उज्जैनमध्ये भरदिवसा रस्ताच्या कडेला कथित बलात्कार, संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?

- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, उज्जैन, मध्य प्रदेश
(या बातमीमधील काही भाग तुम्हाला विचलित करु शकतात.)
मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यामध्ये घडलेली बलात्काराची घटना संतापाचं कारण ठरली आहे. उज्जैनमधील एका महिलेवर रस्त्याच्या कडेला झालेल्या बलात्काराचा व्हीडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुधवारी (4 सप्टेंबर) उज्जैनमधील कोयला फाटक चौकातील फुटपाथवर भरदिवसा 28 वर्षीय युवकाने 40 वर्षीय महिलेवर कथितपणे बलात्कार केला आणि तो तिथून पळून गेला.
धक्कादायक बाब अशी आहे की, ही घटना जिथे घडली तो परिसर वर्दळीचा आहे. याच रस्त्यावर एक पेट्रोल पंप, चरक हॉस्पिटल आणि याशिवाय दारुचे एक दुकानदेखील आहे.
भर रस्त्यात ही घटना घडत असताना लोक ये-जा करत होते. मात्र, कुणीही त्या महिलेच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला नाही. याउलट, काही लोक या घटनेला आपल्या मोबाईलमध्ये कैद करू लागले.
सध्या या घटनेवरुन मध्य प्रदेशचं राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने हा व्हायरल व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपाने म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष राज्याला बदनाम करण्यासाठी 'कुत्सित प्रयत्न' करत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ही घटना बुधवारी (4 सप्टेंबर) दुपारी घडली आहे. उज्जैनच्या ज्या भागामध्ये ही घटना घडली आहे, त्या परिसरात सातत्याने वर्दळ असते.
पोलिसांनी पुढे दिलेली माहिती अशी की, "या घटनेतील पीडिता आणि आरोपी दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. आरोपी हातगाडा चालवतो आणि पीडित महिला रद्दी विकण्याचे काम करते. त्या दिवशी ते दोघे एकमेकांबरोबर बोलले आणि सोबतच त्यांनी दारुही घेतली. या घटनेतील मुलाने तिच्याबरोबर लग्न करण्याचं वचन दिल्यानंतर दोघांनीही दारु घेतली आणि त्यानंतर ही घटना घडली, अशी माहिती महिलेने दारुची नशा उतरल्यानंतर दिली आहे.
"या घटनेमधील आरोपीवर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर सादर करुन तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पुढील तपास सुरु असून ज्यांनी या घटनेचा व्हीडिओ केला आणि ज्यांनी तो प्रसारित करण्यास मदत केली, अशांचाही शोध घेतला जात आहे."
ही महिला जवळपास 8 वर्षांपूर्वी उज्जैनमध्ये आली होती. तिला 18 वर्षांचा एक मुलगाही आहे; मात्र, सध्या ती आपल्या कुटुंबासोबत राहत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षकांचं असं म्हणणं आहे की, ही घटना घडत असतानाच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी महिलेची मदत केली. त्यानंतर दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे नशा उतरल्यानंतर महिलेची साक्ष नोंदवून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सध्या या प्रकरणातील आरोपीला न्यायालयामध्ये सादर करुन तुरुंगात पाठवण्यात आलंय.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या घटनेचा उल्लेख करत 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की, "मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भरदिवसा एका फुटपाथवर महिलेबरोबर झालेली नृशंस घटना अत्यंत भयावह आहे. आपला समाज कोणत्या दिशेला जात आहे, हे पाहून संपूर्ण देश सुन्न झाला आहे. बातम्यांनुसार, रस्त्यावरुन जाणारे लोक महिलेला वाचवण्याऐवजी या घटनेचा व्हीडिओ करत होते. उज्जैनच्या पवित्र भूमीवर अशा प्रकारची घटना घडणे, हा मानवतेलाच कलंक आहे."
दुसऱ्या बाजूला या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलंय की, "धर्मनगरी उज्जैन पुन्हा एकदा कलंकीत झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये आता भरदिवसा रस्त्यात बलात्कार होण्यास सुरुवात झाली आहे, हा विचार करुनच स्तब्ध व्हायला होतंय. जर मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या शहरात ही अवस्था असेल तर बाकी राज्याची अवस्था सहजपणे समजून घेता येऊ शकते. दलित आणि आदिवासी महिलांबरोबर सातत्याने होत असलेले अत्याचारही यातून जाणवू शकतात."

फोटो स्रोत, ANI
सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते आशिष अग्रवाल यांनी जीतू पटवारी यांना प्रत्युत्तर देताना 'एक्स'वर लिहिलं आहे की, पटवारी मध्य प्रदेशला बदनाम करण्याचा 'कुत्सित प्रयत्न' करत आहेत.
पुढे त्यांनी लिहिलं की, "सर्वांत आधी महत्त्वाची गोष्ट अशी की, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कठोर आणि संवेदनशील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महिला आणि आरोपी दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. बाकी गोष्टी तपासाअंती स्पष्ट होतील आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल."
मात्र, या घटनेमधील आश्चर्यचकित करणारी बाब अशी की, भरदिवसा बरीच वर्दळ असणाऱ्या रस्त्याच्या कडेला अशी घटना घडताना अनेक लोक ये-जा करत होते. काहींनी व्हीडिओदेखील केला. मात्र, कुणीही हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
समाजाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
उज्जैनमध्येच गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्धनग्न आणि रक्ताळलेल्या 15 वर्षांच्या मुलीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ही जखमी मुलगी दारोदार भटकून लोकांकडून मदत मागताना दिसत होती.
या घटनेशी निगडीत एका व्हीडिओमध्ये एक व्यक्ती या मुलीला पाहून तिला दारातून हाकलतानाही दिसून आला होता.
बीबीसीने मध्य प्रदेशमध्ये महिला आणि बालहक्कांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चना सहाय यांच्याशी जेव्हा समाजाच्या भूमिकेबाबत विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, लोकांचं हे वर्तन फारच निराशाजनक आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, "महिला वा मुलींबरोबर झालेल्या छेडछाडीची घटना असो वा बलात्कार असो, अशा घटनांमध्ये समाजाची भूमिका फारच निराशाजनक असते. लोक अशा घटना रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याचा व्हीडिओ अथवा फोटो काढण्यात धन्यता मानतात."
"याच घटनेबाबत बोलायचं झालं तर व्हीडिओ करणारी व्यक्ती आणि तिथून जाणाऱ्या लोकांनाही ही गोष्ट माहिती आहे की, महिला अशा प्रकारच्या घटनेसाठी कधीही स्वत: आपल्या मर्जीने तयार नसते. असं असतानाही कुणीही ही घटना रोखण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्याउलट काहींनी व्हीडिओ करण्यात धन्यता मानली."
अर्चना सहाय या अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक कठोर कायदा आणला जावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. जेणेकरुन, जे लोक अशा प्रकारे व्हीडिओ करतात, त्यांनाही कठोरातील कठोर शिक्षा होऊ शकेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)










