'आम्ही दूरपर्यंत फेकलो गेलो, कुणाचा हात, कुणाचा पाय तुटला' - नागपुरातील सोलार कंपनी स्फोटाचा ग्राऊंड रिपोर्ट

कंपनीच्या स्फोटात जखमी झालेला अमोल लोखंडे
फोटो कॅप्शन, कंपनीच्या स्फोटात जखमी झालेला अमोल लोखंडे
    • Author, भाग्रश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"आम्ही 20 जण खाली निघत होतो. जेव्हा धूर निघायला लागला, तेव्हा सर म्हणाले, पळा. तर आम्ही पळायला लागलो. धावता धावता आम्ही ब्लास्टमध्ये सापडलो. आम्ही वीसही जण हवेत फेकले गेलो. मला तर 300 मीटरवर असलेल्या कँटीनच्या दरवाज्यात फेकलं."

नागपुरातील बाजारगावजवळील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या स्फोटातून जखमी झालेला 21 वर्षीय अमोल लोखंडे आपबिती सांगत होता.

अमोलच्या डोक्याला आणि कंबरेला दुखापत झाली. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्च मिळाला. अमोल मूळचा कोंढाळीचा. स्फोट झाला त्यावेळी अमोल तिथंच त्याच प्लांटमध्ये काम करत होता.

त्यावेळी नेमकं काय झालं हे सांगताना अमोलच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती.

अमोल सांगतो, "तिथं आधी सॉल्वंट पाईपमधून धूर निघायला लागला. मी पाच मिनिटं पाणी आणायला गेलो. तिकडून आलो तेव्हा धूर दिसला. त्या धुरामुळे लोकांना चक्कर येत होती. धूर निघाल्याबरोबर आम्ही पळायला लागलो. 12.30 ला पळायला लागलो तर 12.35 ला स्फोट झाला. आम्ही दूरपर्यंत फेकलो गेलो. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचा कान तुटला. पण कसंतरी उठून गेटपर्यंत गेलो आणि मदत मागितली."

या स्फोटात अमोलसह 14 जण जखमी झाले. तसेच, मयूर गणवीर या सुपरवायझरच्या जागीच मृत्यू झाला, तर दोन दिवसांच्या उपचारानंतर निकेश इरपाची नावाच्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

स्फोट झाला त्यादिवशी निकेशची पत्नी हॉस्पिटलच्या बाकावर बसून रडत होती. "माझी कुठलीच मागणी नाही. फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचू दे, इतकंच माझ्यासाठी खूप आहे," असं ती रडत रडतच बोलत होती.

नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर या कंपनीचा परिसर आहे. इथल्या लोकांना शेतीशिवाय हाताला दुसरं काम नाही. तसेच स्फोटकांच्या कंपन्यांशिवाय दुसरा रोजगार नाही. त्यामुळे आपल्या पोटापाण्यासाठी इथली लोकं या स्फोटकाच्या कंपनीत जीव मुठीत घेऊन कामाला जातात.

स्फोट झाला तेव्हा कंपनीत रात्रपाळीत महिला सुद्धा काम करत होत्या. त्यांना हादरा बसताच काही महिलांनी जीवाच्या भीतीनं दगडाच्या पहाडीवरून अंधारात घसरत घसरत मुख्य रस्ता गाठला.

कंपनीत स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीत स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला होता.
फोटो कॅप्शन, कंपनीत स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीत स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला होता.

कामठी मासोद गावच्या निता लाडके सांगतात, "जीवाची भीती आहेच. कधी काय होईल सांगत येत नाही. पण, घरी पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. म्हणून कामाला जायला लागतं. त्यादिवशी दगडांवरून घसरत खाली आलो नसतो तर काही खरं नव्हतं."

स्फोट का झाला, यामागचं कारण तर अद्यापही समोर आलेलं नाही. चौकशीनंतर कारण समोर येईल, असं कंपनीनं काढलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय.

कंपनीचे सिनिअर जनरल मॅनेजर आशिष श्रीवास्त म्हणतात, "सिस्टम फेल्यूअर किंवा मानवी चूक असे दोन्ही फॅक्टर असतात. आम्ही संपूर्ण चौकशी केल्यानंतर कोणती चूक झाली ते समजेल. कुठला व्हॉल्व बंद केला होता की नव्हता, तापमान वाढलं होतं की नव्हतं हे सर्व चौकशीनंतर समजेल."

2023 मध्ये याच कंपनीच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कंपनीत स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीत स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तर नातेवाईकांना मृतदेह सुद्धा मिळाले नव्हते. मृतांच्या कुटुंबीयांना घरी जाऊ न देता तब्बल एक महिना कंपनीच्या परिसरात ठेवण्यात आलं होतं.

2023 च्या स्फोटात कामठी मासोदचे निलकंठ साहारे यांनी आपली 23 वर्षांची मुलगी गमावली.

निलकंठ म्हणतात, "पोरीची आठवण येते. पण, आपल्या नजरेनं दिसत नाही. एकवेळची गेली तर पक्कीच गेली. आता कंपनीवाल्यांनी इतके पैसे दिले. पण पोरीचा जीव दिसून राहिला का नाही ना. पैशाचं काय करायचं आहे जी. एवढं मोठं बकऱ्याचं धन होतं. मी म्हणलं होतं पोरीले जाऊ नको म्हणलं कंपनीत. पण, ऐकलीच नाही. मी जातोच म्हणे. अजूनही तुम्हाले सांगतो मी बकऱ्याकडे गेलो का रडूशा वाटते पोरीसाठी. माझा एकमेव आधार होती."

निलकंठ मुलगी गेल्याच्या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत. ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही दिव्यांग आहेत. त्यांची मुलगी आरती त्यांचा एकमेव आधार होती. पण, तो आधारच या स्फोटानं हिरावून घेतला. त्यामुळे दोघांनाही फार त्रास होतोय.

सरकारी यंत्रणांचे जबाबदार अधिकारी गप्प का?

सोलार कंपनी ही स्फोटके बनवणारी खासगी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. आरडीएक्सपासून सगळी स्फोटकं इथं तयार होतात. तसेच या कंपनीला भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी स्फोटकं बनवण्याचं कंत्राट सुद्धा मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं 'नागास्त्र' हे ड्रोन सुद्धा याच कंपनीनं बनवलेलं आहे.

इतकी मोठी कंपनी असतानाही दोन वर्षांत दोन स्फोट होऊन 11 कामगारांचा जीव जातो. या कंपनीत स्फोटकांचं काम सुरळीत चालतं की नाही याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनची (PESO) असते. त्याचं मुख्यालय नागपुरातच आहे. तसेच, अशा कंपन्यांमधील कामगारांची सुरक्षा, आरोग्य याबद्दलची जबाबदारी डायरोक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ (DISH) या सरकारी यंत्रणेची असते.

आता झालेल्या स्फोटानंतर या दोन्ही सरकारी यंत्रणा इथं चौकशी करत आहेत. गेल्या 2023 च्या स्फोटाची चौकशीही झाली. पण, गेल्यावेळी स्फोट का झाला याचं कारण दोन वर्षानंतरही समोर आलं नाही.

आम्ही या सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलो. पण, मागच्या स्फोटाचं कारण काय होतं, चौकशी अहवालात काय समोर आलं यावर अधिकाऱ्यांनी बोलणं टाळलं. तसेच आताच्या स्फोटावरही आम्ही चौकशी करत आहोत इतकंच उत्तर दिलंय.

पण, एकाच कंपनीत दोन स्फोट झाले त्याची जबाबदारी कोणाची यावर कोणीही बोलायला तयार नाही.

सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनी

या कंपनीत नियम व्यवस्थित पाळले जातात की नाही यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि नसेल पाळले तर जात तर त्यांच्यावर काय कारवाई केली याचं उत्तर या सरकारी यंत्रणांनी द्यायला पाहिजे, अशी मागणी या भागाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली.

4 सप्टेंबरला मध्यरात्री स्फोट झाला तेव्हाच अनिल देशमुख रात्री घटनास्थळावर पोहोचले होते. त्यांच्या संस्थेच्या अम्बुलन्सने जखमींना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं.

ते म्हणतात, "या भागात वारंवार अशाप्रकारचे स्फोट होतात. कामगार आपलं कुटुंब चालवण्यासाठी कामाला जातात. त्याठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसतील तर कामगारांची सुरक्षा कशी होणार? गेल्या दोन वर्षात तीन कंपन्यांमध्ये चार स्फोटाच्या घटना घडल्या. यामध्ये 21 कामगारांचा मृत्यू झाला. याकडे केंद्र शासनासह राज्य शासनानं लक्ष देण्याची गरज आहे."

'कामगारांचा जीव जातो, मग चौकशी अहवाल समोर का येत नाही?'

तसेच, गेल्यावेळी झालेल्या स्फोटाचा चौकशी अहवाल समोर यायला पाहिजे अशी मागणी नागपूर ट्रेड युनियन कौन्सिलचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "डायरेक्टरेट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी यांनी कामगारांच्या सुरक्षेसंबंधी अहवाल आतापर्यंत का समोर आणला नाही? पहिला स्फोट झाला त्यामध्ये काय चूक होती, कुठे चूक झाली, कंपनी कुठे कमी पडली किंवा नाही पडली किंवा कामगारांची काही चूक होती का? काहीही असो, अहवाल तर समोर यायला पाहिजे."

लोकशाहीत कामगार मरत असताना त्यावर अहवाल तयार होतो. तो बाहेर का येऊ नये? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणतात, या कंपनीत अनेक कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करतात. याच कंपनीला सरकारी डिफेन्सचे काही कंत्राट सुद्धा मिळाले आहेत. मग शासकीय डिफेन्स कंपन्यांमध्ये ज्या नियमानुसार काम चालतं, जे सुरक्षेचे नियम तिथं पाळले जातात तसेच नियम या कंपन्यांना देखील लागू करावे. कामगारांच्या सुरक्षेसंबंधी, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सगळे नियम शासकीय डिफेन्स कंपन्यांसारखे असावे.

'सुरक्षा साहित्य असतं तर कामगारांचे जीव वाचले असते'

इतकंच नाहीतर या भागातील भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांनी देखील या कंपनीत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न असून याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधणार असल्याचं म्हटलं आहे.

कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, सेफ्टी बूट आणि हातमोजे इतकंच सुरक्षा साहित्य त्यांनी पुरवलं जातं.

तसेच 4 सप्टेंबरला झालेल्या स्फोटावेळी कामगारांकडे सुरक्षेच्या संबंधित सगळी साधने असती तर नक्कीच त्यांचा जीव वाचला असता असं पोलीस यंत्रणेतील सूत्रांनी सुद्धा बोलून दाखवलं.

या स्फोटात अनेकजण दगड, इमारतीचे तुकडे, लोखंडी सळ्या लागून जखमी झाले. पण, त्यांच्या डोक्यात हेल्मेट असतं, प्रत्येक कामगारांना हेल्मेट पुरवलं असतं तर ज्यांचा मृत्यू झाला त्यांचाही जीव वाचला असता असं पोलिसांमधील सूत्रांनी म्हटलं.

लोकशाहीत कामगार मरत असताना त्यावर अहवाल तयार होतो. तो बाहेर का येऊ नये? असा सवाल नागपूर ट्रेड युनियन कौन्सिलचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी उपस्थित केला.
फोटो कॅप्शन, लोकशाहीत कामगार मरत असताना त्यावर अहवाल तयार होतो. तो बाहेर का येऊ नये? असा सवाल नागपूर ट्रेड युनियन कौन्सिलचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी उपस्थित केला.

सध्या झालेला स्फोटाची चौकशी सुरू असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पण, याआधी स्फोट झाला तेव्हा स्फोटाचं कारण काय होतं, कंपनीनं नेमकी काय पावलं उचलली, कामगारांची सुरक्षा अशा काही प्रश्नांबद्दल आम्ही कंपनीला इमेलवरून संपर्क साधला. पण, त्यांच्याकडून त्यावर कुठलंही उत्तर प्राप्त झालं नाही.

सध्या या कंपनीतील अज्ञात व्यक्तीविरोधात जामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पण, यापुढे जाऊन आणखी कुठली कारवाई केली का? गेल्या स्फोटातील चौकशीबद्दल काय झालं होतं? याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)