रेणुका शहाणेंची पोस्ट आणि मुंबई लोकसभा निवडणुकीत गाजणारा मराठीचा मुद्दा

फोटो स्रोत, Renuka Shahane, Chitra Wagh
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मराठी "not welcome" म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.
"कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे."
प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत आपली ही प्रतिक्रिया दिली. समाज माध्यमांवरही याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषिक विरुद्ध गुजराती भाषिक यावरून राजकारण होत सुरू होताना दिसत आहे.
मुंबईत उत्तर पूर्व मतदारसंघात काही दिवसांपूर्वी एका सोसायटीत प्रचारादरम्यान मराठी पत्रकांचं वाटप रोखल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी केला आणि या वादाला सुरुवात झाली.
खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर आता भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिलंय.
शहाणे यांच्या ट्वीटचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करत एक पत्र ट्वीटरच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांना लिहिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक राहतात आणि कालांतराने 'मुंबईकर' होतात.
ही लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसं मुंबईत मराठी अस्मिता तीव्र होत गेली. याच मराठी अस्मितेच्या आधारावर आधी शिवसेना आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला. यामुळे मुंबईला तसं मराठी मतांचं राजकारण नवीन नाही.
परंतु यावेळची निवडणूक मुंबईकरांसाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही.
कारण मुंबईत मराठी मतांच्या माध्यमातून आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या शिवसेनेचे आता दोन गट झालेत. तर मनसेने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केलाय.
यामुळे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मराठी मतांचं विभाजन होईल का? त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि मराठी मतं किती निर्णायक ठरू शकतात? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
'मराठी विरुद्ध गुजराती' वाद उफाळून का आला?
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात एका रहिवासी इमारतीत रविवारी (5 मे) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाद झाल्याचं समोर आलं.
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बहुसंख्य गुजराती भाषिक असलेल्या इमारतीत प्रचार करताना थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.
घाटकोपर पश्चिम परिसरात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार करत असताना त्यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप झाला.
ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ पत्रक वाटत असताना त्यांना रोखण्यात आलं परंतु भाजपच्या प्रचाराची बैठक मात्र संबंधित इमारतीत फार पडली असं सांगत पदाधिकाऱ्यांनी यावरून वाद निर्माण झाल्याचं सांगितलं.
ठाकरे गटाचे शाखा प्रमुख प्रदीप मांडवलकर यांनी आरोप केला की, "संबंधित सोसायटीमध्ये मराठी असल्याने प्रचार करू दिला गेला नाही. भाजपकडून मराठी विरूद्ध गुजराती असा वाद निर्माण केला जात आहे."

फोटो स्रोत, ANI
या प्रकरणावरून राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाला जाब विचाराला.
"मराठी माणसाला दुय्यम वागणूक दिली जात असताना आता आमचीच खरी शिवसेना असं म्हणणारा शिंदे गट काय भूमिका घेणार ती त्यांनी स्पष्ट करावी."
या प्रकरणी स्थानिक पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखलं नसल्याचं इमारतीच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. सोसायटीने सर्व आरोप फेटाळत आधी भाजपच्या कार्यकर्त्यांना वेळ दिली होती त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नंतर येण्यास सांगितलं, मराठी-गुजराती असा काही वाद नसल्याचंही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
हे एकच उदाहरण नाही. तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका खासगी कंपनीने एका जागेच्या नोकरीची जाहिरात देत असताना मराठी भाषिक नको असल्याची अट ठेवल्याची पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली. यानंतर यावरून मुंबईतील राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

फोटो स्रोत, ANI
मनसे, मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांनी या जाहिरातीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
याला 'गुजरातप्रेमी भाजप' कारणीभूत असल्याची टीका उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी केली. त्या म्हणाल्या, "सुरतची कंपनी मुंबईत नवीन शाखा उघडते, पण त्यांना तिथे मराठी माणूस कामावर नकोय. याच महाराष्ट्रद्वेषी, मुंबईद्वेषी मानसिकतेबद्दल अगदी सुरुवातीपासून सांगण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. एवढं धाडस या कंपन्यांमध्ये येतो कुठून? याला संपूर्णत: जबाबदार गुजरातप्रेमी भाजप पक्ष आहे. त्यांच्याच मेहेरवर असल्या कंपन्या एवढी मजल मारतात. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा स्वाभिमान हा जपला गेलाच पाहिजे."
निवडणूक जाहीर होण्याच्या काही काळ पूर्वीपासूनच महाराष्ट्रात मराठी मतांसाठी राजकारणाला सुरुवात झाल्याचं दिसलं होतं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर महाराष्ट्रातील बडे उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप केला होता. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अगदी पत्रकार परिषदा घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप केले होते.
महाराष्ट्रात येणारे प्रकल्प आणि त्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार गुजरातकडे जात असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला होता. महायुती सरकारने अर्थात हे आरोप फेटाळले होते. तसंच दावोसच्या निमित्ताने महाराष्ट्रात आम्ही किती गुंतवणूक आणत आहोत याचे दाखले महायुती सरकारला द्यावे लागले होते.
20 मे रोजी मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा विविध मार्गांनी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
मराठी मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला?
मुंबईत अनेक भागात मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत. अनेक मतदारसंघात मराठी मतं निर्णायक सुद्धा ठरतात.
मुंबईत सहा पैकी तीन लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. या तीन मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण या दोन चिन्हांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात मुख्य लढत होताना दिसेल. यामुळे या मतदारसंघांमध्ये मराठी मतांचं विभाजन स्पष्ट असेल असं चित्र आहे.
तर इतर दोन मतदारसंघांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार अशी थेट लढत आहे. यामुळे सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यातही वंचित बहुजन आघाडीने ही स्वतंत्र उमेदवार दिल्याने अल्पसंख्याकांच्या मतांचं विभाजनही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये होईल असं स्पष्ट आहे.
मराठी माणसासाठी आणि मुंबईत मराठी अस्मितेसाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी मराठीच्या मुद्यावरच आंदोलनं केली आणि पक्षचा विस्तार केला.
मुंबईत मराठी माणसाला नोकरीसाठी प्राधान्य द्यावं आणि परप्रांतियांविरोधात भूमिका घेतच शिवसेनेला मुंबईत मराठी मतदारांची मोठी साथ मिळाली. यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करताना हीच भूमिका घेतली आणि त्यांना सुरुवातीला मराठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबईत काँग्रेसची पारंपरिक मराठी मतं सोडली तर एकगठ्ठा मराठी मतं ही शिवसेनेला मिळत आल्याचं दिसतं. मनसे हा पक्ष आल्यानंतर मराठी मतांचं विभाजन होताना दिसलं. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांत मराठी मतांचं विभाजन निश्चित आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्यानुसार मुंबईत तीन मराठी मतदार आहेत. ते सांगतात, "उच्च मध्यमवर्गीय भाजपकडे झुकलेला दिसतो. तर एक मराठी मतदारांचा वर्ग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याने नाराज असलेला आहे. परंतु एक मोठा मराठी मतदारांचा वर्ग हा ज्यापद्धतीने बाळासाहेबांची शिवसेना फोडली गेली आणि पक्षाचं नाव, चिन्ह ठाकरेंकडून घेतलं गेलं यासाठी भाजप आणि शिंदे गटावर नाराज आहे. यामुळे मला वाटतं मराठी मतदारांचं विभाजन या निवडणुकीत प्रामुख्याने या यानुसार होईल."

फोटो स्रोत, ANI
प्रधान सांगतात,"मराठी मतदारांचा एक वर्ग उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयासोबत आहे. शिवसेनेत आपापसात लावलेली भांडणं हे अजिबात न आवडलेला मतदार लक्षणीय आहे. शिवसेना फोडली नसती तर कदाचित मुंबईतील बहुसंख्य मराठी मतदार हा भाजपच्या बाजूने दिसला असता. परंतु शिवसेनेत फूट पडल्याने भावनिकदृष्ट्याही मराठी मतदार नाराज दिसतो आहे."
"हा मतदार एकतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान करेल किंवा मतदानाला बाहेरच पडणार नाही. जसं बारामतीत मतदान कमी झालं. पवार विरुद्ध पवार लढाईत कोणाची साथ द्यायची हे ठरवण्याची क्षमता मतदारांमध्ये नव्हती ते मतदानाला बाहेर पडले नाहीत. असं काहीसं चित्र मुंबईतही दिसू शकतं," असंही ते सांगतात.
मराठी विरुद्ध गुजराती असा वाद गेल्या काही काळापासून मुंबईत वारंवार चव्हाट्यावर येताना दिसतो. राजकीय उमेदवार प्रचारातही या मुद्यांचा वापर करतात.
याविषयी बोलताना प्रधान सांगतात,"गुजराती मतदार हा आतापर्यंत शिवसेनेशी वाद करत नव्हता. सेनेची कार्यशैली त्यांना आतापर्यंत पसंत होती असं नव्हतं पण तरी शिवसेनेला गुजराती मतदारांचा पाठिंबा होता. यात आर्थिक गणितही समाविष्ट होतं.अनेक मराठी कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ गुजराती व्यापारी करायचे. परंतु गेल्या दहा वर्षांत मोदी-शहा केंद्रात आल्यापासून गुजराती मतदार एकवटलेला आहेच पण तो आपलं मुंबईत अस्तित्त्व दाखवायला लागला आहे."
"याचं उदाहरण सांगायचं झालं तर मराठी पाट्यांविरोधात कोर्टात जाऊन आव्हान देणं असेल किंवा मराठी महिलेला कार्यालय नाकारणं असेल किंवा मांसाहाराला सरसकट विरोध करणं असेल अशा अनेक घटना मुंबईत वारंवार घडत आहेत. आतापर्यंत शांतीप्रिय असलेल्या गुजराती माणसाचं आत्ताचं वर्तन विपरित आहे असं का दिसतंय? ही उदाहरणं सुद्धा मराठी मतदारांना खटकणारी आहेत. त्यात मराठी माणसाची शिवसेना फोडण्याला भाजप जबाबदार आहे असा एक विश्वास किंवा समज मराठी मतदारांमध्ये आतापर्यंत स्पष्ट झाली आहे. शिवाय, गुजराती माणसाकडे आर्थिक सत्ता असल्याने, राजकीय सत्ता असल्याने मुंबईतलं त्यांचं वर्चस्व वाढेल अशीही भीती मराठी मतदारांमध्ये आहे. यामुळे असे मराठी मतदार उद्धव ठाकरेंना साथ देऊ शकतात."
ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी यांना मात्र मराठी मतांचं फारसं विभाजन होणार नाही असं वाटतं.

फोटो स्रोत, ANI
ते सांगतात, "आत्ताचा वाद हा मराठी विरुद्ध अमराठी किंवा गुजराती उमेदवार असल्याने मतदारसंघात झालेला दिसला. मुंबईत इतर ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी वाद दिसणार नाही. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांनी तर गुजराती भाषेत पत्रकं छापली आहेत. यामुळे हे मुद्दे फक्त निवडणुकीत राजकारणासाठी दिसतात. मतांची शिदोरी बांधून घ्यायची आहे. 2021 मध्ये उद्धव ठाकरे यांनीही गुजराती मेळावे घेतले होते, आदित्य ठाकरे यांनी 'केम छो' बॅनर लावले होते. यामुळे मला वाटतं की असा काही वाद मुंबईत काही अपवाद सोडले तर सगळीकडे नाहीय असं मला वाटतं."
मराठी मतांच्या विभाजनाचं बोलायचं झालं तर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे असल्याने त्यांना फायदा होईल असं धानजी सांगतात.
ते म्हणाले,"ठाकरे गटाकडे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा स्थानिक बेस मजबूत आहे. परंतु असं असलं तरी ठाकरे गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नाही. यामुळे परंपरागत मतदार धनुष्यबाणाला मत देऊ शकतो. चिन्हामुळे शिंदेंना फायदा होऊ शकतो. यातही मराठी मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही. विभाजन झालं तरी याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसेल कारण शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपचे पारंपरिक मतदार असतील. या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद कमी आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील जागांची मार्जीन पाहिली तर दोन्ही पक्षांचा मतांचा टक्का भाजपच्या तुलनेत कमी आहे. यामुळे फारफार तर बाकी मुस्लीम आणि अल्पसंख्याक मतदार निर्णायक ठरू शकतात. त्यातही वंचित बहुजन आघाडीाचा उमेदवार असल्याने मतांमध्ये विभाजन दिसेल."
दुर्देवाने फक्त निवडणूक आली की राजकीय पक्षांना मराठी मतदारांची आठवण होते असं मत राजकीय विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक दीपक पवार यांनी मांडलं.

फोटो स्रोत, ANI
ते सांगतात, "मुंबईत गेल्या पाच वर्षांत मराठी लोकसंख्या घटली आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल असं वाटतं. आतापर्यंत मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षांनीही गेल्या 65 वर्षांत मराठी माणसाला व्यवसायासाठी भांडवल मिळण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले नाहीत."
ते पुढे सांगतात,"उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी तरी एवढ्या वर्षांत प्रादेशिक भाषा आणि मराठी माणूस यांची बाजू घेणं अपेक्षित होतं पण त्यांचीही भूमिका मराठीच्या बाबतीत धरसोडवृत्तीची राहिली आहे. केवळ निवडणुकीपुरतं नव्हे तर नंतरही उद्योगातून, रोजगाराच्याबाबतीत मराठीची पीछेहाट होणं याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे पण आपले राजकीय पक्ष याबाबत जागरूक नाहीत दुर्दैवानं."
"मराठी मतदारांच्या मनात शिवसेना फोडल्याचा राग दिसून येतोय आणि तो मतदानातही दिसेल. राज्यात उर्वरित भागात ज्याप्रमाणे शिवसेनेकडून नाव आणि चिन्ह पळवल्याचा राग व्यक्त होतोय तीच परिस्थिती मुंबई शहरातील मराठी मतदारांमध्येही आहे. मुंबईत बाजारातील आर्थिक ताकद गुजराती आणि मारवाडी यांच्याकडे दिसून येते. तर कामगार, कष्टकरी वर्ग मराठी आहे. आता मराठी भाषिक आणि इतर घटक हे मतदानादिवशी किती प्रमाणात बाहेर पडतात हे महत्त्वाचं आहे,"
मुंबईतल्या कोणत्या मतदारसंघात मराठी मतं निर्णायक ठरणार?
मुंबईत जवळपास साडे छत्तीस लाख मराठी मतदार आहेत. कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे पाहूया,
1) मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ
मुंबईत सर्वाधिक मराठी मतदारांचा टक्का असलेला हा मतदारसंघ आहे. मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर (पूर्व) हे मराठी बहुल भाग आहेत तर गेल्या काही वर्षांत गुजराती भाषिकांची संख्या मुलुंड आणि घाटकोपरमध्ये वाढलेली दिसते.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दक्षिणेस शिवाजीनगर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप हे भाग येतात. या सर्व भागांत मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत. या मतदारसंघात जवळपास 40 - 45 टक्के मतदार मराठी भाषिक आहेत.
या मतदारसंघातच काही दिवसांपूर्वीच मराठी विरुद्ध गुजराती भाषिक असा वाद एका सोसायटीमध्ये झाल्याचा आरोप करण्यात आला.

मराठी आणि गुजराथी भाषिक मतदार या मतदारसंघात लक्षणीय आहेत.
या मतदारसंघातून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिलीय. तर महाविकास आघाडीने मतदारसंघातील मराठी चेहरा असलेले संजय दिना पाटील यांना संधी दिलीय.
तर विधानसभेचं गणित पाहिलं तर तीन भाजप, दोन शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ
2) दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ
मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे.
दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघात अनेक टिकाणी मराठी बहुल भाग आहेत. यामुळे या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.

यात शिवडी, वरळी, गिरगाव लालबाग या परिसरात मराठी मतदारांचे प्राबल्य आहे.
लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीनमध्ये शिवसेनेचे आमदार, दोन मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत.
या लोकसभा मतदारसंघातून 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा विजयी झाले. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.
3) दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
या लोकसभा मतदारसंघातही यावेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असेल.
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

या मतदारसंघात चेंबूर, धारावी, अणुशक्तीनगर, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी सायन, चेंबूर, वडाळा, माहीम या भागांमध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक आहे.
या मतदारसंघात मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहाते. या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते
4) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध माजी मंत्री, शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्यात मुख्य लढत होत आहे.
या मतदारसंघात साधारण 30-35 टक्के मराठी मतदार आहेत.

ठाकरे गटाचे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. गजानन कीर्तिकर सध्या शिंदे गटात आहेत.
मुंबईच्या पश्चिमेचे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असे हे सहा मतदारसंघ आहेत. यापैकी गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या भागात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे.
5) मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होत आहे. या मतदारसंघातून मविआच्या उमेदवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायूतीकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उजव्या, डाव्या, मध्यममार्गी समजल्या जाणाऱ्या सर्व पक्षांना या मतदारसंघात आतापर्यंत संधी मिळालेली आहे.
या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन तर काँग्रेसचे एक आमदार आहेत.
6) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार अशी लढत होत आहे. या मतदारसंघात साधारण 33 मराठी मतदार आहेत.
या मतदारसंघात येणा-या चारकोप, मागाठणे, बोरिवली, गोराई या भागांत मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. तर अमराठी मतदारही तितक्याच प्रमाणात आहेत.
महायुतीकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल या मतदारसंघातून निवडणूक लढतायत तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे भूषण पाटील यांना संधी दिली आहे.

2019 मध्ये अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी साडे चार लाखांच्या मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला होता.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर एका ठिकाणी शिवसेना-शिंदे गटाचे आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.











