IPL 2023 : ...तर 'गुजरात' विजेता होईल, जाणून घ्या नियम

फोटो स्रोत, Getty Images
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तुल्यबळ संघांमधला आयपीएल फायनलचा मुकाबला पावसामुळे रविवारी रद्द करावा लागला.
अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नाणेफेक पुढे ढकलण्यात आली होती. लाखभराची क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पण पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेर पंचांनी फायनल रद्द केली.
आज (29 मे) सोमवारी फायनल खेळवण्यात येईल.

....तर गुजरात विजेता होईल
रात्री 9.30 पर्यंत सामना सुरू झाला तर षटकं कमी होणार नाहीत. प्रत्येकी 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कटऑफ टाईम 11.56 आहे.
तेवढाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.
जो संघ सुपर ओव्हर जिंकेल तो विजयी होईल. पावसाने सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर प्राथमिक फेरीत अव्वल राहिलेल्या गुजरातला विजयी घोषित करण्यात येईल.
विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस रकमेने गौरवण्यात येईल. उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात येईल.

दरम्यान सोमवारीही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सामन्यापूर्वी पाऊस थांबेल अशी चिन्हं आहेत.
दरम्यान फायनलसारख्या मोठया लढतीला पावसाचा फटका बसू नये म्हणून संयोजकांनी नियमांची तरतूद करुन ठेवली आहे.
रात्री 9.35 वाजेपर्यंत पाऊस थांबून सामना सुरू होण्यासाठी प्रतीक्षा केली जाईल. तोवर एकही षटक कमी होणार नाही. म्हणजेच प्रत्येकी 20-20 षटकांचा सामना होईल.
त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला तर षटकं कमी होतील. किती षटकं कमी होणार यासंदर्भातला निर्णय सामनाधिकारी आणि पंच मिळून घेतील.
प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना सुरू होण्यासाठी कटऑफ टाईम रात्री 11.56 आहे.

फोटो स्रोत, ANI
गेल्या वर्षी आयपीएल पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने जेतेपदावर कब्जा केला होता. यंदाही सातत्यपूर्ण खेळ करत त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
प्राथमिक फेरीत गुजरातने 14 सामन्यात 10 विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान राखलं होतं. 4 सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातचे 20 गुण झाले होते.
दुसरीकडे चेन्नईने 14 सामन्यात 8 विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं होतं. 5 लढतीत चेन्नईचा संघ पराभूत झाला होता. एक लढत पावसामुळे रद्द झाली होती. चेन्नईचे 17 गुण झाले होते.
लखनौचा संघ 17 गुणांसह तिसऱ्या स्थानी होता तर मुंबई 16 गुणांसह चौथ्या स्थानी होता.
भारतीय खेळाडूंना लंडनला जायला होणार उशीर
आयपीएलची फायनल रविवारी (28 मे) होती. पावसामुळे आता ही फायनल सोमवारी (29 मे) खेळवण्यात येईल.
गुजरात आणि चेन्नई संघातील 5 भारतीय खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या संघाचा भाग आहेत. 7 जून पासून इंग्लंडमध्ये ओव्हल या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम मुकाबला होणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, सपोर्ट स्टाफ यांच्यासह विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाकी खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. आयपीएल फायनलमध्ये सहभागी खेळाडूंना मात्र तिथे पोहोचायला उशीर होईल.
गुजरातच्या संघातील मोहम्मद शमी, के.एस.भरत आणि शुबमन गिल भारतीय संघात आहेत. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा हे खेळाडू भारतीय संघाचा भाग आहेत.

पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. न्यूझीलंडने भारतीय संघाला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
भारतीय संघाने वनडेत 1983 आणि 2011 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. 2007 मध्ये पहिलंवहिल्या ट्वेन्टी20 जेतेपदाची कमाई केली आहे. 2002 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचं संयुक्त जेतेपद पटकावलं होतं. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
रायडूची निवृत्तीची घोषणा
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये जेतेपद पटकावलं आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने गेल्यावर्षी पदार्पण केलं. पदार्पणातच त्यांनी जेतेपदावर नाव कोरण्याची किमया केली. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी अंतिम फेरी गाठत सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे. फायनल सुरू होण्याआधी चेन्नईचा अनुभवी खेळाडू अंबाती रायुडूने हा शेवटचा आयपीएल सामना असं स्पष्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"मुंबई आणि चेन्नई- दोन मातब्बर संघ. 204 सामने. 14 हंगाम. 11 प्लेऑफ्स. 8 अंतिम मुकाबले. 5 जेतेपदं. आशा करुया की सहावं जेतेपदही नावावर असेल. हा प्रवास अतिशय समाधान देणारा होता. आजचा अंतिम मुकाबला माझ्या आयपीएल कारकीर्दीतला शेवटचा सामना असेल. या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अतिशय आनंददायी होता. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. यावेळी निवृत्तीच्या निर्णयाबाबत यूटर्न नसेल", असं चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी खेळाडू अंबाती रायुडून ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दोन वाघांमधील लढाई
आयपीएल 2023 ची अंतिम फेरी ही दोन वाघांमधली लढाई आहे. एकाने एकछत्री अंमल केला आणि आता तो जरा म्हातारा व्हायला आला आहे. एक असा जो रोज नवीन कर्तृत्वाच्या पायऱ्या चढत आहे. हे दोन वाघ आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि गुजरात टायटन्सचा हार्दिक पांड्या.
अंतिम सामन्यात दोघांचंही काही ना काही पणाला लागलं आहे. धोनी त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. मागच्या मॅच मध्ये तो म्हणाला होता की निवृत्तीचा निर्णय तो पुढच्या वर्षीच्या लिलावाच्या आसपास घेऊ शकतो.
धोनीने त्याची चेन्नई टीम अशी तयार केली आहे जिथे जास्त वय असलेले लोकसुद्धा चॅम्पिअनसारखे खेळतात. त्यांच्यावर डॅडी टीम म्हणून टीका झाली. काही खेळाडू निवडण्यावरून त्यांच्यावर टीका झाली. तरी धोनीने अशी टीम तयार केली जिला फक्त जिंकणं माहिती आहे.

धोनीने आतापर्यंत चार वेळा चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं आहे.
तिकडे हार्दिक पांड्या त्यांच्या चमत्कारिक नेतृत्वगुणांसाठी ओळखले जातात. त्याने पहिल्याच सीझनमध्ये आयपीएलचं टायटल जिंकवून दिलं होतं. त्यांनी अशी मजबूत टीम उभी केली आहे की त्यांनी सगळ्यांच्या लाडक्या मुंबई इंडियन्सलाही मागे टाकलं. आता ते दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या बेतात आहेत.
धोनी आणि पांड्या यांचं नातं
महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र आहेत ही बाब लपून राहिलेली नाही. दोघांनी अनेकदा मीडियासमोर एकमेकांची स्तुती केली आहे.
पांड्या नेहमीच धोनीकडे सल्लामसलत करतो. त्याच्याकडून बरंच शिकायला मिळालं असं तो सांगतो. हार्दिक रांचीला असताना हमखास धोनीला भेटायला त्याच्या घरी जातो. दोघंही जवळचे मित्र आहेत. पण मैदानावर ते कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.

सुनील गावस्कर म्हणतात की पांड्यामध्ये त्यांना धोनी दिसतो. महेंद्रसिंह धोनी ज्या शांततेत त्याचं कर्णधारपद भूषवतो त्याच शांततेत हार्दिक पांड्या भूषवतो. धोनीसारखंच तोही त्याच्या टीममध्ये आनंदी आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवतो.
सध्याच्या सीझनमध्ये पाहिलं तर धोनीशिवाय चेन्नई फायनलमध्ये पोहोचलीच नसती. मात्र बॅटिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याचं योगदान या सीझनमध्ये कमी आहे.
इतिहास कोणाबरोबर आहे?
31 मार्चला पहिल्या मॅचमध्ये गतविजेते गुजरात आणि सगळ्यांत खाली असणारी टीम चेन्नई एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
चेन्नईने पहिल्यांदा बॅटिंग करत 177 रन्स केल्या होत्या. गुजरातने पाच विकेटने हा सामना जिंकला होता.
गेल्या सीझनमध्ये दोन्ही सामन्यात गुजरातचा विजय झाला होता.
आज अंतिम सामन्यात कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








