'जनतेच्या कष्टाच्या पैशातून तटकरेंसाठी हेलिपॅड? तेही चार?', अंजली दमानियांचा प्रश्न, नेमके प्रकरण काय?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आठवडाभरापूर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर येऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावरील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते.

मात्र, या दौऱ्यातील त्यांच्या एका खासगी भेटीनंतर आता वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाच्या निमित्ताने हेलिकॉप्टरमधून गेले. त्यानंतर हेलिपॅडचा हा वाद समोर आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या पैशातून तटकरेंसाठी हेलिपॅड तयार केल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

तर, विरोधी पक्षांकडूनही याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सुनील तटकरे यांनी मात्र याबाबत फार बोलणं टाळलं आहे. पण प्रोटोकॉल आणि सुरक्षेची व्यवस्था असते, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर पार पडलेल्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.

यावेळी विविध कार्यक्रमांसह केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगड येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली.

तसंच अन्य काही कार्यक्रम पार पडल्यानंतर अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, अशी माहिती आहे.

त्यानुसार हेलिकॉप्टरनं अमित शाह सुतारवाडी याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सुनील तटकरे यांच्या घरी भेट झाली.

या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल होता, अशी माहिती सुनील तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली होती.

या दौऱ्याच्या पूर्वीच सुतारवाडीत हेलिपॅड नव्हते, अशी माहिती स्थानिक पत्रकाराने दिली आहे. तसंच या हेलिपॅडपासून तटकरे यांचं घर अगदी जवळ असल्याचीही माहिती मिळाली.

'खर्च जनतेच्या खिशातून का?'

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेलिपॅडच्या मुद्यावरून काही प्रश्न उपस्थित केले.

अंजली दमानिया यांनी एका वर्तमानपत्रातील जाहिरातीचं कात्रण शेअर करत म्हटलं की, "अमित शहांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शहांना जेवायला घालायचंय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानीया यांनी पोस्ट कात्रणात,"रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात 'कन्स्ट्रक्शन ऑफ 4 युनिट हेलिपॅड' अशा कामाचा उल्लेख आहे. यासाठी अंदाजे खर्च 1 कोटी 39 लाख 115 रुपये असा दाखवण्यात आला आहे.'

अंजली दमानियांनी याबाबत आरोप करताना म्हटलं की, "तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय," असंही त्यांनी म्हटलंय.

तर जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.

ते म्हणतात, "अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनील तटकरेंच्या सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती. सदर ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते. निविदा महाड सां.बा. विभागाने काढली.

अंदाजे किंमत 1 करोड 39 लाख एवढी. म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा. काय गरज आहे या अशा जेवणाची? आता या जेवणाचा खर्च सामान्याच्या खिशातून भाव वाढ करून काढतील हे सरकार. अजब गजब सरकार. एका जेवणाचा खर्च."

"एकीकडे वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी नागरीक आपला जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळच्या जेवणासाठी यजमानांच्या जाण्यासाठी हेलिपॅडसाठी 1 कोटी 39 लाख रूपये खर्च केला‌ जात आहे?"

"हेलीपॅड जिथे बांधले ती जागा कुठे आणि कोणाची? की कारण देऊन लँडिंगची कायमची सोय करून घेतली घरा जवळ यजमानांनी. आणि हो, टेंडर उघडणार होते 16 तारखेला. जेवण होते 12 तारखेला.

म्हणजे हेलिपॅडच्या कामाचा आणि टेंडरचा काय संबंध. काम तर आधीच झाले होते आता बिलाचे काय?" असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. या कार्यक्रमाची माहिती माहितीच्या आधिकारात मागवल्याचं त्या सांगतात.

नंदा म्हात्रे यांनी पत्रात लिहिलं की, "12 एप्रिल 2025 रोजी रायगडावर झालेल्या मुख्य कार्यक्रमानंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रायगडचे खासदार मा.सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दुपारचे जेवण घेण्यासाठी गेले.

कार्यक्रम स्थळापासून सदर ठिकाणी हेलिकॉप्टरमधून‌ गेल्याने व सदर ठिकाणी हेलिपॅड नसल्याने केवळ जेवणासाठी हेलिकॉप्टरमधून जाणाऱ्या पाहुण्यांना उतरण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले होते. त्याची निविदा महाड सां.बा. विभागाने काढली अंदाजे किंमत 1 करोड 39 लाख एवढी असल्याचे समजते.

म्हणजे एका जेवणावर एवढा खर्च करण्यात आला असं म्हणल‌ तर वावगं ठरणार नाही."

"वास्तविक पाहता रायगड किल्ल्यापासुन 48 किमी अंतरावरील सुतारवाडी ह्या ठिकाणी जाण्यासाठी मोटारीने अंदाजे 40-50 मिनिटे इतका वेळ लागला असता.

पण तसं न करता प्रशासनानं हेलिपॅडचा घाट घातला. ही बाब मा . मंत्री महोदयांना माहिती असती तर त्यांनी स्वतः च मोटारीने जाणे पसंद केले असते. कारण मा.अमित शहा यांनी पक्षाच्या‌ अनेक रोड शोमध्ये तासंतास उभं राहून‌ प्रचार‌‌ केला आहे.

नेत्यांना एका वेळच्या जेवणासाठी इतका खर्च करणे कधीच आवडणार नाही असा विश्वास आहे, तरी सदर खर्चाची त्यांना कल्पना देणं आवश्यक होतं. निश्चितच त्यांनी कधीही अशा वायफळ खर्चास संमती दिलीच नसती.

महोदय ,आपल्या रायगड जिल्ह्यातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. कित्येक शाळा रूग्णालये , रस्ते नादुरुस्त आहेत ज्यावर खर्च करण्यासाठी जिल्ह्याकडे निधी नाही. रायगड जिल्ह्यात सुमारे 676 आदिवासी वाड्या आहेत, त्यातील 181 वाड्यांवर जायला आजही कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थ कित्येक मैल पायपीट करतात," असंही म्हात्रे यांनी या पत्रात लिहिलं आहे.

सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

यासंदर्भात आम्ही खासदार सुनील तटकरे यांना संपर्क साधला. ते म्हणाले की, "मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. पण देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल असतो. सुरक्षेच्यादृष्टीनेही व्यवस्था असते."

दरम्यान,12 एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाचे कव्हरेज करणाऱ्यांमद्ये रायगडचे ज्येष्ठ पत्रकार हर्षद कशाळकर यांचाही समावेश होता.

कशाळकर म्हणाले की, "रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा आणि त्यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुतारवाडी येथे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी रवाना झाले. सुतारवाडी जवळ यापूर्वी हेलिपॅड नव्हता. आता हेलिपॅड तयार करण्यात आला आहे.

रायगड किल्ला ते सुतारवाडी हे अंतर रस्ते मार्गाने साधारण 1 तासाचे आहे. तर तयार केलेल्या हेलिपॅडपासून सुनील तटकरे यांचे निवासस्थान काही मीटर अंतरावर असेल. यासंदर्भात इतर अधिकारी कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत," असंही ते म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.