You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्षातल्या शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठीसाठी
ग्रहण म्हणजे काय, ते कसं लागतं? त्याबाबतच्या अनेक गोष्टींमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण हे 17-18 सप्टेंबर दरम्यान झाले. हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला होतं.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. या दरम्यान चंद्र आणि पृथ्वीतील अंतर सर्वांत कमी होऊन चंद्र नेहमीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी मोठा आणि अधिक चमकदार दिसतो. तसंच, तो पौर्णिमेचा चंद्र असल्यानं आणखी मोठा दिसतो यामुळे त्याला सुपरमून तसंच पेरिगी मून असंही म्हणतात.
उत्तर गोलार्धातील शरद ऋतूतील पिकांशी संबंधित असल्यामुळे सप्टेंबरच्या पौर्णिमेला हार्वेस्ट मून असंही म्हटलं जातं.
यावर्षींच चंद्रग्रहण हे पेनंब्रल (छायाकल्प) चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत. खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण आणि पेनंब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या प्रच्छायेखाली झाकला जातो.
सूर्याच्या विरुद्ध दिशेला कोनात पडणाऱ्या ग्रह किंवा उपग्रहाच्या सावलीला प्रच्छाया म्हणतात. खंडग्रास चंद्रग्रहणात, चंद्राचा फक्त एक भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असतो. पण जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्या पुसटशा सावलीनं जे ग्रहण दिसतं, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण किंवा penumbral lunar eclipse असं म्हणतात.
कधी कधी सावलीतला हा फरक मानवी डोळ्यांना चटकन लक्षात येईल इतका प्रभावी नसतो. अतिशय छोट्या स्वरूपाचं हे ग्रहण असतं.
पेनंब्रल' म्हणजे काय?
सावल्या दोन प्रकारच्या असतात. प्रकाशाला रोखणारी कोणतीही वस्तू दोन प्रकारच्या सावल्या निर्माण करत असते. अतिशय घनदाट असलेल्या सावलीला अम्ब्रल सावली म्हणतात. तर हलक्या आणि पसरट सावलीला पेनंब्रल सावली म्हटलं जातं.
म्हणजेच, अम्ब्रल भागात पूर्ण सावली पडलेली असते. तर पेनंब्रल भागात सावलीचा काही भागच पडलेला पाहायला मिळतो.
चंद्रग्रहणाची वेळ काय?
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या माहितीनुसार भारतात हे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी दिसायला सुरुवात झाली.
सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी चंद्र अंशतः झाकण्यास सुरुवात झाली आणि सकाळी 8 वाजून 45 मिनिटांपर्यंत या स्थितीत राहिलं.
सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी हे ग्रहण संपले. तर, अमेरिकेतून हे चंद्रग्रहण 17 सप्टेंबरला संध्याकाळी दिसले.
हे चंद्रग्रहण भारतातून दिसेल का?
भारतातील लोकांना हे चंद्रग्रहण पाहता आले नाही. ग्रहणाच्या वेळेनुसार सकाळच्या वाढत्या सूर्यप्रकाशामुळे भारतात हे चंद्रग्रहण दिसले नाही.
भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांसह जगभरातील अनेक देशांत दिसले.
चंद्राला ग्रहण कसं लागतं?
परिभ्रमणादरम्यान जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं.
चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या तुलनेत व्यापक स्तरावर दिसून येतं.
चंद्रग्रहणांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, मात्र सूर्यग्रहणात असं करता येत नाही. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.
सुपरमून, ब्लूमून आणि ब्लडमून म्हणजे काय?
सुपरमून : ही एक खगोल शास्त्रीय घटना आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आला की त्या घटनेला सुपर मून म्हणतात. 14 पट जवळ आल्यामुळे तो मोठा दिसतो. पौर्णिमेचा चंद्र असल्यानं तो आणखी मोठा दिसतो. याला पेरिगी मून असंही म्हणतात.
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वांत जवळच्या (म्हणजेच 3,56,500 किलोमीटरच्या) परिघावरून फिरतो. त्या स्थितीला पेरिगी असं म्हणतात. तर, जेव्हा हे अंतर दूर (म्हणजेच 4,06,700 किलोमीटर) असतं, त्या स्थितीला अपोगी असं म्हणतात.
ब्लूमून : एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लूमून असं म्हणतात.
ब्लडमून : चंद्रग्रहणादरम्यान पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे पृथ्वीवरून बघताना चंद्र काळा दिसायला हवा. पण पृथ्वीवरच्या वातावरणामुळे तो लाल दिसतो. याला ब्लडमून असं म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.