You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजू सॅमसन रनआऊट आणि राजस्थानने खाल्ली कच
विजयासाठी 155 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने बिनबाद 87 अशी सलामी दिली. धावा आणि चेंडू यातलं अंतर आटोक्यात होतं. यानंतर आत्मघातकी घसरगुंडी सुरू झाली आणि लखनौैने 10 धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला. जयपूरच्या घरच्या मैदानावर राजस्थानचा संघ एकतर्फी विजय मिळवणार अशा स्थितीतून सामनाच गमावला.
शेवटच्या षटकात राजस्थानला 6 चेंडूत 19 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर रियान परागने चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूवर लेगबाय मिळाली. तिसऱ्या चेंडूवर अवेशने देवदत्त पड्डीकलला बाद केलं. चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलने जोरकस फटका लगावला. सीमारेषेवर दीपक हुड्डाने अफलातून झेल टिपला. पाचव्या चेंडूवर अश्विनने दोन धावा काढल्या तेव्हाच राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. शेवटच्या चेंडूवर एक धाव निघाली आणि लखनौने 10 धावांनी विजयासह थरारक पुनरागमन केलं.
विजयासाठी 155 धावांचं लक्ष्य मिळालेल्या राजस्थानला जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल जोडीने 12व्या षटकात 87 धावांची सलामी दिली.
या क्षणाला सामना अगदी एकतर्फी वाटत होता. राजस्थानला 52 चेंडूत 68 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या सगळ्या विकेट्स शिल्लक होत्या.
मार्कस स्टॉइनसच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उडाला आणि अवेश खानने चांगला झेल घेतला. 35 चेंडूत 44 धावांची खेळी करुन तो तंबूत परतला.
यशस्वीच्या जागी मैदानात आलेल्या कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर यांच्यात चोरटी धाव घेण्यावरुन गडबड झाली. अमित मिश्राच्या अचूक थ्रोवर विकेटकीपर निकोलस पूरनने संजूला धावचीत केलं. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. संजू बाद झाला तरी अनुभवी बटलर मैदानात असल्याने राजस्थानला चिंता नव्हती. पण स्टॉइनसे बटलरचाही अडथळा दूर केला. बॅक ऑफ लेंथ चेंडूवर फटका मारायचा बटलरचा प्रयत्न रवी बिश्नोईच्या हातात जाऊन विसावला. 40 धावांची खेळी करुन बटलर तंबूत परतला.
राजस्थानच्या आशा फिनिशर शिमोरन हेटमायरवर केंद्रित झाल्या. पण अवेश खानने हेटमायरला चतुराईने बाद केलं. धोकादायक ठरू शकेल असा हेटमायर झटपट माघारी परतल्याने राजस्थानच्या अडचणी वाढल्या. त्याला केवळ 2 धावा करता आल्या.
रियान पराग आणि देवदत्त पड्डीकल जोडीने पाचव्या विकेटसाठी 26 चेंडूत 37 धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा जिवंत राखल्या.
फलंदाजीसाठी अवघड अशा खेळपट्टीवर लखनौने 154 धावांची मजल मारली. के.एल. राहुल आणि काईल मायर्स जोडीने सावधपणे खेळ करत 82 धावांची सलामी दिली. 32 चेंडूत 39 धावांच्या खेळीसाठी सोशल मीडियावर राहुलवर टीका झाली. आयुश बदोनी आणि दीपक हुड्डा दोघेही झटपट तंबूत परतले. रवीचंद्रन अश्विनने मायर्सला बाद केलं. त्याने 42 चेंडूत 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
मार्कस स्टॉइनसने 16 चेंडूत 21 तर निकोलस पूरनने 20 चेंडूत 29 धावांची खेळी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 45 धावांची निर्णायक भागीदारी केली. अश्विनने 2 विकेट्स घेतल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)