You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नक्षलविरोधी कारवाईत पोलिसांना आणखी यश, आंध्र प्रदेशात झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार
आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सितारामराजु जिल्ह्यात आज (19 नोव्हेंबर) पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या आणखी एका चकमकीत मेट्टुरी योगा राव उर्फ टेक शंकर याच्यासह 7 जण ठार झाल्याची माहिती आहे.
मेट्टुरी योगा राव उर्फ 'टेक शंकर' हा टेक एक्सपर्ट होता.
ही चकमक जेथे झाली ते ठिकाण मरेदुमिल्लीपासून सुमारे 20 किमीवर असून काल (18 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीच्या ठिकाणापासून अंदाजे 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे.
मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) महेश चंद्र लड्डा यांच्या माहितीनुसार, टेक शंकर हा सीसीएम पदावर होता आणि एओबी इन्चार्ज म्हणूनही काम पाहत होता.
देव जी याचाही मृतांमध्ये समावेश असू शकतो, अशीही माहिती माहिती समोर येत आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी मरेदुमिल्ली मंडलच्या जंगलात पोलीस आणि नक्षल्यात झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार झाले, ज्यात मडावी हिडमा आणि त्याची पत्नी राजे यांचा समावेश होता.
हिडमा : ज्यानं माओवाद्यांच्या लढण्याची पद्धतच बदलून टाकली
आंध्र प्रदेशामधील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात मंगळवारी (18 नोव्हेंबर) पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली.
या चकमकीत वरिष्ठ माओवादी नेता मडावी हिडमा याच्यासह सहा माओवादी ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमध्ये गेल्या काही काळापासून दबाव वाढत असल्याने तेथील काही वरिष्ठ माओवादी नेते आंध्र प्रदेशच्या जंगलात घुसण्याचा प्रयत्नात आहेत.
ते इथे आपलं आंदोलन पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाल्याचं आंध्र प्रदेशातील गुप्तचर विभागाचे प्रमुख महेश चंद्र लड्डा यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवरच मंगळवारी सकाळी सुमारे 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मरेदुमिल्ली मंडलातील जंगलात ही चकमक झाली.
या चकमकीत सहा माओवादी मारले गेले असून त्यात मडावी हिडमा आणि त्याची पत्नी राजे यांचाही समावेश असल्याचं महेश चंद्र लड्डा यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, आंध्र प्रदेशचे डीजीपी हरीश कुमार गुप्ता यांनीही सांगितले होतं की, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली आहे.
कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं.
हिडमा कोण होता?
सडपातळ दिसणारा हा माओवादी नेता सुमारे दहा वर्षांपासून दंडकारण्यात सर्वाधिक पोलिसांच्या मृत्यूंना कारण ठरल्याचं सांगितलं जातं.
1996-97 च्या सुमारास अवघ्या 17 वर्षांचा असताना मडावी हिडमा माओवादी संघटनेत सामील झाला. त्याला हिडमल्लू आणि संतोष या नावांनीही ओळखलं जात.
दक्षिण बस्तरमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्थी हे हिडमाचं गाव आहे. या गावातील 40 ते 50 जण माओवादी असल्याचा अंदाज आहे.
संघटनेत येण्यापूर्वी हिडमा शेती करत होता.
हिडमा जास्त बोलणाऱ्यांपैकी नव्हता, पण नवं काही शिकायची त्याला खूप आवड होती.
त्यामुळे माओवादी पक्षासोबत काम करणाऱ्या एका व्याख्यात्याकडून त्याने इंग्रजीही शिकून घेतलं होतं.
हिंदी त्याची मातृभाषा नसली तरी त्याने ती उत्साहाने शिकली. मात्र त्याचं शिक्षण फक्त सातवीपर्यंतच झालं होतं.
"सुमारे 2000 च्या आसपास हिडमाला माओवादी संघटनेच्या शस्त्रनिर्मिती विभागात ठेवण्यात आलं होतं. तिथेही त्याने नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता दाखवली, असं सांगितलं जातं.
तो शस्त्रं बनवणे, दुरुस्ती करणे ही कामं करायचा. ग्रेनेड, लाँचर यांसारखी अनेक शस्त्रं त्याने स्थानिक पातळीवर तयार करून घेतली," अशी माहिती माओवादी संघटनेच्या एका माजी सदस्याने यापूर्वी बीबीसीला दिली होती.
दलातील महत्त्वाचा नेता
2001-02 च्या सुमारास हिडमा दक्षिण बस्तर जिल्ह्यातील माओवादी पलटणीत पुढे आला. नंतर तो माओवादी संघटनेच्या सशस्त्र विभागात पीएलजीएमध्ये (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) सामील झाला.
2001 ते 2007 दरम्यान हिडमा एक साधा माओवादी सदस्य म्हणूनच काम करत होता.
परंतु, बस्तरमधील सलवा जुडुम आंदोलन वाढताच, हिडमा अधिक सक्रिय झाला, असं माओवादी हालचालींचा अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात.
2007 च्या मार्च महिन्यात उरपल मेट्टा भागात पोलिसांवर हल्ला झाला होता. यात 24 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला. हा हल्ला हिडमाच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
माओवाद्यांना शस्त्रसज्ज करण्यात म्हणजेच स्फोटकांपासून बंदुकांकडे वळण्यात हिडमाची भूमिका मोठी होती, असं मानलं जातं.
"खरं तर हिडमाचा आक्रमक स्वभाव संघटनेच्या नेत्यांनाही आश्चर्यचकित करायचा. पुढेही त्याने तोच वेग आणि आक्रमकपणा ठेवला. त्यामुळेच संघटना त्याला मोठ्या जबाबदाऱ्या देत राहिली," असं एका माजी महिला माओवादीने यापूर्वी बीबीसीला सांगितलं होतं.
2008-09 च्या सुमारास माओवादी संघटनेने तयार केलेल्या 'फर्स्ट बटालियन'चा कमांडर म्हणून हिडमाची नियुक्ती झाली. ही फर्स्ट बटालियन बस्तर भागातील सर्वात सक्रिय मानली जाते.
नंतर 2011 मध्ये हिडमाला दंडकारण्याच्या स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं.
2010 एप्रिलमध्ये झालेल्या ताडीमेटला घटनेत 76 पोलिसांचा मृत्यू झाला. 2017 मार्चमध्ये 12 सीआरपीएफ पोलीस ठार झाले. या दोन्ही घटनांमध्ये हिडमाची भूमिका असल्याचे बोलले जाते.
'शस्त्र हातात घेणं दुर्मिळ'
2011 मध्ये माओवादी संघटनेत हिडमाबद्दल एक रोचक चर्चा झाली होती, असं त्या वेळी संघटनेत असलेल्या आणि नंतर बाहेर पडलेल्या एका माओवाद्याने सांगितलं.
"ही चर्चा हिडमाच्या लढण्याच्या पद्धतीबद्दल होती. हिडमा अनेक चकमकीत प्रत्यक्ष सामील झाला, पण तो स्वतः क्वचितच गोळीबारामध्ये सहभागी होत असत. त्याऐवजी तो माओवाद्यांना मार्गदर्शन करायचा."
"खूप गरज पडली तरच तो स्वतःजवळची बंदूक वापरायचा. त्याच्या नेतृत्वातील पथक मात्र खूप चपळ आणि सक्रिय असायचं. तरीही तो चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहत नसत. तो जवळच उभा राहून सर्वांना मार्गदर्शन करायचा," असं त्या माजी माओवादीने हिडमाबद्दल सांगितलं.
"आणखी आश्चर्य म्हणजे, 2012 पर्यंत हिडमाला एक छोटी जखमसुद्धा झाली नव्हती. हजारो गोळ्या झाडल्या जाणाऱ्या चकमकींमध्ये तो असायचा, तरीही किरकोळ जखमही न होणं हे खूप विचित्र आहे. 2012 नंतर त्याला काही जखमा झाल्या की नाहीत याची मला माहिती नाही," असं त्या माजी माओवाद्याने बीबीसीला सांगितलं.
स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेता
"हिडमा बस्तरचा स्थानिक रहिवासी आहे. तो त्या भागातील आदिवासी समुदायाचा सदस्य आहे. तो स्थानिक लोकांमध्ये मिसळतो, त्यांच्याशी त्याचे चांगले संबंध ठेवतो. तरुणांमध्ये त्याची मोठी लोकप्रियता आहे. लोक त्याला देवासारखं मानतात," असं दंडकारण्याचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने बीबीसीला सांगितलं.
"तो कोणाचंही म्हणणं नीट ऐकतो आणि नोट्सही काढतो, ही त्याची सवय आहे," असं हिडमाबद्दल सांगितलं जातं.
"हिडमाला परदेशात प्रशिक्षण देण्यात आलं होतं असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्या माहितीनुसार, त्याने कधीही कोणतंही मोठं शहर पाहिलेलं नाही. तो कदाचित बस्तर आणि दंडकारण्य पलीकडे गेला नसेल. हिडमाने मुख्य रस्त्यांवरून प्रवास केल्याची कोणतीही नोंद नाही," असंही ते पुढे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)