You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जातीय हिंसाचाराने होरपळलेल्या परभणीत आंबेडकर जयंतीचा दिवस कसा होता? - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"यावर्षीची जयंती अजून मोठी करणार. आमच्या बापाची जयंती एवढी दणक्यात करणार की आमच्यावर ज्यांनी ज्यांनी अत्याचार केले, त्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. मी 10 वर्षांचा असल्यापासून इथल्या जयंतीला येतो, पण यंदा माहोल वेगळा आहे, आमच्या मनात राग आहे, आमच्या मनात संताप आहे, आमच्या सोमनाथचा जीव गेला आहे," परभणीतल्या एका दलित वस्तीत राहणारा 24 वर्षांचा अक्षय नंद सांगत होता.
10 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 या सहा दिवसांमध्ये परभणीत झालेल्या हिंसाचार आणि त्यानंतरच्या पोलीस कारवाईमध्ये अक्षयवर गुन्हा दाखल झाला आहे.
आजपासून बरोब्बर चार महिन्यांपूर्वी सोमनाथ सूर्यवंशी या तरुण आंबेडकरी कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.
संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यामुळे परभणीत झालेला निषेध मोर्चा, त्यानंतरचा हिंसाचार आणि मग पोलिसांनी परभणीतल्या वेगवेगळ्या दलित वस्त्यांमध्ये घुसून केलेली कारवाई या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाची परभणीतली आंबेडकर जयंती नेमकी कशी होणार? हा प्रश्न मला पडला होता.
सोशल मीडियावर काही जणांनी ही जयंती डीजेविना, साधेपणाने साजरी करून सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूबाबत निषेध करण्याचा प्रस्तावही ठेवला होता.
पण अक्षय नंद म्हणतो, "सोमनाथ आणि वाकोडे बाबांच्या मृत्यूचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे. पण बाबासाहेबांचा वाढदिवस हा आमच्यासाठी फक्त एखादा उपक्रम नाही तर तो एक मोठा सण आहे. ही जयंती दणक्यात साजरी करून आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करणार आहोत."
चार महिन्यांपूर्वी जातीय दंगलीने होरपळलेलं हे शहर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला सज्ज झालं होतं.
ठिकठिकाणी बाबासाहेबांचे मोठमोठे पोस्टर्स, संपूर्ण शहरभर लावलेले निळे झेंडे, गळ्यात निळा रुमाल आणि निळा गंध लावून, नवीन कपडे नेसून फिरणारे तरुण, दलित वस्त्यांमध्ये पांढऱ्या साड्या आणि दागदागिने घालून बसलेल्या महिला असं सगळं चित्र होतं.
वरकरणी पाहता आनंदाचं वातावरण दिसत असलं तरी प्रत्यक्ष वातावरणात एकप्रकारची अस्वस्थता आहे हे सतत जाणवत होतं.
'मला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय'
परभणीतल्या प्रियदर्शिनी नगरमध्ये राहणाऱ्या वत्सलाबाई मानवते यांच्याशी आम्ही याआधी देखील बोललो होतो. पण जयंतीच्या निमित्ताने त्यांची पुन्हा एकदा भेट घ्यावी असं ठरलं आणि आम्ही थेट त्यांच्या घरी गेलो.
आम्ही तिथे गेल्यानंतर वत्सलाबाई लंगडत आम्हाला भेटायला आल्या. जातीय हिंसाचारानंतर झालेल्या कारवाईत पोलिसांनी त्यांना प्रचंड मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दंगलीची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, "त्यादिवशी इथं घरासमोर पोलीस आले. पोलीस आमच्या गल्लीतल्या पुरुषांना इथं मैदानात आणून बेदम मारहाण करत होते. मी नुकतीच झोपेतून उठले होते आणि मला त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. बाहेर जाऊन बघितलं तर प्रचंड मारहाण होत होती. मी माझ्या मोबाईलने ते सगळं शूट करत होते. शूट करत असताना कुणीतरी मला पाहिलं आणि दुसऱ्या सेकंदाला पोलिसांची गाडी माझ्या घरासमोर येऊन उभी राहिली.
"पोलिसांनी माझे केस धरून मला गाडीजवळ नेलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. तिथे दोन महिला पोलिसही होत्या. पण पुरुष पोलीस जास्त मारत होते. पोलिसांनी रिंगण करून मला मारलं, माझे केस धरून उपटले आणि मला गाडीत घालून नवीन मोंढा पोलीस चौकीत घेऊन गेले. मी त्यांना म्हणत होते की साहेब मी गाऊनवर आहे, मी नेमका काय गुन्हा केलाय? मला तुम्ही का मारताय?
"मी जेवढे प्रश्न विचारायचे पोलीस मला तेवढंच मारायचे. त्या दिवशी मी जगेन असं वाटलं नव्हतं. पोलीस मला उड्या मारायला सांगायचे, उड्या नाही मारल्या तर त्यांच्याकडच्या सुंदरीने (चामड्याच्या पट्ट्याने) पायावर फटके द्यायचे. मला बाथरूमला जायचं होतं, पण पोलिसांनी जाऊ दिलं नाही, त्यादिवशी मारहाण होत असतानाच मला बाथरूम (लघवी) झाली, सगळे पोलीस तिथं होते."
वत्सलाबाई अचानक धाय मोकलून रडायला लागल्या आणि म्हणाल्या, "आज बाबासाहेबांची जयंती आहे पण मला चालताच येईना. जमिनीवर पाय ठेवला की त्यांनी मारलेले फटके आठवतात. अजूनही वाईट स्वप्नं येतात, रात्री अचानक दचकून उठते. मला त्यादिवशी का मारलं? या एकाच प्रश्नाचं उत्तर मी गेली चार महिने शोधते आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माझ्याबाबत 'मी पोलिसांना मारलं, मी हायपर अग्रेसिव्ह (अति आक्रमक) होते अशी खोटी विधानं केली. त्यांनी हे बोललेलं मागे घ्यायला पाहिजे. चार महिने झाले मी ओरडते आहे, न्याय मागते आहे, तुमच्यासारख्या पत्रकारांना नेमकं काय घडलं सांगते आहे पण काहीही होत नाहीये."
वत्सलाबाई मानवते यांनी न्यायालयाच्या मार्फत पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 मे रोजी होणार आहे.
'आमच्या हक्कासाठी बोलत राहणारच'
खरंतर 14 एप्रिल हा दिवस या देशातील कोट्यवधी एखाद्या उत्सवासारखा असतो.
यादिवशी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते, घरी गोडधोड बनवलं जातं, दिवसभर त्या त्या शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन केलं जातं आणि मग संध्याकाळी निघणाऱ्या मिरवणुकीत दोन वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या माणसापर्यंत प्रत्येकजण सहभागी होतो, बेधुंद होऊन नाचतो, गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा, अस्पृश्यता संपल्याचा उत्सव साजरा करतो. परभणी देखील त्याला अपवाद नव्हतं.
अक्षय नंद म्हणाला, "साहेब आमच्या हक्क अधिकारासाठी लढणं चूक आहे का? बाबासाहेबांनी समाजासाठी जे केलं त्याचा एक छोटा भाग होता यावं, पुढे जाऊन समाजकार्य करता यावं म्हणून मी एमएसडब्ल्यूचं (मास्टर ऑफ सोशल वर्क) शिक्षण घेतलंय. पण आता माझ्यावर गुन्हा दाखल झालाय. पुढं नोकरी मिळेल, काय होईल काहीच सांगता येत नाही."
"त्यादिवशी (10 डिसेंबर) संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर आम्ही सकाळी आंदोलन केलं होतं. आंदोलनात मी घोषणा दिल्या, जोरजोरात ओरडलो, आम्ही सगळ्या मित्रांनी एका बाजूचा रस्ता देखील अडवला होता. पण त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो. परभणीच्या मुख्य वस्तीत तोडफोड झाल्याचं आम्हाला कळलं. पण आम्ही काही केलंच नव्हतं तर आम्ही कशाला घाबरू? पण संध्याकाळी पोलिसांची गाडी आली, मी इथल्याच एका मेडिकलवर गोळ्या घेत होतो. पोलीस आले आणि त्यांनी माझ्या मानगुटीला धरून गाडीत बसवलं. पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला," अक्षय नंद सांगत होता.
अक्षय पुढे सांगतो, "माझ्याकडं बघा, तुम्हाला वाटतं मी तोडफोड करू शकेन? मी खरंच काही केलं नव्हतं हो पण घोषणा नक्की दिल्या होत्या आणि देत राहणार. आम्हाला माणसात आणणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यावर आम्ही शांत बसायचं का?"
अक्षय आणि त्याच्यासारख्या शेकडो तरुणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी शपथपत्रावर त्यांची सुटका केली असली तरी आता सुनावण्यांच्या तारखा, त्या तारखांना हजेरी या चक्रात ही सगळी तरुण मुलं अडकली आहेत.
'ते चार दिवस आयुष्यात कधीच विसरू शकत नाही'
सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी आणि आई विजया सूर्यवंशी हे त्यांच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या मूळ गावी गेले आहेत. आम्ही फोनवरून त्यांच्याशी बोललो.
प्रेमनाथ म्हणाला, "भाऊ गेल्याच दुःख तर आम्हाला, सर्व कुटुंबाला आहे. पण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आज सन्मानाने जगतोय त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाजत गाजत आणि जल्लोषात साजरी झालीच पाहिजे. आम्ही आतापर्यंत जयंतीचा आनंद घेत आलोय आणि यापुढेही घेत राहणार."
10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या ज्या प्रतिमेची नासधूस झाली ती प्रतिमा पुन्हा एकदा बसवण्यात आली आहे.
या प्रतिमेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तिथे गर्दी जमली होती. याच गर्दीत आम्हाला अर्जुन पंडित भेटले. ते एका आंबेडकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.
चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांबाबत सांगताना अर्जुन पंडित म्हणाले, "सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू आणि त्यानंतर आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण शहर दुःखात होतं. त्यामुळे यंदाची जयंती डीजेविना साजरी करावी, साधेपणाने साजरी करून त्या घटनेचा निषेध करावा असं मला वाटत होतं. पण बाबासाहेबांचा जन्मदिन हा आमच्यासाठी दिवाळीसारखा आहे. हजारो लोकांसाठी वर्षातला तो एकच आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे मग मी फार काही बोललो नाही.
"ते चार दिवस भयानक होते. पोलिसांनी शहराच्या चारही कोपऱ्यात असणाऱ्या दलित वस्त्यांमधून आंबेडकरी तरुणांची धरपकड केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पण हरकत नाही आम्ही असेच लढत राहणार आहोत, बाबासाहेबांना, त्यांनी लिहिलेल्या संविधानाला धोका होत असेल तर आम्ही बघत राहणार का? पण त्या चार दिवसात जे घडलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. प्रचंड अन्याय झाला."
जिथे दंगल झाली तिथे कसं वातावरण आहे?
अर्जुन पंडित यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष हिंसाचार ज्या भागात झाला तिथे गेलो. तिथल्या रस्त्याच्या कडेला अजूनही त्यादिवशी जाळण्यात आलेल्या टायर आणि रबरी पाईप्सचे तुकडे पडले होते. शहर पूर्ववत झालं तरी झालेल्या हिंसाचाराच्या खाणाखुणा अजूनही दिसत होत्या.
तिथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि नव्याने बसवण्यात आलेली संविधानाची प्रत होती. तिथे मात्र जयंतीचा उत्साह दिसत होता. पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते, बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात होतं.
आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नवीन गाडी गाडीची खरेदी केलेला एक तरुण सांगत होता, "लोक पाडव्याला, दिवाळीला नवीन गाडी खरेदी करतात. आमच्यासाठी हीच दिवाळी आणि हाच पाडवा. मी नवीन गाडी घेतली तर ती आधी बाबासाहेबांना दाखवावी म्हणून इथे घेऊन आलो आहे. शेवटी आज आमच्याकडे जे काही आहे ते त्यांच्यामुळंच आहे ना."
संध्याकाळी निघालेल्या मिरवणुकीत संविधानाची झालेली विटंबना, बिहारमध्ये महाबोधी मंदिरासाठी सुरु असलेलं आंदोलन अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरचे देखावे तयार करण्यात आले होते.
सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे?
8 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी या उपस्थित होत्या.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबियांकडून उच्च न्यालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.
त्याआधी मानवाधिकार आयोगात देखील या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाचा संदर्भ देत, ही सुनावणी पार पडली आहे. मानवाधिकार आयोगाच्या सुनावणीत सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीतील नवामोंढा पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला.
या प्रकरणी आयोगानं महाराष्ट्राचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त सचिव, सीआयडीचे (गुन्हे शाखा) अतिरिक्त पोलीस महासंचालक, पुणे उप पोलीस अधीक्षक, परभणी सीआयडी यांना नोटीस बजावली आहे. तसेच, त्यांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
23 जून 2025 रोजी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. एम. बदर आणि सदस्य संजय कुमार याप्रकरणी पुढील सुनावणी घेणार आहेत.
जयंती आणि मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी परभणीत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.
पोलिसांनी सध्या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.
मात्र, जातीय हिंसाचाराने होरपळलेल्या परभणीत आता पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक कमालीचं अंतर पडलेलं दिसून आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)