You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रॉबर्ट प्रिव्होस्ट नवे पोप, त्यांनी धारण केले 'हे' नाव
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष नवीन पोप कोण होतील याकडे होते. गेल्या काही दिवसांपासून पोप यांची निवड करण्याची प्रक्रिया व्हॅटिकन सिटीमध्ये सुरू होती. केवळ ख्रिश्चन-कॅथलिकच नाही तर सर्वांचेच लक्ष या निवडीकडे होते.
व्हॅटिकन सिटीने नवे पोप कोण असतील याची घोषणा केली आहे. मूळचे अमेरिकेचे असलेल्या रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची कार्डिनलने नवे पोप म्हणून निवड केली आहे.
त्यांचे नाव 'लिओ - XIV' हे असेल. पोप यांची निवड झाल्यानंतर त्यांना त्यांचे नवीन नाव धारण करावयाचे असते. त्यांना 'पोप लिओ' या नावाने संबोधित केले जाईल.
याआधी, नवीन पोप यांची निवड झाल्याचे संकेत व्हॅटिकन सिटीने दिले आहेत. व्हॅटिकनमध्ये असलेल्या चिमनीतून पांढऱ्या रंगाचा धूर निघाला आणि उपस्थित लोकांना जल्लोष केला. हे नवीन पोपची निवड झाल्याचे संकेत असतात.
पोप लिओ यांनी व्हॅटिकनच्या गॅलरीत येऊन सर्वांना अभिवादन केले आणि त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी आशीर्वचन दिले आणि दिवंगत पोप फ्रान्सिस यांचे आभार मानले.
व्हॅटिकन सिटीच्या आवारात हजारोच्या संख्येनी लोक जमा झाले आहेत. त्यांना पोप लिओ यांनी संबोधित केले.
आपल्या आशीर्वचनाची सुरुवात त्यांनी 'Peace be with all of you' पासून केली. शांततेचा संदेश देत त्यांनी आपले भाषण सुरू केले. ठबंधू भगिनींनो हाच येशूचा प्रथम संदेश होता. तुम्ही ज्या ही ठिकाणी असाल, तुम्ही आणि तुमचे आप्त हे शांततेत नांदावेत याच सदिच्छा मी देत आहेत. May Peace be with you."
"ईश्वराचे आपल्या सर्वांवर निर्व्याज प्रेम आहे. सर्व मानवतेला येशूची गरज आहे. ईश्वर आणि त्याच्या प्रेमाचा सेतू हा येशूच आहे. एकमेकांना मदत करा आणि प्रेमाचे सेतू बांधा," असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
'ईश्वराने आपल्या सर्वांसाठी निर्माण केलेल्या निवासाकडे आपण सर्वजण मिळून जाऊया,' असा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
पोप लिओ यांच्या कारकिर्दीची सुरुवात पेरूमधून झाली. पोप लिओ हे बहुभाषिक आहेत. त्यांनी आपल्या साथीदारांचे आभार स्पॅनिशमधून मानले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन पोप यांचे अभिनंदन केले. प्रथमच अमेरिकन व्यक्तीला हा बहुमान मिळाला आहे. ही आपल्या सर्वांसाठी बहुमानाची गोष्ट आहे असे ट्रम्प म्हणाले.
पोप यांची निवड कार्डिनलद्वारे होत असते. 133 सदस्य असलेल्या कार्डिनलकडून पोप यांची निवड होते.
पोप कोण असतात?
येशू ख्रिस्त यांच्यानंतर कॅथलिक धर्मात सर्वात मोठं पद म्हणजे पोप. याचा शाब्दिक अर्थ वडील असा होतो.
पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू असतात.
भूगोलात सर्वात लहान देश कोणता याबद्दल आपण शिकलो आहोत. व्हॅटिकन सिटी हे त्याचं उत्तर.
इटली आणि त्याहीपेक्षा थेट सांगायचं तर रोम शहराने या देशाला चारही बाजूंनी वेढलेलं आहे. या व्हॅटिकन सिटीमधूनच पोप यांचा राज्यकारभार चालवला जातो.
पोप हे व्हॅटिकन सिटी या देशाचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात. तसंच जगभरात विविध भागात वास्तव्याल्या असणाऱ्या 1.2 अब्जाहून अधिक कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च अध्यात्मिक गुरू असतात.
पोप यांना चर्चने ठरवलेल्या नावांप्रमाणे विशिष्ट अशी नावे दिली जातात. पण पहिले पोप 'पीटर द एपोजल' यांचं नाव कुणीही घेऊ शकत नाही, असा नियम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)