संजय राऊत म्हणतात, ‘तुरुंगात माझा खूप छळ झाला, मी मोदी-शाहांना भेटणार’ #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) संजय राऊत म्हणतात, ‘तुरुंगात माझा खूप छळ झाला, मी मोदी-शाहांना भेटणार’

“ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात माझा खूप छळ झाला. मी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना माझा तुरुंगातील अनुभव आणि माझ्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात आली याची माहिती देणार आहे,”

असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

तसंच, राऊत म्हणाले, “गेल्या काही वर्षात विरोधकांवर ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत होत असलेल्या कारवाईचा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित करणार आहे.”

“पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती. या पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नाही,” असं राऊत यांनी सांगितलं.

“न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मी स्वागत करतो. देश हा राज्यघटनेच्या चौकटीत चालतो. संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. सध्या संविधानाची पायमल्ली होत आहे,” असंही राऊत म्हणाले.

2) शिवसेनेला रोखण्यासाठी सिंधुदुर्गात राणे-केसरकर एकत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक आज होत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले आहेत.

त्यामुळे भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणुकीसाठी एकूण 15 जागा असून एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.

भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तर उर्वरीत 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी युती असून एकास एक लढत होत आहे.

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, दीपक केसरकर

महाविकास आघाडीला खाली खेचण्यासाठी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे आमदार नितेश राणे हे एकत्र आले असून या दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिंदे गटाचे अशोक दळवी, विद्यापन जिल्हा बँक संचालक विद्या बांदेकर हे मैदानात उतरले आहेत.

तर या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा खरेदी विक्री संघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे विकास सावंत हे मैदानात उतरले आहेत.

सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान होणार असून चार नंतर काही काळ विश्रांतीनंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

14 जागांचे निकाल रात्री उशिरापर्यंत येणार असून 944 सभासद सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे भवितव्य ठरवणार आहेत.

3) शिधावाटप दुकानांमधून आता इंटरनेट

शहरी भागातील वायफाय क्रांती आता गावखेड्यापर्यंत नेण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

त्यानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांतील शिधावाटप दुकानांमध्ये इंटरनेट- वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या दुकानाच्या परिसरात येऊन लोकांना माफक दरात इंटरनेट वापरता येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

देशात इंटरनेटचा वापर वाढत असताना ग्रामीण भागातील इंटरनेटची घनता शहरी भागातील इंटरनेट घनतेच्या फक्त एकतृतीयांश आहे. त्यामुळे शहरांप्रमाणे खेडय़ापाडय़ांतील लोकांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

केंद्राच्या पीएम-वाणी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील 10 जिल्हे, उत्तराखंडची राजधानी डेहराडून, आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील शिधापाटप दुकानांतून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

4) पतंजली समूहाच्या 5 औषधांवर बंदी

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.

उत्तराखंडमधील आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.

रामदेव बाबा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रामदेव बाबा

पतंजलीमार्फत मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.

मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आलं.

5) फ्युचर रिटेलच्या अधिग्रहणासाठी अंबानी-अदानींमध्ये स्पर्धा

भारतातील दोन सर्वात श्रीमंत उद्योजक अदानी समूहाचेअध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आमने-सामने आले आहेत. निमित्त आहे फ्युचर रिटेलच्या अधिग्रहणाचं.

कर्जात बुडालेल्या फ्युचर रिटेलच्या खरेदीसाठी या दोन्ही उद्योजकांमध्ये स्पर्धा लागली आहे. या दोन्ही समूहांनी फ्युचर रिटेलसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहेत.

लोकमतच्या माहितीनुसार, एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स आणि फ्लेमिंगो ग्रुपच्या एका जॉईंट व्हेचरने फ्युचर रिटेलसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहे. तर रिलायन्स रिटेल व्हेंचर्सदेखील या प्रक्रियेत सहभागी झाली आहे. एकूण 13 कंपन्यांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहेत.

28 हजार कोटी रुपयांचे फ्युचर रिटेलवर कर्ज आहे. दिवाळखोरीप्रकरणी कंपनीला 33 वित्तसंस्थांचे कर्ज फेडायचे आहे. त्यात बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचाही समावेश आहे.