You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुत्ताकींच्या 'देवबंद' भेटीनंतर जावेद अख्तर यांनी 'मान शरमेनं खाली गेली' असं का म्हटलं?
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी 11 ऑक्टोबर रोजी दारुल उलूम देवबंदला भेट दिली होती. त्यानंतर यावरून आता वाद सुरू झाला आहे.
देवबंद हे उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील एक शहर आहे. 'दारुल उलूम' म्हणजे शिक्षण घेण्याचं ठिकाण.
भारतात दारुल उलूमचे हजारो मदरसे आहेत आणि मौलाना अर्शद मदनी हे त्यांचे प्रमुख आहेत. दारुल उलूमच या मदरसांचा अभ्यासक्रम ठरवते आणि धर्माशी संबंधित विषयही स्पष्ट करते.
बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अनेक मदरशांमध्येही दारुल उलूमचा हाच अभ्यासक्रम वापरला जातो.
मुत्ताकी देवबंदला आले तेव्हा मौलाना मदनी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनी मुत्ताकींची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती.
त्याठिकाणी मोठ्या संख्येनं मदरशांचे विद्यार्थी होते. दारुल उलूमचे प्रमुख आणि जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना मदनी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, देवबंदच्या मदरशात सुमारे 6 हजार विद्यार्थी आहेत आणि ते सर्व त्या वेळी उपस्थित होते.
याशिवाय इतर शहरातील अनेक उलेमाही तिथे आले होते. मौलाना मदनींच्या म्हणण्यानुसार, सुमारे 10 हजार लोक मुत्ताकींच्या स्वागतासाठी आले होते.
जावेद अख्तर यांनी उपस्थित केले प्रश्न
दारुल उलूमने अमीर खान मुत्ताकींना या भेटीत हदीस शिकवण्याची डिग्री (पदवी) दिली. 'कासिमी' असं या डिग्रीचं नाव आहे. जेव्हा देवबंद एखाद्याला कासिमी डिग्री देतं, तेव्हा ती व्यक्ती हदीस शिकवू शकते.
वास्तविक, अमीर खान मुत्ताकी यांचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे. त्यांना भारतात येण्यासाठी यूएनएससीची परवानगी घ्यावी लागली होती. यूएनएससीने मुत्ताकींना 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत भारतात येण्याची परवानगी दिली होती.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला भारताने अजून मान्यता दिलेली नाही, तरीही मुत्ताकींचं स्वागत पूर्ण प्रोटोकॉलनुसार करण्यात आलं. मुत्ताकींच्या देवबंद भेटीतही याचा परिणाम दिसला.
भारतात मुत्ताकींचं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाच स्वरूपाचे प्रश्न पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लोकही विचारत आहेत.
भारताचे प्रख्यात गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी 13 ऑक्टोबर रोजी मुत्ताकींच्या भेटीबद्दल लिहिलं, "जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना तालिबानच्या प्रतिनिधीचं स्वागत केलं जात आणि प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध उपदेश देतात, तेच स्वागत करतात, हे पाहून शरमेनं माझी मान खाली जाते.
देवबंदचीही मला लाज वाटते, त्यांनी त्यांच्या इस्लामी नायकाचे एवढ्या श्रद्धेनं स्वागत केलं. हा व्यक्ती मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी घालणाऱ्यांपैकी एक आहे. माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो, आपल्यासोबत हे काय होत आहे?''
दारुल उलूम देवबंदचे अध्यक्ष मौलाना मदनी यांनाही जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न विचारण्यात आला.
मौलाना अर्शद मदनी यांनी दिलं उत्तर
मौलाना मदनी यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "जावेद अख्तर यांच्या वक्तव्याबद्दल मी इतरांकडून ऐकलं आहे. ते म्हणत आहेत की, तालिबान मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखत आहे, पण असं नाही.
तालिबान फक्त एवढं सांगतं की, मुलं आणि मुली एकत्र शिकणार नाहीत. याच्या विरोधात आम्हीही आहोत. भारतातही अशा अनेक शाळा आहेत, जिथे फक्त मुलीच शिकतात."
मौलाना मदनी म्हणतात, "जर जावेद अख्तर यांची मान यामुळे शरमेने खाली जात असेल, तर आमची मानही त्यांच्या या अशा विचारांमुळे झुकते. जावेद अख्तर यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही.
अशा विचारांमुळेच समस्या निर्माण होत आहेत. हिंदू मुली मुसलमान मुलांसोबत जात आहेत आणि मुस्लीम मुली हिंदू मुलांसोबत जात आहेत. यामुळे संघर्ष वाढत आहे. म्हणून मुलांच्या आणि मुलींच्या शाळा स्वतंत्र असल्या पाहिजेत."
पण हा मुद्दा फक्त जावेद अख्तर यांच्याबद्दल नाही. देवबंदमध्ये मुत्ताकींचं ज्या पद्धतीने स्वागत झालं, त्यावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लोकही टीका करत आहेत.
अफगाणिस्तानचे पत्रकार हबीब खान यांनी 11 ऑक्टोबर रोजी देवबंदमध्ये मुत्ताकींच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा व्हीडिओ 'एक्स'वर पोस्ट केला. त्याबरोबर त्यांनी लिहिलं की,"देवबंदमध्ये तालिबानी मंत्र्याच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहून भारतानं काळजी करायला हवी.
कारण ही गर्ताी दलिबानच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचं दर्शन घडवते. हेच तालिबान देवबंदी मुळांशी पुन्हा जोडलं जात आहे. आत्मघातकी बॉम्बस्फोट करून सत्ता मिळवली अशी संघटना भारतीय मुस्लीमांसाठी प्रेरणादायी ठरू नये."
हबीब खान यांची पोस्ट रिपोस्ट करत पाकिस्तानमधील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे प्राध्यापक तैमूर रहमान यांनी लिहिलं की, "भारताने स्वतःच विनाशाचा मार्ग निवडला आहे. त्यांनी कोंबड्याच्या खुराड्यात कोल्ह्याला आमंत्रित केलं आहे. भारतातील तालिबानीकृत देवबंदी देशात कहर निर्माण करेल."
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचाही चर्चेत समावेश
तैमूर रेहमान म्हणतात की, "तालिबानने अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. इंटरनेटवरही बंदी आहे. तालिबान मध्ययुगीन समाजाचे समर्थन करतो. अशा परिस्थितीत भारतात तालिबानचे स्वागत झाल्यास दोन गोष्टी लगेच घडतील.
पहिली गोष्ट म्हणजे या भागात तालिबान मजबूत होईल आणि यामुळे इस्लामी कट्टरपणा वाढेल. दुसरी गोष्ट अशी की, मुत्ताकींना देवबंदच्या विद्यार्थ्यांनी एखाद्या नायकाप्रमाणे पाहिलं. जर भारतातील मुस्लीम तरुणांनी मुत्ताकींना नायक किंवा हिरो म्हणून पाहिलं तर भारताने याचे परिणाम समजून घ्यायला हवेत."
ते म्हणतात, "पूर्वी पाकिस्तानने तालिबानला मजबूत केलं आणि आता भारत तीच चूक करत आहे. भारत देवबंदी मुस्लिमांवर तालिबानचा प्रभाव समजू शकत नाही. आम्ही तर आमच्या समाजात तालिबानचा प्रभाव पाहिला आहे आणि त्याचे परिणाम भोगतही आहोत.
भारताने तालिबानला बळ दिल्यास त्याचे परिणाम तसेच होतील जे पाकिस्तान आता भोगत आहे. मला वाटतं की, भारत स्वतःच आगीत हात घालत आहे. भारत सतत म्हणत असतो की, पाकिस्तानने इस्लामी कट्टरतावाद वाढवला, पण ते स्वतः तीच चूक का करत आहेत?", असा सवाल रहमान यांनी व्यक्त केला.
मौलाना अर्शद मदनी तैमूर रहमान यांच्या युक्तिवादाशी सहमत नाहीत. त्यांना वाटतं की तालिबानने क्रांती केली आहे आणि लोक या क्रांतीकडे दहशतवादाप्रमाणे पाहत आहेत.
मौलाना मदनी म्हणतात, "माझा असा विश्वास आहे की त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी जगातील मोठ्या शक्तींशी ज्या पद्धतीने लढायला शिकवलं होतं ते अजूनही अबाधित आहे. तालिबानने पाश्चिमात्य देशांना पराभूत केलं, म्हणून त्यांना दहशतवादी म्हटलं जातं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.