घातक आकर्षण : पार्टनरला सर्वाधिक आकर्षित करणारा गुणच तुम्हाला त्याच्यापासून दूरही करू शकतो

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/ Getty Images
- Author, विल पार्क
आपल्यातील ज्या गुणांमुळे आपण इतरांचं लक्ष वेधून घेतो आणि ज्यामुळे आपण लोकांना आकर्षक वाटतो, ते गुण जसे वरदान ठरू शकतात तसेच शापदेखील ठरू शकतात.
उलट काहीवेळा आपले सर्वात लक्षवेधी किंवा आकर्षक गुण देखील नात्यातील ब्रेकअपचं कारण ठरू शकतात.
'द इक' (The ick) हा 2024 मध्ये केंब्रिज डिक्शनरीमध्ये भर पडलेल्या सर्वात असामान्य किंवा विचित्र शब्दांपैकी एक होता. 'द इक' या शब्दाचा अर्थ होतो, 'अचानक एखाद्या गोष्टीविषयी तिरस्कार किंवा घृणा वाटणं'.
कधी कधी जोडीदाराबद्दल अचानक नवीन दृष्टीकोन निर्माण होतो आणि जोडीदार अनाकर्षक वाटण्याची भावना निर्माण होते.
आधी हे लक्षात आलेलं नसतं किंवा जाणवलेलं नसतं. पण, एकदा ही भावना किंवा दृष्टीकोन निर्माण झाला की दुर्दैवानं तो दूर होत नाही.
जरी हा शब्दप्रयोग हलक्या-फुलक्या ढंगात वापरण्यात आला असला तरी, त्यातून असं दिसतं की जोडीदारात असे गुण किंवा पैलू असू शकतात जे अनाकर्षक असू शकतात पण ते लगेच स्पष्ट होत नाहीत.
किंबहुना जोडीदाराबरोबरच्या नात्यात सुरुवातीच्या टप्प्यात तेच गुण आपल्याला खरोखरंच आकर्षक वाटलेले असू शकतात.


जोडीदाराबद्दलचं घातक आकर्षण
याला "घातक किंवा धोकादायक आकर्षण" म्हणतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला त्याच्या जोडीदाराचे जे गुण किंवा पैलू सुरुवातीला आवडलेले असतात, तेच नंतर त्याला आवडत नाहीत.
"इथे घातक शब्दाचा अर्थ प्राणघातक अशा आशयानं नाही. मात्र तो भविष्यसूचक घटना अशा अर्थानं येतो," असं डायन फेल्मली म्हणतात. त्या अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठात सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहेत.
" 'मला ते खूप जास्त आकर्षण असणं' असं वाटतं. लोकांना जे हवं असतं ते मिळतं आणि किंबुहना त्यांना जे हवं आहे ते मिळालं आहे, म्हणून देखील जोडीदाराबद्दल मोहभंग होऊ शकतो," असं त्या म्हणतात.
फेल्मली यासंदर्भात संशोधन करताना लोकांना विचारतात की, जोडीदाराकडं पहिल्यांदा आकर्षित का झाले, नंतर असमाधानी का झाले आणि त्यांचं पूर्वीचं नातं का संपलं? असे प्रश्न विचारले.
त्यावर बहुतांश लोकांनी ब्रेकअप होण्यामागचं कारण म्हणून त्यांच्या माजी जोडीदाराकडून पूर्ण न झालेल्या विविध गरजांची यादी दिली.
मात्र, फेल्मली यांच्या लक्षात आलं की त्या पूर्ण न झालेल्या गरजांचा संबंध ते लोक त्यांच्या माजी जोडीदाराकडं पहिल्यांदा आकर्षित झाले त्या कारणांशी होता.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/ Getty Images
"एकाच गुणाची ती वेगवेगळी व्याख्या आहे. एखाद्या चांगल्या गुणाकडे पाहण्याचा तो नकारात्मक दृष्टीकोन आहे. इथे मी एका व्यक्तीचं उदाहरण देते. तो म्हणाला होता की, तो त्याच्या जोडीदाराकडे आकर्षित झाला कारण ती संवेदनशील, समजूतदार होती. मग त्यानं तक्रार केली की, ती खूप जास्त वेळा सॉरी म्हणाली. ते खूपच संवेदनशील वाटतं," असं त्या म्हणतात.
फेल्मली इतरही उदाहरणं देतात. त्यात उच्च पदावरील नोकरी असलेल्या व्यक्तीकडे आकर्षित होणं याचाही समावेश आहे. असे लोक कामाच्या ठिकाणी खूप वेळ घालवतात, अशी नंतर तक्रार केली जाते.
तसंच मजेशीर जोडीदार निवडणं आणि मग नंतर तो आयुष्याला गांभीर्यानं घेत नसल्याची तक्रार याचाही समावेश आहे. निवांत असणारे, ताण न घेणारे भागिदार नंतर बेभरवशाचे वाटू लागतात किंवा वक्तशीर वाटत नाहीत.
"जोपर्यंत तुम्ही वेळ पाळता, तोपर्यंत निवांत राहणं उत्तम आहे," असं फेल्मली हसत हसत म्हणतात.
त्याचप्रमाणे, जे जोडीदार सुरुवातीला शक्तीशाली किंवा बलवान वाटतात, तेच ब्रेकअपनंतर नियंत्रणात ठेवणारे किंवा दुसऱ्यावर रुबाव दाखवणारे वाटतात.
जे लोक आधी छान, चांगले असतात तेच नंतर भोळसट किंवा कोणाकडूनही प्रभावित होणारे वाटतात. तर यशस्वी लोक नंतर कामाचे व्यसन असणारे वाटू लागतात.
आवडत्या गुणामुळेच नात्यात दुरावा का येतो?
घातक आकर्षणात, व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट गुण किंवा वैशिष्ट्याबद्दल सुरुवातीला जितकं जास्त आकर्षण असेल तितकंच ते ब्रेकअप होण्यामागचं कारण ठरण्याची शक्यता असते.
मोठ्या सकारात्मक गोष्टींमुळेच नंतर नातं तुटतं, असं का होत असावं?
यातील पहिली गोष्ट म्हणजे, नव्या जोडीदाराच्या किंवा संभाव्य जोडीदाराच्या बाबतीत सर्वात आधी लक्षात येणाऱ्या गोष्टी म्हणजे असे टोकाचे गुण ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.
"आपण जोडीदारांचं वर्णन 'मदत करणारे' किंवा 'थोडेसे कष्टाळू' असं करत नाही. जोडीदारातील हे गुण जितके टोकाचे असतील नंतर ते गुण तितकेच नापसंतीचे किंवा नावडणारे ठरतात," असं फेल्मली म्हणतात.
फेल्मली पुढे सांगतात की, यात भोळेपणा हा एक घटक असू शकतो. जोडीदाराबद्दल सुरुवातीच्या प्रेमामुळे किंवा आकर्षणामुळे त्याच्यातील टोकाच्या गुणाकडे किंवा वैशिष्ट्याबाबत आपण अंध होतो किंवा त्याकडे आपले दुर्लक्ष होते.
मात्र, नात्यातील सुरुवातीचा उत्साह कमी झाल्यानंतर, जोडीदारातील त्या गुणाचा नकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो याची आपल्याला अधिक प्रकर्षानं जाणीव होते.
मात्र, जोडीदाराबद्दलचं हे पुनर्मूल्यांकन कालांतरानं अधिक सूक्ष्म स्वरुपाचं किंवा बारकाईनं होऊ शकतं. घातक आकर्षण हे इकप्रमाणे निर्णयातील आमुलाग्र बदलाऐवजी किंवा निर्णय पूर्ण बदलण्याऐवजी हळूहळू जाणीव होणारं असू शकतं.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/ Getty Images
10 ते 21 वर्षे एकत्र राहिलेली जोडपी म्हणजे दीर्घकाळ नात्यात असलेली जोडप्यांमध्ये नातं जुळवून घेण्याचं प्रमाण सर्वात कमी असतं.
त्याचा अर्थ त्यांना या वयोगटात त्यांना आपसातील संघर्ष, भांडणं सोडवणं, नवीन आव्हानांशी जुळवून घेणं किंवा एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये बदल करणं कठीण जातं.
सामंथा जोएल कॅनडातील ओंटारियोमधील वेस्टर्न विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, नात्यातील समाधानाचं पुनर्मूल्यांकन करणं महत्त्वाचं आहे. कारण त्यातून जीवनाच्या अनेक पैलूंविषयी सूतोवाच होतं.
ज्या लोकांचं नातं चांगलं नसतं किंवा नात्यात दु:ख असतं, त्यांचं आरोग्य चांगलं नसतं, त्यांना उच्च रक्तदाब असतो, त्यांचं मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका अधिक असतो आणि त्यांचं काम-वैयक्तिक आयुष्य यातील संतुलन बिघडलेलं असतं. त्यांना याप्रकारच्या इतर अनेक समस्या असतात.
किती आनंद आणि दु:ख
नात्यातील समाधानाचं एक साधं मूल्यमापन म्हणजे सामाजिक देवाणघेवाण सिद्धांत (social exchange theory). ते म्हणजे जोडीदाराकडून आपल्याला मिळालेला आनंद, समाधानाची तुलना करून करता येतं.
उदाहरणार्थ, आपल्याला किती मजा येते? आपलं महत्त्व अधिक आहे असं त्यांच्यामुळे आपल्याला वाटतं का? त्यांचं सौंदर्य किंवा पैसा, या गोष्टींच्या तुलनेत आपण काय किंमत मोजतो? म्हणजेच भांडणं किंवा संघर्ष, दु:ख होण्याची शक्यता किंवा आर्थिक गुंतवणूक.
लोक सामाजिक देवाणघेवाणीचा सिद्धांत दोन प्रकारे वापरतात. पहिला म्हणजे सध्याच्या नात्याची तुलना भूतकाळातील नात्याशी करणं. भूतकाळातील अनुभवाच्या आधारे
आपण ठेवलेल्या अपेक्षांच्या तुलनेत सध्याच्या नात्यात तर त्या कमी पूर्ण होत असतील तर आपल्याला ते नातं कमी समाधानकारक वाटेल.
दुसरी तुलना आपण सध्या आपल्याला उपलब्ध असलेल्या पर्यायांशी करू शकतो. जरी आपल्याला वाटत असेल की, त्याच्याबरोबर नात्याचं चित्र आशादायक असेल, तरी आपण संभाव्य जोडीदार नाकारू शकतो, जर आपल्याला वाटत असेल की, इतर लोकांबरोबर आपले संबंध चांगले असतील.
प्रत्येकासाठी ही गणितं वेगवेगळी असतील. उदाहरणार्थ, समलिंगी जोडप्यांना, भेदभाव आणि समलैंगिकतेबद्दलची नापसंती किंवा पूर्वग्रह यामुळे नातं टिकवण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता असते.
तुम्ही कुठे राहता यावर ते अवलंबून असतं. तुमच्याकडे डेटिंगचे कमी पर्याय उपलब्ध असू शकतात.
नातं टिकवणारे घटक
ज्या जोडप्यांमधील काही प्रमुख गुण किंवा वैशिष्टयं समान असतात, ती जोडपी यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. 79,000 ब्रिटिश जोडप्यांच्या समूहाकडे पाहता, समाधानकारक नात्याचं सर्वात मोठं निदर्शक म्हणजे समान वयाचं असणं.
मात्र शिक्षणासह इतर वयोगटाचे घटक आणि धर्म किंवा राजकीय धारणा, विचारसरणी सारख्या इतर गोष्टीदेखील यशस्वी नात्यांसंदर्भात भक्कम भाकित करणारे घटक असतात.
समान उंची आणि बीएमआय म्हणजे शरीराची उंची आणि वजन याच्या आधारे करण्यात आलेलं चरबीचं मोजमाप यासारख्या जैविक घटकांमध्ये लहानसे मात्र महत्त्वाचे परस्परसंबंध असतात.
"श्रद्धा आणि मूल्यं, शिक्षणाचं प्रमाण किंवा शैक्षणिक प्रगती आणि विचारसरणी या घटकांचा खूप अधिक परस्परसंबंध असल्याचं आम्हाला आढळलं," असं तान्या हॉरविट्झ म्हणतात. त्या अमेरिकेतील कोलोरॅडो बॉल्डर विद्यापीठात पीएचडीच्या विद्यार्थिनी आहेत.
जोडप्यांमधील समानतेमुळे नातं बळकट होतं, मात्र काही विशिष्ट परिस्थितीतच दोघांमधील भिन्नता ही समस्या असल्याचं दिसतं. "एका छोट्या अल्पसंख्यांक गटानं नकारात्मक परस्परसंबंधांचं चिन्ह दर्शविलं," असं त्या म्हणतात.
एक उदाहरण जे नात्यांवर परिणाम करणारं वाटलं ते म्हणजे पहाटे लवकर उठणाऱ्या लोकांचं निशाचर लोकांशी जुळताना दिसत नाही आणि तसंच निशाचरांचं पहाटे उठणाऱ्यांशी जुळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हॉरविट्झ म्हणतात, सुरुवातीला दोन अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. मात्र दीर्घकाळात त्यांच्यातील नातं यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी असते.
त्यांनी ज्या जोडप्यांवर अभ्यास केला, ती वयस्कर, पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहणारी, विवाहित किंवा सह-पालकत्व निभावणारी होती.
"हे लोक सामान्यत: खूपच गंभीर किंवा दीर्घकाळापासून नात्यात असणारे होते. मला त्यातून सुरुवातीचं आकर्षण कशामुळे निर्माण होतं त्यापेक्षा दीर्घकालीन नातं कशामुळे तयार होतं याबद्दल त्यातून अधिक कळतं," असं त्या म्हणतात.
फेल्मली याबाबत इशारा देतात की, नात्यासाठी घातक आकर्षण हे शेवटचं असण्याची गरज नाही. ज्या जोडीदारांमध्ये समान तीव्र गुण किंवा वैशिष्ट्ये आहेत त्यांचं नातं व्यवस्थित राहू शकतं.
"घातक आकर्षणाचा अभ्यास करताना, जोडप्यांमध्ये जे समान गुण असतात त्याबद्दल ते कमी तक्रार करताना दिसतात. कारण जे गुण त्यांच्यात स्वत:मध्ये देखील असतात त्याबद्दल ते तक्रार करणं कठीण असतं," असं त्या म्हणतात.
फेल्मली यांनी ज्या लोकांची मुलाखत घेतली त्यात भाग घेतलेले एक वृद्ध म्हणाले की, ते त्यांच्या पत्नीकडे पहिल्यांदा आकर्षित झाले ते तिच्या चारित्र्याची ताकद आणि तिचा आत्मविश्वास यामुळे. मात्र या गुणांची नकारात्मक बाजू सांगताना ते म्हणाले की, कधीकधी ती हट्टीपणा करू शकते.
"मात्र ते अजूनही विवाहित आहेत. मग त्यांच्यात काय चाललं आहे? त्या वृद्ध व्यक्तीनं स्वत:बद्दल देखील जागरूकता दाखवली. त्यानं हे मान्य केलं की तो देखील हट्टी होऊ शकतो. ती गोष्ट खरोखरंच गोड होती," असं फेल्मली म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











