You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प: 'मी स्वतः पुतिन यांना फोन केला; झेलेन्स्की-पुतिन यांची भेट घडवण्यासाठी माझे प्रयत्न'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपियन नेत्यांची भेट घेतली. त्याआधी गेल्या शुक्रवारी (15 ऑगस्ट) अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि ट्रम्प यांची भेट झाली होती.
ट्रम्प यांच्या भेटीच्या वेळेस झेलेन्स्की यांनी सूट घातला होता. दोन्ही नेत्यांमध्ये सामंजस्य दिसून येत होतं. पत्रकारांनी याबद्दल त्यांना प्रश्नही विचारले.
पत्रकारांच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं ही ट्रम्प यांनीच दिली.
रशिया आणि युक्रेनदरम्यान शस्त्रसंधीवर बोलताना त्यांनी म्हटलं की, कोणत्याही शांतता प्रस्तावावर युक्रेनला सुरक्षेची हमी देण्यासाठी अमेरिका त्यांच्या बरोबर असेल आणि त्याची खात्री देईल.
त्यांनी म्हटलं की, शस्त्रसंधीबद्दल चर्चा करण्यासाठी युद्ध विरामाची आवश्यकता नाही.
ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, चर्चा संपल्यानंतर मी स्वतः पुतिन यांना फोन केला होता.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून म्हटलं की, "मीटिंग संपल्यानंतर मी पुतिन यांना कॉल केला आणि झेलेन्स्की-पुतिन यांच्या भेट घडवून आणण्याच्या दृष्टिने हालचाली करायला सुरूवात केली आहे.
या बैठकीनंतर तीन जणांची चर्चा होईल ज्यामध्ये हे दोन राष्ट्राध्यक्ष आणि मी स्वतः असेन आपण अमेरिका आणि रशियाच्या नेत्यांसोबत बैठक करण्याच्या बाजूने असल्याचे संकेत झेलेन्स्की यांनी दिले. त्यांनी म्हटलं की, युद्ध राजनैतिक मार्गांचा वापर करून थांबविण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेचं युक्रेनी नागरिक समर्थन करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
अमेरिकेकडून सुरक्षेच्या हमीबद्दल बोलतान झेलेन्स्कींनी म्हटलं की, "युक्रेनचं लष्कर मजबूत असायला हवं.त्यासाठी शस्त्रास्त्रं, ट्रेनिंग, गुप्त माहिती मिळवणं या सर्वांचीच आवश्यकता आहे."
झेलेन्स्की आणि युरोपियन नेत्यांसोबत ट्रम्प रात्रीचे जेवणही घेतील. त्यानंतर एक बहुपक्षीय बैठक होईल आणि झेलेन्स्की पत्रकारांशी संवाद साधतील.
ट्रम्प यांच्या भेटीनंतर युरोपियन नेत्यांनी काय म्हटलं?
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध थांबविण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर युरोपियन नेत्यांनीही वक्तव्यं केली आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं की, ही चर्चा सकारात्मक होती आणि आम्ही सुरक्षेच्या हमीसह इतर संवेदनशील विषयांवर चर्चा केली.
ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी म्हटलं की, सुरक्षेची हमी आणि रशिया, युक्रेन तसंच अमेरिकेसोबत त्रिपक्षीय बैठक हे एक 'ऐतिहासिक पाऊल' असेल.
जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी रशियासोबत कोणत्याही बैठकीचच्या आधी युद्ध विरामाच्या आवश्यकतेवर जोर देताना ट्रम्प यांना म्हटलं की, यावर आपण काम करूया आणि रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करूया.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनीही ही चर्चा पूर्ण युरोपच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचं म्हणत युद्ध विरामाच्याच मागणीचा पुनरूच्चार केला.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं की, अशी घटना पुन्हा होऊ नये हीच शांततेची पूर्वअट आहे आणि सर्वांत महत्त्वपूर्ण प्रश्नांपैकी हाच एक आहे.
युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेअन यांनी युक्रेनच्या मुलांना प्राथमिकता देण्याची गरज व्यक्त केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)