You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जे. जे. रुग्णालयात महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, डॉक्टर संघटना आक्रमक; नक्की प्रकरण काय?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने एनआयसीयू विभागाच्या साईड रूममध्ये औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
वेळीच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या निवासी डॉक्टरशी विभागप्रमुख आणि पीजी गाईड डॉ. बेला वर्मा यांच्याकडून छळ व भेदभाव होत होता, असा आरोप निवासी डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात केला. तसेच विभाग प्रमुखांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
दुसरीकडे विभागप्रमुख वर्मा यांनी ही तक्रार खोटी आणि द्वेषपूर्ण असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात रुग्णालय स्तरावरील एक समिती आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या समितींचा समावेश आहे. तसेच जे जे पोलीस देखील याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
समित्यांचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतरच आत्महत्येचे नेमके आणि सविस्तर कारण कळू शकेल अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या प्रशासनाने देण्यात आली.
दरम्यान, जे जे रुग्णालयात गेल्या वर्षभरात आत्महत्येच्या काही घटना समोर आल्यामुळे राज्यभरातील डॉक्टर्सनी रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित करत आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली आहे.
डॉक्टरांनी या घटनेसंदर्भात बाल रोग विभागाच्या विभागप्रमुख दोषी असल्याचं म्हणत रुग्णालय प्रशासनासह आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.
जे. जे. रुग्णालयातील महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण नक्की काय?
जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आणि केलेल्या तक्रारीनुसार रुग्णालयातील बालरोग विभागाचे निवासी डॉक्टरांनी एक निवेदन जारी करत या आत्महत्येच्या घटनेची माहिती दिली.
त्यानुसार, 16 जुलै 2025 रोजी दुपारी अडीच ते तीन दरम्यान ही घटना घडली. रुग्णालयात सर्व विभागात दैनंदिन सर्व काम सुरू होतं.
जे. जे. रुग्णालयात बालरोग विभागातील तिसऱ्या वर्षातील 28 वर्षीय निवासी डॉक्टर, आमची जवळची मैत्रीण आणि बॅचमेट आहे. तिने औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या डॉक्टर स्वतः बालरोग विभागात ड्युटीवर होत्या. दुपारी त्या सकाळपासून ड्युटीवर असताना सहकाऱ्यांना दिसून आल्या नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांनी साईड रूममध्ये त्यांची चौकशी केली असता तिथे त्या आढळल्या.
या घटनेबाबत कळताच सहकारी डॉक्टरांनी त्यांना तातडीने कॅज्युअल्टीमध्ये दाखल करत उपचार केले.
यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरच्या कुटुंबीयांना कळवले. तसेच या प्रकरणी जे. जे. पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद केली.
रुग्णालय प्रशासनातील विभाग प्रमुखांच्या त्रासामुळे या महिला डॉक्टरने हा प्रकार केल्याचं सहकारी डॉक्टरांचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर जे जे रुग्णालयातील डॉक्टर आणि महाराष्ट्रातील डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या आहेत.
टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
यासंदर्भात निवासी डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, "आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या निवासी डॉक्टरवर विभागप्रमुख आणि पीजी गाईड डॉ. बेला वर्मा यांच्याकडून प्रचंड छळ व भेदभाव होत होता."
"रेसिडेन्सीच्या सुरुवातीपासूनच तिला क्षुल्लक कारणांवरून सतत त्रास देण्यात आला आणि रुग्णांच्या नातेवाईकांसमोर तिचा अपमान करण्यात आला. हे मानसिक शोषण इतकं वाढलं की, तिला सहन झालं नाही. तिने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. तिला अनेकवेळा असहाय्य, नैराश्यग्रस्त वाटत होतं."
"गेल्या तीन महिन्यांपासून हा छळ अधिकच वाढला. तिला पदव्युत्तर परीक्षेला बसू दिलं जाणार नाही अशी धमकी देण्यात आली. यानंतर पीडित डॉक्टरनं विभाग प्रमुखांना मेसेज करत मानसिक स्थितीबाबत माहिती दिली. तसेच हे तिचं शेवटचं मदतीचं आवाहन आहे आणि ती आपलं जीवन संपवण्याचा विचार करत आहे हे सांगितलं."
"दुर्दैवाने तिच्या या मेसेजकडे दुर्लक्ष करण्यात आलं. विभाग प्रमुखांकडून पीडित डॉक्टरला कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला," असं रुग्णालयातील डॉक्टरांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"ही घटना फक्त पुढे आलेली आहे. या विभागात वर्षानुवर्षे निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या मानसिक छळाचा, अपमानाचा आणि भेदभावाचा प्रकार आहे. आम्ही हे सर्व आजवर सहन केलं. कारण आम्हाला प्रतिकाराची भीती वाटत होती, पण आता हे खूपच झालं आहे. आमचं जीवन जर यांच्या अहंकारापेक्षा कमी महत्त्वाचं समजलं जात असेल, तर हे मनाला खोलवर बोचणारं आहे," असं डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं.
शासनाने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या घटने संदर्भात डॉक्टरांच्या मार्ड संघटनेचे जे. जे. हॉस्पिटलचे अध्यक्ष महेश तिडके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "झालेल्या दुर्दैवी घटनेचा मी तीव्र निषेध करतो. या पार्श्वभूमीवर, आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार सादर केली असून चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे."
"बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांना न्याय व योग्य वागणूक मिळावी यासाठी आम्ही प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत. आम्ही आमच्या निवासी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शासनाने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी करावी, अशी आमची नम्र विनंती आहे."
पुढे तिडके म्हणाले, "रुग्णालयात काम करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक डॉक्टरसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि सहकार्यपूर्ण वातावरण असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, ही आमची स्पष्ट मागणी आहे."
विभाग प्रमुखांच्या निलंबनाची मागणी
जे. जे. रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी याची दखल घेत आवाज उठवला आहे. जे. जे. रुग्णालयातील हा प्रकार ज्या बालरोग विभागात घडला त्या विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी सध्या रुग्णालयात आंदोलन करत आहेत.
तर मार्ड डॉक्टर संघटनेने तसेच एमएसआरडीए संघटनेने याप्रकरणी संबंधित विभाग प्रमुख डॉक्टरांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी केली आहे.
या घटने संदर्भात जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आमच्या स्तरावर जी कार्यवाही करायची होती, ती आम्ही केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय स्तरावर एक आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने एक अशा दोन स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत."
"अधिक तपास अजून सुरू आहे. याबाबत सविस्तर आणि अंतिम निर्णय लवकरच येईल. डॉक्टरांच्या मागणीनुसार या विभागाच्या प्रमुखपदी दुसरी नियुक्ती करण्यात आलेली आहे."
पुढे भंडारवार म्हणाले की, प्राथमिक चौकशीनुसार थिसिस सबमिशन यावरून महिला डॉक्टरने स्वाक्षरी न झाल्याने हा प्रकार केल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. दोन्ही बाजू जाणून याबाबत समिती सविस्तर निर्णय देईल.
'तक्रार खोटी, द्वेषपूर्ण, माझी प्रतिमा खराब करणारी'
यासंदर्भात ज्या विभाग प्रमुखांवर आरोप होत आहेत त्या डॉ. बेला वर्मा यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला.
त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "माझ्याविरुद्ध केलेली तक्रार खोटी, द्वेषपूर्ण आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा आणि माझ्या कारकिर्दीला नुकसान करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे. मी निवासी डॉक्टरांना हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडण्यासाठी काहीही केलेलं नाही."
वर्मा पुढे म्हणाल्या, "मी आयुष्यभर रुग्णांवर चांगले उपचार होतील यासाठी प्रयत्न केले. तसेच चांगले डॉक्टर निर्माण व्हावे यासाठी मेहनत केली. मात्र काही निवासी डॉक्टर बनावट आणि अपुरी माहिती असलेले थिसीस सबमिट करतात."
"याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होतो आणि मला आरएमओ आणि मुलांच्या नातेवाईकांकडून रहिवाशांबद्दल अनेक तक्रारी येतात. त्यामुळे हे व्यवस्थित तपासल्याशिवाय स्वाक्षरी करता येत नाही. त्यामुळे होत असलेल्या आरोपात काही तथ्य नाही," असं वर्मा यांनी म्हटलं.
'प्राध्यापकांचीही बाजू समजून घेतली पाहिजे'
डॉक्टरांची प्राध्यापक संघटना असलेली महाराष्ट्र टीचर असोसिएशन मुंबई या संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिनेश धोडी त्यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला. ज्या विभागप्रमुखांवर आरोप झाले आहेत त्याही या संघटनेच्या सदस्य आहेत.
यावेळी डॉक्टर दिनेश धोडी म्हणाले, "याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती व्यवस्थित चौकशी करून योग्य कार्यवाही करेल. मात्र प्राध्यापकांची बाजू देखील समजून घेतली पाहिजे. कारवाई करताना त्यांच्यावर अन्याय होऊ नये. विद्यार्थी डॉक्टरांनी मागणी केली त्यानुसार एकतर्फी कारवाई नको."
या घटनेसंदर्भात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिला डॉक्टरांशी बीबीसी मराठीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्या माध्यमांशी संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाही, असे त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितलं.
पुढील काळात त्यांची यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया आल्यास येथे अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)