LGBTQ : 'आम्ही आमच्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध मुलाशी लग्न करायला भाग पाडलं नाही'

- Author, गगनदीप सिंग जसोवाल
- Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
27 वर्षीय डिंपल आणि तिची 21 वर्षीय मैत्रीण मनीषा यांनी सामाजिक चालिरिती मोडून लग्न केलं आहे.
डिंपल आणि मनीषा या दोघींच्याही कुटुंबीयांनी या नात्याला संमती दिल्याने हा समलैंगिक विवाह सध्या चर्चेत आहे.
डिंपल ही पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील, तर मनिषा ही भटिंडा जिल्ह्यातील आहे.
डिंपल आणि मनीषा यांचा विवाह 18 सप्टेंबर 2023 रोजी भटिंडा शहरातील गुरुद्वारामध्ये शीख विधींनुसार झाला.
लग्नात डिंपलने नवरदेवाचा पोषाख घातला होता.
एवढंच नाही तर त्यांनी आणखी एक सामाजिक अडथळा बाजूला सारून लग्न केलं आहे. कारण दोघींचा आंतरजातीय विवाह आहे.
डिंपल ही एका जाट शीख कुटुंबातील आहे, तर मनीषा दलित हिंदू समुदायातून आली आहे.
जात आणि धर्मामुळे आमच्या प्रेमात तसू भर पण फरक न पडल्याचं डिंपल आवर्जून सांगते.
पण आता या लग्नावरून वाद निर्माण झाला आहे.
श्री अकाल तख्त साहिबने या दोन्ही मुलींचे लग्न लावून देणारे ग्रंथी, संबंधित गुरुद्वारा समितीच्या कामावर पूर्ण बंदी घातली आहे.
बीबीसीने डिंपल आणि मनीषा यांच्यासोबत या संपूर्ण प्रकरणाविषयी चर्चा केली.
कुटुंबांनी दोघींचे समलैंगिक संबंध कसे मान्य केले?
आम्ही भेटलो तेव्हा शर्ट आणि पँट घातलेल्या डिंपलने टॉमबॉय हेअरकट केला होता.
वयात आल्यावर तिने आपल्याला मुलांमध्ये नाही तर फक्त मुलींमध्ये रस असल्याचं पालकांना ठामपणे सांगितलं होतं.
तिच्या आनंदात आनंद व्यक्त करत तिच्या पालकांनी पण तिला पाठिंबा दिला.
दुसरीकडे मनीषाला मात्र आईवडिलांना ही गोष्ट पटवून देण्यासाठी वेळ लागला.
"मी डिंपलशी लग्न करण्याची माझी इच्छा माझ्या आईसोबत शेअर केली. पण तिने सुरुवातीला नकार दिला. शेवटी मी तिला पटवून दिलं. नंतर माझ्या आईने माझ्या वडिलांशी याबद्दल चर्चा केली. शेवटी त्यांनी लग्नाला होकार दिला," असं मनीषा सांगते.
सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा निकाल दिला आहे. पण समलिंगी विवाहाला अद्याप अधिकृत मान्यता नाही.
सुप्रीम कोर्टाने या वर्षी समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या वकिली करणाऱ्या 21 याचिकांवर विचार केला असून येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय येईल.
2012 मध्ये भारत सरकारने समलैंगिकांची लोकसंख्या 25 लाख असल्याचा अंदाज वर्तवला होता.
डिंपल आणि मनीषाच्या प्रेमकथेची सुरुवात
डिंपलने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
लहानपणापासूनच मुलांऐवजी मुलींकडे कल असल्याचं ती सांगते.
तिच्या पालकांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती कधीच मुलांकडे आकर्षित झाली नाही.
डिंपल झिरकपूरमध्ये कपड्यांचा व्यवसाय करते.
ती म्हणते, "2017 मध्ये मला पंजाबची राजधानी चंदीगडपासून 12 किमी अंतरावर असलेल्या झिरकपूर शहरात नोकरी मिळाली. तिथे मला समविचारी मित्र मिळाले ज्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली."
डिंपल ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
डिंपलने एकदा लिंग बदलण्याचा विचार केला आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण तिचे पालक या निर्णयाच्या विरोधात होते. कारण भारतात ही शस्त्रक्रिया कितपत यशस्वी होईल याची त्यांना काळजी होती.
रिलेशनशिपविषयी बोलताना डिंपल सांगते, "मी एका मुलीसोबत पाच वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. 2023 मध्ये आमचं ब्रेकअप झालं. कारण आमच्यात खूप भांडण झालं. तीन-चार महिने मी दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण तेही यशस्वी झालं नाही. "

तेव्हा मनीषा डिंपलसोबतच काम करायची. अनेकदा ती दुसऱ्या मैत्रिणीला भेटत असे.
जेव्हा जेव्हा डिंपलचे तिच्या मैत्रिणीशी वाद व्हायचे. तेव्हा मनीषा मध्यस्थी करून वाद सोडवायची.
डिंपल म्हणते, "मला तेव्हाच समजलं की मनीषा माझ्यासाठी एक चांगली जोडीदार असू शकते. तिनेही माझ्या सहवासाचा आनंद लुटला आणि आमच्यात लांबलचक चर्चा झाल्या. आम्ही आणखी जवळ आलो. आता आम्ही विधीनुसार लग्नही केलं आहे."
डिंपलने मनीषाला फोनवर प्रपोज केलं आणि आपणही तिला आनंदाने होकार दिल्याचे मनीषा सांगते.
"मुलीला अशा जीवनसाथीची गरज असते जी तिला समजून घेईल, तिचा आदर करेल, तिच्यावर प्रेम करेल आणि एक चांगली वागणूक देईल,” असं मनीषा म्हणाली.
समलैंगिक लग्न नेमकं कसं पार पडलं?
प्रेमात पडल्यानंतर डिंपल आणि मनीषा यांनी आपल्या पालकांना याविषयी कल्पना दिली. 'होय-नाही' असं करत शेवटी दोन्ही पालक तयार झाले. मग दोघींच्या पालकांनी एकमेकांच्या घरी जाऊन लग्नाची तारीख निश्चित केली.
18 सप्टेंबरला लग्न करण्याचं ठरलं.
डिंपलने लग्नात नवरदेवाची भूमिका केली तर मनीषा नवरी झाली. पारंपारिक विधीनुसार लग्न करण्यासाठी डिंपलची बारात भटिंडा येथे आणली.
त्यांच्या लग्न समारंभात जवळपास 70 नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते, असं दोघींनी सांगितलं.
डिंपलचे वडील जगतार सिंग आणि आई कुलदीप कौर आपल्या मुलीच्या निर्णयावर आनंद व्यक्त करतात.
ते म्हणतात की आम्ही आमच्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध मुलाशी लग्न करण्यास भाग पाडले नाही. हे लग्न यशस्वी होईल, असा त्यांना विश्वास आहे.
शीख कुटुंबातील असल्याने डिंपलला शीख रितीरिवाजानुसार लग्न करायचे होते. त्यांनी आपली ओळख न लपवता गुरुद्वारा साहिबच्या ग्रंथीशी संपर्क साधला.

लग्नात डिंपलने शीख वराप्रमाणे पगडी आणि कुर्ता पायजमा परिधान केला होता.
दोन मुली एकमेकांसोबत काय करतील असा प्रश्न अनेकांना पडत असल्याचे डिंपल आवर्जून सांगते.
डिंपल म्हणते, "सेक्स हे आयुष्यातील सर्वस्व नाही, प्रेम आहे. आम्ही मूल होण्यासाठी किंवा दत्तक घेण्यासाठी वैद्यकीय पर्याय शोधू."
लग्नानंतर वादाला सुरुवात
जेव्हा हे लग्न सार्वजनिक झाले तेव्हा काही धर्मगुरूंनी डिंपल आणि मनीषाच्या लग्नाला आक्षेप घेतला.
गुरुद्वाराचे ग्रंथी हरदेव सिंग यांना समलिंगी विवाह करण्यास मदत केल्याबद्दल माफी मागण्यास भाग पाडले.
नंतर ग्रंथी यांना पदावरून हटवण्यात आले. एका मुलीने पगडी घातल्यामुळे त्या दोघी मुली होत्या हे त्यांना ओळखता आले नाही, असे ग्रंथी हरदेव सिंग सांगतात.
डिंपलने दावा केला आहे की त्यांच्या लग्नात कोणतीही गोष्ट लपवली नव्हती.
परदेशात जाण्याच्या बहाण्याने लोक गुरुद्वारांमध्ये खोटे लग्न करतात. ज्याला ती धर्माचा खरा अनादर मानला जातो. मग निषेध का होत नाही? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
डिंपल म्हणते, "आम्ही गुरुद्वारा साहिब येथे सर्व काही सांगितले आणि आमचे ओळखपत्रही दिले."
भटिंडाचे पोलीस अधिकारी गुलनीत सिंग खुराना यांनी बीबीसीला सांगितले की, पोलिसांकडे कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, समलिंगी विवाह हा गुन्हा नाही," असं ते सांगतात.
दुसरीकडे, शीख धर्माची सर्वोच्च धार्मिक संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती ही आता धार्मिक नियमांच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशी करत आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वकील तनु बेदी म्हणतात की समलिंगी विवाहाला मान्यता द्यायची की नाही हे प्रकरणर सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे.
सध्या आपल्याकडे हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायदा आहे. वैध विवाहासाठी एक अट अशी आहे की, एक व्यक्ती पुरुष असली पाहिजे तर दुसरी स्त्री असावी. त्यामुळे कोणताही कायदा समलिंगी विवाहाला मान्यता देत नाही.
तनु बेदी यांच्या म्हणण्यानुसार ते समलिंगी विवाह करून कोणताही गुन्हा करत नाहीत.
"कागदपत्रांमध्ये लग्नाला मान्यता नसल्यामुळे कायदेशीरपणे पती-पत्नीला त्यांच्या नातेसंबंधात फौजदारी गुन्हा घडल्यास त्यावर कारवाई करणं शक्य नाही," असं तनु बेदी म्हणतात.
याउलट सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग रिलेशनशिपला मान्यता दिली आहे आणि देखभाल खर्च आणि इतर काही अधिकार देखील दिले आहेत.
समलिंगी विवाहित जोडप्यांसाठी कायदेशीर व्यवस्था केल्यास त्यांनाही समान अधिकार मिळू शकतात.
अकाल तख्त पुढे काय कारवाई करणार?
श्री अकाल तख्तचे जथेदार रघुबीर सिंह यांनी या प्रकरणी आपला आदेश दिला आहे.
श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी रघुबीर सिंह यांनी शीख गुरुद्वारात डिंपल आणि मनीषा यांचं लग्न लावून दिलं. ही घटना नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या घोर उल्लंघन असल्याचं म्हटले जातंय.
रघुबीर सिंह म्हणाले, "गुरुद्वारा साहिबचे मुख्य ग्रंथी हरदेव सिंग, ग्रंथी अजयब सिंग, रागी सिकंदर सिंग, तबलावादक सतनाम सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच गुरुद्वारा समितीचे सर्व उपक्रमांना तात्काळ थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे."
जथेदार ग्यानी रघुबीर सिंह म्हणाले की, दोन मुलींचा विवाह केवळ शीख आचारविचारांच्या विरोधात नाही तर अनैसर्गिकही आहे.

या घटनेनंतर त्यांनी भारत आणि जगभरातील गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या, ग्रंथी, रागी आणि प्रचारक यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले की, जगभरातील शीखांनी आपले सर्व काम शीख आचारधर्मानुसार केले पाहिजे.
डिंपल आणि मनीषा यांचं लग्न लावून देणारे ग्रंथी हरदेव सिंह म्हणतात की, मला अकाल तख्तचा प्रत्येक निर्णय मान्य असेल.
समलिंगी विवाह प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्री अकाल तख्त साहिबने एक धार्मिक उपसमिती स्थापने केलीय. त्यांना याविषयी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ॉ
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) या प्रकरणी विवाह करणार्या ग्रंथी आणि इतरांविरोधात चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








