गेलं.

पण युक्रेनने पिव्होवार्निकवर त्याच्या अनुपस्थितीत आरोप लावल्याचं सांगण्यात आलं.

बीबीसीने आरोपांबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी संपर्क साधू शकला नाही.

SBUनुसार, बाबचेन्कोच्या खोट्या हत्येनंतर सकाळी, ‘मारेकरी’ त्सिम्बालियुकला अंतिम पेमेंट करण्याबद्दलच्या संवादाचे काही संदेश मेसेजिंग प्लॅटफॉर्म सिग्नलवर आढळून आले आहेत.

व्याचेस्लाव पिवोवर्निक:

"मद्यपीला नमस्कार [हर्मनच्या मद्यपानाचा संदर्भ]."

बोरिस हर्मन:

"हाय, चर्च [धर्मगुरू त्सिम्बालियुकचा संदर्भ] दुसरे पैसे मागत आहे, पण माझ्याकडे काहीही नाही."

व्याचेस्लाव पिवोवर्निक:

"किती पैसे?"

बोरिस हर्मन:

"15 [15 हजार डॉलर्सच्या थकबाकीचा संदर्भ]"

आतापर्यंत, कोणताही पत्रकार पिव्होवार्निकचा माग काढू शकलेला नाही. त्यामुळे बोरीस हर्मन याच्याकडेच लक्ष केंद्रीत झालं आहे.

अस्तित्वात असलेलं रेकॉर्डिंग आणि संदेश पाहता हर्मनने त्सिम्बालियुक किंवा पिव्होवार्निकसोबत कट रचणं नाकारलेलं नाही.

त्याचा बचाव असा आहे की हे सर्व एक पूर्वनियोजित कृत्य होतं.

खरं तर तो युक्रेनच्या सुरक्षा सेवेसाठी काम करत होता.

विशेषतः मारेकरी म्हणून त्सिम्बालियुकची निवड केली कारण तो एक धर्मगुरू होता.

जेव्हा हर्मन कीवमधील कोर्टात हजर झाला तेव्हा मी त्याला विचारलं की त्याला अर्काडी बाबचेन्कोला तुला मारायचं नव्हतं, यावर आपण विश्वास का ठेवावा?

तसंच, आतापर्यंत, मी त्याला आणि त्याच्या वकिलाला वारंवार विनंती करूनही, हर्मन युक्रेनच्या सुरक्षा सेवेसाठी काम करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे प्रदान करू शकला नाही.

शिवाय, पिव्होवार्निक जवळजवळ निश्चितपणे रशियामध्येच राहिल्याने, तपासाशी रशियन लिंक पूर्णपणे उघड होण्याची शक्यता नाही.

रशियन प्रतिक्रिया

बाबचेन्को प्रकरण आणि युक्रेनने ज्या प्रकारे हाताळले त्याबद्दलच्या प्रतिसादासाठी बीबीसीने रशियन सरकारशी संपर्क साधला.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा म्हणाल्या, "माझी पहिली भावना होती की ही जादू आहे, ती छान आहे, तो जिवंत आहे."

पण, लगेचच मला वाटलं यात गुंतलेल्या युक्रेनियन अधिकाऱ्यांनी काय केलं आहे, याची त्यांना जाणीव आहे का,

या प्रकरणामुळे आता युक्रेनियन आणि युक्रेनियन सरकारवर भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या प्रकरणांमध्ये विश्वास ठेवणार नाही."

"हे प्रकरण पूर्णपणे हास्यास्पद आहे," असं झाखारोव्हा यांनी म्हटलं.

"रशियाचा अर्काडी बाब्चेन्कोशी काहीही संबंध नाही. तो मुक्त जगात एक मुक्त माणूस आहे. त्याला हवे ते तो करू शकतो,” असं झाखारोव्हा यांनी म्हटलं.

आता पुढे काय?

बनावट हत्येत सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं राहिलेलं नाही.

मारेकरी त्सिम्बालियुक हा आता काहीसा थकल्यासारखा भासतो.

आम्ही एकत्र कीव्हभोवती फिरत असताना त्याने मला सांगितलं की तो त्याच्या अनुभवाबद्दल एक पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहे.

"आपल्या देशातील युद्ध संपलेलं नाही," तो म्हणतो.

"मी माझ्या आयुष्यात काहीही बदलणार नाही. मी युद्धात परत येईन. जगण्यासाठी, काम करण्यासाठी, लढण्यासाठी."

अर्काडी आणि ओल्गा बाबचेन्को यांना युक्रेनमध्ये पुन्हा कधीही सुरक्षित वाटू शकत नाही.

"मला काळजी वाटते," असं ओल्गा म्हणते.

"मला सुरक्षित वाटत नाही. सध्यापुरता विचार केला तर आम्ही सुरक्षित ठिकाणी आहोत - पण मला सुरक्षित वाटत नाही. एक दिवस आमच्या संरक्षित क्षेत्राबाहेर जाणे आवश्यक आहे. भविष्यात काय होईल, काही कल्पना नाही.”

अर्काडी बाब्चेन्को म्हणतो, "मला कळतं की ही सर्व टीका कोठून येते. ती अशा लोकांकडून येते जे नैतिकतेबाबत, चांगल्या आणि वाईटाबद्दल काल्पनिकपणे बोलतात.”

"तुम्ही माझ्या परिस्थितीत असता, तुमच्याकडे एखादा व्यक्ती येतो, तुम्हाला मारण्यासाठी कुणीतरी पैसे दिले आहेत,

त्यावेळी “नाही, मी नकार देतो कारण माझ्या वाचकांना समजणार नाही. ते पत्रकारितेच्या नैतिकतेचं उल्लंघन असेल,' असं तुम्ही म्हणाल का?

"असे केल्याने आणखी लोक मरतील, कारण जर मी मेलो असतो, तर हे नेटवर्क उघड झालं नसतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)