नव्या वर्षात आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी 'हे' आहेत 8 मार्ग

    • Author, बीबीसी फ्यूचर टीम

आयुष्य आनंदात आणि समाधानात कसं जगायचं या प्रश्नाचं उत्तर जर विज्ञान देत असेल तर ते उत्तर ऐकायलाच हवं. नाही का?

काही लोक हे जन्मजातच अधिक आनंदी असतात. पण असे नशीबवान लोक निराळेच. हा आनंद आंघोळ करताना गाणं गुणगुणत किंवा पावसात नाचून काहींना साजरा करावासा वाटतो.

तर काही लोकांना झालेला आनंदही फार उघडपणे व्यक्त करता येत नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व अंतर्मुख अथवा बुजरं असतं. पण या आनंदापेक्षाही आणखी कोणती महत्त्वाची गोष्ट असेल तर ते म्हणजे समाधान. ते आजच्या या धकाधकीच्या जीवनात सहजासहजी मिळत नाही.

पण रोजच्या जगण्यातील क्षुल्लक सवयी बदलून तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच अधिक आनंददायी आणि समाधानकारक बनवू शकता.

2025 चं हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायक आणि समाधानकारक ठरावं यासाठी बीबीसी सादर करत आहे या खास टिप्स.

1. वाढत्या वयाबरोबर नवे मित्र जोडा

निखळ मैत्री हा कुठल्याही वयोगटातील व्यक्तीसाठी आनंदाचा स्रोत असतो. पण खासकरून उतरत्या वयात सुखी जीवन जगण्यासाठी तर मैत्री सारखा दुसरा कुठला प्रभावी उपाय नाही. मैत्रीचं हे महत्त्व शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे.

वय वाढतं तसं माणसाचं सामाजिक वर्तुळ कमी होत जातं. कारण वाढत्या वयात मित्रांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याकडे व्यक्तीचा कल असतो. त्यामुळे म्हातारपणात नवे मित्र जोडणं किंबहुना जुने मित्रही टिकवून ठेवणं तसं अवघडच समजलं जातं. तरीही वय वाढल्यानंतरही मित्र जोडा, असा सल्ला डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ देतात.

कारण मैत्रीचे अनेक निराळे फायदे आहेत. जो आनंद माणसाला मित्रांसोबत मिळतो तो कुटुंबातील सदस्यांकडून मिळू शकत नाही. कारण कौटुंबिक नात्यात मजामस्ती पेक्षा जबाबदारीची भावना जास्त असते. त्यात तुम्हाला आवड-निवडीचं स्वातंत्र्य नसतं.

याउलट मित्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडता. शिवाय ही मैत्री ऐच्छिक असल्यानं ती कशी आणि किती काळ ठेवायची अथवा मोडायची याचं स्वातंत्र्य व्यक्तीकडे असतं‌.

मैत्रीतील नात्याचं स्वरूप अनौपचारिक आणि बंधनकारक नसल्यानं माणसाला या नात्यात तणाव कमी आणि मौजमजा जास्त करायला मिळते. कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या खांद्यावर पडलेल्या या वयात माणसाला त्याची नितांत गरज असते‌‌.

एकदा वय झाल्यानंतर नवीन लोकांमध्ये मिसळणं किंवा नवे मित्र जोडणं माणसाला अवघड जातं, असं म्हटलं जातं. मात्र, या नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. वय वाढतं तसं माणूस तितकाच समजदारही बनत जातो. वाढत्या वयाबरोबर आलेला हा समजूतदारपणा उलट नव्या लोकांशी जोडलं जाण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

कारण एखाद्याची कोणती गोष्ट न पटल्यास वाद घालण्यापेक्षा तो वाद सोडवून जुळवून घेण्याचा समजूतदारपणा माणसामध्ये उतरत्या वयात आलेला असतो.

त्यामुळे मैत्री करण्यासाठी आणि ती निभावण्यासाठी म्हातारपण उलट आदर्श वय आहे, असंही म्हणता येईल. नवीन मित्र जोडल्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य तर सुधारतंच शिवाय शारीरिक स्वास्थ्य आणि मेंदूची कार्यक्षमताही विकसित होते, असं एका प्रयोगातून शास्त्रज्ञांना आढळून आलं होतं. त्यामुळे उतरत्या वयात सुखी, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर कुटुंबाबरोबरच मित्रांचीही भूमिका तितकीच मोठी आहे.

पण बुजऱ्या स्वभावामुळे तुम्हाला नवीन मित्र जोडणं अवघड जातं असेल तर यासाठी एक सोप्पा उपाय आहे. तो म्हणजे तुमच्या आयुष्यातील एखादा अभूतपूर्व क्षण समोरच्या सोबत वाटून घेणे. उदाहरणादाखल कोणाशी मैत्री करायची असल्यास त्याच्या / तिच्यासोबत कोणतीही मजेदार गोष्ट करायला घ्या.

जसं की सूर्यग्रहण सोबत अनुभवा अथवा कुठे सोबत थरारक सहलीला जा. असे क्षण तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ आणतात. अशा प्रकारे तुम्ही नवीन मित्र जोडू शकता. याचा तुमच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अतिशय सकारात्मक असेल.

2. इतरांच्या सुखात आपलं सुख मानून त्यांच्या आनंदात सहभागी व्हा

मित्राच्या दु:खात आपलं दुःख मानून सहवेदना जपणं हे खऱ्या मैत्रीचं प्रतीक मानलं जातं‌. सहवेदना बाळगल्यानं माणसं एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांची मैत्री घट्ट होते, यात दुमत नाही.

पण याच्या अगदी उलट असलेल्या आणखी एका गोष्टीने सुद्धा मैत्री तितकीच मजबूत होते. ती म्हणजे इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानून तो सोबत साजरा करणे.

पण मैत्रीच्या परिभाषेत या गुणाची फारशी चर्चा होताना दिसत नाही. सहवेदनेबरोबरच आनंद वाटून घेण्याची ही वृत्ती देखील निखळ मैत्रीचं तितकंच जिवंत प्रतीक आहे‌. त्यामुळे मैत्रीचं नातं घट्ट होतं आणि ही मैत्री चिरकाल टिकणारी ठरते, असं अनेक संशोधनातून समोर आलेलं आहे.

मित्रासोबत कोणती चांगली घटना घडली की उत्साह व आनंद व्यक्त करणं हे चांगल्या मैत्रीचं लक्षण आहे. याउलट आपल्याला काही देणंघेणंच नसल्याची तुमची तटस्थ अथवा निरुत्साही प्रतिक्रिया तुमची ही मैत्रीच धोक्यात आणू शकते.

3. परोपकाराच्या भावनेनं दानधर्म करायला शिका

निस्वार्थ भावनेनं दुसऱ्यासाठी एखादी चांगली गोष्ट केल्यानं तुमच्या मनाला समाधान मिळेल, ही चावून चोथा झालेली शिकवण तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. पण परोपकार आणि दानधर्माचे समोर आलेले परिणाम बघता ही शिकवण किती संयुक्तिक आहे, याची लगेच जाणीव होते.

परोपकारी वृत्तीने दानधर्म केल्याने शारीरिक व्याधी आणि नैराश्याची समस्या देखील कमी होत असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.

2002 साली करण्यात आलेल्या प्रयोगात स्वतः शारीरिक व्याधीच्या समस्येतून जात असलेल्या लोकांनी आपल्यासारख्याच त्रासातून जात असलेल्या रुग्णांची सेवा केली तेव्हा त्यांचा स्वतःची त्रासही कमी झाल्याचं आढळून आलं

तसंच प्राण्यांवर प्रेम करून आणि त्यांची काळजी घेतल्यानं माणसाचं आरोग्य सुधारतं किंवा घरात झाडं लावून त्यांची जोपसणा केल्यावर वयस्क लोकांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचंही काही प्रयोगांमधून आढळून आलं आहे.

याचाच अर्थ परोपकार किंवा निस्वार्थी भावनेनं इतरांची मदत करण्याचा आपल्याला स्वतःलाही तितकाच फायदा होतो, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता आरोग्य सेवकही आपल्या रुग्णांना मदतकार्यात सहभागी होण्याचा सल्ला देताना दिसतात.

सामाजिक उपक्रमात स्वयंसेवक बनून योगदान दिल्याचे अतिशय सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे.

लोकांना सामाजिक उपक्रम आणि मदतकार्यात सहभागी होण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून त्यामुळेच दिला जातो. मग ते गरिबांना अन्नाचं वाटप करणं असो अथवा गरजूंना शैक्षणिक सेवा पुरवणं या सगळ्यांमुळे लोकांचं आरोग्य सुधारून आरोग्य विभागावरील अतिरिक्त ताण कमी होत असल्याचं आढळून आलं आहे.

या बातम्याही वाचा:

4. आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा

भूतकाळ खोदून काढल्यानं तुमचा वर्तमान आणि भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. आपला इतिहास आणि पूर्वजांसोबत नाळ जोडून ठेवल्याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम अतिशय सकारात्मक असल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे.

आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे अडचणींतून मार्ग काढत वंश पुढे नेला ज्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत, याच्या कथा पुढच्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी ठरतात. जीवनाकडे नव्या उर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला माणसाला त्या भाग पाडतात.

मेलबर्नमधील स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका सुझन एम मूर आपल्या प्रयोगातून सिद्ध करतात की ज्या लोकांना आपल्या कुटुंबाचा आणि पूर्वजांचा इतिहास चांगला ज्ञात असतो ते लोक इतरांच्या तुलनेत अधिक सुखी - समाधानी असतात. आपल्या कुटुंबाची वंशावळ खोदून काढल्यानं माणसाला स्वत:ची नव्याने ओळख होते.

यामुळे माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो. त्यासोबतच आपण आज जिवंत असण्यामागे पूर्वजांनी किती खस्ता खाल्लेल्या आहेत आणि आपलं मूळ किती जुनं आहे याची जाणीव होऊन माणसाला आपलं आयुष्य किती मौल्यवान आहे, याची जाणीव होते. या जाणीवेने माणूस आयुष्याकडे कृतज्ञतेनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकतो.

5. छोट्या छोट्या गोष्टी लिहून काढा व त्यांची यादी बनवा

रोज तुमच्यासोबत घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी डायरीत लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली तर याने तुमची मनस्थिती क्षणात चांगली होऊ शकते. जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, असा सल्ला आपल्याला कायमच दिला जातो. पण हा सल्ला प्रत्यक्षात कागदावर उतरवल्याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत.

फक्त मोठमोठ्या गोष्टीच नव्हे तर अगदी क्षुल्लक गोष्टी ज्यातून तुम्हाला आनंद मिळालाय त्याबद्दल लिहून ठेवल्यानं हा आनंद द्विगुणित होते. तुम्ही एखादी महत्त्वाची परिक्षा उत्तीर्ण झाला किंवा तुम्हाला संतती प्राप्ती झाली, अशा मोठ्या घटनांची तर नोंद ठेवायलाच हवी.

पण मध्येच एखादा जुना मित्र अचानक भेटला किंवा संध्याकाळी सूर्यास्त बघत चालल्यानं कसं छान वाटलं, या छोटछोट्या गोष्टी देखील लिहून ठेवायला हव्यात. तुमचं रोजचं आयुष्य अशा प्रकारे नोंदवून ठेवल्यानंतर आरोग्यात सुधारणा झाल्याची अनेक उदाहरणं दिसून आलेली आहेत.

6. सतत नवनव्या मजेशीर आणि रोमांचक गोष्टी करायला घ्या

गाडी काढून रिकाम्या रस्त्यावर चालवत निघण्यासारखी रम्य आणि आनंददायी गोष्ट दुसरी कोणती नसेल. थंड हवेचा झोत तुमच्या चेहरा आणि केसांना सुखावत असतो, रेडिओवर गाणं सुरू असतं आणि समोर मोकळा रस्ता. सुख म्हणजे दुसरं काय असतं?

अशी लाँग ड्राईव्ह फक्त माणसांनाच नाही तर उंदरांनाही तितकीच सुखावणारी असते, हे व्हर्जिनियातील युनिव्हर्सिटी ऑफ रिचमंडच्या शास्त्रज्ञांनी एका अनोख्या प्रयोगातून सिद्ध केलंय.

या प्रयोगात उंदरांना चालवण्यासाठी एक खास छोटं वाहन बनवण्यात आलं होतं आणि त्यातून उंदरांना लाँग ड्राईव्हचा अनुभव करून देण्यात आला. गंमत म्हणजे एकदा शिकवल्यानंतर उंदीरही ही छोटेखानी गाडी चालवायला शिकले‌.

उंदरांना या लाँग ड्राईव्हची फार मजा येऊ लागली होती. वाहनात बसायची वेळ आल्यावर ते अक्षरशः आनंदाने उड्या मारत वाहनात शिरायचे. प्रत्यक्षात तर वाहनातून प्रवास करण्याचा आनंद त्यांना होतच होता. पण त्याची तयारी करताना देखील हे उंदीर तितकेच उत्साही आणि आनंदात असल्याचं शास्त्रज्ञांना दिसून आलं.

त्यामुळे कुठलीही रम्य किंवा रोमांचक कृती प्रत्यक्षात करण्यासोबतच त्याची तयारी अथवा योजना बनवणं देखील तितकाच आनंद देणारं असतं. हे सिद्ध करायला शास्त्रज्ञांनी उंदरांसोबत आणखी एक प्रयोग केला. त्यांनी उंदरांना दोन गटात विभागलं‌. पहिल्या गटातील उंदरांना कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक एखादी रोमांचक गोष्ट करायला दिली.

तर दुसऱ्या गटातील उंदरांना त्याची आधी पूर्वसूचना देऊन आधी वाट पाहायला लावली व नंतर त्यांना ती रोमांचक गोष्ट करायला मिळाली. यानंतर दोन्ही गटातील उंदरांमधील आशावाद आणि उत्साहाची पातळी तपासून पाहिली गेली. तेव्हा दुसऱ्या गटातील उंदीर हे जास्त आशावादी आणि उत्साही असलेले पाहायला मिळाले‌.

हेच निष्कर्ष माणसालाही लागू होतात. कोणतीही रोमांचक कृती करण्यात आनंद तर असतोच‌. पण त्याची योजना बनवणं अथवा वाट पाहणंही माणसाला तितकंच सुखावणारं असतं‌.

त्यामुळे आनंदी आयुष्य जगण्यासाठी वेळोवेळी अशा रोमांचक कृती आखल्या पाहिजेत. अशा गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी योजना बनवल्या पाहिजेत‌‌. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आशावादी होईल.

7. काहीच न करता फक्त बसून राहा

आता आनंदी जगण्यासाठी काय काय करायला हवं याची यादी वाचूनच तुम्हाला थकायला झालं असेल. त्यामुळे निवांत राहा. कारण काहीच न करता नुसतं बसून राहण्यातही एक वेगळा आनंद आहे. शास्त्रज्ञांनीही हे सिद्ध केलंय‌.

आयुष्य आनंदी बनवण्याची चिंताच कधी कधी आनंद मिळवण्यातील मुख्य अडथळा ठरू शकते. त्यामुळे आनंदी कसं जगायचं याचा फार विचार न करता नुसतं बसून राहणंही कधी कधी उपयोगी ठरू शकतं‌.

आनंदी आयुष्य जगण्यासाठी लोक अनेक खटाटोप करतात. कधी आनंदाची गुरूकिल्ली देणारी पुस्तकं वाचतात तर कधी एखादा विनोदी चित्रपट पाहायला घेतात. त्याने आपल्याला आनंद मिळेल, अशी आशा असते. पण कधी कधी असंही होतं की जी आशा लावून आपण ते पुस्तक वाचतो अथवा चित्रपट पाहतो, तितकं काही ते पुस्तक अथवा चित्रपट चांगला निघत नाही.

त्यामुळे आनंद होण्यापेक्षा भ्रमनिरासच जास्त होतो. म्हणून आनंदी राहण्यासाठी सतत काहीतरी खटाटोपच करायला हवा, हे गरजेचं नाही‌. कारण अपेक्षा हे शेवटी दु:खाचं कारण आहे. एखादी गोष्ट अथवा कृती करून आपल्याला आनंद मिळेल, अशी आशा आपल्याला असते.

पण ती प्रत्यक्षात केल्यानंतर हवी तितकी मजा आली नाही, हे कळाल्यानं निराशाच हाती येते. त्यामुळे कुठलीही आशा व योजना न ठेवता फक्त निवांत बसून राहणंही कधीकधी गरजेचं असतं‌.

तुम्हालाही हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असेल. एखादा मोठा कार्यक्रम अथवा पार्टीत फार मजा येईल म्हणून तुम्ही आतुरतेनं वाट बघत असता. पण प्रत्यक्षात तो कार्यक्रम अथवा पार्टी काही तितकी चांगली होत नाही. मग त्यात जाऊन आल्यावर आनंदा ऐवजी निराशाच पदरी पडते. तुम्ही आनंदी होण्यापेक्षा अजूनही जास्त दुःखी होऊन बाहेर पडता.

बर्कले शहरातील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका एरिस मॉस यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलंय की आनंदाचा पिच्छा पुरवणं किंवा त्यासाठी सतत घौडदौड करणंही बऱ्याचदा थकवणारं ठरू शकतं.

त्यामुळे आपण आनंदीच असलं पाहिजे, असा अट्टाहास न बाळगणं हा आनंदी राहण्याचा एक मार्ग आहे. हे प्रसंगी काही जणांना विरोधाभासी अथवा विनोदीही वाटेल. पण हे तितकंच खरं आहे. सतत आनंदी राहण्याचं दडपण अथवा महत्त्वाकांक्षा माणसाला इतरांपासून तोडते आणि आणखी एकटं बनवते. त्यामुळे सुखाच्या मागे फार न धावता तटस्थ राहायला शिका.

सुख आणि दुःखाकडे निरपेक्ष भावनेनं पाहा. आनंदी राहण्याच्या स्पर्धेत धावण्याचा मोह टाळला तर तुमचं आयुष्य उलट जास्त आनंददायक होईल, असा सल्ला एरिस मॉस देतात.

8. कॅफिनचं अतिसेवन टाळा

हिवाळ्यात हुडहुडी भरवणाऱ्या बोचऱ्या थंडीत चहा अथवा कॉफीचा एक कप तुम्हाला तरतरी देऊन जातो. त्याचं कारण आहे चहा आणि कॉफी सारख्या पेयांमध्ये असलेला कॅफिन हा घटक पदार्थ. चहा किंवा कॉफी पिल्यानंतर त्यातलं कॅफिन शरीरातील रक्तामध्ये मिसळतं‌.

या कॅफिनमधले केमिकल मग आपल्या शरिरातील ॲडेनोसिन नावाच्या संयुगाचा प्रतिकार करून त्याला काही प्रमाणात निष्क्रिय करतात. आपल्या शरीरातील ॲडेनोसिन हा घटकामुळे तुम्हाला थकवा अथवा आळस जाणवतो. त्यालाच हे कॅफिन निष्क्रिय करायला बघतं. म्हणूनच चहा किंवा कॉफी पिल्यानंतर आपल्याला तरतरी आल्यासारखं वाटतं‌.

या शिवायही कॅफिनचे अनेक फायदे आहेत. ते शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध देखील झालेले आहेत. कॅफिनमुळे ठराविक कर्करोगाचा धोका कमी होतो, हृदयविकाराची शक्यता कमी होते, मधुमेह नियंत्रणात येतो, पचनसंस्था चांगली होते आणि नैराश्य अथवा उदासी झटकायला देखील मदत होते. कॅफिनचे असे अनेक फायदे आहेत.

पण हे कॅफिनचं सेवन आपण कधी आणि किती प्रमाणात करतो, हे महत्त्वाचं आहे. कॅफिनचे हे सगळे फायदे तेव्हाच होतात जेव्हा आपण त्याचं सेवन नियंत्रणात आणि ठराविक वेळीच करू. कारण कॅफिनच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम देखील तितकेच हानीकारक आहेत. जसे की निद्रानाश, डोकेदुखी, मळमळ आणि अस्वस्थ वाटणं. त्यामुळे कॅफिनचं सेवन मर्यादीत प्रमाणातच करायला हवं.

वैज्ञानिकांनी ही मर्यादा शास्त्रीय पद्धतीनं ठरवून दिलेली आहे. त्यानुसार दिवसाला 400 ग्रॅमपेक्षा जास्त कॅफिन म्हणजेच दोन अथवा जास्तीत जास्त तीन कपांपेक्षा जास्त चहा अथवा कॉफी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टर देखील देतात. याशिवाय झोपण्यापूर्वी 8 तास कॅफिन घेणं टाळा, असंही तज्ज्ञांचं सांगणं आहे. कारण झोपण्यापूर्वी कॅफिनचं सेवन केल्यानं झोप बिघडण्याची दाट शक्यता असते.

म्हणून आनंदी जगायचं असेल तर चहा, कॉफी जरूर प्या, पण अगदी नियंत्रित प्रमाणात. अन्यथा हे कॅफिन तरतरीऐवजी तुमचा ताण आणखी जास्त वाढवण्याचं कारण बनू शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)