Valentine’s Day 2022: एकापेक्षा जास्त प्रियकर-प्रेयसी असल्याचे असतात अनेक फायदे...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विल्यम पार्क
- Role, बीबीसी फ्युचर प्रतिनिधी
एखादं नातं दोन लोकांमधील अनन्य समजुतीवर उभं असतं, असं आपण अनेकदा मानतो. परंतु, लोकांना प्रेमाच्या नवीन वाटा सापडत असताना या नियमाची अधिकाधिक छाननी होऊ लागली आहे.
"एक्स्क्लुझिव्हिटीला तुझ्या लेखी काय अर्थ आहे?" असा प्रश्न युनायटेड किंगडममधील 'लव्ह आयलँड' या रिअॅलिटी कार्यक्रमातली स्पर्धक अॅमी हार्ट विचारते. या प्रश्नावर तिचा पार्टनर, कर्टिस प्रिचर्ड पेचात अडकलाय, हे तिलाही कळतं. तिच्या माघारी तो इतर मुलींची चुंबनं घेत होता.
हार्ट अस्खलितपणे आणि शांतपणे त्यांच्या नात्यातील अडचणीच्या मुद्द्यांचा पाढा वाचते, तेव्हा प्रिचर्ड त्याच्या जागेवर अंग चोरून बसून राहतो. एकाच वेळी त्याला दोन माणसांविषयी रोमॅन्टिक भावनेने जवळीक कशी काय वाटू शकते, तिला त्याची गरज आहे आणि त्याने तिचा हिरमोड केलाय, अशा विविध मुद्द्यांचा यात उल्लेख होतो.
रोमॅन्टिक प्रेमाच्या नात्यामध्ये केवळ दोनच लोकांचा समावेश असतो, आणि प्रिचर्ड हा नियम मोडतोय, असं गृहित धरून हार्ट बोलत होती. आताच्या अनेक समाजांमध्ये एकविवाहित्व ही स्वाभाविक स्थिती असली, तरी मानवी नातेसंबंधांचा इतिहास याहून बराच गुंतागुंतीचा राहिल्याचं दिसतं. आपण आपल्या एकविवाहित्व (मोनोगमी) न मानणाऱ्या मुळांकडे परत जाऊ शकतो का?
परस्परसहमतीने एकविवाहित्वापलीकडे जाण्याच्या पद्धतीमुळे (कन्सेन्शुअल नॉन-मोनोगमी: सीएनएम) एखाद्या जोडप्यातील दोन्ही व्यक्तींना इतर लोकांसोबतच्या नात्यांमधील शक्यता धुंडाळण्याची मुभा मिळते. परस्परसहमतीने अनेकांशी संबंध ठेवण्यापासून ते जोडीदारांची अदलाबदल करणं (स्विंगिंग) आणि इतर स्वरूपाच्या 'खुल्या' संबंधांचा यात समावेश होऊ शकतो.
सीएनएम पद्धतीने कोणतंही रूप घेतलं, तरी यामध्ये संबंधित जोडीदार नात्यातील सीमारेषांची चर्चा करतात आणि त्यावर सहमती प्रस्थापित करतात, हे यातील एक ठोस वैशिष्ट्य आहे. आपण कितपत सीमा ओलांडायची, कधी आणि कुठे ओलांडायची, याबद्दल ते चर्चा करून निर्णय घेतात.
या व्याख्येनुसार पाहिलं, तर प्रिचर्डचे चाळे या प्रकारात गणता येणार नाहीत, कारण हार्टने त्यासाठी संमती दिलेली नव्हती. पण अल्पसंख्य असले तरी अनेक लोक एकविवाहित्वाच्या सीमा ओलांडतात, ही बाब लक्षात घेतली तर प्रिचर्डच्या वागण्यामागची प्रेरणा कळण्याची शक्यता आहे.
एकविवाहित्व प्रचलित असलं, तरी मानवांना त्यांच्या जोडीदाराहून वेगळ्या लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्याची खूप ओढ असल्याचं दिसतं. मानसशास्त्रज्ञ जस्टीन लेहमिलर यांनी त्यांच्या 'टेल मी व्हॉट यू वॉन्ट' या पुस्तकासाठी चार हजार अमेरिकी लोकांना त्यांच्या लैंगिक कल्पनांचं वर्णन सांगायची विनंती केली. तर, तिघांनी एकत्र लैंगिक अनुभव घेणं ही सर्वांत लोकप्रिय कल्पना असल्याचं त्यांना आढळलं. तर अशा तिघांच्या एकत्रित लैंगिक अनुभवामध्ये आणि परस्परसहमतीने एकविवाहित्वाच्या सीमा ओलांडण्यामध्ये काय फरक आहे?
"नातेसंबंधांमध्ये असलेल्या सर्व लोकांचा विचार केला, तर सुमारे पाच टक्के लोकांचे संबंध परस्परसहमतीने एकविवाहित्व ओलांडणारे असल्याचं दिसतं," असं टोरान्टोमधील (कॅनडा) यॉर्क विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक अॅमी म्यूसी सांगतात. पण परस्परसहमतीने एकविवाहित्वापलीकडचे संबंध कधीतरी अनुभवलेल्यांचाही समावेश केला, तर हा आकडा आणखी वर जाईल.
"आयुष्यभराच्या अनुभवाचा विचार केला, तर 21 टक्के लोकांनी कधी ना कधी एकविवाहित्वाची सीमा ओलांडणारे संबंध ठेवलेले आहेत."
विशिष्ट परिमाणात पाहायचं असेल तर- अमेरिकेमध्ये घरात इंग्रजीहून निराळी भाषा बोलणाऱ्या कुटुंबांच्या प्रमाणापेक्षा (21.9 टक्के) वरची 21 टक्के ही आकडेवारी थोडीशीच कमी आहे.
"परस्परसहमतीने एकविवाहित्व ओलांडणारे संबंध आणखी सर्रास असतील, तरी मला आश्चर्य वाटणार नाही," असं कॅलिफोर्नियामधील चॅपमन विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक अॅमी मूअर्स सांगतात.
"अशा प्रश्नांना लोक काहीशी रुढीवादी उत्तरं देतात, याला सामाजिक इष्टअनिष्टतेचे संकेत कारणीभूत आहेत. आपण एका दिवसात पाच फळं किंवा भाज्या खातो असा अवाजवी जास्त आकडा सांगितला जातो किंवा आपण किती दारू पितो याबाबत कमी प्रमाण सांगितलं जातं, तसाच हा प्रकार असतो."

फोटो स्रोत, Getty Images
या बऱ्यापैकी मोठ्या अल्पसंख्याकांना घराबाहेरच्या जोडीदारांना भेटण्याच्या संधी आत्ताच्या घडीला खूप थोड्या असतील, कारण कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे विविध देशांमध्ये सामाजिक वावरावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. एकविवाहित्वापलीकडचे संबंध राखणाऱ्या लोकांना त्यांच्या सोबत राहणाऱ्या जोडीदारांसह जास्त वेळ घालवावा लागतो आहे, तर इतर जोडीदारांना भेटणं कमी झालं असेल. याचा त्यांच्या स्वास्थ्यावर कसा परिणाम होईल, हे अस्पष्ट आहे.
पण दीर्घ अंतरावरून टिकून राहिलेल्या नातेसंबंधांबद्दलच्या प्रस्थापित संशोधनानुसार, दीर्घ अंतरावरचे नातेसंबंधही पूर्णतः समाधानकारक असू शकतात. सामाजिक मानसशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एकविवाहित्वापलीकडील संबंध राखणाऱ्या लोकांना त्यांच्या वयाच्या एकविवाहित्व पाळणाऱ्या लोकांपेक्षा अधिकचे काही लाभ अनुभवायला मिळण्याची शक्यता असते.
माणसांमध्ये एकविवाहित्व नक्की कधीपासून रूढ झालं, हा वादाचा विषय आहे. प्राचीन मानवी पूर्वज ठळकपणे लैंगिक द्विरूपातील होते- पुरुष व स्त्रिया यांचे आकार व ठेवण निरनिराळी होती, हा एकविवाहित्वापलीकडल्या संबंधांचा पुरावा असल्याचा दाखला काही मानवशास्त्रज्ञ देतात.
लैंगिक द्विरूपांचं प्रमाण जास्त होतं, याचा अर्थ, एका (किंवा दोन्ही) लिंगांवर लैंगिकदृष्ट्या काही निवडक दबाव तीव्र स्वरूपाचे होते. गोरिलांसारख्या काही प्रजातींमध्ये मोठ्या आकाराचे नर लैंगिकदृष्ट्या जास्त यशस्वी ठरू शकतात. ते स्वतःच्या मोठ्या आकाराचा वापर करून इतर स्पर्धक नरांना लढाईत हरवतात. उदाहरणार्थ, डोंगराळ गोरिलांमधील एखादा प्रभुत्वशाली नर त्या झुंडीतील70 टक्के लैंगिक संबंधांवर स्वतःची मक्तेदारी प्रस्थापित करू शकतो- अशा समाजात एका नराशी अनेक माद्यांचे संबंध येतात.
लैंगिक द्विरूप प्रत्येक वेळी असंच कार्यरत होतं असं नाही. स्वास्थ्याचा भडक देखावा वापरणाऱ्या प्रजाती नरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा करतात, तिथे शारीरिक लढाई होत नाही- उदाहरणार्थ, सुंदर तुरे असलेले पक्षी किंवा उजळ रंगाचे मासे, यांच्यात अशा रितीने स्पर्धा होते. इथे एक फरक असा आहे की, बहुतेकदा या प्रजाती मानवाप्रमाणे सामाजिक नसतात, त्यामुळे एक नर किंवा माती त्यांच्या भागातील सर्व संभाव्य जोडीदारांवर नियंत्रण ठेवू शकतीलच असं नाही.
प्राचीन मानवी जीवाश्मांच्या नोंदी तुटक आहेत. याच तर्काने बरोब्बर उलटाही युक्तिवाद केला गेला आहे- म्हणजे आपल्या प्राचीन नातलगांमध्ये आपल्यासारखीच द्विरूपाची पातळी दिसत असे. विविध जीवाश्मांचा विचार करता याचं समर्थन करता येतं. त्यामुळे एकविवाहित्व / एकच जोडीदार असण्याची पद्धत खूप आधीपासूनच प्रचलित झाली असण्याची शक्यता आहे.
वाय-गुणसुत्रामधील वैविध्य, किंवा वैविध्याचा अभाव, हे माणसाने अगदी अलीकडेपर्यंत बहुविवाहित्व पाळण्यामागचं कारण असावं, असंही सुचवलं गेलं आहे. यातही पुन्हा मानवशास्त्रज्ञांमध्ये पुराव्यावरून वाद आहेत. पण पुरुषांच्या जुनकीय माहितीमध्ये तुलनेने साधर्म्य दिसतं, याचा अर्थ आपल्या उत्क्रांतीच्या गतकाळात केवळ मोजकेच पुरुष लैंगिक संबंध ठेवत असावेत, असं सूचित होतं, असंही काहींनी म्हटलं आहे. अलीकडच्या काळात हे वैविध्य वाढलं आहे, याचा अर्थ एकविवाहित्वामुळे अधिक पुरुषांना लैंगिक संबंध ठेवणं शक्य झालं आहे.
पुरातत्त्वीय पुराव्यावरून आपल्याला कळतं की, प्राचीन मानव लहान, जवळच्या विस्तारित कुटुंबसमूहांमध्ये राहत होता. एकंदर लोकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्वतःच्या स्थानिक गटाबाहेरच्या व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणं गरजेचं होतं, असं शिकारी-अन्नसंकलक समाजांच्या संगणकीय प्रारूपमांडणीवरून सूचित होतं. त्यामुळे शिकारी-संकलक समाजांमध्ये लैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींचा प्रवाह मोठा असेल. अचूक जनुकीय वंशावळ सांगता येईल असं कुटुंब राखणं अशक्य झालं असेल.

फोटो स्रोत, Getty Images
शिकारी-संकलक समाज सलगपणे एकच जोडीदार राखणारे राहिले असावेत- त्यात मूल स्वावलंबी होईपर्यंतचा काळ पूर्णतः एक जोडपं म्हणून व्यक्ती राहत असाव्यात, आणि मग नवीन जोडीदार शोधत असाव्यात. आधुनिक पुरुषांसाठी हे लैंगिकदृष्ट्या लाभदायक असल्याचं दाखवून देण्यात आलं आहे. पुरुष खुल्या संबंधांमध्ये अधिक रस का घेतात, हेही यातून स्पष्ट होतं.
लेहमिलर यांनी केलेल्या लैंगिक कल्पनांसंबंधीच्या संशोधनानुसार, पुरुषांना सामूहिक संभोगात अधिक रस असतो (अशा संबंधात केवळ 8 टक्के स्त्रियांनी रस दाखवला, तर सुमारे 26 टक्के पुरुषांना अशा संबंधांमध्ये रस होता). इतर प्रकारच्या "सामाजिक सेक्स"च्याबाबतही असाच प्रकारचा कल दिसला, म्हणजे स्विंगर क्लब (जोडीदारांची अदलाबदल करणारे क्लब) किंवा सेक्स पार्टीला जाण्यामध्ये पुरुषांना जास्त रस असतो (7 टक्के स्त्रियांच्या तुलनेत 17 टक्के पुरुष अशा गोष्टीत रस घेतात). परंतु, ज्या स्त्रियांना अशा कल्पनारम्यतेमध्ये रस असेल, त्यांच्या अशा कल्पना प्रत्यक्षात पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, याच नमुन्यामधील ज्या लोकांनी सामूहिक संभोगात सभागी झाल्याचं सांगितलं, त्यामध्ये 12 टक्के पुरुष होते, तर स्त्रिया 6 टक्के होत्या. म्हणजे स्त्रियांना योग्य संधी मिळण्याची शक्यता जास्त असते.
पण एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगता येते, ती अशी- जगभरातील 85 टक्के आधुनिक मानवी समाजांमध्ये, एकविवाहित्वापलीकडे जाणाऱ्या संबंधांच्या कोणत्या ना कोणत्या रूपाला मान्यता आहे. 'जुन्या करारा'मध्येही बहुविवाहित्वाचे / अनेक जोडीदार असल्याचे अनेक संदर्भ आहेत. परंतु, बहुतांश समाजांमध्ये रूढ स्थिती अजूनही एकविवाहित्वाची आहे. आता हे सर्वसाधारण वाटत असलं, तरी ऐतिहासिकदृष्ट्या मानव आपल्या आजच्या स्थितीसारखा एकविवाहित्व मानणारा / एक जोडीदार असणारा नव्हता. मग आता आयुष्यभर एकविवाहित्व सांभाळणं स्वाभाविक का मानलं जातं?
"माध्यमांचा उल्लेख न करता याचं अचूक उत्तर देता येणं अवघड आहे," असं मूअर्स म्हणतात. आपली जडणघडण होत असताना कलेचा व संस्कृतीचा आपल्यावर होणारा परिणाम त्या अधोरेखित करतात. "बहुतांशाने आपण मोठे होत असताना आपले पालक विवाहित असतात किंवा एकविवाही राहण्याचा प्रयत्न करत असतात. जगभरातील बहुतांश ठिकाणी विवाहसंस्था आहे."
"लोकांनी जमीन ताब्यात घेऊन त्यावर मालकी सांगायला सुरुवात केली, तेव्हा विवाह दृढ व्हायला लागले, कारण आपल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा व कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचा हा एक स्पष्ट मार्ग होता," असं मूअर्स म्हणतात.
"तेव्हापासून आपण एक जोडपं आणि भिन्नलिंगी व्यक्तीशी संबंध यांना प्राधान्य द्यायला लागलो."
एका जोडीदारापलीकडे जवळीक ठेवणं अधिक चांगलं असतं का?
एकविवाहित्वापलीकडे / एका जोडीदारापलीकडे जाणाऱ्या संबंधांबाबत होणाऱ्या संशोधनातून वारंवार असं दिसून आलं आहे की, भिन्न लैंगिक रुची असलेल्या जोडप्यांना अनेक लैंगिक जोडीदार असतील तर त्यांचं नातं अधिक चांगलं राहतं. "परंतु, अनेक जोडीदार असलेले लोक एकंदरितच अधिक समाधानी राहत असावेत. इतर लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्यात तुम्हाला रस असेल, तर तशा शक्यता पडताळणं स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं असू शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
एकविवाहित्वापलीकडे जाणाऱ्या संबंधांबाबत दीर्घ काळाचा अभ्यास मात्र झालेला नाही. आपले नातेसंबंध खुले करू पाहणाऱ्या लोकसमूहाचा काही वर्षं पाठपुरावा करून संशोधन झालेलं नाही. आपल्या जोडीदाराशी पहिलं संभाषण होण्याआधीपासून ते इतर संबंध सुरू झाल्यानंतरचा दीर्घ काळ, अशा व्याप्तीचा अभ्यास झालेला नाही.
परंतु, काही अभ्यास हा अभाव भरून काढत आहेत. एकविवाहित्वापलीकडे जाणाऱ्या संबंधांबाबत कुतूहल असलेले लोक आणि खुले संबंध ठेवण्याचा कधीच विचारही न केलेले लोक, यांच्याकडून त्यांच्या संबंधांबद्दल आणि लैंगिक समाधानाबद्दल प्रश्नावल्या भरून घेण्यात आल्या.
सुरुवातीला यापैकी कोणीच इतर लोकांशी खुले संबंध ठेवण्याबाबत आपल्या जोडीदाराशी चर्चा केली नव्हती. आपल्या प्रेमजीवनामध्ये आपण किती समाधानी आहात, असा प्रश्न शेवटी त्यांना पुन्हा विचारण्यात आला, पण त्याच वेळी त्यांनी आपल्या संबंधांबद्दल वाच्यता केली का, हेही नोंदवण्यास सांगण्यात आलं.
"खुले संबंध राखू इच्छिणाऱ्या लोकांपैकी ज्या लोकांना खरोखरच तसं करता आलं, त्यांचं समाधान बरंच जास्त होतं," असं लंडन, कॅनडा इथल्या वेस्टर्न विद्यापीठातील सामाजिक मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापिका समान्था जोएल म्हणतात. "दरम्यान, याबद्दल विचार करूनही प्रत्यक्षात तशी कृती करता न आलेल्यांचं समाधान खालावलं, पण खूप जास्त प्रमाणात नाही."
एकविवाहित्वापलीकडचे संबंध स्वीकारलेल्या लोकांमध्ये समाधानाची पातळी वाढली, ही रेंगाळणाऱ्या परिणामाची निष्पत्ती असू शकते. नंतरच्या जोडीदारासोबत चांगल्या गुणवत्तेचं लैंगिक जीवन अनुभवायला मिळाल्यामुळे पहिल्या जोडीदारासोबतचं समाधान रेंगाळत राहतं, कारण सर्व आनंद एकाच व्यक्तीने द्यायला हवा असा दबाव अचानकपणे बंद होतो.
"लोक त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत आनंदी असतील तर ते चांगला संवाद साधतात, हे आपण जाणतो," असं जोएल म्हणतात. "पण एकविवाहित्वापलीकडचे संबंध असलेले लोक खुला संवाद असल्याचं सांगतात- नात्यांमधील सीमारेषांबद्दल बोललं नाही तर असे संबंध टिकवणं अवघड असतं. तर, एकविवाहि जोडप्यांमध्ये सीमारेषांबद्दलच्या अशा चर्चा बहुतेकदा होत नाहीत."
सर्वसाधारण संबंधांमध्ये भावनिक समाधान- सुरक्षितता, संगोपन व जवळीक या भावना- सरत्या काळानुसार वाढत जातं. दरम्यान, लैंगिक आचरणाशी संबंधित उत्स्फूर्तता व उत्साह मावळत जातात.
"सुरुवातीला सेक्सी आणि स्टिमी वातावरण असतं, पण नंतर सगळं प्रेडिक्टेबल होऊन जातं," असं यॉर्क विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ ऱ्होंडा बाल्झरिनी सांगतात. "नवेपण टिकवून ठेवणं अवघड असतं, आणि त्यातूनच स्टिमी वातावरण रोडावत जातं."
या संदर्भात बाल्झरिनी एक उदाहरण देतात: कायदेशीर विवाह झालेल्या व्यक्तींना एकमेकांपासून मुलं असतात आणि एकविवाही जीवनाशी निगडीत जबाबदाऱ्याही त्यांना पार पाडायच्या असतात. यात असलेल्या विविध कामांमुळे काहीएक अनुमानक्षमता त्यात गरजेची असते, आणि ही गरज सेक्सी नसते, असं त्या म्हणतात. विवाहबाह्य जोडीदार कदाचित अशा जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्या सोबत नसेल, त्यामुळे तिथल्या नात्यात कदाचित कधीच उत्साहात घट होणार नाही. परिणामी, एकविवाहित्वाबाहेरच्या जोडीदारांसोबत कमी बांधिलकीसह अधिक वारंवार शारीरिक संबंध येण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
"सर्वसाधारणतः नवेपण आणि सुरक्षितता यांच्यात सतत रस्सीखेच सुरू असते, असं मला वाटतं. त्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या एकविवाहित्वाबाहेरच्या संबंधाची वाट चोखाळणं एकाच वेळी दोन्ही गरजा पूर्ण करू शकतं," असं जोएल म्हणतात. "हा एकमेव मार्ग नाही, पण हा एक मार्ग आहे आणि काही लोकांसाठी तो परिणामकारक ठरतो."
एकविवाहित्वापलीकडचे संबंध राखणाऱ्या लोकांची संख्या जितकी असेल तितक्या संख्येने अशा संबंधांच्या शक्यताही अस्तित्वात असतात. खाली दिलेल्या व्हीडिओमध्ये मुलाखत देणाऱ्या अनिता कॅसिडी त्यांचे असे संबंध कशा हाताळतात याबद्दल आणि त्यांचा जोडीदार स्वतःचे असे संबंध कसे हाताळतो याबद्दल बोलतात.
कॅसिडी त्यांच्या दोन मुलांसोबत राहतात आणि त्यांचे अनेक जोडीदार आहेत, ते आठवडाभर त्यांच्या घरी येत राहतात. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या व्हिडिओसाठी कॅसिडी यांची मुलाखत घेतली गेली होती, त्यामुळे आता सामाजिक अंतर किंवा विलगीकरण इत्यादींमुळे त्यांच्या जोडीदारांशी असलेल्या भेटीगाठींवर कदाचित मर्यादा आली असेल.
मत्सर कसा हाताळावा?
मूळ नात्यातील / विवाहातील जोडीदार एकमेकांच्या आनंदाला पाठबळ द्यायला तयार असतील, तर एकविवाहित्वापलीकडच्या नात्यांचे लाभ अधिक सक्षमपणे दिसतात, असं म्यूस सांगतात. "आपली जोडीदारीण लैंगिकदृष्ट्या समाधानी असावी असं वाटणं, पण ती आपल्यामुळेच समाधानी असण्याची गरज न वाटणं, यात काही प्राथमिक निकडीचा भाग असावा," असं त्या म्हणतात. "आपली जोडीदारीण किंवा आपला जोडीदार आपल्या आनंदाने अधिक प्रेरित झालेले असतील, तेव्हा आपल्या गरजा भागवणं त्यांना अधिक सुखाचं वाटतं."
यासाठी मानसशास्त्रामध्ये 'compersion' अशी संकल्पना वापरली जाते- दुसऱ्या व्यक्तीचं सुख पाहून स्वतः सुख अनुभवण्याचा यात समावेश होतो (परभावसुख). प्रेमसंबंधांबाहेरच्या अवकाशातही या संकल्पनेशी आपला परिचय असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, कोणीतरी भेटवस्तू उघडताना आपण पाहत आहोत, अशा प्रसंगाचा विचार करून पाहा. पण परभावसुख लैंगिक समाधानाच्या संदर्भातही लागू होतं.
तर, एकविवाहित्वापलीकडच्या संबंधांमध्ये असलेली जोडपी मत्सराच्या भावनेवर कशी मात करतात? पुरुषांना भावनिक व्यभिचारापेक्षा लैंगिक व्यभिचाराबाबत जास्त मत्सर वाटतो, असं हवाई पॅसिफिक विद्यापीठातील संशोधक कॅथरिन ऑमर व त्यांचे सह-लेखक लिहितात.
एकविवाही आणि एकविवाहित्वापलीकडे जाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या जोडप्यांमधील परभावसुखाचा अब्यास केला. आपल्या मुलांच्या पितृत्वाचा स्त्रोत कोणता हे जाणून घेण्याची स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त इच्छा असेल, तर हा प्रकार दिसतो, असं उत्क्रांतिनिष्ठ सिद्धान्त म्हणतो (फसवणुकीबाबत आपली कशी गफलत होते, त्याबद्दल अधिक वाचा). आपल्या मुलांच्या मातृत्वाचा स्त्रोत ओळखणं स्त्रियांसाठी फारसं गुंतागुंतीचं नसतं.
परंतु, भावनिक व्यभिचाराबाबत स्त्रियांना जास्त मत्सर वाटण्याची शक्यता असते, असं ऑमर म्हणतात. मूल वाढवण्याच्या उत्क्रांतिजन्य दबावांमुळे स्त्रियांना स्वतःचा पुरुष जोडीदार सोबत ठेवण्याची तीव्र प्रेरणा असते, जेणेकरून आपल्याला व आपण स्तनपान देत असताना आपल्या मुलांना अन्न व सुरक्षितता पुरवली जावं. संबंधित पुरुष भावनिकदृष्ट्या दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतल्याचं दिसत असेल, तर संबंधित मातेला त्याच्याकडून सर्वोत्तम गुणवत्तेचं अन्न, सुरक्षितता व निवारा मिळत नसण्याची शक्यता आहे.
एकविवाहित्व ओलांडणाऱ्या संबंधांची निवड लोक का करतात?
एकाच वेळी अनेक संबंध सांभाळण्याबाबत काही लोक इतरांहून अधिक चांगली कामगिरी करू शकतात, हे सिद्ध करणारा पुरावा आहे. सुरक्षिततेच्या किंवा असुरक्षिततेच्या आपल्या भावनांनी आपल्या संबंधांना कसा आकार येतो आणि काहींना स्वतःचा जोडीदार इतरांसोबत वाटून घेण्याची इच्छा कमी का असू शकते, हे ओढविषयक (अटॅचमेन्ट) सिद्धान्तामध्ये स्पष्ट केलेलं आहे (पूर्ववत स्थितीत येण्याबाबत ओढविषयक सिद्धान्त कोणता उलगडा करतो, ते अधिक वाचा).

फोटो स्रोत, Getty Images
इलिनॉय विद्यापीठातील ख्रिस फेली गेल्या दोन दशकांपासून एका ऑनलाइन प्रश्नावलीला प्रतिसादक देत असलेल्या उत्तरांमधून ओढीविषयीची माहिती गोळा करत आहेत. एकूण मिळून सुमारे दोन लाख लोकांनी ही चाचणी केली आहे, आणि इतर अनेक संशोधन विविध प्रकारच्या वर्तनांबाबतचे नियम स्पष्ट करण्यासाठी या माहितीसाठ्याचा उपयोग करतात.
या माहितीसाठ्याचा वापर करून मूअर्स म्हणतात की, अनेक संबंध असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत कमी चिंताग्रस्त ओढ वाटते व टाळण्याची ओढही त्यांच्यात कमी असते. परंतु, हा परस्परसंबंधित निष्कर्ष आहे, याकडे त्या लक्ष वेधतात. केवळ सुरक्षित, चिंताग्रस्त नसलेले, टाळाटाळ न करणारे लोकच अशा जीवनशैलीकडे आकर्षित होत असण्याचीही शक्यता आहे.
एकविवाहित्व ओलांडणारे संबंध राखणाऱ्या लोकांच्या भावनिक गरजा एका व्यक्तीकडून पूर्ण होत नाहीत, असं या लोकांच्या मानसशास्त्रीय अभ्यासातून सूचित होतं. "अनेक संबंध राखणाऱ्या लोकांच्या एकंदरच गरजा अधिक असू शकतात," असं बाल्झरिनी म्हणतात. "संगोपन व संभोगाच्या गरजांबाबत एकविवाहित्वामधले लोक समतोल स्थितीत असल्याचं आपल्याला दिसतं. पण बहुसंबंधी लोक उंचीवरची उंची गाठतात आणि तळाच्या तळातही जातात. दोन्ही गोष्टी एकाच वेळी हव्याशा वाटणारे लोक असू शकतात, पण एकाच जोडीदाराकडून तसा अनुभव मिळणं अवघड असतं. संगोपनकार्यात गुंतलेली मूळची जोडीदारीण किंवा जोडीदार संभोगाच्या बाबतीत तितकाच उत्साही असेल असं नाही."
तरीही, एकविवाहित्व ओलांडणारे संबंध राखणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वाबाबत ठोसपणे काही सांगणं शक्य नसल्याचं मूअर्स म्हणतात. वय, उत्पन्न, स्थान, शिक्षण, स्पर्धा, वांशिकता, धर्म किंवा राजकीय संलग्नता आणि एकविवाहित्व ओलांडणारे संबंध यांच्यात परस्परसंबंध असल्याचं आफल्या संशोधनातून दिसल्याचं त्या म्हणतात. समलिंगी किंवा उभयलिंगी अशी स्वतःची ओळख मानणारे लोक एकविवाहित्वापलीकडच्या संबंधांमध्ये जास्त गुंतण्याची शक्यता असते, पण हा केवळ एक आकृतिबंध आहे.
जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पसरल्यासारख्या वाटणाऱ्या या विषयाबाबत, एकविवाहित्वापलीकडच्या जीवनशैलीबाबत कायमचा कलंक चिकटलेला आहे. अशारीर किंवा कुटुंबीय प्रेम अमर्याद असल्याचा विचार किती स्वाभाविक मानला जातो, पण काही कारणाने आपण शारीर प्रेम मात्र मर्यादित मानतो, असा दाखला मूअर्स देतात. "अनेक लोकांशी घनिष्ठ मायेचे संबंध कसे राखायचे हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. पण शारीर प्रेम मर्यादित असल्याची आपली धारणा करवून दिली जाते. आपल्याला सर्वोत्तम शारीरिक जोडीदार किती लाभतात? असं बोलणंच हास्यास्पद ठरतं," असं त्या म्हणतात.
आपण आपल्या जोडीदारांकडून खूप अपेक्षा करतो. त्यांनी आपल्या जीवनाचं मार्गदर्शक असावं, घनिष्ठ मित्र असावं, गुपित सांगता येईल अशी जवळची व्यक्ती असावं अशा आपल्या अपेक्षा असतात. "या सगळ्या गोष्टीच एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील असं नाही," मूअर्स म्हणतात. कदाचित एकाहून अधिक व्यक्तींमध्ये आपल्या गरजा विभागल्या तर आपण अधिक चांगलं जीवन जगण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








