बाँडी हल्ल्यात दाम्पत्याने हिसकावली हल्लेखोराची बंदूक, पुढे काय घडले? डॅशकॅम व्हीडिओ समोर

69 वर्षांचे बोरिस गुरमन आणि त्यांची 61 वर्षांची पत्नी सोफिया

फोटो स्रोत, GoFundMe

फोटो कॅप्शन, कुटुंबीयांनी सांगितले की, जानेवारीमध्ये हे जोडपे आपल्या लग्नाचा 35वा वाढदिवस साजरा करणार होते.
    • Author, फ्रँसेस्का गिललेट आणि एना लॅमचे

ऑस्ट्रेलियातील बाँडी बीचवर झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या एका दांपत्याने, हल्लेखोराची बंदूक हिसकावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक डॅशकॅम फुटेज समोर आले आहे.

69 वर्षांचे बोरिस गुरमन आणि त्यांची 61 वर्षांची पत्नी सोफिया यांनी स्वतःचा जीव जाण्यापूर्वी इतरांचे रक्षण करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले, असं त्यांच्या कुटुंबानं एका निवेदनात म्हटलं आहे.

या घटनेच्या व्हीडिओमध्ये दिसते की, बोरिस गुरमन एका बंदूकधाऱ्याशी झटापट करतात आणि त्याच्याकडून शस्त्र हिसकावून घेतात त्यानंतर दोघेही रस्त्यावर पडतात.

बोरिस उठतात आणि बंदूकधाऱ्याला त्याच बंदुकीने मारताना दिसतात. मात्र, हल्लेखोराकडे दुसरी बंदूक असावी ज्याचा वापर करून त्याने त्या दोघांची हत्या केली.

"बोरिस आणि सोफिया यांना गमावल्याचं दुःख कशानंही कमी होऊ शकत नाही, पण त्यांच्या शौर्याचा आणि निस्वार्थीपणाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो," असे त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.

बोरिस आणि सोफिया नेमके कसे होते, हेच यातून दिसून येते. उत्स्फूर्त आणि निस्वार्थीपणे इतरांना मदत करण्यासाठी धावून जाणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, ज्यू धर्मीय गुरमन दाम्पत्य रविवारी झालेल्या हल्ल्यात मारले गेलेले पहिले दोन व्यक्ती होते.

हनुक्का सणाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात झालेल्या या गोळीबारात किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालं आहे.

'ते आमचे हिरो होते...'

गुरमन यांच्या कुटुंबानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या दाम्पत्याच्या लग्नाला 34 वर्षे झाली होती.

"आम्हाला प्रिय असलेले बोरिस आणि सोफिया गुरमन यांच्या अचानक आणि अमानवी मृत्यूमुळं आमच्यावर मोठा आघात झाला आहे.

बोरिस हे एक निवृत्त मेकॅनिक होते. मनमोकळ्या स्वभावासाठी, संयमासाठी आणि कोणाही गरजूला मदत करण्यासाठी ते ओळखले जायचे.

सोफिया 'ऑस्ट्रेलिया पोस्ट'मध्ये काम करत होत्या आणि त्यांचे सहकारी तसेच समाजातील लोक त्यांच्यावर खूप प्रेम करायचे.

बाँडीचे रहिवासी असलेलं हे दाम्पत्य प्रामाणिक, कष्टकरी जीवन जगलं आणि त्यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दयाळूपणे, प्रेमाने आणि आदराने वागणूक दिली.

बोरिस आणि सोफिया कुटुंबासाठी आणि एकमेकांसाठी समर्पित होते. ते आमच्या कुटुंबाचा कणा होते आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे."

प्रत्यक्षदर्शींनी बोरिस गुरमन यांचे वर्णन 'नायक' (हिरो) असे केले आहे.

बॉन्डी बीच हल्ला

ज्या महिलेच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली आहे, तिने 'रॉयटर्स' वृत्तसंस्थेला सांगितलं की, बोरिस "पळून गेले नाही, त्याऐवजी ते थेट संकटाशी दोन हात करण्यासाठी धावले आणि आपली सर्व शक्ती पणाला लावून बंदूक हिसकावून घेण्याचा आणि मृत्यूशी झुंज देण्याचा प्रयत्न केला."

ती पुढे म्हणाली, "मी माझ्या कॅमेऱ्यात पाहू शकते की, त्या वृद्ध गृहस्थावर शेवटी गोळी झाडली गेली आणि ते कोसळले. तो क्षण पाहून माझे हृदय पिळवटून निघाले."

ही घटना पाहिल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने '9News' ला सांगितले की," ते एक हिरो होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. आपण हे त्यांच्या कुटुंबाला सांगायला हवे"

त्यांनी काय प्रयत्न केले हे सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे, कारण हे अगदी सुरुवातीला घडले होते. त्यांनी स्वतःला संकटाच्या खाईत लोटले. गोळ्यांचा वर्षाव सुरू असतानाही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला."

कोण होते आरोपी?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलिसांनी या हल्ल्याचे वर्णन ज्यू समुदायाला लक्ष्य करणारी एक दहशतवादी घटना म्हणून केले आहे.

इतर बळींमध्ये 10 वर्षांची मुलगी, ब्रिटनमध्ये जन्मलेले रब्बी (धर्मगुरू), एक निवृत्त पोलीस अधिकारी आणि होलोकॉस्टमध्ये वाचलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

मृतांचे वय 10 ते 87 वर्षांच्या दरम्यान आहे. आणखी 22 लोक रुग्णालयात असून त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला 43 वर्षीय अहमद अल अहमद नावाच्या आणखी एका व्यक्तीला हिरो मानले गेले होते, त्यांनीही एका हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेतली होती.

त्यांना अनेक गोळ्या लागल्या पण ते वाचले आणि जखमी झाल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

त्यांच्या वडिलांनी 'बीबीसी अरेबिक'ला सांगितले की, त्यांचा मुलगा त्याच्या "सदसद्विवेकबुद्धीने" प्रेरित झाला होता आणि "रस्त्यावर पडलेले बळी, रक्त, महिला आणि मुलांना पाहून त्याने हे धाडस केले."

पोलिसांनी आरोप केला आहे की, हा हल्ला 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा 24 वर्षांचा मुलगा नावेद अक्रम यांनी केला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते इस्लामिक स्टेट (IS) च्या विचारधारेने प्रेरित असल्याचे दिसते. संशयितांनी वापरलेल्या वाहनात पोलिसांना 'घरगुती बनावटीचे' IS चे झेंडे आणि स्फोटके आढळली.

बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Brent Lewin/Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी मृत अवस्थेत सापडलेला साजिद हा मूळचा भारतातील हैदराबाद शहराचा होता, असे एका भारतीय पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्या अधिकाऱ्याने 'बीबीसी तेलुगू'ला सांगितले की, साजिद अक्रम ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सहा वेळा भारतात आला होता. प्रामुख्याने मालमत्तेचे व्यवहार आणि वृद्ध पालकांना भेटणे यासारख्या कौटुंबीक कारणांसाठी आला होता.

त्यांनी सांगितले की, "असे समजते की, वडिलांच्या निधनाच्या वेळीही तो भारतात गेला नव्हता."

"साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नावेद यांच्या कट्टरपंथी बनण्यामागे भारत किंवा तेलंगणातील कोणत्याही स्थानिक प्रभावाचा संबंध असल्याचे दिसत नाही."

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या मते, नावेद अक्रम कोमातून बाहेर आला असून तो रुग्णालयात शुद्धीवर आहे.

पोलिसांनी सांगितले की, हे दोघे 1 नोव्हेंबरला फिलीपिन्सला गेले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन विभागाने पुष्टी केली की ते तिथे चार आठवडे राहिले होते. अधिकारी आता ते तिथे कशासाठी गेले होते याचा तपास करत आहेत.

काही पुष्टी न मिळालेल्या वृत्तांनुसार, दक्षिण-पूर्व आशियामध्ये असताना संशयितांनी "लष्करी प्रकारचे प्रशिक्षण" घेतले होते. परंतु फिलीपिन्सच्या लष्कराने सांगितले आहे की आतापर्यंत याची कोणतीही "अधिकृत पुष्टी" मिळालेली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.