मनू भाकर आणि खेलरत्न पुरस्कारावरुन का वाद होतोय?

फोटो स्रोत, Getty Images
पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारावरुन सध्या जोरदार चर्चा घडताना दिसत आहे.
सोमवारी माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त प्रसारित झाले होते की, क्रीडा मंत्रालयाच्या 12 सदस्यीय पुरस्कार समितीने ज्या खेळाडूंची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे, त्यामध्ये मनू भाकरचं नाव नाहीये.
या वृत्तांनंतर मनू भाकर आणि खेलरत्न पुरस्कार या दोन्हींवरुन जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे या प्रकरणावरुन जोरदार चर्चा चाललेली असताना, काल मंगळवारी (24 नोव्हेंबर) मनू भाकर, तिचे वडील राम किशन आणि तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनीही या प्रकरणी वक्तव्य केलं आहे.
यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल आणि 10 मीटर मिक्स्ड एअर पिस्टल क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
2021 मध्ये मनू भाकरने 'बीबीसी इमर्जिंग इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर 2020'चा पुरस्कारही जिंकला होता.
'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर'च्या अंतर्गतच 'बीबीसी इमर्जिंग इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर 2020' अवॉर्ड कॅटेगरीमध्ये उदयोन्मुख महिला खेळाडूचा सन्मान केला जातो.
भारतीय महिला खेळाडूंचा आणि त्यांच्या कामगिरीचा सन्मान करणे, महिला खेळाडूंसमोर असलेल्या आव्हानांची चर्चा करणे तसेच त्यांच्या ऐकलेल्या आणि न ऐकलेल्या गोष्टी जगासमोर आणणे हा 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर'चा उद्देश आहे.
मनू भाकरने काय म्हटलं?
भारतीय नेमबाज मनू भाकरने खेलरत्न अवॉर्डशी निगडीत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
मनुने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं आहे की, "सर्वांत प्रतिष्ठित अशा खेलरत्न पुरस्कारासाठी माझं नामांकन न मिळण्यावरुन जो वाद सुरु आहे, त्याबद्दल मी असं म्हणू इच्छिते की, एक खेळाडू म्हणून माझं काम देशासाठी खेळणं आणि चांगली कामगिरी करणं, हे आहे. पुरस्कार आणि सन्मान मला निश्चितच प्रोत्साहन देतात; मात्र, ते माझं उद्दिष्ट नाही."

फोटो स्रोत, ANI
"मी असं मानते की, नामांकन भरताना माझ्याकडूनच काहीतरी कमतरता राहिलेली असेल. मी त्यामध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. पुरस्कार मिळो अथवा ना मिळो, मला देशासाठी पदक आणण्यासाठी प्रेरितच राहिलं पाहिजे. कृपया कुणीही कसलेही अंदाज बांधू नयेत, असं माझं आवाहन आहे," असंही तिने म्हटलं आहे.


मनू भाकरकडून नामांकन अर्ज भरताना चूक झाली का?
26 ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मनू भाकरच्या अकाऊंटवरुन केल्या गेलेल्या एका पोस्टवरुन वाद झाला होता.
या पोस्टमध्ये मनू भाकरने दोन्ही पदकं हातात घेऊन एक फोटो टाकला होता. त्या फोटोवर लिहिलं होतं की, "मला सांगा, मी ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी लायक आहे का? धन्यवाद."
या पोस्टवर फारच जोरदार चर्चा झाली होती. मात्र, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली होती.

फोटो स्रोत, X
मनू भाकरच्या या पोस्टच्या दोन दिवस आधीच क्रीडा मंत्रालयाने 2024 साठी 'खेलरत्न'सहित सर्व पुरस्कारांसाठीचे अर्ज मागवले होते. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे होते.
क्रीडा मंत्रालयाने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर रात्री 11.59 मिनिटांपर्यंत निश्चित केली होती.
मनू भाकरच्या वडिलांनी काय म्हटलं?
या सर्व वादादरम्यान, मनू भाकरचे वडील राम किशन यांनी बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी हरपिंदर सिंह टौहडा यांच्याशी संवाध साधला आहे.
त्यांनी म्हटलं की, मुलांनी खेळाडू होण्याऐवजी प्रशासनात जाणं अथवा नेता होणं अधिक चांगलं आहे. कारण, प्रशासनातील एक लहानशी व्यक्तीही लाखो खेळाडूंचं आयुष्य खराब करुन टाकते.
"जर तुम्हाला एखाद्याला खेळाडू करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहता. याहून चांगलं हेच आहे की, तुमच्याकडेच ती ताकद असेल. त्यामुळे, तुम्ही आयएएस-आयपीएस अधिकारी वा मंत्री होणं, हेच चांगलं आहे."
मनू भाकरच्या वडिलांनी असंही म्हटलं की, क्रीडा मंत्रालयाकडे ही संधी आहे की, त्यांनी आपली चूक सुधारावी आणि मनू भाकरला पुरस्कार द्यावा.

या बातम्याही वाचा:

"पुरस्कारांची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये ऑलिंपिक खेळलेला फक्त एकच सदस्य होता तर बाकी सगळे प्रशासनातील अधिकारी होते. ऑलिंपिक खेळणारा माणूसच ऑलिंपिकचं महत्त्व जाणू शकतो. न्यायाधीश आणि प्रशासनातील अधिकारी जर समितीमध्ये असतील तर तेच त्या समितीचं नियंत्रण करतील," असंही राम किशन यांनी म्हटलं.
पुरस्कारासाठी अर्ज करण्यामध्ये काही कमतरता राहिली आहे का, या प्रश्नावर राम किशन यांनी म्हटलं की, "यामध्ये नोकरीसाठी अर्ज थोडीच करायचा होता? हा तर खेळाचा एक सन्मान असतो, जो सरकार खेळाडूंचा करते. मनूने अर्ज केला की नाही, हा प्रश्नच नाहीये. ज्यांना आजवर पुरस्कार मिळाला आहे त्यांनी अर्ज केला होता का, हा मुद्दा आहे. गेल्या ऑलिंपिकमधून जे आले होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तर अर्ज केलेला नव्हता."

फोटो स्रोत, ANI
"मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन, नीरज चोप्रा, मोहम्मद शमी यांनी अर्ज केलेला नव्हता. मनु तीन-चार वर्षांपासून अर्ज करत होती मात्र, तिला हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. अर्ज करणे वगैरे हा वाद निर्माण करण्यासाठीचा एक बहाणा आहे. खेलरत्नपासून तिने पद्मश्री आणि पद्मभूषणसाठीही अर्ज केला होता. अगोदरच ठरवलेल्या यादीवर शिक्का मारला जातो आणि ज्या समितीने नावे निश्चित केली होती त्या समितीला श्रेय दिले जाते."
मनू भाकरला अशी आशा होती की, तिला पुरस्कार मिळेल, कारण ती त्यासाठी पात्र आहे. तसेच, ती या पुरस्कारासाठी लायक आहे की नाही, हे त्यांच्या हातात नसून देशवासीयांच्या हातात आहे, असंही राम किशन यांनी म्हटलं आहे.
ती आता खेळणारच नाही, अशा स्वरुपाच्या बातम्याही पसरवल्या जात असून त्या साफ खोट्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मनू भाकरने ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. राहुल गांधी यांची भेट घेतल्यामुळेच तिला पुरस्कार दिला जात नसल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.
मनूला पुरस्कार न मिळण्यामागे असं काही राजकीय कारण आहे का, या प्रकारच्या दाव्याला तिच्या वडिलांनी ठामपणे फेटाळून लावलं आहे. मनू भाकरशी सगळेच भेटले होते, असंही त्यांनी म्हटलं.
कोच जसपाल राणा यांनी काय म्हटलं?
मनू भाकरचे वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचा निषेध केला. तसेच, या वादासाठी त्यांनाच जबाबदार ठरवलं.
मनूने अर्ज केला नव्हता, असं कुणीही म्हणू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.
जसपाल राणा म्हणाले की, "एका ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकून इतिहास रचणारी ती पहिली महिला आहे. तिचं नाव तर आपोआप त्या यादीत गेलं पाहिजे. वरच्या स्थानी बसलेल्या या लोकांना मनू भाकर कोण आहे आणि तिची पात्रता काय आहे, याची कल्पना खरंच नाहीये का?"

फोटो स्रोत, ANI
क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारासाठी जी 12 सदस्यीय समिती स्थापन केली आहे, त्याचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यन आहेत. याच समितीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार राणी रामपाल यांचाही समावेश आहे.
फेडरेशन आणि इतर संस्था खेळाडूंना पुरस्कारासाठी नामांकित करु शकतात. तसेच खेळाडूदेखील स्वतःला नामनिर्देशित करू शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











