खग्रास सूर्यग्रहण भारतातून कधी दिसेल? लोक ग्रहणं का पाहतात?

खग्रास सूर्यग्रहणाविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे कारण 8 एप्रिलला अमेरिकेत हे ग्रहण दिसणार आहे.

भारतातून ते पाहता येणार नाही. पण काहीजण हे ग्रहण पाहण्यासाठी भारतातूनही तिकडे प्रवास करून गेले आहेत.

वर्षातून काहीवेळा ग्रहणं दिसतात. पण पृथ्वीचा मोठा भाग महासागरांनी व्यापला आहे. त्यामुळे जमिनीवरून सूर्यग्रहण दिसणं आणि त्यातही खग्रास सूर्यग्रहण हे तसं दुर्मिळ.

अनेकांना तर आयुष्यात एखादंच असं ग्रहण पाहण्याची संधी मिळते. पण काहीच्या आयुष्यात अशी अनेक ग्रहणं पाहण्याचा योग येतो. काही लोक खास ग्रहण पाहण्यासाठी लांबवर प्रवासही करतात. अशा लोकांना Eclipse Chasser – ग्रहणाचा पाठलाग करणारे लोक किंवा ग्रहणवेडे लोक असं म्हणता येईल.

खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण त्यापैकीच एक आहे. आजवर त्यांनी पाहिलेल्या खग्रास सूर्यग्रहणांविषयी त्यांनी हा लेख लिहिला आहे :

स्वतंत्र भारतातलं पहिलं सूर्यग्रहण

खग्रास सूर्यग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. ते निसर्गातलं एक अत्यंत सुंदर, अलौकिक असं दृश्य आहे.

1980 साली 16 फेब्रुवारीच्या दिवशी झालेलं खग्रास सूर्यग्रहण मला आजही स्पष्ट आठवतं. त्यावेळी तब्बल आठ एक दशकांनंतर भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार होतं. (स्वतंत्र भारतातलं ते पहिलं खग्रास सूर्यग्रहण होतं.)

म्हणून मी त्यावेळी अनेक ठिकाणी फिरून शंभर व्याख्यानं दिली होती, ग्रहणाविषयी लोकांना माहिती दिली होती. दक्षिण भारतातून हे ग्रहण दिसणार होतं.

आम्ही तेव्हा कारवारजवळ अंकोला या गावी मराठी विज्ञान परिषदेची सहल घेऊन गेलो होतो. खग्रास सूर्यग्रहण हे त्यावेळेच्या पिढीत आधी कुणी पाहिलं नव्हतं.

त्यामुळे भारतात औत्सुक्य होतं आणि भीतीपण होती. अंकोला गावात लोक दारं खिडक्या बंद करून बसलेले होते. मी एका घराचा दरवाजा ठोठावला, तर ते म्हणाले, आम्हाला सरकारनं सांगितलंय, ग्रहण बघू नका डोळे खराब होतील.

अर्थात ग्रहण हे त्यासाठी बनवलेल्या खासस चष्म्यातूनच पाहायला हवं. आम्ही त्यावेळी मराठी विज्ञान परिषदेतर्फे असे चष्मे सोबत घेऊनच गेलो होतो.

खग्रास सूर्यग्रहणात आधी खंडग्रास स्थिती पाहायला मिळते. जसजसं चंद्र सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू लागतो, तसं आधी शॅडोबँड्स दिसतात. म्हणजे छायाप्रकाश लहरी. (अंधार आणि प्रकाशाच्या लाटांसारख्या या लहरी दिसतात.)

आम्ही पांढरी चादर अंथरली होती, त्यावर त्या छायाप्रकाश लहरी दिसल्या. आमच्या शर्टावरही दिसल्या. सुंदर दृश्य. त्याचे फोटो मात्र काढता येत नाहीत.

आकाशात आम्हाला डायमंड रिंग दिसली – हिऱ्याच्या अंगठीसारखं दृश्य. ते काही सेकंदच दिसलं आणि लगेच चंद्रबिंबानं सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकलं.

खग्रास स्थिती सुरू झाली होती. आम्ही चष्मे काढून टाकले.

अतिशय सुंदर असं प्रभाकिरिट दिसलं, ज्याला इंग्रजीत कोरोनो म्हणतात. भर दुपारी आकाशात बुध दिसला, शुक्र दिसला, व्याध तारा दिसला.

आणि सगळीकडे काळोख होता. म्हणे घड्याळात किती वाजले हे दिसेल पण पुस्तक वाचता येणार नाही असा तो काळोख होता.

त्यावेळी तापमान दहा अंशांनी उतरलं होतं. पशुपक्षी स्तब्ध झाले होते. ही सगळी निरीक्षणं आम्ही नोंदवली.

आम्ही सोबत काही रोपं घेऊन गेलो होतो. रात्र झाली की लाजाळूचं झाड पानं मिटतं, टाकळ्याची पानं रात्री मिटतात हे आपल्याला माहित आहेच. ग्रहणाच्या काळातही लाजाळूच्या झाडानं पानं मिटली होती.

चंद्रबिंब बाजूला झालं आणि सूर्याचा पहिला किरण आला. तेव्हा आमच्यापैकी एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, हा तर पश्चिमेला सूर्योदय होतोय. (तेव्हा सूर्य पश्चिमेला होता.)

पुन्हा डायमंड रिंग, छायाप्रकाश लहरी दिसल्या. तेव्हा कोंबडा आरवला, तो आवाजही आमच्या टेपरेकॉर्डरनं रेकॉर्ड केला आहे.

भारतात पुढचं ग्रहण कधी दिसेल?

भारतात 1980 नंतर 24 ऑक्टोबर 1995 रोजी खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. ते बघायला आम्ही फत्तेपूर सिक्रीला पुन्हा मराठी विज्ञान परिषदेची सहल घेऊन गेलो होतो. ते ग्रहण मात्र काही सेकंदांपुरतंच होतं. मला वाटतं 50-55 सेकंदांपुरतं होतं.

त्यानंतर भारतात 11 ऑगस्ट 1999 रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसलं. त्यावेळी आम्ही गुजरतमध्ये भुज इथे गेलो होतो. पण ऑगस्ट महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ असल्यानं आकाश ढगाळ होतं. त्यामुळे ग्रहण नीट पाहता आलं नाही.

मग 22 जुलै 2009 रोजी उत्तर भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार होतं. आम्ही ते पाहण्यासाठी इंदूरला गेलो होते. तिथेही पावसाळ्यामुळे ग्रहण नीट दिसू शकलं नाही.

त्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायचा योग आला. 15 जानेवारी 2010 रोजी कन्याकुमारीत जवळजवळ आठ एक मिनिटं ते ग्रहण अगदी मस्त दिसलं. कंकणाकृती ग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. पण ते पाहणंही वेगळा अनुभव असतो.

भारतात 2019 सालीही दक्षिणेत आणि 2020 साली उत्तरेत कंकणाकृती ग्रहण झालं.

त्याशिवाय अमेरिकेत पेज इथून मी एक कंकणाकृती ग्रहण पाहिलं अणि 2024 चं ग्रहण पाहण्यासाठीही अमेरिकेत आलो आहे. यावेळी तर एक धूमकेतूही आला आहे आणि तो ग्रहणाच्या काळात पाहण्याची संधी मिळू शकते.

आपल्याकडे खगोलमंडळं आणि हौशी विज्ञानप्रेमींचे ग्रुप आहेत, तसंच इथेही आहेत. ते एकत्र येऊन ग्रहण पाहतात.

भारतात आता यापुढचं खग्रास सूर्यग्रहण 2034 साली काश्मीरमधून दिसणार आहे.

लोक ग्रहण पाहण्यासाठी का जातात?

अनेकजण खास ग्रहण पाहण्यासाठी अगदी लांबवर प्रवास करून जातात. लोकांना ही उत्सुकता का वाटत असावी?

जसे आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारकरी जातात ना, तसं ग्रहण पाहण्यासाठी विज्ञानप्रेमी आणि संशोधक जात असतात. निरीक्षणं नोंदवतत असतात. त्यातून काहीतरी वेगळं समोर येऊ शकतं.

पेजला तर आम्ही गहू चाळायच्या चाळणीतून पिन होल कॅमेऱ्यासारखं ग्रहणाचं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयोग केला होता. असे अनेक प्रयोग करता येतात.

हे करायला हवं कारण ग्रहणासारख्या घटनांतून लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करता येते. उल्कापात, धूमकेतू अशा गोष्टीही म्हणूनच मुलांना दाखवायला हव्या.

असं सांगतात की विजयदुर्ग किल्ल्यावर एका ग्रहणादरम्यान घेतलेल्या नोंदींमधून हेलियमचा शोध लावण्यास मदत झाली.

सूर्याचं प्रभामंडळ आणि सनस्पॉट यांच्यातल्या संबंधावर अभ्यासही ग्रहणादरम्यान केला गेला आहे.

अशा गोष्टींमुळेच खगोलप्रेमी ग्रहणं पाहण्यासाठी प्रवास शक्य असेल तर आवर्जून जातात.

तसं खंडग्रास सूर्यग्रहणांमध्येही निरीक्षणं नोंदवता येतात. कंकणाकृती ग्रहणातही पूर्ण अंधार होत नाही. पण खग्रास सूर्यग्रहण मात्र अलौकिक दिसतं, त्यात अंधार पडतो आणि तारेही दिसतात. ही गोष्ट लोकांना आकर्षक वाटते.

ग्रहणांविषयी भीती नको

प्राचीन काळापासून ग्रहणाविषयी लोकांच्या मनात भीती होती. दिवसा अंधार होतो त्यामुळे अनेक गैरसमज पसरले. लोक धार्मिक कारणांमुळे घाबरायचे. पण त्यात काही तथ्य नाही.

ग्रहणांमुळे काहीही अशुद्ध होत नाही. लोक ग्रहणानंतर स्नान करायचे, पाणी वगैरे ओतून द्यायचे. पण मग तळ्यातलं पाणी तर तेच असतं ना. ते कसं अशुद्ध ठरेल?

आता लोक तसं घाबरत नाहीत, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शाळांमधूनही मिळालेलं शिक्षण यामुळे भीती कमी झाली आहे.

पण ग्रहणात एक पथ्य मात्र पाळायलाच हवं – ते म्हणजे सूर्याकडे खग्रास स्थिती वगळता साध्या डोळ्यांनी कधीच पाहायचं नाही.

(शब्दांकन जान्हवी मुळे)

संबंधित बातम्या