उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, खासदार गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत आणखी एक धक्का बसला आहे. कारण खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईत शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आणि उत्तर-पश्चिम मुंबईतून गजानन किर्तीकर असे एकूण तीन खासदार होते.

यापैकी राहुल शेवाळे आधीच शिंदे गटात दाखल झाले होते. आता त्यामागोमाग गजानन किर्तीकरही दाखल झाले आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटात अरविंद सावंत यांच्या रुपानं मुंबईत केवळ एकच खासदार उरले आहेत.

तसंच, गजानन किर्तीकरांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केल्यानं एकनाथ शिंदेंसोबत 13 खासदार झाले असून, उद्धव ठाकरेंच्या पक्षात केवळ 5 खासदार उरले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना, गजानन किर्तीकर यांच्यासारख्या मुंबईतील ज्येष्ठ नेत्यानं उद्धव ठाकरेंची सोथ सोडल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मनापासून ठरवून शिंदे गटात आलोय – गजानन किर्तीकर

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमातच गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची सोथ सोडत एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री रामदास कदम हेही उपस्थित होते.

या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, “एकनाथ शिंदेंची संघटना मजबूत करण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रात कधी झाला नाही, असा लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हावं. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या रिस्कमागे मी कायमस्वरूपी राहीन.”

“मनापासून ठरवलं आणि इथं आलो. माझ्याबद्दल गैरसमज पसरवतील, चिखलफेक करतील. त्यांना जे काही उत्तर द्यायचं, ते देईन,” असंही किर्तीकर म्हणाले.

मुलगा अमोल किर्तीकर शिवसेनेतच

खासदार गजानन किर्तीकर यांनी पुढील राजकीय प्रवासासाठी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेंचा हात पकडला असला, तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले आहेत.

अमोल किर्तीकर हे युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.

शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय असून, मी शेवटपर्यंत आदित्य ठाकरेंसोबतच राहीन, असं अमोल किर्तीकरांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

किर्तीकरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील खासदार

  • राहुल शेवाळे
  • श्रीकांत शिंदे
  • हेमंत पाटील
  • राजेंद्र गावित
  • संजय मंडलिक
  • श्रीरंग बारणे
  • भावना गवळी
  • कृपाल तुमाणे
  • हेमंत गोडसे
  • सदाशिव लोखंडे
  • प्रतापराव जाधव
  • धैर्यशील माने
  • गजानन किर्तिकर

एकनाथ शिंदेंचं बंड आणि पक्षाची मोडतोड

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अभूतपूर्व बंड करत, शिवसेनेतून 40 आमदारांसह बाहेर पडले. सुरत-गुवाहाटी-गोवा करत ते महाराष्ट्रात परतले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपनं सरकार स्थापन केलं आणि त्यात एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

महाराष्ट्रात यापूर्वी क्वचित झालेल्या इतक्या मोठ्या राजकीय घडामोडीनं संपूर्ण देशात खळबळ उडाली. 40 आमदार आणि 12 खासदार (आता किर्तीकरांच्या प्रवेशानं 13 खासदार) असा भक्कम पाठिंबा सध्या एकनाथ शिंदेंच्या मागे उभा आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात शिवसेनेवरील अधिकाराचा वाद कोर्टापर्यंत गेला आणि त्यातून शिवसेनेची दोन शकलं उडाली.

शिवसेनेचे काही दशकांचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गमवावं लागलं, तसंच पक्षाचे नावही गेलं.

आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी नावं मिळाली आहेत. मशाल आणि तलवार-ढाल अशी अनुक्रमे चिन्हंही या दोन्ही गटांना मिळाली आहेत.