चीन पृथ्वीच्या पोटात 11 हजार मीटर खोल खड्डा खणतोय, कारण...

चीन त्यांच्या देशातला सर्वात मोठा खड्डा खणतोय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीन त्यांच्या देशातला सर्वात मोठा खड्डा खणतोय
    • Author, एतहाल्पा येमेरीस
    • Role, बीबीसी न्यूज

चीन आपल्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिंकयांग प्रदेशातल्या टकलामकान वाळवंटात 11 किलोमीटरहून जास्त खोल खड्डा खणतोय.

गेल्या आठवड्यात या योजनेची सुरुवात झाली.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या एका रिपोर्टनुसार हा खड्डा पृथ्वीवरचा सर्वात प्राचीन काळ, क्रेटासियस काळातल्या आवरणांपर्यंत पोचेल.

क्रेटासियस एक भूगर्भीय काळ मानला जातो जो 14.5 ते 6.6 कोटी वर्षं जुना समजला जातो.

या योजनेला 457 दिवस लागण्याचा अंदाज आहे.

इथे काम करणारे ऑपरेटर्स दिवस रात्र जड मशिन्स घेऊन काम करत राहतील.

उत्साहाने घेतला पुढाकार

या योजनेला चीनची सर्वात मोठी खोदकाम मोहीम म्हटलं जातंय. याआधी चीनमधल्या या प्रकारच्या चीनमधल्या सर्वात खोल खड्ड्याची खोली 10 हजार मीटर (10 किलोमीटर) मोजली गेली होती.

अर्थात चीनकडून खोदला जाणारा हा भलामोठा खड्डा मानवनिर्मित सर्वात खोल खड्डा नसेल.

हा रेकॉर्ड रशियात खोदल्या गेलेल्या ‘कोला’ ड्रिलिंग विहिरीजवळ आहे. या अजस्र विहिरीचं खोदकाम अनेक दशकं चाललं. 1989 साली इथली खोली भूगर्भात 12 किलोमीटरपर्यंत पोचली. त्यानंतर इथलं खोदकाम थांबवलं.

टकलामकान वाळवंटात आधीच 9 किलोमीटर खोलीची तेलविहीर आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टकलामकान वाळवंटात आधीच 9 किलोमीटर खोलीची तेलविहीर आहे

चीन आता जगातल्या तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या शक्तिशाली देशांच्या यादीत सहभागी होऊ पाहातोय. त्या दृष्टीने पावलं उचलतोय आणि याच सुमारास ही योजना आलेली आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या दिवशी या नव्या योजनेवर काम सुरू झालं त्याच दिवशी चीनने आपल्या तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं.

या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पाठवणं हेही चीनच्या एका महत्त्वकांक्षी अंतराळ योजनेचा भाग आहे ज्याअंतर्गत तो सन 2030 च्या आधी चंद्रावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

पण आता प्रश्न असाय की चीन एवढा मोठा खड्डा का खणतोय ज्याची खोली जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्टपेक्षाही जास्त आहे?

दोन उद्देश

या योजनेचं नेतृत्व सरकारी संरक्षणांतर्गत चालणारी पेट्रो केमिकल कंपनी ‘सीनोपॅक’ करतेय. नुकतंच या कंपनीने भूगर्भीय शोधात अधिकाधिक खोलवर जाण्याची घोषणा केली.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी साधारण दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिक समुदायाला जोरदार आवाहन करत सांगितलं होतं ती त्यांनी जमिनीच्या आत सर्वाधिक खोलीवर असणाऱ्या प्राकृतिक साधनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, त्या कामावर जोर द्यावा.

त्यानंतर दोन वर्षांनी ही योजना सुरू झालीये.

ही योजना चीनच्या सरकारी कंपनीने हाती घेतली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ही योजना चीनच्या सरकारी कंपनीने हाती घेतली आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चीनमध्ये कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू शोधण्यासाठी काम करणारी सर्वात मोठी कंपनी चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी ल्यू जियागांग यांनी सांगितलं की एवढा अजस्र खड्डा खणण्यामागे दोन हेतू आहेत – एक म्हणजे शास्त्रीय शोध आणि दुसरं म्हणजे कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध.

चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन फक्त चीनमधली सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी नाही तर जगातल्या काही मोजक्या मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांपैकी एक आहे.

या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी ल्यू जियागांग यांनी व्हीडिओ प्रसारित केला. त्यात त्यांनी म्हटलं की ही योजना पेट्रो चायनाच्या तांत्रिक क्षमता अधिक शक्तीशाली करण्यासाठी मदत करेल.

पेट्रो चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अंतर्गत एक व्यापारी संस्था आहे जी हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर्ड आहे.

त्यांनी असंही म्हटलं की या योजनेदरम्यान खोदकामाच्या नव्या आणि आधुनिक मशिनरीचा वापर होईल.

भूगर्भ शास्त्रज्ञ क्रिस्टियान फारियास यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की जमिनीत खोलवर अभ्यास करण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ सहसा सीस्मिक टोमोग्राफी आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करतात.

ते म्हणतात, “या प्रकारच्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत कारण यातून ज्या गोष्टी पुढे येतील त्या पुढच्या शास्त्रज्ञांना पुरावे म्हणून वापरता येतील.”

क्रिस्टियान फारियास कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ टेमेकोमध्ये सिव्हिल वर्क्स अँड जियोलॉजी संचालकही आहेत.

ते म्हणतात, “चीनच्या या योजनेमुळे आतापर्यंत बनवलेल्या आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची संधी मिळेल. जगासाठी काहीतरी नवं करण्याची संधी उपलब्ध होईल.”

तेल आणि नैसर्गिक वायू

चायना नॅशनल पेट्रोलियन कॉर्पोरेशन असंही म्हटलंय की या योजनेचा दुसरा उद्देश असाही आहे की इथे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधता यावेत.

हायड्रोकार्बन जमिनीत साधारण पाच किलोमीटर खोलीवर सापडतात. अशा ठिकाणी दगडांचे अनेक स्तर असतात. पण कधी कधी हायड्रोकार्बन जमिनीवरही सापडतात.

टकलामकान वाळवंटात काम करणं आव्हानात्मक आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टकलामकान वाळवंटात काम करणं आव्हानात्मक आहे

टकलामकान वाळवंटात कदाचित तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे असू शकतात असं म्हटलं जातंय.

पण इथे काम करताना वाळवंटाच्या पृष्ठभागाची रचना, तिथलं तापमान आणि उच्च दबाव यामुळे काही तांत्रिक आव्हानं उभी राहू शकतात.

क्रिस्टियान म्हणतता की एवढा मोठा खड्डा बुजू न देणं हेही सर्वात मोठं आव्हान आहे.

अर्थात रशिया यापूर्वी 12 किलोमीटर खोल खड्डा करण्यात यशस्वी ठरला होता पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भूगर्भात आजही इतक्या खोलवर जाणं सोपं नाही.

चिनी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे एक शास्त्रज्ञ सुन जिन यांनी सरकारी वृत्तसंस्थेला सांगितलं की हा ड्रिलिंग प्रोजेक्ट म्हणजे स्टीलच्या दोन पातळ तारांवरून एक मोठा ट्रक चालवण्यासारखं अवघड आहे.

याशिवाय टकलामकान वाळवंटात काम करणं अत्यंत जिकिरीचं काम आहे. इथे हिवाळ्यात तापमान उणे 20 सेल्सिअसपर्यंत पोचतं तर उन्हाळ्यात तापमान 40 सेल्सिअसपर्यंत पोचतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)