ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे हैदराबादशी संबंध, काय सांगितले पोलिसांनी?

14 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॅान्डी समुद्रकिनाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा भारताशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्लेखोरांपैकी एक साजिद अक्रम भारतीय पासपोर्टवर तर त्याचा मुलगा नवीद ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर नोव्हेंबरमध्ये फिलीपिन्सला गेले होते, अशी माहिती फिलीपिन्स इमिग्रेशन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली आहे.
दरम्यान, मंगळवारी(16 डिसेंबर) तेलंगाना पोलिसांनी एक निवेदन जारी करून साजिद अक्रम हा मूळचा हैदराबादचा असल्याची माहिती दिली आहे.
बीबीसी तेलगूच्या वृत्तानुसार, तेलंगाना पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "साजिद अक्रमच्या भारतातील नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो गेल्या 27 वर्षांपासून हैदराबादमधील त्याच्या नातेवाईकांसोबत संपर्कात होता. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तो सहा वेळा आपल्या मालमत्तेसंबंधीच्या काही कामांसाठी तसेच वृद्ध आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी तो भारतात आला नव्हता."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद अक्रम 1998 मध्ये नोकरीच्या शोधात ऑस्ट्रेलियाला गेला, नंतर त्यानं लग्न केलं आणि तिथंच स्थायिक झाला.
रविवारी (14 डिसेंबर) ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॅान्डी समुद्रकिनाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या दोघा जणांची ओळख पटली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, ते दोघे बाप-लेक असल्याची माहिती समोर आली आहे.
वडिलांचं नाव साजिद अक्रम असून ते 50 वर्षांचे आहेत, तर मुलाचं नाव नवीद अक्रम असून तो 24 वर्षांचा आहे.
यापूर्वी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रविवारी (14 डिसेंबर) हनुक्का नावाच्या उत्सवावेळी (ज्यू धर्मीयांचा सण) बॅान्डी बीचवर बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
हल्लेखोरांनी इस्लामिक स्टेटशी (आयएस) निष्ठा असल्याची शपथ घेतल्याबाबतची माहिती आहे. त्यांच्या कारमध्ये आयएसचे ध्वजही सापडले होते.
साजिद अक्रमचा भारतीय पासपोर्ट?
बॉन्डी बीचवर गोळीबार करण्यापूर्वी या हल्ल्यातील दोन संशयित साजिद अक्रम आणि मुलगा नवीद अक्रम एक महिना आधी फिलीपिन्सला गेले होते, असं ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. ते फिलीपिन्सला का गेले होते, याची चौकशी पोलीस आता करत आहेत.
दरम्यान, यातील साजिद अक्रम हा भारतीय पासपोर्टवर फिलीपिन्सला आला होता, अशी माहिती मनिलाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली आहे. तर मुलगा नवीदने यासाठी ऑस्ट्रेलियन पासपोर्ट वापरला होता.
'लष्करी प्रशिक्षण' घेण्यासाठी ते फिलीपिन्सला गेले होतं असं आधी सांगण्यात आलं होतं.

हा हल्ला 'इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीवर आधारित' दिसतो, असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटलं. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार बंदूकधाऱ्यांनी वापरलेल्या गाडीमध्ये 'घरी बनवलेले' इस्लामिक स्टेटचे झेंडे आणि आयइडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) सापडले आहेत.
रविवारी (14 डिसेंबर) झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये एक 10 वर्षांची ब्रिटिश वंशाची मुलगी रब्बी, निवृत्त पोलीस अधिकारी आणि होलोकॉस्ट सर्व्हायव्हरचा समावेश आहेत. ताज्या माहितीनुसार, 24 जण अजूनही रुग्णालयात आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे आणि आणखी पाच जण गंभीर पण स्थिर आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी रुग्णालयात जाऊन हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेणाऱ्या व्यक्तीची भेट घेतली. हा 'खरा ऑस्ट्रेलियन नायक' असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
दोघांनी फिलीपिन्समध्ये काय केलं?
साजिद आणि नावेद अक्रम हे संशयित हल्लेखोर 1 नोव्हेंबरला फिलीपिन्सला गेले होते. ते 28 नोव्हेंबरपर्यंत तिथे होते, असं फिलीपिन्सच्या इमिग्रेशन ब्युरोने बीबीसीला सांगितलं.
ते फिलीपिन्समधील दक्षिणेकडील शहर दावो येथे सर्वात शेवटी गेले होते. नंतर ते तेथून सिडनीला गेले, असं सँडोव्हल सांगतात.
दावो हे फिलिपिन्सच्या मुख्य दक्षिणेकडील बेट मिंडानाओच्या पूर्व भागातील मोठे शहर आहे. मिंडानाओच्या मध्य आणि दक्षिण-पश्चिमेकडील गरीब भागांमध्ये इस्लामी दहशतवादी गट सक्रिय असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या दोघांनी 'लष्करी पद्धतीचं प्रशिक्षण' घेतलं होतं, असं सुरुवातीला सांगण्यात आलं आहे. परंतु, या वृत्ताची तत्काळ पुष्टी करता आली नसल्याचे फिलीपिन्सच्या लष्करानं सांगितलं.
'शस्त्रांचा परवाना होता'
न्यू साउथ वेल्स राज्याचे पोलीस आयुक्त मेल लेनन यांनी सोमवारी(15 डिसेंबर) पत्रकार परिषदेत सांगितलं की, साजिद अक्रमकडे शिकार करण्यासाठीच्या बंदुकीचा परवाना होता आणि तो गन क्लबचा सदस्य होता.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर एबीसी न्यूजला सांगितलं की, बॅान्डी बीचवरील गोळीबार करणाऱ्यांच्या कारमध्ये इस्लामिक स्टेटचे (आयएस) 2 ध्वज सापडले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांच्या मते, साजिद अक्रम 1998 मध्ये विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियाला आला होता. 2001 मध्ये, त्याच्या व्हिसाचं पार्टनर व्हिसामध्ये रूपांतर झालं आणि नंतर त्याला रहिवासी परतीचा व्हिसा देण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचा मुलगा नवीद अक्रम याचा ऑस्ट्रेलियात जन्म झाला होता आणि तो आता ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितलं की, अक्रम पहिल्यांदा ऑक्टोबर 2019 मध्ये सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आला होता.
मात्र, त्यावेळी असा निष्कर्ष काढण्यात आला होता की, तो कोणत्याही हिंसाचारात सहभागी होईल, असे कोणतेही संकेत नाहीत.
एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, घटनास्थळावरील फुटेजमध्ये कारच्या बोनेटवर एक ध्वज स्पष्टपणे दिसत आहे. बंदूकधाऱ्यांपैकी एक नवीद अक्रमची यापुर्वीही चौकशी करण्यात आली होती. सिडनीतील आयएस सेलशी त्याचे जवळचे संबंध असल्याबद्दल ही चौकशी करण्यात आली होती.
एबीसीच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन पोलिसांचा म्हणणं आहे, "दोन्ही बंदूकधाऱ्यांनी आयएस दहशतवादी संघटनेशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली होती."
हल्लेखोरांनी घटनास्थळाजवळच भाड्याने घेतली होती खोली
समुद्रकिनाऱ्याजवळ घर भाड्यानं घेण्यापूर्वी, हल्लेखोर सिडनीच्या बाहेरच्या परिसरात राहत होते. बॉन्डी बीचपासून बॉनीरिग हे ठिकाण सुमारे 1 तासाच्या अंतरावर आहे.

फोटो स्रोत, EPA/Shutterstock
काही आठवड्यांपूर्वीपर्यंत साजिद आणि नवीद अक्रम तिथंच राहत होते. त्यानंतर ते हल्ल्याच्या ठिकाणाजवळील कॅम्पसी इथे भाड्याच्या घरात राहायला गेले.
बीबीसी प्रतिनिधी केटी वॉटसन यांनी बॉनीरिगमधील त्यांच्या घरी भेट दिली.
त्या म्हणतात, "पोलिसांनी रात्री घरावर छापा मारला. त्यानंतर तिथं राहणाऱ्या 3 लोकांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना कोणत्याही आरोपाशिवाय सोडण्यात आलं, मग पुन्हा ते त्यांच्या घरी निघून गेले."
'अहमद खऱ्या आयुष्यातील हिरो'
दरम्यान, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स यांनी रुग्णालयात अहमद अल अहमद यांची भेट घेतली. हा तोच व्यक्ती आहे ज्यानं एका बंदूकधाऱ्याला यशस्वीरित्या नि:शस्त्र केलं होतं.
मिन्स यांनी लिहिलंय, "अहमद हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. त्यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून असाधारण धाडस दाखवत एका दहशतवाद्याला नि:शस्त्र केलं. यामुळे असंख्य जीव वाचले यात काही शंका नाही."
"आता त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि न्यू साउथ वेल्सच्या लोकांतर्फे त्यांचे आभार मानणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे."
"जर अहमद यांच्याकडे हे निःस्वार्थ धाडस नसते, तर आणखी बरेच जीव गेले असते यात शंका नाही."
बीबीसीनं पडताळलेल्या व्हीडिओमध्ये अहमद बंदूकधारी व्यक्तीकडे धावत जातात, त्याच्याकडील शस्त्र हिसकावून घेतात आणि नंतर त्याच्या दिशेनं बंदूक फिरवतात. यामुळे हल्लेखोराला माघार घेण्यास भाग पाडलं गेलं.

फोटो स्रोत, Facebook/Chris Minns
अहमद दोन मुलांचे वडील आहेत आणि ते फळांचे दुकान चालवतात. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांच्या कुटुंबियांनी 7न्यूज ऑस्ट्रेलियाला सांगितलं की, त्यांच्या खांद्याला आणि हाताला गोळी लागल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
अहमदचा चुलत भाऊ मुस्तफा यांनी रविवारी (14 डिसेंबर) रात्री उशिरा 7न्यूज ऑस्ट्रेलियाला सांगितलं, "तो एक हिरो आहे, 100 टक्के हिरो आहे. त्याला दोनदा गोळी लागली, एक त्याच्या खांद्याला आणि एक हाताला."
सोमवारी (15 डिसेंबर) पहाटे दिलेल्या अपडेटमध्ये मुस्तफा यांनी म्हटलं, "मला आशा आहे की तो बरा होईल. मी त्याला काल रात्री पाहिलं होतं. तो बरा होता, पण आम्ही डॉक्टरांकडून अपडेटची वाट पाहत आहोत."
अहमद हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
यात एक हल्लेखोर एका छोट्या पादचारी पुलाजवळ पाम झाडाच्या मागे उभा राहून गोळीबार करताना दिसत आहे. हल्लेखोर ज्या दिशेनं गोळीबार करत होता ते कॅमेऱ्याच्या चौकटीच्या बाहेर आहे.
अहमद एका पार्क केलेल्या गाडीच्या मागे लपले होते. त्यावेळी त्यांनी हल्लेखोर हल्ला करत असतानाच त्याला पकडले असे दिसते.

ते हल्लेखोरांकडून बंदूक हिसकावून घेण्यात यशस्वी होतात, त्याला जमिनीवर ढकलतात आणि त्याच्यावर बंदूक रोखतात. त्यानंतर हल्लेखोर पुलाच्या दिशेने मागे सरकू लागतो.
ते हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेतात, त्याला जमिनीवर ढकलतात आणि त्याच्यावर बंदूक रोखतात. त्यानंतर हल्लेखोर पुलाकडे मागे हटू लागतो.
अहमद नंतर शस्त्र खाली ठेवतात आणि एक हात हवेत वर करतात, ते पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न करतात की, ते हल्लेखोरांसोबत नाहीत.
नंतर, तोच हल्लेखोर पुलावर दुसरे शस्त्र उचलून पुन्हा गोळीबार करताना दिसतो.
दुसरा बंदूकधारी देखील पुलावरून गोळीबार करताना दिसत आहे. व्हीडिओवरून हे स्पष्ट झालेलं नाही की, हल्लेखोर कोणावर किंवा कोणत्या दिशेनं गोळीबार करत होते.
या हल्ल्यात मारली गेलेली सर्वात लहान मुलगी 10 वर्षांची
रविवारी (14 डिसेंबर) झालेल्या हल्ल्यात मारली गेलेली सर्वात लहान वयाची एक मुलगी होती.
तिच्या शिक्षिकेनं सांगितलं, "ती एक हुशार, आनंदी आणि उत्साही मुलगी होती." त्यांनी ही प्रतिक्रिया 10 वर्षांच्या मटिल्डाच्या कुटुंबासाठी तयार केलेल्या गो फंड मी (GoFundMe) या पेजवर दिली.

फोटो स्रोत, GoFundMe
त्यांनी लिहिलं, "काल, हनुक्का साजरा करत असताना, तिचं छोटेसं आयुष्य दुःखदपणे हिरावून घेण्यात आलं. तिच्या आठवणी नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील."
यापूर्वी, मटिल्डाच्या मावशीनं एबीसी न्यूजला सांगितलं होतं की, ती एक "खूपच मनमिळावू" मुलगी होती. तिला "शाळा खूप आवडायची आणि तिचे बरेच मित्रमैत्रिणी होते."
तिच्या मावशीनं मीडियाला मटिल्डाचं आडनाव वापरू नये, अशी विनंती केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











