ऑस्ट्रेलिया : सिडनीच्या बॅान्डी बीचवरील गोळीबारात 15 जणांचा मृत्यू; 'ते' दोघे हल्लेखोर बाप-लेक असल्याची पोलिसांची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील सिडनी येथील बॅान्डी समुद्रकिनाऱ्यावर गोळीबाराची घटना घडली आहे.
या गोळीबारात 10 वर्षांच्या मुलीसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिली. हल्ल्यात जखमी झालेल्या 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये एक संशयित हल्लेखोराचाही समावेश आहे. आणखी एक संशयित हल्लेखोर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयिताची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांपैकी दोघे बाप-लेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
यातील 50 वर्षीय बापाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 24 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
50 वर्षीय हल्लेखोराकडे परवानाधारक बंदुक होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तीच्या नावावर 6 शस्त्रे नोंदणीकृत होती आणि बॅान्डी बीचवरून आणखी 6 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
घटनास्थळी 2 सक्रिय स्फोटके देखील आढळली. पोलिसांनी ती सुरक्षितपणे निकामी केली आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "बॅान्डी बीच येथे 2 व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्यानंतर तेथे पोलिसांचे ऑपरेशन सुरू आहे."
न्यू साऊथ वेल्सचे पोलीस आयुक्त एम. लेनयन यांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन ईस्टर्न डेलाइट टाइमनुसार संध्याकाळी सुमारे 6 वाजून 47 मिनिटांनी बॅान्डी बीच येथे आर्चर पार्कजवळ ही घटना घडली.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या घटनेचे वर्णन "धक्कादायक आणि अत्यंत अस्वस्थ करणारे" असे केले.
पोलिसांनी काय सांगितलं?
न्यू साउथ वेल्स पोलीस सध्या परिसरात शोध घेत आहेत. लोकांनी या परिसरात येणं टाळावं आणि बातम्या पसरवणंही टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी केलं.
या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
या भागापासून जवळ आयोजित होणाऱ्या हनुक्का नावाच्या उत्सवाशी (यहुदी सण) याचा संबंध आहे किंवा नाही याबाबत नेमकी माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, DARRIAN TRAYNOR/GETTY IMAGES
प्रत्यक्षदर्शींनी काय म्हणाले
एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, गोळीबार सुरू झाला तेव्हा ते मुलांसह समुद्रकिनाऱ्यावर हनुक्का कार्यक्रमात होते.
गोळीबारानंतर मुलांसह ते तिथून निघून गेल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Darrian Traynor/Getty Images
ब्रोंटेहून बीबीसी वार्तांकन करणाऱ्या टॅबी विल्सन यांनी सांगितलं की, "मी दुपारी ब्रोंटे बीचवर होतो. मी नेहमी कामानंतर इथं येत असतो. आज मला इथं अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. अंदाजे 20 स्फोटांचे आवाज आले."
"सुरुवातीला कुणाला फार भीती वाटली नाही. आम्हाला वाटलं कुठंतरी आतषबाजी होत असेल. पण आम्ही हेलिकॉप्टर फिरताना पाहिले तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर गोळीबाराच्या बातम्या येत होत्या."

बीबीसी प्रतिनिधी टॅसी वॉन्ग यांच्या मते, ही घटना बॅान्डी बीचच्या उत्तरेकडील भागात एका गर्दीच्या ठिकाणी घडली.
त्या म्हणाल्या, "बीचच्या मागे गवताळ भागाजवळ हनुक्का उत्सव सुरू होता. तिथे एक पादचारी पूल होता, ज्याचा वापर लोक बीचकडे जाण्यासाठी करत होते. हल्लेखोरांनी कदाचित याच ठिकाणाचा वापर लक्ष्य साधण्यासाठी केला असावा."
"गोळीबार होण्याच्या सुमारे तासभर आधी मी तो पूल ओलांडला होता. त्यावेळी तिथे किमान 200 लोक उपस्थित होते. मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं आणि विविध उपक्रमही चालू होते. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी या उंच ठिकाणाचा वापर केला," अशी माहिती त्यांनी दिली.
"ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता, त्या संपूर्ण परिसराभोवती धातूचे बॅरियर लावण्यात आले होते. लोकांना ये-जा साठी करण्यासाठी एक गेट होतं, जे एखाद्या बॅग चेकसारखा दिसत होतं. एकूणच तिथे सुरक्षेच्या उपाययोजना तुलनेने कमी असल्याचं दिसून येत होतं," असंही टॅसी नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












