ऑपरेशन मोगादिशू : जेव्हा रक्तबंबाळ सैनिकांना ट्रकमध्ये भरून सोमालियातून अमेरिकेला पळावं लागलं

1990 च्या दशकात सोमालियातील असंख्य अमेरिकन मिशनमध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1990 च्या दशकात सोमालियातील असंख्य अमेरिकन मिशनमध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला होता
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी हिंदी

अमेरिकन सैन्य त्यांच्या प्रचंड शक्तीसाठी ओळखलं जातं. मात्र, सोमालियासारख्या अत्यंत गरीब आणि मागासलेल्या देशात याच अमेरिकन सैन्याची त्रेधातिरपीट उडाली होती.

'ऑपरेशन मोगादिशू' हे लष्करी ऑपरेशन फसल्यामुळे तिथून सैन्य माघारी बोलावण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली होती. या ऑपरेशनची कहाणी सांगणारा हा लेख.

सोमालियाच्या अलीकडच्या काळातील इतिहासावर तुम्ही नजर फिरवलीत, तर तुम्हाला दुष्काळ, क्रूर हुकुमशहा, एकमेकांशी लढणाऱ्या टोळ्या आणि अराजकता हेच दिसेल.

80 च्या दशकात सोमालियात महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्याचा तडाखा इतका प्रचंड होता की, त्यामुळे सोमालियातील पायाभूत सुविधा पूर्णपर्ण उदध्वस्त झाल्या.

1992 मध्ये अमेरिकेच्या फर्स्ट मरीन डिव्हिजन आणि स्पेशल फोर्सच्या काही सैनिकांना मदत कार्य करण्यासाठी सोमालियात पाठवण्यात आलं होतं.

सोमालियात त्यावेळेस कोणतंही सरकार अस्तित्वात नव्हतं. तिथल्या दोन टोळ्यांच्या नेत्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता.

5 जून 1993 ला नेहमीच्या शस्त्रास्त्रं तपासणीच्या वेळेस, मोहम्मद फराह आयदीद यांच्या समर्थक बंडखोरांनी दबा धरून 24 पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला करत त्यांना ठार केलं होतं.

आयदीद यांच्या समर्थकांना अटक करण्याची मोहीम

या घटनेची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं एक प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार आयदीद आणि त्यांच्या सोमाली नॅशनल अलायन्सच्या लोकांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला.

मॅट एवर्समॅन आणि डॅन शिलिंग यांनी 'बॅटल ऑफ मोगादिशू' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "अमेरिकेच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या आदेशानुसार अमेरिकेच्या स्पेशन ऑपरेशन्स कमांडनं आयदीदला पकडण्यासाठी एक खास तुकडी तयार केली."

26 ऑगस्ट 1993 ला अमेरिकन सैन्य, नौदलाचे सैनिक आणि वायुदलाचे सैनिक असलेली तुकडी मोगादिशूच्या विमानतळावरील मुख्य हॅंगरवर पोहोचली. मोगादिशू ही सोमालियाची राजधानी आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं प्रस्ताव मंजूर करून मोहम्मद फराह आयदीद यांच्या अटकेचा आदेश दिला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं प्रस्ताव मंजूर करून मोहम्मद फराह आयदीद यांच्या अटकेचा आदेश दिला होता

पाच आठवड्यांनी, एका रविवारच्या दुपारी या सैनिकांनी ऑपरेशन 'गॉथिक सर्पंट'ची सुरुवात केली. हे त्यांचं सातवं आणि शेवटचं ऑपरेशन होतं.

तोपर्यंत, दहा वर्षांपासून सुरु असलेल्या यादवी युद्धामुळे सोमालियातील बंडखोरांना लढाईचा चांगलाच अनुभव मिळाला होता. मोगादिशू शहराची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक होती.

यातील बहुतांश लोकांकडे शस्त्रं होती.

3 ऑक्टोबर 1993 ला अमेरिकन सैनिकांना माहिती मिळाली की आयदीदच्या जवळचे दोन सोमाली बंडखोर ऑलिंपिक हॉटलच्या शेजारी असणाऱ्या एका इमारतीत बैठक घेत आहेत.

त्यानंतर अमेरिकन तुकडीनं ठरवलं की या इमारतीवर हल्ला करून या लोकांना अटक करायची. ही जागा मोगादिशू शहराच्या मध्यवर्ती भागातील बकारा मार्केंटमध्ये होती.

अमेरिकन सैनिकांनी ऑपरेशन 'गॉथिक सर्पंट' सुरू केलं, हे त्यांचं सातवं आणि शेवटचं ऑपरेशन होतं

फोटो स्रोत, Presidio Press

फोटो कॅप्शन, अमेरिकन सैनिकांनी ऑपरेशन 'गॉथिक सर्पंट' सुरू केलं, हे त्यांचं सातवं आणि शेवटचं ऑपरेशन होतं

एवर्समॅन, अमेरिकन सैनिकांच्या तुकडीत होते. ते लिहितात, "आम्हाला मोगादिशूमधील एका इमारतीवर हल्ला करायचा होता. 3 वाजून 32 मिनिटांनी लक्ष्यावर पोहोचण्यासाठी आमचं हेलिकॉप्टर हवेत झेपावलं. आमच्या लक्ष्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी फक्त 3 मिनिटांचा वेळ लागणार होता."

"हा दाट लोकवस्तीचा भाग होता. यात चारी बाजूंना आयदीदचे समर्थक होते. हे मिशन अर्ध्या तासात पूर्ण करण्याची आमची योजना होती. मात्र आयदीदच्या समर्थकांवर हल्ला करण्याचं हे मिशन हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे बचावाच्या ऑपरेशनमध्ये रुपांतरित झालं."

"आम्ही टेक-ऑफ करताच, आमच्या पायलटनं आम्हाला सांगितलं की, सोमाली लोक रस्त्यांवर टायर जाळत आहेत. काहीजणांचं मत होतं की, टायर जाळून सोमाली बंडखोर त्यांच्या लोकांना आमच्या हल्ल्याविषयी सतर्क करत होते. ती त्यांची सांकेतिक भाषा होती."

"तर काहीजणांना वाटत होतं की टायर जाळून ते अमेरिकन सैनिकांच्या मार्गात अडथळा निर्माण करत होते."

लाल रेष
लाल रेष

हेलिकॉप्टरमुळे उडाली मोठी धूळ

या मिशनमध्ये 12 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि जवळपास 100 अमेरिकन सैनिक होते.

प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये चार सैनिक होते. सैनिकांनी काळ्या रंगाचं बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं. त्यांनी रेडिओ इयर-प्लगच्या वर प्लास्टिक हॉकी हेल्मेट घातलं होतं. त्यांच्याकडे एक रॅपअराउंड मायक्रोफोन होता. त्याच्या माध्यमातून ते सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात होते.

गर्दीच्या वस्तीत हेलिकॉप्टर पोहोचताच खाली असलेले लोक आणि कार पांगू लागल्या.

सोमाली बंडखोर त्यांच्या लोकांना हल्ल्यापासून सतर्क करण्यासाठी टायर जाळण्याच्या सांकेतिक भाषेचा वापर करत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोमाली बंडखोर त्यांच्या लोकांना हल्ल्यापासून सतर्क करण्यासाठी टायर जाळण्याच्या सांकेतिक भाषेचा वापर करत

खाली उभे असलेले काहीजण वरच इशारा करत होते. जणूकाही ते हेलिकॉप्टर खाली उतरवण्याचं आणि लढण्याचं आव्हान देत असावेत.

मार्क बाउडन यांनी 'ब्लॅक हॉक डाउन अ स्टोरी ऑफ मॉडर्न वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "सुरुवातीची दोन हेलिकॉप्टर लक्ष्य असलेल्या इमारतीच्या दक्षिणेला उतरली. ही हेलिकॉप्टर खाली उतरल्यामुळे इतकी धूळ उडू लागली की इतर हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पायलट आणि सैनिकांना खाली जमिनीवरचं काहीच दिसत नव्हतं."

"दुसरं हेलिकॉप्टर जिथे उतरणार होतं, त्या जागी पहिलं हेलिकॉप्टर उतरलं. दुसरं हेलिकॉप्टर मग पुन्हा हवेत झेपावलं आणि ते लक्ष्य असलेल्या इमारतीच्या अगदी समोरच उतरलं. ही जागा हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी आधी ठरवण्यात आली नव्हती."

एक सैनिक हेलिकॉप्टरमधून खाली पडला

अमेरिकन सैनिक हेलिकॉप्टरमधून उतरताच एक दुर्घटना झाली. आकाशात असलेल्या टॉड ब्लॅकबर्न हेलिकॉप्टरमधून एक सैनिक 70 फुटांच्या उंचीवरून खाली जमिनीवर पडला.

या घटनेबद्दल मॅट एवर्समॅन लिहितात, "मी खाली येऊ लागताच, मी हेलिकॉप्टरच्या बेलीकडे पाहू लागलो. ग्लोव्हज घातलेले असूनसुद्धा नायलॉनच्या दोरीमुळे माझ्या हातांची जळजळ होत होती."

"मला आणखी किती खाली उतरायचं आहे, हे पाहण्यासाठी मी नजर फिरवली. मी खाली पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. खाली एक मोडलेलं शरीर पडलं होतं."

ऑपरेशन मोगादिशूमध्ये 12 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि जवळपास 100 अमेरिकन सैनिकांनी भाग घेतला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑपरेशन मोगादिशूमध्ये 12 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि जवळपास 100 अमेरिकन सैनिकांनी भाग घेतला होता

"त्यावेळी माझ्या डोक्यात पहिला विचार हाच आला की कोणाला तरी गोळी लागली आहे. तो मेला आहे का? मी जेव्हा जमिनीवर उतरला तेव्हा माझ्या पायाचा जवळपास त्याच्या शरीराला स्पर्श झाला."

"डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या नाक, कान आणि तोंडातून रक्त वाहत होतं. तो बेशुद्ध झालेला होता."

"हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असताना त्याच्या हातातून दोर सुटला होता आणि तो 70 फूट उंचीवरून खाली पडला होता. माझ्या इतर सहकाऱ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी मी चारी बाजूंना पाहिलं. तेव्हा मला जाणीव झाली की आमच्यावर गोळीबार होतो आहे."

अमेरिकन सैनिकाचा गोळीबारात मृत्यू

गोळीबाराची सुरुवात झाली तेव्हा सोमाली बंडखोरांच्या गोळ्या निशाण्यावर लागत नव्हत्या. मात्र नंतर त्यांनी अचूक नेम धरण्यास सुरुवात केली.

रस्त्याच्या मधोमध एक बेवारस वाहन उभं होतं. सोमाली बंडखोर त्याचा आडोसा घेत अमेरिकन सैनिकांवर गोळीबार करत होते.

ते इमारतीच्या एका बाजूनं कारच्या दिशेनं पळायचे. कारचा आडोसा घेत गोळीबार करायचे आणि मग रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळायचे.

यादरम्यान ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरदेखील वरून सोमाली बंडखोरांवर गोळीबार करू लागले होते. मात्र सोमाली लोक त्याला चांगलंच प्रत्युत्तर देत होते. मात्र असं असूनही 19 अपेक्षित सोमाली बंडखोरांना अटक करण्यात अमेरिकन सैनिकांना यश आलं.

दहा वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे सोमालियातील लोकांना लढाईचा चांगलाच अनुभव मिळाला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दहा वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे सोमालियातील लोकांना लढाईचा चांगलाच अनुभव मिळाला होता

मॅट एवर्समॅन लिहितात, "मशीन गनमधून निघणाऱ्या गोळ्यांचा आवाज इतका मोठा होता की त्यामुळे माझे दात कटाकट वाजत होते. त्याचवेळेस कॅसी जोएस या आमच्या एका सार्जंटला गोळी लागली."

"अर्थात त्यानं केव्हलर वेस्ट घातलेली होती. मात्र त्या वेस्टनं बगलेजवळचा जो भाग कव्हर झालेला नव्हता तिथूनच गोळी शरीरात शिरली होती. त्याची जखम इतकी किरकोळ होती की मी जवळपास त्याकडे दुर्लक्षच केलं."

"असं वाटलं की त्याला फारशी वेदना देखील होत नाहीये. तो अजिबात हलत नव्हता. फक्त माझ्याकडे पाहत होता. मात्र आमच्या डॉक्टरनं त्याची तपासणी केल्यानंतर, इशाऱ्यानंच सांगितलं की त्या सार्जंटचं शरीर ट्रकमध्ये ठेवण्यात यावं."

"तेव्हा कुठे मला जाणीव झाली की माझ्या टीममधील एका सैनिकाचा मृत्यू झाला होता."

ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पडलं

त्यावेळेस, जखमी ब्लॅकबर्न आणि अटक करण्यात आलेल्या बंडखोरांना आमच्या तळावर पोहोचवणं हे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचं पहिलं प्राधान्य होतं.

त्याचवेळी रेडिओ ऑपरेटर माइक कर्थनं पाहिलं की, एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर जरा जास्तच कमी उंचीवरून चकरा मारतं आहे.

कर्थ लिहितात, "ते पाहिल्यावर मला जरा विचित्र वाटलं. त्याचवेळी मी पाहिलं की ते हेलिकॉप्टर खाली जातं आहे."

एका आरपीजीनं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका आरपीजीनं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडलं होतं

"आधी तर मला वाटलं की हेलिकॉप्टरमधील स्नायपर्सना अचूक नेम घेता यावा यासाठी, पायलट एखाद्या अँगलमध्ये हेलिकॉप्टर नेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र हेलिकॉप्टर सारखं गोल फिरत राहिलं आणि खालीदेखील जात राहिलं."

"एक पूर्ण चक्कर मारून हेलिकॉप्टर इमारतींच्या मागच्या बाजूला दिसेनासं झालं. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा आवाज मला ऐकू तर आला नाही. मात्र, काय झालं होतं याचा अंदाज अला आला होता."

"मी लगेचच सगळ्यांना सूचना दिली की, 'वी हॅव अ बर्ड डाऊन.' त्यावेळेस 4 वाजून 18 मिनिटं झाली होती. सोमाली बंडखोरांच्या एका आरपीजीनं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडलं होतं."

मृतांची संख्या वाढली

दरम्यान हे सर्व घडत असताना मृत अमेरिकन सैनिकांची संख्या वाढतच चालली होती.

एक अमेरिकन ऑपरेटर एक चौक ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. तो रस्त्याच्या कोपऱ्यापासून चार ते पाच फूट अंतरावर होता. तितक्यात दुरून एक गोळी येऊन त्याच्या हेल्मेटला लागली.

माइक कर्थ लिहितात, "त्याचं हेल्मेट आमच्याकडे असणाऱ्या के-पॉट हेल्मेटसारखं मजबूत नव्हतं. त्यामुळे गोळी लागताच त्याचं डोकं मागच्या बाजूला गेलं. मी पाहिलं की त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूनं रक्ताचा कारंजा उडाला."

सोमालियातून परत जाणारे अमेरिकन सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोमालियातून परत जाणारे अमेरिकन सैनिक

"त्यामुळे त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीचा रंग लाल झाला. तो जमिनीवर कोसळला."

"मी जे दृश्य पाहिलं, त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. तो ऑपरेटर जमिनीवर पडताच, आणखी एका ऑपरेटरनं त्याला सुरक्षित जागेकडे ओढण्याचा प्रयत्न केला. तो दोन पावलं चालला असेल तितक्यात त्याला देखील गोळी लागली."

ट्रकमध्ये भरून सैनिकांना स्टेडियमवर नेण्यात आलं

मोगादिशूच्या मधोमध अडकलेल्या अमेरिकन सैनिकांच्या मदतीसाठी इतर सैनिक रात्री 2 वाजेपर्यंत तिथे पोहोचले. मात्र तिथे लढत असलेल्या अमेरिकन सैनिकांनी, मृत चीफ वॉरंट ऑफिसर क्लिफ वॉलकॉट यांचा मृतदेह घेतल्याशिवाय तिथून हटण्यास नकार दिला.

वॉलकॉट यांचा मृतदेह अजूनही पाडण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये अडकला होता. ते हेलिकॉप्टर वॉलकॉटच उडवत होते. अनेक तासांच्या मेहनतीनंतर तो मृतदेह बाहेर काढण्यात अमेरिकन सैनिकांना यश आलं. मात्र तोपर्यंत पहाट होत आली होती.

पहाटे 5 वाजून 42 मिनिटांनी अमेरिकन सैनिकांनी सर्व मृतदेह ट्रकांवर चढवले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ट्रकमध्ये जखमी सैनिकांसाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती.

मोगादिशूच्या लढाईत 88 सैनिक जखमी झाले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोगादिशूच्या लढाईत 88 सैनिक जखमी झाले होते

मार्क बाउडन लिहितात, "उरलेले सैनिक त्या ट्रकांच्या मागे पळत ऑलिंपिक हॉटेलपर्यंत पोहोचले. हेलिकॉप्टरची दुर्घटना जिथे झाली होती, तिथून ते फक्त 400 ते 600 मीटर अंतरावर होतं. त्यानंतर या अंतराला 'मोगादिशू माइल' असं नाव देण्यात आलं."

"तिथून सर्व मृत आणि जखमी सैनिकांना ट्रकांमधून स्टेडियममध्ये नेण्यात आलं. मोगादिशूमध्ये पाठवण्यात आलेल्या पाकिस्तानी शांती सेनेचा तळ त्या स्टेडियममध्ये होता."

"संपूर्ण रस्त्यात आयदीदच्या समर्थक बंडखोरांनी ट्रकांच्या ताफ्यावर गोळीबार केला. त्यात दोन मलेशियन सैनिकांचा मृत्यू झाला."

"या मिशनमध्ये एकूण 88 सैनिक जखमी झाले. ते दमलेले-थकलेले सैनिक सकाळी साडे सहा वाजता स्टेडियमवर पोहोचले. स्टेडियममध्ये असलेल्या डॉक्टर ब्रूस अॅडम्स यांना एकाचवेळी दोन रुग्ण तपासण्याचा सराव होता. संपूर्ण स्टेडियम रक्तानं माखलेल्या अमेरिकन सैनिकांनी भरलेलं होतं."

सोमाली जखमींनं भरलं हॉस्पिटल

मोगादिशूच्या वॉलंटियर हॉस्पिटलमध्ये देखील सोमाली जखमींची रीघ लागली होती. तिथले सर्जन आब्दी मोहम्मद एलमी यांचे कपडे रक्तानं माखलेले होते. जखमींची तपासणी करता करता ते पार थकून गेले होते.

मार्क बाउडन लिहितात, "अडथळ्यांमुळे रस्त्यावर वाहनं चालवता येत नव्हती. त्यामुळे जखमींना हातगाड्यांवर लादून आणलं जात होतं."

लढाई सुरु होण्यापूर्वी वॉलंटियर हॉस्पिटल पूर्णपणे रिकामं असायचं. 4 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हॉस्पिटलमधील सर्व 500 बेड भरलेले होते. आणखी 100 जखमींना हॉस्पिटलच्या व्हरांड्यात ठेवण्यात आलं होतं.

मोगादिशूच्या वॉलंटियर हॉस्पिटलमध्ये तीन बेडच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रात्रभर काम सुरू होतं, सोमाली जखमींच्या किंकाळ्या आणि कण्हण्याचा आवाज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये येत होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोगादिशूच्या वॉलंटियर हॉस्पिटलमध्ये तीन बेडच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रात्रभर काम सुरू होतं, सोमाली जखमींच्या किंकाळ्या आणि कण्हण्याचा आवाज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये येत होता

तीन बेडच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रात्रभर काम सुरू होतं. संपूर्ण हॉस्पिटलभर लोकांच्या किंकाळ्या आणि कण्हण्याचा आवाज येत होता.

रक्तबंबाळ झालेल्या लोकांचे अवयव एकतर शरीरापासून वेगळे झाले होते किंवा त्यात खूप खोल जखम झाली होती. त्यातील बहुतांश लोक शेवटची घटका मोजत होते.

डिगफेर हॉस्पिटलमध्ये जखमी आणि मृतांची संख्या याहून अधिक होती.

अमेरिकन पायलट सोमाली लोकांच्या ताब्यात

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये अमेरिकेचे 18 सैनिक मारले गेले. एका अंदाजानुसार, जवळपास 315 ते 2000 सोमाली लोक या हल्ल्यात जखमी झाले किंवा मारले गेले.

एका अमेरिकन सैनिकाचा जवळ जवळ नग्न मृतदेह मोगादिशूच्या रस्त्यांवर ओढला जात असल्याचं भयावह दृश्य संपूर्ण जगानं पाहिलं.

याशिवाय सोमालियातील लोकांच्या हाती लागलेल्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे पायलट मायकल ड्युरंट यांचं टीव्ही फुटेज देखील संपूर्ण जगभरात दाखवण्यात आलं. त्यात सोमाली लोक त्या पायलटला प्रश्न विचारताना दिसत होते.

मोगादिशूच्या रस्त्यांवर सोमालियाच्या लोकांनी एका अमेरिकन सैनिकाचा मृतदेह फरफटत नेला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोगादिशूच्या रस्त्यांवर सोमालियाच्या लोकांनी एका अमेरिकन सैनिकाचा मृतदेह फरफटत नेला

11 दिवसांनी डयुरंट यांची सुटका करण्यात आली. त्यांच्याबरोबर मृत अमेरिकन सैनिकांचे मृतदेह देखील अमेरिकन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ड्युरंट यांनी रेड-क्रॉसच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, त्यांना बुक्के मारण्यात आले आणि काठीनं मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडण्यात आले. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना जवळपास नग्न करत जमावासमोर फिरवण्यात आलं.

सुपर सिक्स क्रू मधील फक्त मायकल ड्युरंट जिवंत राहिले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुपर सिक्स क्रू मधील फक्त मायकल ड्युरंट जिवंत राहिले होते

डॉक्टरांनी जेव्हा ड्युरंट यांची तपासणी केली, तेव्हा त्यांना आढळलं की, त्यांचा एक पाय, पाठ आणि गालाचं हाड मोडलं होतं. त्यांच्या पायांना आणि खांद्याला गोळी लागल्यामुळे छोट्या जखमा देखील झाल्या होत्या.

त्यांच्या पायांना प्लास्टर बांधण्यात आलं होतं मात्र हाड नीट व्यवस्थित बसवण्यात आलं नव्हतं. ड्युरंट यांच्यासाठी तो दिवस एकाच वेळी आनंदाचा आणि दु:खाचा ठरला होता.

त्याच दिवशी त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या सुपर सिक्स क्रूमध्ये फक्त तेच जिवंत वाचले होते.

अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावलं

7 ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मार्च 1994 पर्यंत सोमालियातील सर्व अमेरिकन सैनिकांना परत बोलावण्याची घोषणा केली.

काही महिन्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लेस आस्पिन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

सहा महिन्यांनी रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात हस्तक्षेप करण्यास अमेरिकेनं नकार दिला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सहा महिन्यांनी रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात हस्तक्षेप करण्यास अमेरिकेनं नकार दिला होता

टास्क फोर्स रेंजरचे कमांडर जनरल विलियम गॅरिसन यांचं करियरदेखील वेळेआधीच संपलं.

या घटनेचा इतका प्रचंड परिणाम झाला की, याच भागातील रवांडामध्ये सहा महिन्यांनी झालेल्या नरसंहारात हस्तक्षेप करण्यास अमेरिकेनं नकार दिला.

आयदीद यांची टोळी आजदेखील 3 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी साजरी करते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयदीद यांची टोळी आजदेखील 3 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी साजरी करते

आयदीद यांनी दावा केला की, त्यांच्या लोकांना जगातील सर्वात प्रबळ लष्करी शक्तीला त्यांच्या देशातून (सोमालिया) पळवून लावण्यात यश आलं.

त्यांची टोळी आजदेखील 3 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी साजरी करते. आयदीद खूप दिवस जिवंत राहिले नाहीत. या ऑपरेशननंतर तीन वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)