You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप विजयानंतर बार्बाडोसमधे जल्लोष, टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचे खास क्षण पाहा 11 फोटोंमधून
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी
भारतीय संघानं अखेर जवळपास एका तपानंतर आयसीसी स्पर्धेचा दुष्काळ संपवला आहे. बार्बाडोसमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं टी 20 चं जगज्जेतेपद मिळवलं आहे.
अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रचंड दबावामध्येही सर्वोत्तम कामगिरी करत अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवला. विजयानंतर जगभरातल्या भारतीयांनी जल्लोष केलाच.
पण मैदानातही भारतीय खेळाडूंना भावना अनावर झाल्या. सगळ्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरलेले होते.
या विजयानंतर टीम इंडियानं कसं केलं सेलिब्रेशन पाहूया काही फोटोंच्या माध्यमातून...
1. सूर्यकुमारचा तो झेल आणि विजयाचं झुकलेलं पारडं
भारताच्या हातून यावेळीही सामना निसटत आहे, असं वाटत असताना गोलंदाजांनी भारताला सामन्यात परत आणलं. अखेरच्या ओव्हरमध्ये मिलर स्ट्राइकवर होता.
'किलर मिलर' अशी ओळख असल्यानं तो काहीही करण्याची शक्यता होती. पण सूर्यकुमारनं सीमारेषेवर एक उत्तम जगलिंग झेल घेतला आणि तिथंच भारताला सामना जिंकून दिला होता.
2. रोहितचं स्वप्न साकार
भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी हा विश्वचषक जिंकणं हे सर्वात मोठं स्वप्न होतं. ते स्वप्न साकारलं हे समजल्यानंतर त्यानं सुटकेचा निःश्वास टाकला.
3. हार्दिक पांड्याला अश्रू अनावर
भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हार्दिक पांड्याला विजयानंतर अश्रू अनावर झाले होते. रोहितनं दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरत पांड्यानं क्लासेन आणि नंतर मिलरला बाद केलं.
तेच क्षण भारतीय संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरले.
4. कोच राहुल द्रविडसोबत सेलिब्रेशन
भारतीय संघाच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या प्रशिक्षक राहुल द्रविडला एवढा आनंद व्यक्त करताना चाहत्यांनी कदाचित पहिल्यांदाच पाहिलं.
संघाचा सदस्य म्हणून विश्वचषक जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसलं तरी प्रशिक्षक म्हणून त्यानं भारताला विश्वचषक मिळवून दिला.
5. 'मालिकावीर' बुमराह
जसप्रित बुमराह भारतीय संघाच्या या विश्वचषकाच्या संपूर्ण प्रवासातील अत्तंयत महत्त्वाचा सदस्य होता. त्यानं सर्वोत्तम गोलंदाजी करत भारताला प्रत्येक सामन्यान ऐन मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिल्या.
अवघ्या 4 च्या सरासरीनं त्यानं धावा दिल्या. या कामगिरीसाठीच त्याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
6. मोहम्मद सिराजचं सेलिब्रेशन
मोहम्मद सिराजच्याही आनंदाला पारावर उरला नव्हता. भारतीय तिरंगा हाती घेऊन मैदानात त्यानं जल्लोष केला. सामन्यानंतर तो प्रचंड भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
7. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पंतचा आनंद
दुखापतीनंतर भारतीय संघात परतलेल्या ऋषभ पंतनं या संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी अत्यंत चमकदार कामगिरी केली.
फलंदाजीबरोबरच ऋषभच्या यष्टीमागील कामगिरीसाठी त्याचं प्रचंड कौतुक झालं. त्यानं घेतलेल्या अनेक झेलची प्रचंड चर्चा झाली.
8. विश्वचषकासोबत कुलदीप यादव
भारतीय फिरकीपटुंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर सेलिब्रेशन करताना फिरकीपटू कुलदीप यादव.
9. विजयाचा आनंद आणि निवृत्तीची घोषणा
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी या विजयानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
यावरूनच हा वर्ल्डकप विजय भारतासाठी किती महत्त्वाचा होता याचा अंदाज येतो. रोहितनं सेमिफायनलमध्ये तडाखेबाज फलंदाजी केली. तर कोहलीनं फायनलमध्ये डाव सावरत भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली.
10. अकरा वर्षांनंतर आयसीसी कपसोबत टीम इंडिया
विजयानंतर विश्वचषक उंचावताना टीम इंडिया. भारतीय संघाला 11 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यश आलं. टी 20 वर्ल्डकपच्या या विजयानं अनेकांचं स्वप्न साकार झालं.
पुढच्या विश्वचषकात या संघातील काही दिग्गज नसणार आहे, पण त्यांना बरंच काही शिकवून सिनिअर क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्याची ही जबाबदारी आहे.
11.दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंना अश्रू अनावर
मोठ्या सामन्यांत पुन्हा एकदा झालेला पराभव दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंसाठी मनावर आघात करणारा ठरला. आफ्रिकेच्या अनेक क्रिकेटपटूंना या पराभवानंतर अश्रू अनावर झाले. त्यानंतर ऋषभ पंत काही वेळ त्यांच्याशी जाऊन बोलला आणि वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला.
क्लासेननं फटकेबाजी करत सामना जवळपास खिशात घातला होता. पण तरीही पराभवाचा सामना करावा लागल्यानं त्याच्या अश्रूंना बांध फुटला. तर पराभरावनंतर तबरेज शम्सीनंही अश्रूंना वाट मोकळी करून दिली.