मांजरींचा छळ करून ठार करणाऱ्यांचं विकृत नेटवर्क - BBC च्या तपासातून भीषणता उघड

    • Author, टोनी स्मिथ आणि अँगस क्रॉफर्ड
    • Role, बीबीसी न्यूज इन्व्हेस्टिगेशन्स

(सूचना: या लेखात प्राण्यांवरील क्रौर्याचं वर्णन आणि माहिती आहे.)

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्यांवर अत्याचार करणारं एक नेटवर्क असून त्यांनी मांजरी आणि मांजरीच्या पिल्लांवर अत्याचार केल्याचे व्हीडिओ ऑनलाईन शेअर केले असून त्याचे युकेमध्ये सदस्य आहेत, असं बीबीसीला आढळून आलं आहे.

असं मानलं जातं की, या नेटवर्कमध्ये हजारो सदस्य आहेत आणि ते मांजरींना दुखापत करण्याचे, मारल्याचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करतात, शेअर करतात आणि विकतात सुद्धा.

एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपवर व्हीडिओ पोस्ट करतात आणि विकतात.

एका एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपवर एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर ब्रिटनमधील सदस्य युजर्सना आरएसपीसीएकडून (रॉयल सोसायटी फॉर द प्रीव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स) मांजरीचं पिल्लू दत्तक घेऊन त्यावर अत्याचार करण्यास, त्याचा छळ करण्यास सुचवत असल्याचे पुरावे बीबीसीला सापडले.

दोन किशोरवयीन मुलांना पश्चिम लंडनमधील रुइसलिपमधील पार्कमध्ये मांजरीच्या दोन पिल्लांचा छळ करून त्यांना मारून टाकल्याबद्दल शिक्षा झाल्यानंतर बीबीसीनं यासंदर्भात तपास सुरू केला.

यातील एका 17 वर्षांच्या मुलाला 12 महिन्यांच्या कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. तर दुसऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीला नऊ महिन्यांची कोठडी देण्यात आली. कायदेशीर कारणांमुळे या दोघांचं नाव देता येणार नाही.

त्यापूर्वी त्यांनी मांजरींना ठार केल्याची कबूली दिली होती. या मांजरी कापलेल्या आणि दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी चाकू, ब्लोटॉर्च (जाळ निर्माण करणारं उपकरण) आणि कात्री देखील सापडल्या.

पोलीस आता मांजरींवर अत्याचार करणाऱ्यांच्या व्यापक नेटवर्कशी संबंधित संभाव्य दुवे शोधत आहेत. हा ग्रुप मांजरींच्या छळाचे व्हीडिओ तयार करतो. तसंच एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपवर हे व्हीडिओ आणि फोटो पोस्ट करतो आणि त्याची विक्री करतो.

मांजरांचा छळ करणाऱ्यांचं मोठं नेटवर्क

या ग्रुप्सची सुरुवात चीनमध्ये झाली होती. मात्र याचे सदस्य युकेसह जगभरात सक्रिय असल्याचं बीबीसी न्यूजच्या तपासातून समोर आलं आहे.

फेलाइन गार्डियन्स या प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी या नेटवर्कच्या व्याप्तीचं दस्ताऐवजीकरण केलं आहे.

या गटाचं म्हणणं आहे की, मे 2023 ते मे 2024 दरम्यान दर 14 तासांमध्ये मांजर किंवा मांजरीच्या पिल्लाचा छळ केल्याचा आणि त्यांना ठार केल्याचा एक नवीन व्हीडिओ अपलोड करण्यात आला.

त्यांनी म्हटलं आहे की, यावर्षी त्यांनी 24 सक्रिय गटांची नोंद केली आहे.

यातील सर्वात मोठ्या गटात 1,000 हून अधिक सदस्य होते.

यातील सर्वात विकृत आणि सर्वाधिक छळ करणाऱ्यानं 200 हून अधिक मांजरींचा छळ केल्याचे आणि त्यांना ठार केल्याचे व्हीडिओ तयार केल्याचं मानलं जातं.

या मेसेजिंग ॲपवरील चॅटिंग बीबीसीनं पाहिली आहे. एका गटाच्या चॅटिंगमधील संभाषणात मांजरींचा छळ करण्यासाठी त्यांना कसं पकडायचं याची चर्चा करण्यात आली होती. त्यात युकेमधील अकाउंट असल्याचं दिसून आलं.

या गटातील एका सदस्यानं आरएसपीसीएकडून मांजरींची पिल्लं कशी दत्तक घ्यायची याची चर्चा केली. त्यानं यासाठीचे फॉर्मदेखील पोस्ट केले.

तर आणखी एकानं विक्रीसाठी असलेल्या मांजरींच्या पिल्लांची युकेमधील एक जाहिरात पोस्ट केली होती. त्यात लिहिलं होतं की त्यांना "मांजरींचा अतोनात छळ करायचा आहे".

मांजरांना वाचवण्यासाठी काम करणाऱ्या लारा

लारा या फेलाईन गार्डियन्सच्या एक कार्यकर्त्या आहेत. मांजरींचा छळ करणारे बदला घेऊ शकतात या भीतीनं आम्ही त्यांचं पूर्ण नाव दिलेलं नाही.

त्या म्हणाल्या, "दररोज माझं ह्रदय पिळवटून निघतं, मी दु:खी होते. असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी माझ्या मनाला वेदना होत नाहीत."

त्या या फोरम्समध्ये गुप्तपणे वावरल्या आहेत. त्या म्हणतात की मांजरीचा छळ करणारे कोणत्या थराला जाऊ शकतात, ते मांजरींना किती वेदना देऊ शकतात, किती छळ करू शकतात याला मर्यादा नाही.

त्या याचं वर्णन, 'दुष्टंपणाचं टोक' किंवा 'वाईटाची परिसीमा' असं करतात.

बीबीसीनं पाहिलेले व्हीडिओ, फोटो अत्यंत विचलित करणारे आहेत.

यात मांजरींना बुडवून विजेचा धक्का देण्याच्या व्हीडिओंचा समावेश आहे. एका व्हीडिओत तर पिंजऱ्यातील मांजरीच्या पिल्लाला अन्न दिलं नाही, तर ते किती काळ जिवंत राहील याचा अंदाज लावण्यात आला आहे.

लहान मुलंही होत आहेत सहभागी

या विकृत ग्रुपमधील सदस्यांमध्ये मांजरींचा जास्तीत जास्त, शक्य तितका छळ करण्याची इच्छा दिसून येते.

हे छळ करणारे लोक ऑनलाइन चॅटिंगमध्ये सांगतात की एखाद्या मांजरीचा जास्त काळ छळ करण्यासाठी मांजरीला शुद्धीत आणण्यासाठी विजेच्या धक्क्याचा कसा वापर करायचा.

नव्या सदस्यांना या मोठ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मांजरींचा छळ करण्यास आणि त्याचे व्हीडिओ पोस्ट करण्यास प्रोत्साहन दिलं जातं.

मुलं या ग्रुपमध्ये सहभागी होत असल्याचं दाखवणारे पुरावे बीबीसीनं पाहिले. एका सदस्यानं पोस्ट केलं होतं, "मी 10 वर्षांचा आहे आणि मला मांजरींचा छळ करायला आवडतं."

100 मांजरी मारण्याची स्पर्धा

सप्टेंबर 2023 मध्ये या नेटवर्कनं तर '100 मांजरी मारण्याची' स्पर्धादेखील घेतली होती.

या स्पर्धेमध्ये या गटात 100 मांजरींचा किती लवकर छळ करून त्यांना मारलं जाऊ शकतं, यासाठी सदस्यांना प्रोत्साहन देण्यात आलं होतं.

मांजरींच्या भयानक छळाचे व्हीडिओ 2023 मध्ये पहिल्यांदा चीनमध्ये व्हायरल झाले.

वांग चाओई हा दोन अत्यंत भयानक व्हीडिओंसाठी जबाबदार होता. त्याला चीनमधील अधिकाऱ्यांनी 15 दिवस ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या या कृतीबद्दल 'पश्चातापाचं पत्र' त्याला जारी करण्यास लावलं होतं.

मात्र वांगच्या व्हीडिओमुळे त्याचे फॉलोअर्स तयार झाले आणि इतर जण देखील चीनमधील आणि पाश्चात्य सोशल मीडियावर याच प्रकारचे व्हीडिओ, फोटो पोस्ट करू लागले.

एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स विकसित होण्यापूर्वी या प्रकारच्या व्हीडिओंना हजारो व्ह्यूज मिळाले होते.

एक वेबसाईट तर स्वत:ला 'मांजरप्रेमी समुदाया'चं ठिकाण (कॅट-लव्हर कम्युनिटी) म्हणवून घेते. तसंच ही वेबसाईट युजर्सना त्यांचं काम म्हणजे 'व्हीडिओ तिथे अपलोड करण्याची' विनंती करते.

तिथे प्रवेश मिळवण्यासाठी युजर्सना त्यांनी मांजरीचा छळ केल्याचे पुरावे तिथे सादर करावे लागतात.

लिटल विनी कोण आहे?

'लिटल विनी' हे नाव मांजरींचा छळ करणाऱ्यांच्या समुदायात चांगलंच प्रसिद्ध आहे. या 'लिटल विनी'च्या प्रोफाईल फोटोमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची खिल्ली उडवणारा विनी द पूहचा फोटो असतो.

या नावानं असलेल्या आणि असाच प्रोफाईल फोटो असलेल्या, अकाउंटना अनेक फोरममध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हटलं जातं.

फेलाईन गार्डियन्स या संस्थेच्या एका कार्यकर्तीनं लिटल विनीवरील त्या अकाउंटपैकी एकाशी संपर्क साधला आणि ते अकाउंट चालवणाऱ्या माणसाला प्रलोभन दाखवून त्याच्याशी ऑनलाइन संबंध निर्माण केला.

"मला त्याच्याशी मोकळेपणानं संवाद साधताना आणि नंतर त्याच्याशी मैत्री करताना घृणास्पद किंवा किळसवाणं वाटलं," असं त्या कार्यकर्तीनं सांगितलं. तिला तिचं नाव सांगायचं नव्हतं.

तिनं अनेक आठवडे त्या व्यक्तीशी संवाद ठेवला आणि नंतर त्या नेटवर्कमध्ये शिरकाव केला.

"तिथे मांजरींच्या छळाचे एकापाठोपाठ एक न संपणारे व्हीडिओ होते. मला ते पाहवत नव्हतं. मी जरी त्याला मेसेज करत असले, तरी 'मी ते पाहू शकत नाही'. त्यामुळे ते सुरू ठेवण्यासाठी मला माझा मेंदू एकप्रकारे बंद किंवा निष्क्रिय करावा लागला," असं ती म्हणाली.

शेवटी त्या कार्यकर्तीनं ते अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीला व्हीडिओ कॉल करण्यासाठी राजी केलं. त्या कॉलवरून त्या माणसाची ओळख पटवण्यात आली. तो जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये राहणारा एक 27 वर्षांचा तरुण होता.

बीबीसीनं जेव्हा त्याच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यानं या प्रकारच्या कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारलं.

फेलाईन गार्डियन्स संस्थेच्या लारा यांनी आम्हाला सांगितलं की कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि सरकारांनी अशा ग्रुप्सवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

त्या म्हणाल्या, "हे वाढतच जाईल, अशा प्रकारांमध्ये वाढ होत जाईल आणि त्याचं स्वरुप आणखी वाईट होत जाईल."

फेलाईन गार्डियन्स संस्थेनं लंडनमधील चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शनं केली आहेत. मांजरीचा छळ करणाऱ्या या नेटवर्कवर चीनमधील अधिकाऱ्यांनी अधिक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

'आधुनिक प्राणीप्रेमी समाजात अशा गोष्टींना स्थान नाही'

लारा म्हणाल्या, "चीनमध्ये या प्रकारांना आळा घालणारे किंवा ते थांबवणारे कोणतेही कायदे नाहीत. त्याचा अर्थ, मांजरींचा छळ करणारे आणि अत्याचार करणारे त्यांना काय करायचं ते करू शकतात आणि कोणत्याही कारवाईशिवाय किंवा परिणामांना तोंड न देताना या अत्यंत दु:खद कल्पना अंमलात आणू शकतात."

"मांजरींच्या छळाचे हे व्हीडिओ मग वेबसाईटवर अपलोड केले जातात. ही एक जागतिक समस्या आहे. कारण प्रत्येकालाच हे व्हिडिओ पाहता येतात. मुलं असे व्हीडिओ पाहत आहेत."

इयान ब्रिग्ज आरएसपीसीए (रॉयल सोसायटी फॉर द प्रीव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स) च्या स्पेशल ऑपरेशन युनिटचे प्रमुख आहेत.

इयान यांनी बीबीसीला सांगितलं, "प्राण्यांना अशी वागणूक देणं अजिबात स्वीकारार्ह नाही. आजच्या आधुनिक समाजात, जिथे मोठ्या प्रमाणात प्राण्यांविषयी दया बाळगणारे आणि प्राणीप्रेमी लोक आहेत, अशा ठिकाणी या गोष्टींना कोणतंही स्थान नाही."

जोहाना बॅक्सटर खासदार आहेत, तसंच मांजरीवरील सर्वपक्षीय संसदीय गटाच्या (ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप) अध्यक्षा आहेत.

जोहाना म्हणाल्या, "याप्रकारचे गट असणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे. विशेषकरून तरुणांमध्ये असणारी ही प्रवृती मोठ्या चिंतेचा विषय आहे."

"प्राण्यांवर केले जाणारे अत्याचार किंवा त्यांचा केला जाणारा छळ हा अनेकदा भविष्यातील गुन्ह्यांची सुरुवात ठरते. त्यामुळे भविष्यात केल्या जाणाऱ्या हिंसाचाराला योग्य ठरवणं आणि तो करणं सोपं होतं," असं जोहाना पुढे म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)