You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
10 वर्षाच्या मुलाचा सुंता करताना मृत्यू, मुलांना भूल देणं किती धोकादायक?
- Author, तारिक जमान शमल
- Role, बीबीसी न्यूज बांगला
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका खासगी रुग्णालयात 10 वर्षांच्या मुलाचा सुंता करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अहनाफ तहमीद असं या मुलाचं नाव असून, मंगळवारी रात्री त्याची सुंता करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण कुटुंबीयांची परवानगी न घेता 'पूर्ण भूल' (फुल ऍनेस्थेसिया) दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर केला आहे.
बांगलादेशात दीड महिन्यांपूर्वी अयान अहमद नावाच्या आणखी एका मुलाची सुंता करताना मृत्यू झाला होता आणि त्या मुलाच्या कुटुंबीयांनीही अगदी अशीच तक्रार केली होती.
गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशमध्ये भूल न देताच सुंता केली जाते. परंतु अलीकडच्या काळात डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून सुंता करून घेण्याची प्रथा वाढली आहे.
पण सुंता करताना भूल देणं महत्त्वाचं आहे का? आणि ते किती धोकादायक असू शकतं?
ढाका मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी भूलतज्ञ डॉ. शाह आलम यांनी बीबीसी बांग्लाशी बोलताना सांगितलं की, "मुलाची योग्य आणि सुरक्षित सुंता करण्यासाठी भूल देण्याची गरज आहे. परंतु अशा प्रकरणात कोणती भूल द्यावी हे निश्चित करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
आवश्यक शारीरिक तपासणी न करता चुकीच्या वेळी भूल दिल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अहनाफच्या कुटुंबीयांनी काय म्हटलं?
मुलाचे वडील फखरुल आलम यांनी बीबीसी बांग्लाशी बोलताना सांगितलं की, दहा वर्षांच्या अहनाफ तहमीदला मंगळवारी रात्री 8 वाजता ढाक्याच्या माली बाग चौधरी पाडा येथील जेएस डायग्नोस्टिक अँड मेडिकल चेकअप सेंटरमध्ये सुंता करण्यासाठी नेलं होतं.
रात्री 8.30 वाजता सुंता शस्त्रक्रिया संपली पण तासाभरानंतरही अहनाफ शुद्धीवर आला नाही. यामुळे फखरुल आलम चिंतेत होते.
त्यांनी बीबीसी बांग्लाला सांगितलं की, "मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं की माझ्या मुलाला काही त्रास होतोय का? पण त्यांनी कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही आणि काही वेळाने तो शुद्धीवर येईल असं सांगितलं."
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या मुलाची प्रकृती ढासळत असल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर मुलाला ताबडतोब दुसऱ्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये नेणं आवश्यक असल्याचं सांगितलं.
यानंतर कुटुंबीयांनी मुलाला आयसीयूमध्ये नेण्यासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात संपर्क साधला. रात्री साडे दहा वाजता रुग्णवाहिका आली पण तोपर्यंत तहमीदचा मृत्यू झाला होता.
फखरुल आलम यांनी आरोप केलाय की, माझ्या मुलाला परवानगीशिवाय 'पूर्ण भूल' देण्यात आली.
ते म्हणतात, "काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं की एका मुलाला 'पूर्णपणे बेशुद्ध' केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. म्हणूनच जेव्हा मी माझ्या मुलाला रुग्णालयात नेलं तेव्हा मी डॉक्टरांना विनंती केली होती की माझ्या मुलाला पूर्ण भूल देऊ नका. त्यांनी माझं ऐकलं नाही आणि माझ्या मुलाचा जीव घेतला."
या घटनेनंतर मुलांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री हाथीर झील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यात रुग्णालयाचे मालक आणि कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांची नावं नोंदवण्यात आली आहेत.
फखरुल आलम म्हणाले, "माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."
अहनाफ तहमीद हा ढाक्याच्या मोती झील आयडियल शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होता.
अहनाफचं कुटुंब पूर्वी डेन्मार्कमध्ये राहत होतं त्याचाही जन्म तिकडेच झाला होता. पुढे उद्योगपती असलेले फखरुल आलम 2017 मध्ये पत्नी आणि मुलांसह बांगलादेशात परतले.
भूल देणं कधी धोकादायक ठरू शकतं ?
एक काळ असा होता की भूल न देताही शस्त्रक्रिया केली जायची, पण आता गोष्टी बदलल्या आहेत.
आधुनिक वैद्यक शास्त्रात मानवी शरीरावर कोणत्याही प्रकारची छोटी-मोठी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टर भूल देतात.
भूल (ऍनेस्थेसिया) दिल्यामुळे शरीर किंवा शस्त्रक्रिया करण्यात येणारा एक भाग सुन्न होतो, त्यामुळे रुग्णाला वेदना होत नाहीत.
ढाका मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी भूलतज्ञ शाह आलम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "भूल देण्याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर छोटीशी शस्त्रक्रिया करायची असेल तर तोच भाग सुन्न केला जातो. याला लोकल ऍनेस्थेसिया म्हणतात."
"पण जेव्हा मोठी शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा रुग्णाचं संपूर्ण शरीर सुन्न केलं जातं. या स्थितीत रुग्ण गाढ झोपेत जातो आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा उठतो."
शाह आलम सांगतात की, "कोणालाही भूल देण्याआधी त्याचे रक्त, हृदयाचे ठोके आदींसह अनेक गोष्टींची चाचणी करावी लागते."
त्यामुळे कोणत्या प्रकारची भूल रुग्णासाठी सुरक्षित आहे हे समजण्यास मदत होते.
याशिवाय ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीचे आजार किंवा हृदयविकार असलेल्यांना भूल देऊ नये, असा सल्ला डॉ. शाह आलम यांनी दिला आहे.
हा त्रास असलेल्यांना भूल देणं सुरक्षित नसून आजार बरा झाल्यानंतर किंवा नियंत्रणात आल्यानंतर तज्ञ डॉक्टरांच्या संमतीने शस्त्रक्रिया करता येते असं त्यांनी सांगितलं.
सुंता म्हणजे काय?
पुरुषांच्या शिश्नाच्या पुढची त्वचा कापून काढण्याला सुंता म्हटलं जातं. धार्मिक परंपरा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जातं. शिश्नावरील उरलेली त्वचा त्यावर चिकटलेली असते. ही त्वचा मऊ असते आणि तिचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत असतो.
अमेरिकन कॉन्फेडरेशन ऑफ यूरोलॉजीशी संबंधित असलेल्या यूरोलॉजिस्ट ॲना मारिया यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं की, या मऊ त्वचेचं काम असतं ते म्हणजे लिंगाचा शेवटचा भाग झाकणे.
लिंगाचा शेवटचा भाग अतिशय संवेदनशील असल्यामुळे या त्वचेचे संरक्षणात्मक कार्य महत्वाचे ठरते असं या तज्ञांचं मत आहे.
यामुळेच सुंता झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात त्या भागाला हवा लागली किंवा कापडाचा स्पर्श झाला तरी वेदना होतात. परंतु कालांतराने हा भाग संवेदनाहीन बनतो.
सुंता सामान्यतः दोन प्रकारे केली जाते. पारंपारिक पद्धतीने म्हणजे मऊ त्वचा धारदार रेझर, ब्लेड किंवा वस्तरा वापरून कापली जाते. दुसरी पद्धत स्टेपल गनची आहे. मोठ्या मुलांना किंवा पुरुषांना सुंता करण्यापूर्वी भूल देऊन ही त्वचा कापली जाते जेणेकरून जास्त वेदना होत नाहीत.
सुंता कधी करायला हवी?
धार्मिक कारणं बाजूला ठेवून केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलायला गेलं तर या प्रश्नाची उत्तरं मिळतील.
एकीकडे, अमेरिकेतील डॉक्टरांचं मत आहे की, जन्मानंतर लगेचच मुलाची सुंता करणं चांगलं. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, नवजात मुलांची सुंता करण्याचे फायदे त्याच्याशी संबंधित जोखमींपेक्षा जास्त आहेत.
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, सुंता केल्यामुळे अनेक लैंगिक संक्रमित रोग टाळण्यास मदत होते. यात मूत्रमार्गातील संक्रमण, पेनाइल कॅन्सर आणि एड्स यांचा समावेश आहे.
त्यांच्या मते, नवजात मुलांची सुंता केल्याने मोठेपणी उद्भवणारी गुंतागुंत खूप कमी होते.
त्यामुळे कोणत्या वयात सुंता करायला हवी यासाठी पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
रॉयल मेडिकल असोसिएशनचं मत मात्र याच्या अगदी उलट आहे. ते म्हणतात की, नवजात मुलांची सुंता करू नये कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे किंवा आवश्यक आहे याचा कोणताही ठोस पुरावा आजवर मिळालेला नाही. त्यांच्या मते, नवजात मुलांची सुंता तेव्हाच केली पाहिजे जेव्हा त्यामागे ठोस वैद्यकीय कारण असेल.
या असोसिएशनच्या मते, सुंता केल्यामुळे वैद्यकीय आणि मानसिक गुंतागुंत होण्याचा धोका असतो. यामुळे रक्तस्त्राव, संसर्ग, मूत्रमार्ग अरुंद होणं आणि पॅनीक अटॅक आदी गोष्टी होऊ शकतात.