'शिरुरकर, माळी सर नि दहावी पास करणारे कामगार'; 'आता थांबायचं नाय'मधील पात्रांची काय आहे खरी गोष्ट?

फोटो स्रोत, Uday Shirurkar
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
'आता थांबायचं नाय!' हा मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संघर्ष, जिद्द आणि आत्मविकासाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात आहे.
हा चित्रपट त्यातील प्रेरणादायी कथेमुळे सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील वास्तविक कथा ही मुंबईत घडलेली आहे.
मनोरंजनाच्या दृष्टीने चित्रपटातील कथेत काही बदल आहेत. पण वास्तविक या चित्रपटाची कथा आणि पात्र प्रत्येक सामान्य कर्मचाऱ्याच्या संघर्षाची, जिद्दीची आणि स्वयंविकासाची कहाणी सांगतो.
चित्रपटात मनोरंजनाच्या दृष्टीने कथेत बदल करण्यात आले आहेत.
मात्र, 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांसाठी धडपड करणाऱ्या रियल हिरोंची खरी गोष्ट काय आणि सध्या हे रियल हिरो काय करतात, याचाच आढावा बीबीसी मराठीच्या टीमने घेतला आहे.

फोटो स्रोत, X/@ZeeStudios_
या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत उदयकुमार शिरुरकर. तेच ज्यांची भूमिका प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे.
उदयकुमार शिरुरकर हे मुंबई महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त, ज्यांनी 2017 मध्ये 23 कामगारांना मुंबईतील डोंगरीच्या मॉडेल नाईट हायस्कूल रात्रशाळेतून दहावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रेरित केलं.
शिरुरकर यांच्याबरोबर रात्र शाळेचे शिक्षक निलेश माळी यांनी देखील खऱ्या जीवनामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी आणि भूमिका बजावली आहे.
तर, मुंबई महापालिकेच्या चतुर्थश्रेणी वर्गातील 23 कर्मचाऱ्यांनी आपल्या संघर्षातून मेहनतीने दहावीचे शिक्षण त्यावेळी कसं पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात काय बदल झाले, याचं चित्रण या चित्रपटात आहे.
मात्र, त्यांची सद्यस्थिती चित्रपटापेक्षा थोडी वेगळी आहे, हे त्यांच्याशी संवाद साधल्यावर कळते.
चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली सर्वच पात्रे आज एक वेगळं आयुष्य जगत आहेत. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या त्यांच्या भूमिकेपेक्षा या सर्व पात्रांचे खरे आयुष्य आनंदी आणि प्रेरणा देणारं आहे.
संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी
"प्रत्येक समस्येचं समाधान असतं, ते शोधा," या तत्त्वज्ञानावर कार्य करणाऱ्या उदयकुमार शिरूरकर यांचं आयुष्य हे केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील समाजभान असलेला लढवय्या म्हणूनही आज ओळखलं जातं.
बेळगावचे मूळ रहिवासी असलेल्या शिरूरकर यांचे वडील कारवारमध्ये व्यवसाय करत होते, तर आई बेळगावची होती.
शिरूरकर यांनी बेळगावमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुंबई महापालिकेत नोकरीला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी केवळ कागदोपत्री निर्णय न घेता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केलं.
शिरूरकर यांचे कामगारांशी फार जिव्हाळ्याचे संबंध. कामगार करत असलेल्या कामाचं त्यांना भान होतं. त्यामुळे कर्मचारी वारंवार त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी करायचे.
शिरूरकर यांनीही या कामगारांच्या पगार वाढीसाठी आणि पदोन्नतीसाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला.
महापालिकेत काम करणारे अनेक कर्मचारी दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकले नव्हते. शिरूरकर यांनी हे ओळखलं आणि त्यांच्यासाठी रात्रशाळा आणि दहावी परीक्षा यांचं मार्गदर्शन सुरू केलं.
त्यात 2016 मध्ये पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील दहावी पूर्ण न करू शकलेल्या 23 विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली. असंख्य अडचणी असतानाही 23 चतुर्थ श्रेणी कर्मचारी दहावी पास झाले.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
2018 मध्ये 74 कर्मचाऱ्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यातले 26 जण उत्तीर्ण झाले. हे फक्त आकडे नाहीत, ही आयुष्य बदलणारी आकडेवारी आहे.
"दहावी पास नसते, तर हे कर्मचारी कामगार म्हणूनच निवृत्त झाले असते," असं शिरूरकर ठामपणे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
शिरूरकर म्हणतात, "आजही अनेकजण मला सांगतात की, त्यांच्या घरी, परिसरात मी लावलेली शिक्षणाची ज्योत अजून पेटत आहे. माझ्या या संकल्पनेतून अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील दहावी-बारावीचं शिक्षण दिलं."
2018 जून महिन्यामध्ये शिरूरकर हे महापालिकेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी कमी झाली नाही. त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतलं आणि समाजाचं आपण पुढेही काहीतरी देणं लागतो, अशा भूमिकेतून आजही ते सामाजिक कार्य करत आहेत.
ते समाजात न्यायापासून वंचित असणाऱ्या आणि कोर्टापर्यंत पोहचू न शकणाऱ्या सर्वसामान्यांचे खटले लढतात. तसेच त्यांना मार्गदर्शन करतात.
तर दुसरीकडे पर्यावरण विषयक न्यायालयीन लढ्यांमध्ये ते आजही सक्रिय आहेत. पर्यावरणपूरक टॉयलेटसारख्या संकल्पना त्यांनी राबवल्या आहेत. हे टॉयलेट्स आज गोवा आणि बेंगळुरूच्या खासगी बससेवा वापरत आहेत. हेच त्यांचं पुढचं योगदान आहे.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
त्यांच्यावर कर्तव्यदक्ष असण्यावरुन अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. कधी फेरीवाल्यांवर कारवाई करताना, तर कधी अनधिकृत इमारतींवर कारवाई करताना त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
पण शिरूरकरांचे निर्णय ठाम असायचे. शिरूरकर यांचे ड्युटीवरचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर आजही व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ते रस्त्यावर अतिक्रमण हटवताना दिसतात.
ही कारवाई केवळ कारभारासाठी नव्हती, ती ॲम्बुलन्स व अग्निशमन दलाला मोकळा मार्ग मिळावा, यासाठी होती. त्यामुळे काही वेळा त्यांच्यावर टीकाही झाली, परंतु त्यांनी ती सकारात्मकपणे घेतली, असं ते सांगतात.
त्यांनी वाडी बंदर परिसरात रेल्वे ट्रॅक लगत धोका निर्माण करणारी इमारत रिकामी करण्याचंही धाडस दाखवलं. पालिकेत नोकरीवर असताना त्यांना 'सिंघम' म्हणूनही ओळखले जायचे.
ते पत्नी, मुलगा आणि मुलीसह वडाळा येथे राहतात. 2018 मध्ये ते सेवानिवृत्त झाले, पण आजही सामाजिक आणि शैक्षणिक कामांमध्ये सक्रिय आहेत.
अंधारात प्रकाश पेरणारा शिक्षक
दिवस संपतो तिथून त्यांच्या शाळेची सुरुवात होते. ही आहे डोंगरी येथील मॉडेल नाईट हायस्कूल शाळेतील निलेश माळी यांची कहाणी.
धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबे गावचे मूळ रहिवासी असलेले निलेश माळी सध्या डोंबिवलीत पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहतात. ते मुंबईतील न्यू मॉडेल शाळेत रात्रशाळेतील अर्धवेळ शासकीय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दहावी पास होण्यासाठी महत्त्वाची भूमिका निलेश माळी या शिक्षकांनी बजावली.
या सर्व विद्यार्थ्यांचं आयुष्यात भलं झालं, मात्र आजही आम्ही रात्र शाळा शिक्षक काही मागण्यांसाठी संघर्ष करतोय, असं ते सांगतात.

2017 मध्ये राज्य सरकारनं रात्रशाळेतील अर्धवेळ शिक्षकांसाठी शासन निर्णय काढला. त्यात 'समान काम, समान वेतन' आणि अनेक चांगले निर्णय या रात्र शाळा शिक्षकांसाठी घेण्यात आले होते. परंतु, आजही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
निलेश माळी यांच्यासह सुमारे 250 शिक्षक आजही समान वेतन, सुविधा आणि मान्यता मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
"दुसऱ्या शिक्षकांप्रमाणे आम्हाला वेतन नाही, सोयी नाहीत, ही आमची व्यथा आहे," असं माळी स्पष्टपणे सांगतात.
ते पुढे म्हणतात, "नि:स्वार्थ काम करतोय. त्याचं फलित कधी ना कधी मिळेल, हीच आमची आशा आहे."
2 हजार मानधनापासून सुरू झालेली यात्रा
माळी यांनी फक्त 2 हजार रुपयांच्या मानधनावर शिक्षकाची नोकरी सुरू केली. पुढे शिक्षण सेवक या नात्याने मानधन 4 हजारांवर गेलं, तरीही ते म्हणतात, "मी शिकवतोय कारण शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे. पैसा हे साधन आहे, ध्येय नाही."
आज काही लोक रात्रशाळा बंद करण्याच्या मागे लागले आहेत. मात्र, माळी ठामपणे म्हणतात, "एकही विद्यार्थी असला, तरी रात्रशाळा बंद करता येत नाही. ही फक्त शाळा नाही, ही दुसऱ्या संधीची आशा आहे."
कर्मचाऱ्यांचे जीवन बदलणाऱ्या या रात्रशाळा बंद करण्याचं धोरण म्हणजे शोषित वर्गाच्या शिक्षणावर कुऱ्हाड चालवणं आहे, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
माळी यांना या चित्रपटांबाबत विचारलं असता ते सांगतात, "हो, कर्मचाऱ्यांचे आयुष्य दाखवलं आहे, पण त्यात थोडा 'मीठ मसाला' आहे, थोडं मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून सादर केलं आहे. पण आमचं खरं जीवन त्याहून वेगळं आणि खडतर आहे."
निलेश माळी हे फक्त शिक्षक नाहीत. ते एक सांघिक आशेचे प्रतिक आहेत. आपल्या एका विद्यार्थ्यासाठीदेखील रात्रभर शिकवणारा हा शिक्षक शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते 'प्रकाशाचा किरण' आहेत.
"रात्रशाळा हे शिक्षणाचं अखेरचं आश्रयस्थान आहे आणि आम्ही हे जपतो आहोत," असं माळी अभिमानाने सांगतात.
"शिकायला वय लागत नाही, मन लागतं'
"शिकायला वय लागत नाही, मन लागतं," हे सांगणाऱ्या मुंबई महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी योगिता प्रदीप कासारे यांची कहाणी आज हजारो कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी ठरते आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातल्या मूळ रहिवासी असलेल्या योगिता कासारे यांचं खरं आयुष्य संघर्षमय, पण जिद्दीचं आहे.
38 वर्षांच्या ठाण्यात राहणाऱ्या योगिता कासारे 2012 पासून सफाई विभागात कार्यरत आहेत. 2003 मध्ये दहावीत 3 विषयात नापास झाल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं होतं.
पण 2017 मध्ये पालिका सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या प्रेरणेने पुन्हा दहावीला प्रवेश घेतला. "त्या वयात शिकायला सुरुवात केली, तेव्हा अनेक जण हसले, पण सरांनी खंबीर पाठिंबा दिला. आम्ही तिघी महिला कर्मचाऱ्यांनी ते आव्हान पूर्ण केलं," योगिता त्या आठवणी आनंदाने सांगतात.
योगिता कासारे यांच्या कुटुंबात अपंग आई-वडील, दोन मुलं आणि पती आहेत. पती ड्रायव्हर म्हणून काम करतात. घराचा आर्थिक भार मोठा असूनही शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी 2016 मध्ये घेतला.
"दहावी झाल्यानंतर वेतनामध्ये वाढ झाली, पण त्यापेक्षा मोठं समाधान म्हणजे माझं नाव परिसरामध्ये बोर्डावर झळकलं," त्या आनंदाने सांगतात.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
मुंबईसारख्या मोठ्या शहरात सफाई कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला.
त्या म्हणतात, "जयश्री कांबळे या चित्रपटातील पात्रासारखंच माझं जीवन आहे. मला संघर्ष, शिक्षण आणि बदलाची आस आहे."
"दहावी पास झाल्यावर पुढे कॉलेजचं शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं, मात्र, घरगुती अडचणींमुळे ते पूर्ण करता आलं नाही. माझी इच्छा अजून जिवंत आहे, मी लवकरच ऍडमिशन घेईन आणि कॉलेज पूर्ण करीन," असा निर्धार त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.
योगिता कासारे यांच्या प्रेरणेमुळे अनेक सहकारी कर्मचाऱ्यांनीही पुढे शिक्षण सुरू केलं. त्या म्हणतात, "माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी दहावीचा अभ्यास सुरू केला आणि पासही झाले. शिक्षण हे खरंच आयुष्य बदलू शकतं."
"कासारे या सध्या मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमध्ये सफाई विभागामध्ये कार्यरत आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पगारामध्ये वाढ झाली. आर्थिक प्रगती झाल्यामुळे घराच्या प्रगतीला हातभार लागला", असं त्या सांगतात.
दैनंदिन जीवनात आपलं शहर स्वच्छ ठेवणाऱ्या, अपंग आई-वडिलांची सेवा करणाऱ्या, दोन मुलांचं शिक्षण चालू ठेवणाऱ्या आणि स्वतःचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या योगिता कासारे यांसारख्या महिला चित्रपटांमध्ये नाही, तर आपल्या आजूबाजूला आहेत.
संघर्षातून उभं राहणाऱ्या या महिला म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील हिरो आहेत.
जयश्री कांबळे यांचं संघर्षमय जीवन
"घराबाहेर निघण्याची वेळ ठरलेली, पण परतण्याची नाही," असं सांगताना जयश्री रामदास कांबळे खूप थकलेल्या वाटतात. पण त्यांच्या बोलण्यात जिद्द दिसते. वयाच्या 39 व्या वर्षीही त्यांच्या आयुष्याचा संघर्ष थांबलेला नाही.
आजकाल शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. पण काही लोकांसाठी शिक्षण हा एक लांबचा आणि अवघड प्रवास ठरतो. 2017 मध्ये रात्र शाळेमध्ये जयश्री कांबळे यांनी देखील दहावी उत्तीर्ण केली.
39 वर्षीय जयश्री रामदास कांबळे मुंबई महापालिकेच्या बी बोर्डमध्ये सफाई विभागात कार्यरत आहेत. त्या पनवेल येथे आपल्या आई-वडील, मुलगा आणि पती यांच्यासह राहतात. त्यांनी शिक्षण किती महत्त्वाचं असतं याचा अनुभव घेतला, परंतु त्यांचे जीवन अजूनही संघर्षमय आहे.
"2017 मध्ये मी दहावी पूर्ण केली, कारण शिरूरकर सरांनी सांगितले की, दहावी पास झाला तर पगारात थोडी वाढ होईल. हे ऐकून मी दहावीच्या शिक्षणाला सुरूवात केली," जयश्री सांगतात.
सफाई कर्मचाऱ्याच्या नोकरीत असताना, एक छोटा पगार आणि कुटुंबाची देखभाल यामध्ये संतुलन साधणं, हे त्या वेळच्या परिस्थितीत कठीण होईल, हे समजून त्या शिक्षणाच्या वाटेवर गेल्या आणि दहावी उत्तीर्ण झाल्या.
मात्र, आजही त्यांच्या जीवनात काहीही बदल झालेला नाही. जयश्री सांगतात, "दहावी पूर्ण केल्यावर थोडी आर्थिक प्रगती झाली. माझ्या पगारात थोडी वाढ झाली, पण घरचं संपूर्ण पालनपोषण अजूनही माझ्यावरच आहे."

"रोज पहाटे अडीच वाजता उठून मुंबईत ड्युटीला जायचं आणि ड्युटी संपल्यावर घरी परत येऊन कुटुंबाची काळजी घेणे, ही दिनचर्या बनली आहे. हे रोजचं धकाधकीचं जीवन नेहमीच शारीरिक आणि मानसिक थकवा आणतं," असे जयश्री सांगतात. याच धकाधकीमुळे त्यांना निरंतर आरोग्याशी संबंधित समस्या येतात.
"दिवसभराच्या कामामुळे शरीराचं कामकाज व्यवस्थित चालत नाही. परंतु, त्यावर काहीच उपाय नाही," जयश्री नमूद करतात. दररोजच्या परिश्रमाने आजारपणाशी तडजोड करावी लागते, पण तरीही त्यांचा जिवंत राहण्याचा संघर्ष चालू आहे.
"माझ्या दहावीच्या शिक्षणानंतर घरची आर्थिक जबाबदारी, वेळेची टंचाई यामुळे मी पुढे कॉलेजला जाणं किंवा अधिक शिक्षण घेणं शक्य झालं नाही. पण शिक्षणाने फरक पडतो. इतर महिलांना आणि कर्मचाऱ्यांना हे सांगण्याची इच्छा आहे की, शिक्षण पूर्ण करा. शिक्षण आपल्याला आत्मसन्मान देतं आणि भविष्य उज्वल करतं," जयश्री सांगतात.
गोवंडीतील सफाई कामगार ते सुपरवायझर
अनिल पवार यांनी 26 वर्षांनंतर पुन्हा दहावीचा फॉर्म भरला आणि पास होऊन आपलं आयुष्य पालटून टाकलं. शिक्षणानं पवार यांना नवा आत्मविश्वास दिला.
अनिल पवार हे मूळचे कोकणातील गुहागरचे रहिवासी.
सध्या ते मुंबईतील जी उत्तर विभाग कार्यालयात वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता (सुपरवायझर) म्हणून काम करतात. पूर्वी ते बी वॉर्ड ऑफिसमध्ये कीटकनाशक विभागात कनिष्ठ कामगार होते. गोवंडी परिसरात राहणाऱ्या पवार यांचं आयुष्य शिक्षणानं आमूलाग्र बदललं.
चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल पवार यांचं 1991 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर शिक्षण थांबलं. आयुष्य कष्टात गेलं. पण 2017 मध्ये 'मॉडेल नाईट हायस्कूल'च्या माध्यमातून दहावीचा फॉर्म भरला.
वय होतं 46 वर्ष – पण आत्मविश्वास तरुणांच्या तोडीचा होता. "26 वर्षांनी पुस्तके उघडली आणि नव्या आयुष्याची सुरुवात झाली," असं ते बीबीसी मराठीशी बोलताना अभिमानाने सांगतात.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
2016 मध्ये मॉडेल नाईट हायस्कूलमध्ये दहावी पूर्ण करण्यासाठी वर्गात एकूण 42 विद्यार्थी होते. त्यापैकी 23 जण मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी. त्यात तीन महिला कर्मचारी देखील होत्या. या सर्वांमध्ये अनिल पवार ज्येष्ठ. त्यामुळे वर्गात त्यांच्याकडं आदरानं पाहिलं जायचं.
"पूर्वी मी फवारणी कर्मचारी होतो, आता सुपरव्हीजन करतो. हे शिक्षणामुळं शक्य झालं," असं सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंद होता.
दहावी पास झाल्यावर पगारात वाढ झाली, सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. आज ते एक मुलगा आणि मुलीसोबत गोवंडीमध्ये समाधानी आयुष्य जगत आहेत.
"चित्रपटातील 'भरत जाधव' म्हणजे मीच," असं ते अभिमानानं सांगतात.
सामाजिक संदर्भ असलेल्या एका चित्रपटात भरत जाधव यांचं पात्र अनिल पवार यांच्या आयुष्याशी साम्य सांगतं.
"हो, ते पात्र माझ्यावर आधारित आहे, थोडं मनोरंजनाचं मिश्रण आहे, पण मूळ संघर्ष आणि प्रेरणा खरी आहे," असं ते नम्रपणे सांगतात.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण वेळ अपुरा पडला.
"दहावी झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण ड्युटी आणि जबाबदाऱ्यांमुळे नियमितपणे जाता आलं नाही. मात्र अजूनही शिकायचं स्वप्न आहे. तो दिवाही पुन्हा पेटवायचा आहे," असं पवार शेवटी नमूद करतात.
अनिल पवार यांचं आयुष्य सांगतं की, शिक्षणासाठी कधीच उशीर झालेला नसतो. वय, अडचणी, जबाबदाऱ्या यांच्यावर मात करत आपल्याला दुसरी संधी मिळवता येते, फक्त जिद्द लागते.
'यंदा मुलीच्या दहावीत, स्वतःची दहावी आठवली'
दहावीचा अभ्यास करत असलेल्या मुलीला मदत करताना, गणेश रघुनाथ कदम यांना आठवली 2017 ची त्यांनी दिलेली दहावी परीक्षा.
आज 46 वर्षांचे गणेश कदम हे मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डमधील जल विभागात कार्यरत आहेत. शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला. दहावी होण्यापूर्वी कदम रिक्षा चालवून थोडेफार पैसे कमवायचे. कारण इतर उत्पन्नाचे काही साधन नव्हते. मात्र, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या उत्पन्नात थोडी वाढ झाली आणि मग आता अधिकचे कष्ट त्यांना करावे लागत नाहीत.
मूळचे साताऱ्याचे रहिवासी असलेले कदम 1998 मध्ये दहावीत अपयशी ठरले.
"शिरूरकर साहेबांनी एकदा सांगितलं. दहावी पास झालात तर वेतन श्रेणीत वाढ होईल. तेव्हा वाटलं, खरंच शिक्षणाला पर्याय नाही. त्यामुळं तेव्हा दहावीचं शिक्षण घेतलं," असं बीबीसी मराठीशी बोलताना गणेश कदम सांगतात.
2016 मध्ये महानगरपालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत त्यांनी दहावीचा फॉर्म भरला आणि 2017 मध्ये यशस्वीपणे परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. दहावी पास झाल्यानंतर त्यांना पगारात 5 हजार रुपयांची वाढ मिळाली.
"आधी आमच्यापेक्षा कमी वयाचे पण दहावी पास सहकारी आमच्यापेक्षा अधिक पगार घेत होते. आता आम्ही ते अंतर मिटवलं," असं कदम समाधानानं सांगतात.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
सध्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या कदम यांच्या मुलीची यावर्षी दहावीची परीक्षा होती. "तिचा अभ्यास घेताना मला माझं दहावी मधलं वर्ष आठवत राहायचं. तिला शिकवताना मी पुन्हा एकदा त्या पुस्तकांमध्ये हरवत होतो," ते हसत सांगतात.
मुलगी, मुलगा, पत्नी आणि लहान भाऊ असं त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. शिक्षणाने त्यांचं आयुष्य भरभराटीच्या वाटेवर आलं.
"दहावीनंतर कॉलेजला अॅडमिशन घेतलं होतं, पण नोकरीच्या वेळेमुळे शक्य झालं नाही. मात्र अजूनही शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. वेळ मिळाला की पुढे पुन्हा शिकणार," अशी ठाम भावना ते व्यक्त करतात.
चित्रपटात सिद्धार्थ जाधव यांनी त्यांच्यावर आधारित पात्र साकारलं, असं ते सांगतात. "चित्रपटात थोडा 'फिल्मी मसाला' होता. पण खरं आयुष्य वेगळं असतं, शिक्षणानं आयुष्यात बदल झालाय आणि आता आनंदानं आम्ही जगत आहोत," असं कदम स्पष्ट करतात.
"वय कितीही असो, शिकायला उशीर कधीच झालेला नसतो," असं ते म्हणतात.
गणेश कदम यांचं आयुष्य हे जणू शिक्षणाच्या दिव्यानं उजळलेला दीपस्तंभ आहे. यंदा मुलीच्या अभ्यासातून स्वतःच्या आठवणी जागवणारे हे वडील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक जिवंत प्रेरणास्त्रोत आहेत.
कर्मचाऱ्याच्या संघर्षाची, जिद्दीची कहाणी
पालिका अधिकारी उदय शिरूरकर, शिक्षक नितेश माळी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी गणेश कदम, अनिल पवार, जयश्री कांबळे आणि योगिता कासारे यांच्यासारखेच इतर 19 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एक वेगळी कहाणी आहे.
'आता थांबायचं!' नाय हा चित्रपट प्रत्येक सामान्य कर्मचाऱ्याच्या संघर्षाची, जिद्दीची आणि स्वयंविकासाची कहाणी सांगतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेरणा देणारा ठरतो; तसेच हा चित्रपट ज्या व्यक्तींवर प्रेरित होऊन बनवला गेलाय, त्यांचं खरं आयुष्य प्रेरणादायी आहे. त्यातील काहींचं आयुष्य आजही संघर्षमय आहे.

फोटो स्रोत, Uday Shirurkar
'आता थांबायचं नाय' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले असून या चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
चित्रपटात उदयकुमार शिरुरकर यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी अभिनय केला आहे.
2017 वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणीतील 23 कर्मचाऱ्यांनी आपली ड्युटी बजावत आपलं दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. त्या रियल हिरोंचं आयुष्य आता थोडं वेगळं आहे. शिक्षणामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडला आहे. 23 पैकी काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि काही वेतन वाढ मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातही बदल घडलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












