सिक्कीमची राणी होप कुक अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएची एजंट होती?

सिक्कीम, राणी होप कुक,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राणी होप कुक
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1959 चं ते वर्ष.. उन्हाळ्याचे दिवस होते. अशाच एका संध्याकाळी सिक्कीमचे युवराज थोंडुप त्यांची मर्सिडीज कार घेऊन दार्जिलिंगमधील विंडमेयर हॉटेलच्या बाहेर थांबले होते. हॉटेलच्या लाउंजमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या आवडत्या पेयाची ऑर्डर दिली.

त्याच लाउंजच्या कोपऱ्यात एक तरुणी बसली होती. युवराजाची नजर त्या तरुणीवर खिळली. काही मिनिटांतच त्यांनी आपल्या मित्रांकरवी त्या तरुणीची माहिती काढली.

ती एक अमेरिकन विद्यार्थिनी होती, जी सुट्टीसाठी भारतात आली होती. काही दिवसांसाठी तिचा मुक्काम विंडमेयर हॉटेलमध्ये होता.

त्या मुलीचं नाव होतं होप कुक. युवराजने होप कुकची भेट घेतली. त्या पहिल्या भेटीतच ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले.

36 वर्षीय युवराजच्या पत्नीचं निधन झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला 3 मुलं होती. थोंडुप यांचा स्वभावही थोडा लाजाळू होता.

त्यावेळी होप कुक निव्वळ 19 वर्षांची होती. या भेटीनंतर पुढचे दोन वर्ष होप आणि थोंडुप यांची भेट झालीच नाही.

युवराजाने ठेवला लग्नाचा प्रस्ताव

होप कुक

फोटो स्रोत, Getty Images

1961 मध्ये होप पुन्हा भारतात आली आणि दार्जिलिंगमधील विंडामेयर हॉटेल मध्येच मुक्काम ठोकला. तिने आपल्या 'टाईम चेंज' या आत्मचरित्रात लिहिलंय की, "मी विंडामेयर हॉटेल मध्ये थांबल्याचं युवराजांना कोणी सांगितलं मला माहिती नाही. यावेळी मी एकटीच तिथे चहा पित असताना युवराज तिथे आले "

"ते गोरखा रेजिमेंटचे मानद अधिकारी होते आणि त्यामुळे एका लष्करी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास गंगटोकहून आले होते. संध्याकाळी त्यांनी मला जिमखाना क्लबमध्ये डान्ससाठी आमंत्रित केलं. त्या रात्री ते खूप चांगल्या मूडमध्ये होते. ते हळूच मला म्हणाले की, एक दिवस आपण व्हिएन्नामध्ये एकत्र फिरायला जाऊ."

त्याच रात्री डान्स करताना थोंडुप यांनी होपला लग्नाची मागणी घातली.

अमेरिकेच्या या तरुणीने अजून वयाची एकविशी सुद्धा गाठली नव्हती. तिने देखील लग्नाचा प्रस्ताव मान्य केला. काही दिवसांतच थोंडुप होपला गंगटोकला घेऊन गेले. राजवाडा पाहून होप सातव्या आसमंतात पोहोचली.

हॉलिवूड अभिनेत्री ग्रेस केलीशी तुलना

1963 मध्ये होप आणि सिक्कीमचे राजकुमार थोंडुप यांचा विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाच्या बातम्या अमेरिकेच्या प्रत्येक एका वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. यावेळी होपची तुलना हॉलिवूड अभिनेत्री ग्रेस केलीशी करण्यात आली होती. ग्रेस केलीने मोनॅकोचा प्रिन्स रेनियर तृतीय याच्याशी विवाह केला होता.

1969 मध्ये टाईम मासिकाने 'सिक्कीम: अ क्वीन रीव्हिजिटेड' नावाचा एक लेख प्रकाशित केला होता.

यात म्हटलं होतं की, "होप सकाळी 8 वाजता उठते. नंतर ती परदेशातून आणलेली वर्तमानपत्र आणि मासिक वाचते. पुढचे चार तास ती लोकांना पत्रं लिहिते जेवणाचे पदार्थ ठरविते आणि राजवाड्याच्या 15 नोकरांना काम सांगते. तिचा संध्याकाळचा वेळ टेनिस खेळण्यात आणि पार्ट्यांमध्ये जातो.

रात्रीच्या जेवणापूर्वी ती स्कॉच आणि सोडा वॉटर घेते. गंगटोकमध्ये प्रवास करताना ती तिची मर्सिडीज वापरते मात्र परदेशात प्रवास करताना इकॉनॉमी क्लासमधूनच जाते."

चोग्याल आणि होप यांच्या लग्नानंतर पाश्चिमात्य जगतात, खासकरून अमेरिकेतील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा होऊ लागली. होपही अशा पद्धतीने वागू लागली जणू काही ती स्वतंत्र सिक्कीमची राणीच बनणार आहे.

परदेशी पाहुण्यांशी संपर्क वाढला

न्यूज वीकच्या 2 जुलै 1973 च्या अंकात छापून आलं होतं की, "होपने आता जॅकलीन केनेडीच्या शैलीत कुजबुजायला सुरुवात केली आहे. ती आता 'मी' ऐवजी 'आम्ही' असे शब्द वापरते. आणि ज्याप्रमाणे महाराणीला वागणूक दिली जाते त्याचप्रमाणे मलाही वागणूक दिली जावी असं तिचं म्हणणं असतं."

होप कुकला भेटणाऱ्या परदेशी पाहुण्यांची संख्या आता वाढू लागली होती.

अमेरिकेचे भारतातील राजदूत कीनेथ कीटिंग आणि अमेरिकन काँग्रेसचे सिनेटर चार्ल्स पर्सी त्यांना भेटण्यासाठी खास गंगटोक येथे आले होते.

सिक्कीमचे राजे चोग्याल आणि होप कुक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिक्कीमचे राजे चोग्याल आणि होप कुक

त्यावेळी रॉचे विशेष सचिव असलेले जीबीएस सिद्धू त्यांच्या "सिक्कीम डॉन ऑफ डेमोक्रसी' या पुस्तकात लिहितात, "होप आणि परदेशी लोकांच्या बैठकांमुळे पश्चिमेत भारताविरुद्ध प्रचार सुरू झाला की भारत सिक्कीमच्या स्वातंत्र्यात अडथळा आणत आहे. शिवाय 1950 च्या करारात बदल करण्यासाठी चोग्याल यांनी भारतावर दबाव आणला होता. आणि होप कुक या त्यांच्या पत्नीमुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनू लागला होता."

त्यावेळी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात काम करणारे अमेरिका परराष्ट्र सेवेचे अधिकारी विल्यम ब्राउन सांगतात, "60 च्या दशकात आमची आणि होप कूकची जेव्हा केव्हा भेट झाली तेव्हा तिने भारताला टोमणे मारण्याची संधी कधीही सोडली नाही."

लेखात दार्जिलिंगवर दावा सांगितला

1966 मध्ये होप कुक यांनी नामग्याल इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये 'सिक्किमीज थिअरी ऑफ लँडहोल्डिंग अँड द दार्जिलिंग ग्रँट' नावाचा लेख लिहिला होता. या लेखात तिने 1835 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

तिने असा युक्तिवाद केला होता की, दार्जिलिंग हे ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. सिक्कीमवर राजघराण्याचा हक्क असल्याने दार्जिलिंग परत सिक्कीमला द्यावे. हा लेख राजकीय बॉम्ब ठरला.

या लेखाने लोकांचं लक्ष वेधलं कारण ही संस्था अप्रत्यक्षपणे सीआयएशी संबंधित होती. केन कॉनबॉय त्यांच्या 'द सीआयए इन तिबेट' या पुस्तकात लिहितात, "तिबेट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सीआयए एजंटनी याच संस्थेत इंग्रजीचे धडे घेतले होते."

त्यामुळे होप कुकच्या या लेखामुळे तिला 'हिमालयातील सीआयएचा प्लांट एजंट' म्हटलं जाऊ लागलं.

सिक्कीम, राणी होप कुक,

फोटो स्रोत, PENGUIN

फोटो कॅप्शन, मुखपृष्ठ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इंदिरा गांधींनी देखील होप कुकचा लेख गांभीर्याने घेतला

अँड्र्यू डफ त्यांच्या 'सिक्कीम रिक्वेम फॉर अ हिमालयन किंगडम' या पुस्तकात लिहितात, "होप कुकने तिच्या आत्मचरित्रात स्पष्ट केलंय की, शैक्षणिक वादविवादाला सुरुवात करण्याच्या हेतूने तिने हा लेख लिहिला होता.

मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. भारतीय वृत्तपत्रांना वाटलं की तिने दार्जिलिंगच्या भारतीय स्वामित्वाच्या कायदेशीरपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे भारतीय वृत्तपत्रात 'सीआयए एजंटला पंख फुटले' किंवा 'गंगटोकमध्ये आली ट्रोजन घोडी' अशा हेडलाईन्स छापून येऊ लागल्या."

पुढच्या काही दिवसात हा लेख इंदिरा गांधींच्या टेबलवर पोहोचला. हा लेख इंदिराजींसाठी धोक्याची घंटा होता.

सुनंदा दत्ता रे त्यांच्या 'स्मॅश अँड ग्रॅब' पुस्तकात लिहितात, "भारताच्या संसदेत यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. तेव्हा इंदिरा गांधींनी संसद सदस्यांना आश्वासन दिलं की दार्जिलिंगवर सिक्कीमने केलेल्या हक्काची मागणी कोण्या जबाबदार व्यक्तीने केलेली नाही. 'जबाबदार' हा शब्द वापरून इंदिरा गांधी होपच्या विधानाबद्दल गंगटोकला स्पष्ट संदेश पाठवू इच्छित होत्या."

"यावर चोग्यालने देखील पत्नीच्या त्या लेखपासून फारकत घेतली आणि घोषित केलं की, "माझा देश, माझ्या देशातील लोकांचे अधिकार, त्यांचं कल्याण करण्यासाठी मी सक्षम आहे. यासाठी मला नामग्याल इन्स्टिट्यूट किंवा त्यांच्या मासिकाची गरज नाही."

सीआयए एजंट असण्यावर संमिश्र मत

भारतातील बऱ्याच सामजिक वर्तुळांमध्ये होपच्या सीआयए एजंट असण्याबद्दलच्या चर्चा चालायच्या. सिक्कीम हे राज्य सामरिकदृष्ट्या महत्वाचं होतं. आणि तिथल्या एकट्या राजाला एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पाडण्याची संधी सीआयएचे अधिकारी कशी गमावतील अशा त्या चर्चा असायच्या. पण भारतीय गुप्तचर विभागाने यावर कधीही विश्वास ठेवला नाही. होप कूक ही सीआयए एजंट होती, तिला एजन्सीने अमेरिकन हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी गंगटोकमध्ये ठेवल्याचं त्यांनी कधीच मान्य केलं नाही.

रॉचे माजी विशेष सचिव, जीबीएस सिद्धू लिहितात की, "जर सीआयएला खरोखरच सिक्कीमच्या स्वातंत्र्यासाठी काम करायचं असतं तर त्यांनी आणखीन चांगलं नियोजन केलं असतं. जर वास्तवात असं काही असतं तर होपने सिक्कीमच्या दक्षिण आणि पश्चिम भागात आपली उपस्थिती नोंदवली असती."

तिने नेपाळी वंशाच्या उपेक्षित लोकांसाठी रुग्णालये, शाळा इत्यादी उघडून चोग्यालबद्दल त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असता.

दुसरं म्हणजे, तिने चोग्यालला प्रशासनावरची पकड ढीली करायला सांगून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना काही अधिकार देण्याचा सल्ला दिला असता. याउलट तिने चोग्यालला त्यांच्याच लोकांपासून विशेषत: नेपाळी वंशाच्या लोकांपासून दूर केलं.

होप कुक

फोटो स्रोत, Getty Images

चोग्याल हे आधीपासूनच सीआयएच्या संपर्कात होते

या उलट होप तिबेटी राणीसारखी वागायची. ती जेव्हा चोग्याल यांच्या राणीच्या भूमिकेत असायची तेव्हा सिक्कीमच्या लोकांसारखे कपडे घालायची. अतिशय विनम्रतेने वागायची, बोलताना राणीसारखं धीम्या आवाजात बोलायची.

सिद्धू पुढे लिहितात, "ती सीआयए एजंट आहे असं एका क्षणासाठी गृहीत जरी धरलं तरी तिचे हँडलर अनाडी होते असं म्हणता येईल. त्यांना जमिनीवरील परिस्थितीची कल्पना नव्हती. आणि तसं ही सीआयएला चोग्यालकडून अतिरिक्त माहितीची गरज नव्हती. कारण चोग्याल आणि त्यांचे गुप्तचर विभागाचे प्रमुख कर्मा तोपडेन यांच्याविषयीची सगळी माहिती कलकत्त्यातील सीआयए अधिकाऱ्यांना होतीच."

"पन्नासच्या दशकात चोग्याल यांनी राजकुमार म्हणून तिबेटला दोनदा भेट दिली होती. दोन्ही प्रसंगी परतताना कलकत्याच्या वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या सीआयए अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती घेतली होती. जेव्हाही ते कलकत्त्याला भेट देत, तेव्हा अमेरिकन काउंसलेट त्यांच्यासोबत असत."

"त्यामुळे सीआयए आणि एमआय 6 चे हेर त्यांच्या संपर्कात कायमच राहू शकले असते. सीआयए सारख्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम एजन्सीसाठी होप पेक्षा इतर स्त्रोतांकडून माहिती गोळा करणं सोपं ठरलं असतं."

चोग्यालच्या पतनापूर्वी होपने सिक्कीम सोडलं

पण होप चोग्यालच्या तुलनेत चांगलीच हुशार होती. 8 मे 1973 रोजी भारतासोबत जो करार झाला होता त्याच्या खऱ्या परिणामांची जाणीव तिला झाली होती. म्हणून तिने करार झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टमध्ये सिक्कीम कायमचं सोडण्याची योजना आखली. त्यामुळे आपल्या पतीच्या पतनाची साक्षीदार होण्याच्या दुःखद प्रसंगातून ती वाचली. तिने 14 ऑगस्ट 1973 रोजी सिक्कीमला कायमचा रामराम ठोकला.

सिक्कीमचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी डी दास यांनी 'मेमोयर्स ऑफ अॅन इंडियन डिप्लोमॅट' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, "शेवटी होप कुकने सिक्कीम सोडून अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात सोबत रहा म्हणून चोग्याल यांनी तिला विनंती केली. पण तिने त्यांचं काहीएक ऐकून घेतलं नाही."

तिला सोडायला दास गेले होते. तेव्हा ती दास यांना म्हणाली, "मिस्टर दास, इथं माझी भूमिका संपली आहे. माझ्या पतीची काळजी घ्या."

होप कूक ही अनेकांसाठी गूढ बाई होती. काहींनी तिला सीआयए एजंट म्हटलं खरं पण तिच्याविषयी नक्की कोणालाच माहीत नाही. पण तिने चोग्यालला भारतविरोधी भूमिका घेण्यास प्रवृत्त केलं यात शंका नाही.

चोग्याल आणि होप कुक

फोटो स्रोत, PENGUIN

फोटो कॅप्शन, चोग्याल आणि होप कुक

चोग्याल यांना भारताविरुद्ध भडकवण्यात तिचा मोठा वाटा होता. तिने शाळेची पाठ्यपुस्तके बदलली. दर आठवड्याला तरुण अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावण्याचा तिने सपाटा लावला होता.

भारतीय नेते आणि अधिकाऱ्यांसमोर ती राणीसारखी वागायची, पण त्यांच्या पाठीमागे राग आल्यावर मात्र तिचा तिच्यावरचा ताबा सुटायचा.

सिक्कीम सोडण्यामागे चोग्यालचं वागणं कारणीभूत

चोग्यालशी लग्न केल्यानंतर होपने अमेरिकेचं नागरिकत्व सोडलं होतं. पण सिक्कीम सोडल्यावर तिने चोग्यालपासून घटस्फोट मागितला आणि तिचं अमेरिकन नागरिकत्व परत मिळवलं. काही लोकांच्या मते होपने चोग्यालला सोडलं कारण त्यांचं नातं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं.

चोग्यालचे एका विवाहित बेल्जियम महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्यामुळे होप कुक आणि चोग्याल यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. होपच्या पहिल्या अपत्याच्या जन्माआधीच त्या महिलेला भेटण्यासाठी चोग्याल बेल्जियमला गेले होते.

होप कुक तिच्या आत्मचरित्रात लिहिते, "त्यांची प्रेयसी त्यांना प्रेमपत्र लिहायची."

पुस्तक

फोटो स्रोत, TATA MCGRAW HILL

"अनेकदा मी त्यांना मिठी मारायची तेव्हा मला जाणवायचं की, त्यांच्या ड्रेसिंग गाउनच्या खिशात काही कागद आहेत. अनेकदा ती प्रेमपत्र त्यांच्या खिशातून पडायची, ती मी वाचली होती."

चोग्याल यांना दारूचं व्यसन लागलं होतं. ते दारूच्या इतके आहारी गेले होते की, त्यांच्या सवयीचा त्रास त्यांच्या राणीला व्हायचा आणि दोघांमध्ये खडाजंगी व्हायची. एकदा चोग्याल तिच्यावर इतके चिडले की त्यांनी तिचा रेकॉर्ड प्लेयर राजवाड्याच्या खिडकीतून बाहेर फेकून दिला.

भारतीय सैनिकांचा राजवाड्याला वेढा

30 जून 1974 रोजी चोग्याल यांनी इंदिरा गांधींना आपल्याकडे वळवून घेण्याचा शेवटचा प्रयत्न केला. पण तोही अयशस्वी ठरला.

9 एप्रिल 1975 ला भारतीय सैनिकांचे ट्रक सिक्कीमच्या राजवाड्याच्या दिशेने रवाना झाले. सकाळी सकाळी कसला आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी सिक्कीमचे राजे चोग्याल राजवाड्याबाहेर डोकावून बघतात तर भारतीय सैनिकांनी सिक्कीमच्या राजवाड्याला वेढा घातला होता.

जी बी एस सिद्धू लिहितात, "भारतीय सैन्याने राजवाड्याला चारी बाजूंनी घेरलं होतं. तेवढ्यात मशिनगन चालवल्याचा आवाज येऊ लागला. मशिनगनची एक गोळी राजवाड्याच्या गेटवर तैनात असलेल्या बसंत कुमार छेत्रींना लागली आणि ते खाली कोसळले."

सिक्कीमचे राजे चोग्याल आणि होप कुक

फोटो स्रोत, HTTP://SIKKIMARCHIVES.GOV.IN/

जी बी एस सिद्धू लिहितात, "चोग्याल यांनी घाबरून त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकारी गुरबचन सिंग यांना फोन केला आणि काय सुरू आहे याची चौकशी केली. पण गुरबचन यांनी फोनचा रिसीव्हर जनरल खुल्लर यांच्याकडे दिला.

जनरल खुल्लर चोग्यालला म्हणाले की, सिक्कीमच्या सैनिकांना शस्त्र टाकण्याचे आदेश द्या. राजवाड्याच्या संरक्षणासाठी 243 सुरक्षा रक्षक होते. तेच दुसरीकडे 5,000 भारतीय सैनिक होते. त्यामुळे अवघ्या 30 मिनिटांत हे युद्ध संपलं आणि भारतीय सैन्याने राजवड्यावर ताबा मिळवला."

सिक्कीमचे भारतात विलीनीकरण

त्याच दिवशी 12 वाजून 45 मिनिटांनी सिक्कीम या देशाचा स्वतंत्र दर्जा समाप्त करून सिक्कीम हे नवं राज्य भारताचा अविभाज्य अंग झालं.

यासंदर्भातील माहिती जगाला कळावी या उद्देशाने राजे चोग्याल यांनी हॅम रेडिओवर एका संदेशाच प्रसारण केलं. तिकडे इंग्लंडच्या खेड्यात राहणाऱ्या एका निवृत्त डॉक्टरने चोग्याल यांचा आपत्कालीन संदेश ऐकला. तर स्वीडन आणि जपानमधील इतर दोघांनीही हा संदेश ऐकला होता.

राजे चोग्याल यांच्या या कृतीमुळे त्यांना राजवाड्यातच नजरकैदेत ठेवण्यात आलं. सिक्कीमला भारताचे 22 वे राज्य बनवण्यासाठी 23 एप्रिल 1975 ला संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. आणि त्याच दिवशी 299-11 मतांनी ते मंजूरही झालं.

चोग्याल

फोटो स्रोत, OXFORD UNIVERSITY PRESS

26 एप्रिलला राज्यसभेत या विधयेकाला मंजुरी मिळाली आणि 15 मे 1975 रोजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी या विधेयकावर सही करून नामग्याल घराण्याची राजवट संपुष्टात आणली.

होप कुक कधीही सिक्कीमला परतली नाही

या धक्क्यातून चोग्याल कधीच सावरू शकले नाहीत. त्यांना कर्करोग झाला. त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले.

29 जानेवारी 1982 रोजी सकाळी चोग्याल पालडन थोंडुप नामग्याल यांनी जगाचा निरोप घेतला. चोग्याल यांच्या मृत्यूनंतरही होप कुक अमेरिकेतच राहिली.

होप कुक

फोटो स्रोत, Getty Images

1989 मध्ये होप कूकने ओप्रा विन्फ्रेच्या 'ओप्रा' टॉक शोमध्ये भाग घेतला होता. यावेळी आपण सिक्कीमशी संबंध कायम ठेवल्याचं सांगितलं, पण ती तिथे कधीच परतली नाही.

तिने 1983 मध्ये इतिहासकार माईक वॉलेस यांच्याशी दुसरं लग्न केलं, पण त्यांचाही घटस्फोट झाला. ती अजूनही न्यूयॉर्कमध्ये राहते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)